Homeनागपूर न्यूजमेयाेमधून ४० करोनाबाधित रुग्णांचे अहवाल गहाळ!

मेयाेमधून ४० करोनाबाधित रुग्णांचे अहवाल गहाळ!

परिचारिकांच्या भरवश्‍यावर कमी लक्ष् णे असणा-या करोनाबाधित रुग्णांवर उपचार

डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)

नागपूर,ता. ६ ऑगस्ट: नुकतीच मेयाे रुग्णालयातून सुटी झालेली एक तरुणी जी कोविडची सुक्ष्म लक्ष् णे दिसल्याने स्वत:हून मेयो रुग्णालयात भरती झाली,तिला पाच दिवसातच सुटी देण्यात आली मात्र तिने तिचे डिर्स्चाज पेपर मागितले असता मेयो रुग्णालयाने ते देण्यास चक्क नकार दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली.एवढेच नव्हे तर या उच्च विद्याभूषित तरुणीने ते पेपर मिळवण्याच्या माझा न्याय हक्क आहे,पेपरशिवाय मी जाणार नसल्याचा वाद घालताच तेथील परिचारिकेने सांगितले,या वार्डातील ४० रुग्णांचे पेपर्स गहाळ झाले आहेत!

विशेष म्हणजे,तिला करोनाची सौम्य लक्ष् णे जाणवल्याने खासगी लॅबमध्ये चाचणी केल्यावर या तरुणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला.खासगी रुग्णालयाऐवजी तिने स्वत:हून महानगरपालिका प्रशासनाला कळवले व त्यांच्याच वाहनाने ती मेयोमध्ये भरती झाली.या पाच दिवसात एक ही ज्येष्ठ डॉक्टर तर सोडा शिकाऊ डॉक्टर देखील तिच्या वॉर्डात फिरकले नसल्याचे तिने सांगितले. एक राऊंडसुद्धा या ‘करोना योद्धांनी ’वार्डात मारला नाही! फक्त परिचारीका येऊन औषध देऊन जात असत.व ऑक्सीजन चेक करणारे ऑक्सीमेटरी लावून जात असत.या पाच दिवसात तिची पुन्हा स्वॅब चाचणी देखील घेण्यात आली नाही. फक्त रक्त चाचणी झाली.

पाचव्याच दिवशी सुटी झाली त्या दिवशी दूपारी १२ वा.तिचे रक्त घेण्यात आले,१ वाजता तिला सांगण्यात आले आज दूपारी ४ वाजता तू घरी जाऊ शकतेस. तिने परिचारिकेला तिच्या डिस्चार्जची कागदपत्रे मागितली.त्यावर असे पेपर तुम्हाला देऊ शकत नसल्याचे परिचारिकेने सांगितले.यावर या तरुणीचा भडका उडून,माझ्यावरील उपचाराचे पेपर मिळवणे हा माझा हक्क असल्याचे सांगून डिस्चार्ज पेपर मिळाल्याशिवाय मी येथून जाणार नसल्याचे ठणकावून सांगितले.

यावर परिचारिकेने एका शिकाऊ डॉक्टरला बोलावून आणले.त्या डॉक्टरने देखील पेपर दिले जात नसल्याचा चमत्कारिक कायदा सांगितला! तुमची पण रिपोर्ट ’मिस प्लेस’झाली असल्याचे कारण सांगितले!सध्या नाही मिळू शकत,असे ते डॉक्टर म्हणाले,यावर या तरुणीने एक तरी रिपोर्ट द्या,मला माझ्या फॅमिली डॉक्टरला ते रिपोर्ट दाखवायचे आहेत, किवा मला मोबाईलमध्ये फोटो तरी घेऊ द्या,अशी मागणी तरुणीने केली.अशी कशी तुम्हाला रिपोर्ट देणार?असा चमत्कारिक सवाल या शिकाऊ डॉक्टरने तरुणीशी केला!चार वाजता रुग्णालयाची गाडी इतर रुग्णांना घेऊन निघून जाईल,तुम्हाला तर रिपोर्ट घेतल्याशिवाय घरी जायचे नसेल आणि तुम्हाला जर तुमचा हक्क हवा असेल तर इथेच बसून रहावे लागेल,असा दम त्या डॉक्टरने तरुणीला दिला. २०० पेशेंटमधून तुमचा रिपोर्ट कसा शोधून देणार?

पाच दिवस मेयोमध्ये भरती असताना या तरुणीला पॅरासिटामल,एंटीबायोटीक देण्यात आले.या उपचारांची तिला रितसर लेखी माहिती हवी होती. तिला ताप,ड्राय कफ आणि डोकेदुखी असल्याने तिने करोनाची चाचणी खासगी लॅबमध्ये करुन घेतली होती. मात्र मेयोमध्ये भरती झाल्यावर अगदी पहिल्याच दिवसापासून तिचा एकदाही ताप मोजण्यात आला नसल्याची धक्कादायक बाब तिने खास ‘सत्ताधीश’ला सांगितली.आई-वडीलांचे वय जास्त असल्याने या तरुणीला लवकर एडमिट होऊन लवकर बरे व्हायचे होते.तरुणीची आत्या या देखील व्यवसायाने डॉक्टर असल्याने तरुणीला त्यांचा सल्ला वेळोवेळी उपयोगी पडला.

आणि…डिस्चार्ज पेपरमधील निगेटीव्ह शब्द खोडला!
आपल्या न्याय हक्काप्रति सजग असलेल्या या तरुणीला डिस्चार्ज पेपरचा मोबाईलने फोटो काढताना पेपरवरील ‘निगेटीव्ह’हा शब्द चक्क खोडण्यात आला!सर्वात महत्वाचे म्हणजे डिस्चार्ज कार्डावर बीपी लिहलंय जे कधी घेतल्याच गेले नाही! इतर ज्या ७ रुग्णांना या तरुणीसोबत सुटी देण्यात आली त्यांच्या डिस्चार्ज कार्डवरील ‘निगेटीव्ह’शब्द मात्र तसाच राहू देण्यात आला.

साेशल मिडीयावर सध्या जागतिक आरोग्य संघटनेवर अनेक गंभीर आरोप करणारे व्हिडीयो व्हायरल झाले आहे. करोनाच्या नावावर लवकरच बाजारात लस उपलब्ध होईल,सध्या गरोदर स्त्रियांनाही स्वाईन फ्लूची लस टोचली जात आहे. या लसीची त्यांना गरज असो किवा नसो! तशीतर ही लस २५६ रु.ची आहे मात्र खासगीत ती ६०० रु.ची विकली जात असल्याची धक्कादायक माहिती समाेर आली आहे. ज्याप्रमाणे स्वाईन फ्लूच्या लस मार्केटींगमागे जागतिक आरोग्य संघटनेला अब्जावधी कमावता आले तशीच आता जगभरातील फार्मा मेडीकलवाल्यांना कोट्याधीश करण्यासाठीच करोनाचा हा जगभरात प्रपोगंडा होत असल्याचा दावा अनेक व्हिडीयोमध्ये अनेक तज्ज्ञ डॉक्टर्सच करीत आहेत!

करोना ही खरंच ‘महामारी’ असती तर प्लेगप्रमाणेच प्रत्येक घरात एक तरी मृत्यूचा आकडा वाढला असता, नागपूर शहरात ३० लाखांच्या लोकसंख्येत २५० मृत्यू,ते ही इतर गंभीर व्याधी असणारेच अधिक असल्याने हा २ टक्क्यांचाच जवळपास मृत्यूदर ठरतो. २ टक्के मृत्यूदराला केंद्र सरकार ने चक्क’महामारी’जाहीर केल्याने अनेक तज्ज्ञ व बुद्धीजीवींनी यात काळेबेरे असल्याचा संशय व्यक्त केला आहे.
शासकीय रुग्णालयातून अखेर रुग्णांचा अहवाल हा जातो कुठे?असा प्रश्‍न आता उपस्थित होत आहे. रुग्णांना सुटी देताना त्यांचा अहवाल न देता तो कोणाला पुरविला जातो?ज्या रुग्णांनी अहवाल मागितला त्यांना त्यांचा करोनाचा अहवाल दिल्यास चक्क ’निगेटीव्ह’शब्द खोडून का दिला जातोय?

याचा अर्थ या तरुणीचे देखील केसपेपर पुढे केंद्र व जागतिक आरोग्य संघटनेत पाठविले जाणार असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.
मेयोमधील गहाळ झालेल्या अहवालाबाबत रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.अजय केवलिया यांना फोन केला असता त्यांनी फोन उचलला नाही.

मनपाचाही भर कागदपत्रांवरच!

मनपा आयुक्तांनी मंगळवारी (ता.४) सर्व झोनल वैद्यकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. आयुक्तांनी सांगितले की, ७ जुलै, २०२० च्या केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार लक्षणे नसलेल्या रुग्णांना होम आयसोलेशनमध्ये ठेवावे. या रुग्णांवर खाजगी रुग्णालयात उपचार केले जात आहे. असे आढल्यास साथ रोग प्रतिबंधक कायद्यान्वये संबंधित खाजगी रुग्णालयावर कारवाई करण्यात येईल. त्यादृष्टीने सर्व झोनल वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपापल्या झोनमधील खाजगी रुग्णालयांची वेळावेळी तपासणी करणे व त्यांच्याकडून रोजची माहिती घेऊन त्याचा अहवाल संबंधित विभागप्रमुखांना रोज सादर करावा, असेही निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.

Latest बातम्या