Homeनागपूर न्यूजमेडीकीलमध्ये वीज पुरवठा खंडीत: करोना रुग्णांचे हाल

मेडीकीलमध्ये वीज पुरवठा खंडीत: करोना रुग्णांचे हाल

Advertisements

नागपूर,ता.१४ मार्च: एकीकडे दररोज कराेना बाधितांचा आकडा शहर तसेच ग्रामीण भागात चिंताजनकरित्या वाढत आहे, अशा परिस्थितीत लक्षणे असलेले रुग्ण स्वत:जून उपचारार्थ रुग्णालयांमध्ये भरती होत आहेत. परंतु मध्य भारतातील सर्वात मोठे शासकीय रुग्णालय अशी ओळख असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात प्रशासनाकडून रुग्णांकडे दुर्लक्ष होत असल्यची घटना पुन्हा एकदा समाेर आली.

रविवारी दि. १४ मार्च रोजी सकाळपासून अचानक कोरोना रुग्ण भरती असलेल्या वार्डातील विज पुरवठा खंडित झाला एवढंच नव्हे तर तो अनेक तास पूर्ववत न झाल्यामुळे वार्डातील रुग्णांना गरमीच्या दिवसांमध्ये चांगलाच मन:स्ताप सहन करावा लागला. यानंतर सायंकाळच्या सुमारास येथील वीज पुरवठा पूर्ववत झाला.

मेडिकल रुग्णालय येथे नागपूर, विदर्भासह मध्यप्रदेश, छत्तीसगड व इतर राज्यातूनही मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचारार्थ येत असतात. कोरोना काळातही येथे मोठ्या प्रमाणात रुग्ण भरती झाले आहेत. कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेता मेडिकलमध्ये कोरोना रुग्णांकरिता जवळपास हजार बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.

आजच्या तारखेत ट्रामा केअरसह इतर वार्डांमध्ये जवळपास अडीचशेच्यावर रुग्ण भरती आहेत. लक्षणे असलेले रुग्ण येथे भरती करण्यात येत आहेत. मेडिकलच्या पहिल्या माळ्यावरील कोविड रुग्णांकरिता असलेल्या वार्ड क्र. १२ मध्ये आज २२ च्या वर रुग्ण भरती आहेत. परंतु रविवारी अचानक या वार्डातील विज पुरवठा खंडित झाला.

यानंतर तेथील रुग्णांनी मेडिकल प्रशासनाला याबाबतची माहिती दिली. परंतु यानंतरही प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष करण्यात आले. दिवसाआड तापमानात वाढ होत आहे. अशा परिस्थितीतही भर दुपारच्या सुमारास या रुग्णांना विज पुरवठा खंडित असल्यामुळे गरमीमध्ये संपूर्ण दिवस ढकलण्याची वेळ येऊन पडली.

यामुळे रुग्णांमध्ये मेडिकल प्रशासनाविरुध्द चांगलाच संताप पहायला मिळाला. सायंकाळच्या सुमारास हा विज पुरवठा पूर्ववत झाला. याशिवाय या वार्डामध्ये रुग्णांना पिण्यासाठी पाणीही उपलब्ध नसल्याचे रुग्णांकडून सांगण्यात आले. या सर्व बाबी गंभीर असून, यावर आता मेडिकल प्रशासन काय उपाययोजना करतात?याकडे जनतेचे लक्ष् लागले आहे.

Latest बातम्या