Homeसांस्कृतिक / मनोरंजनयुवा गायक अथर्व डाकेने साजरा केला ‘सुरोत्सव’

युवा गायक अथर्व डाकेने साजरा केला ‘सुरोत्सव’

पहिलाच कार्यक्रम हाऊसफुल्ल; टाळ्या, वन्समोअरने रसिकांची दाद

नागपूर, दि. २६ एप्रिल : युवा गायक अथर्व रोहित डाके याने आपल्या मधुर, दमदार आणि भावपूर्ण आवाजाच्या जोरावर ‘सुरोत्सव – म्युझिक फॉर अ कॉज’ या संगीत कार्यक्रमात रसिकांची मने जिंकली. हिंदी व मराठी गीतांची सुरेल मैफल सादर करत त्याने सुर, लय आणि ताल यांचा अप्रतिम संगम साकारला.
श्रीवत्स ज्योतिष विद्यालय आणि जंगोराईताड आदिवासी विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हा कार्यक्रम धरमपेठ येथील वनामती परिसरातील वसंतराव नाईक सभागृहात रविवारी सायंकाळी अत्यंत उत्साहात व दिमाखात पार पडला. नागपूरकरांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत हाऊसफुल्ल उपस्थिती दर्शवली.

अथर्वने ‘वक्रतुंड महाकाय’ या गणेश वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर ‘सूर निरागस हो’ (कट्यार काळजात घुसली), ‘तोच चंद्रमा नभात’, ‘घर से निकलते ही’ आणि ‘मन उधाण वाऱ्याचे’ यांसारखी गीते सादर करत रसिकांची मनापासून दाद मिळवली. प्रत्येक सादरीकरणानंतर टाळ्यांचा कडकडाट आणि ‘वन्समोअर’च्या आरोळ्या कार्यक्रमाची रंगत वाढवत होत्या.

या कार्यक्रमात अथर्वला प्रसिद्ध गायिका सुरभी ढोमणे यांची समर्थ साथ लाभली. त्यांनी शांता शेळके यांच्या ‘मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश’, ‘जय शारदे वागेश्वरी’, तसेच नौशाद यांच्या ‘जवा है मोहब्बत’ आणि ‘सावर रे’ या रचना सादर केल्या.
सुरभी आणि अथर्व यांच्या ‘बहरला हा मधुमास नवा’ या युगल गीताने कार्यक्रमाला विशेष रंगत दिली.
सचिन ढोमणे, सुभाष वानखेडे, प्रमोद बावणे, मनोज चुरगळे, आर्य पुराणकर आणि गोविंद गडकरी यांनी वाद्यसंगतीतून कार्यक्रमाची उंची वाढवली. कार्यक्रमाचे प्रभावी आणि ओघवते निवेदन विघ्नेश जोशी यांनी केले.
अथर्व डाके हा नागपुरातील एक आशादायी युवा गायक असून त्याच्या सादरीकरणातून त्याची शास्त्रीय संगीतावरील भक्कम पकड आणि आत्मविश्वास स्पष्टपणे जाणवला. त्याच्या संगीत प्रवासातील हा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे. विशेष म्हणजे त्याला शंकर महादेवन यांचे आशीर्वाद लाभलेले आहेत. खासदार सांस्कृतिक महोत्सवादरम्यान शंकर महादेवन यांची भेट झाली होती. त्यांनी खूप कौतुक केले होते, अशी आठवण अथर्वने सांगितली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सर्जन डॉ. मदन कापरे, इंजिनिअर दिलीप मसे, जंगोराईताड आदिवासी विकास संस्थेचे संचालक प्रभोध वेखंडे, मंदार वेखंडे आणि अथर्व डाके यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करण्यात आले.
जंगोराईताड आदिवासी विकास संस्थेच्या वात्सल्यम या उपक्रमांतर्गत संस्था संचालक प्रभोध वेखंडे यांनी गर्भवती महिलांना अडचणीच्या काळात मदत करण्यात आली होती. त्या महिलांना अथर्वच्या हस्ते या कार्यक्रमात भेटवस्तू देण्यात आल्या. यावेळी अथर्व ने ‘तारे जमी पर ‘हे गीत सादर केले.
प्रास्ताविक फाल्गुनी नलगे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे पदाधिकारी मुकुंद ऊईके, दीपक त्रिवेदी, किरण वेरूळकर, नितीन वर्मा, रोहित डाके यांचे विशेष योगदान लाभले.
Advertisements

Latest बातम्या