Homeनागपूर न्यूजमौत के साथ-साथ बेहतरीन दुश्‍मनी भी निभा गये.....

मौत के साथ-साथ बेहतरीन दुश्‍मनी भी निभा गये…..

Advertisements

(रविवार विशेष)

जिल्हा न्यायालयाचा ’टायगर’ काळाच्या ओघात गडप

वकीली वर्तुळात अद्यापही ॲड.सुदीप जायसवाल यांच्या मृत्यूवर विश्‍वास नाही

गेल्या रविवारी झाला होता करोनामुळे धक्कादायक मृत्यू

डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)

नागपूर,ता. १६ मे: ‘मेरे दुश्‍मन भी,मेरे मुरीद है शायद,वक्त बेवक्त मेरा नाम लिया करते है,मेरी गली से गुजरते है छूपा के खंजर,रुबरु होने पर सलाम किया करते है’एका शायरची ही शायरी हरफनमौला स्व.ॲड.सुदीप जायसवाल यांच्या व्यक्तिमत्वावर अगदी चपखल बसते.गेल्या रविवारी अचानक त्यांच्या मृत्यूची अभद्र वार्ता येऊन धडकली अन्‌ वकीली वर्तुळात त्यांच्या मित्र परिवारासोबतच त्यांच्याशी वैचारिक ‘वैर’असणा-यांनाही ही वार्ता बुचकळ्यात टाकून गेली.

पत्र-परिषदेनंतर त्यांची नेहमीच गप्पा होत असे,सतत हसतमुख व्यक्तिमत्वाचे धनी असणारे अॅड.सुदीप जायसवाल तेवढ्या वेळात माहीती नाही कसे, किती तरी विषयांना हात घालत असे,अगदी खाकी वर्दीपासून तर भ्रष्ट सिस्टमपर्यंत सगळ्या विषयांवर ते बेधडकपणे बोलत होते.राजकारणावर ते जे काही बोलत असे ते शब्दात ही मांडता येणार नाही. म्हणूनच त्यांचे व्यक्तिमत्व हे एखाद्या ‘निधन वार्ता’मधील फोटो आणि २५ शब्दात नक्कीच सामावणारे नाही,त्यामुळेच हा लेख प्रपंच.

ॲड.सुदीप जायसवाल हे जिल्हा न्यायालयातील महिला वकीलांसाठी मोठ्या भावासारखे होते.त्यांचा खूप आधार जिल्हा न्यायालयाच्या महीला वकीलांना वाटत होता.ते बार असोसिएशनचे अध्यक्ष् असताना पाचव्या माळ्यावरील महिला वकीलांची ५१९ ही खोली ॲड.सुदीप जायसवाल यांचीच आपल्या वकील भगिनींना भेट मानली जाते.

महीला वकील म्हणून अनेकींना अनेकवेळा विविध अडचणींना समोर जावं लागतं तेव्हा एकच नाव प्रत्येकीच्या ओठी असायचं ‘ॲड.सुदीप जायसवाल’एका महिला वकीलला घरमालकाने खूप त्रास दिला,त्यांच्यावर गुन्हा दाखल केला,त्यांना पोलीस ठाण्यात घेऊन जाण्यात आले अश्‍यावेळी त्या महिला वकीलचा फोन फक्त ॲड.सुदीप यांनाच गेला आणि एक सेकंदाचाही वेळ न दवडता ते पोलीस ठाण्यात पोहोचले!रात्रीच त्यांनी पोलीस आयुक्तांना फोन लावला आणि सरळ दमच दिला.

एका महिला वकीलला त्यांचाच क्लाईंट मानसिक त्रास देत होता त्या क्लाईंटला सरळ मार्गावर आनणारे ॲड.सुदीप हेच होते.ॲड.पोर्णिमा जळीत कांड हे महाराष्ट्रात खूप गाजलं होतं.त्यांना मेडिट्रीना रुग्णालयात दाखल करुन घेतल्या जात नव्हते,अश्‍या वेळी आपली संपूर्ण चमू घेऊन ॲड.सुदीप हे मेडिट्रीनाला पोहोचले व ॲड.पोर्णिमा यांच्यावर उपचाराला सुरवात होऊ शकली.

फक्त….५४ वर्षांचं वय होतं!दिलखुलास,दिलदार ,निगर्वी,निष्कपट मनाचा माणूस.जे काही करणार ते खुलेआम म्हणून वै-यांची संख्या ही बरीच होती.जिल्हा बार असोसिएशनच्या निवडणूका याचे दूसरे नाव म्हणजे ॲड.सुदीप जायसवाल हेच होऊ शकतं.हा माणूस ज्याच्या पाठीवर हात ठेवत होता तो हमखास निवडून येण्याची जणू ‘शाश्‍वतीच’होती.

एका माजी मुख्यमंत्र्यांच्या व त्यांच्या राजकीय विचारसरणीच्या गटाचे हाड वैरी होते म्हणजे ’ॲड.सुदीप जायसवाल’.ॲड.सुदीप हे उघडपणे ती विचारसरणी,ते राजकारण,मोठ्या नेत्याप्रतिची काही वकीलांची तत्वनिष्ठा,त्यासाठी प्रसंगी पत्करल्या जाणारी हिणकस लाचारी याचा उघडपणे विरोध दर्शवत होते.ॲड.सुदीप जायसवाल हे एकमेव असे व्यक्तित्व होते ज्यांनी त्यांना जिल्हा बार असोसिएशनमध्ये घूसण्यास अडवून ठेवले होते.

आज ते आपल्यात नाही आणि अजून त्यांची तेरवी देखील व्हायची आहे पण….त्यांनीच निर्मित केलेल्या महीला वकीलांच्या व्हॉट्स ॲप ग्रूपवर एका उजव्या विचारसरणीच्या महिला वकीलाचा संदेश झळकतो ‘ॲड.सुदीप जायसवाल यांचा डीपी ताबडतोब काढा आता’………!मात्र जिल्हा न्यायालयाच्या ‘बार’चा शेर असणारा या ’शेरे-बार’चा डीपी कधीही हटणार नाही असे अनेक महिला वकीलांनी ठणकावून सांगितले,ज्यांना त्यांचा डीपी बघवत नाही त्यांनीच ग्रूपमधून ‘लेफ्ट’होऊन जावे…..!

असेच होते ॲड.सुदीप जायसवाल यांचे बहूआयामी व्यक्तिमत्व…!गेल्या रविवारी जग सोडू गेले तरी आपल्या विचारसरणीला विरोध करणा-या वै-यांच्या चेह-यावर ‘हसू’देऊन गेलेत.…!फक्त महिला वकीलच नव्हे तर जिल्हा न्यायालयातील कर्मचारी आणि न्यायदान क्ष्ेत्रातील सर्वांशीच त्यांचे खूप चांगले सख्य होते.

ते जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष् असताना अनेक उपक्रम त्यांनी सुरु केले,यात वैशिष्ठपूर्ण होते खोली क्र. ५१९ मध्ये म्हणजे महिला वकीलांच्या खोलीत दरवर्षी गणेश चतुर्थीला श्री गणेशाची प्रतिष्ठापणा.दहा दिवस त्या मंगलमय व भक्तीपूर्ण वातावरणात ॲड.सुदीप यांचा उत्साह इतर दिवसांपेक्ष्ाही दांडगा असायचा.आपल्या मुस्लिम सहका-यांसाठी इफ्तार पार्टी देखील ते तेवढ्याच आपुलकीने देत होते.धर्म,जात,पंथ,लिंग,भाषा असा कोणताही भेदभाव या अवलियाजवळ नव्हता….!

जिल्हा न्यायालयातील ॲड.सुदीप यांना ओळखणा-या प्रत्येक व्यक्तिला ॲड.सुदीप म्हणजे काय हे एका वाक्यात कळत होते,ते वाक्य होते ‘मै करुंगा करके दिखाऊंगा’मात्र शेवटच्या क्ष णी त्यांनी मृत्यूला जिंकून नाही दाखवले….आयुष्याला आपलसं नाही करु शकले…मृत्यूपूर्वी व्हाट्स ॲपवर त्यांनी जे अनेक संदेश टाकले ते सर्व ‘फसवे’निघाले…..७ मे रोजी त्यांनी करोनाची लस घेतली,याचे फोटो देखील त्यांनी ग्रूपवर टाकले,तीन दिवसांनी त्यांनी ताप आल्याची माहीती टाकली.करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे सांगून सौम्य लक्ष् णे असल्याचे सांगितले.दर वेळी ते ‘मै आ रहा हूं’असाच मॅसेज टाकायचे.

त्यांना आशा रुग्णालयात दाखल करण्यात आले.उपचार घेताना देखील सतत ते ग्रूपवर सकारात्मक मॅसेज टाकत होते.कोणालाही कल्पना ही नव्हती त्यांचं ‘मै आ रहा हूं’ही साद त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणा-यांसाठी नव्हे तर ज्याच्यावर ‘देव जीवापाड प्रेम करीत होता’त्यांच्याकडे जाण्यासाठी ॲड.सुदीप यांची ती साद होती….!रविवार,ता. ९ मे रात्री ८ वा.त्यांचा मॅसेज होता त्यांची ऑक्सीजन लेवल घसरतेय,रात्री ११.३० वा. कळले त्यांची ऑक्सीजन लेवल ८० पर्यंत आली अन्‌ रात्री १ वाजून ४५ मिनिटावर ग्रूपमध्ये मॅसेज आला…ॲड.सुदीप जायसवाल इस नो मोर…….!

शुद्ध शाकाहारी माणूस,ज्यांनी गेल्या वर्षी लॉकडाऊनच्या काळात पागलखाना चौकात बाबा ताजुद्दीन मनोरुग्णालयासमोर सतत दोन महिने स्वखर्चाने गरीबांना अन्नदान केले,जे अनेकांचे तारहणार होते,जीवलग मित्र होते,महिला वकीलांसाठी भाऊबीज ओवाळणीसाठी हक्काची मनगट होते….त्या पवित्र आत्म्याची गरज या नश्‍वर जगापेक्ष्ा देवालाच अधिक असावी म्हणून कदाचित देवाने या सद् गुणी विभूतीला लगेच आपल्याजवळ करोनाचे निमित्त करुन बोलावून घेतले जणू….!

आणि….महिला वकीलांची एक बोलकी प्रतिक्रिया उमटली ‘ऑल लेडीज लॉयर लॉस्ट देअर बिग ब्रदर!’
ते असते तर पुढे मागे कधीही पुन्हा जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष् सहज बनू शकले असतेच,परिणामी त्यांनी जाता जाता आपल्या वैचारिक मतभेद असणा-यांच्या चेह-यावरही जणू हसूच फूलवून गेलेत म्हणूनच हा शायर म्हणतो ना ‘मौत के साथ-साथ बेहतरीन दुश्‍मनी भी निभा गये…….!

या महान अवलिया व बहूआयामी व्यक्तिमत्वाला ‘सत्ताधीश‘चा मानाचा मुजरा.

Latest बातम्या