Homeनागपूर न्यूजमुख्यमंत्र्यांच्या वाढदिवशी गरजूंसाठी ‘अनोखा बाजार’

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवशी गरजूंसाठी ‘अनोखा बाजार’

Advertisements

नागपूर,ता. १८ जुलै २०२६: सोबत पालकत्व प्रकल्प, दि फ्रेण्डस् को-ऑप. हाऊसिंग सोसायटी लि. यांच्या संयुक्त विद्यमाने, श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्ट व सोबत पालकत्‍व प्रकल्‍पाचे अध्यक्ष तथा माजी आमदार संदीप जोशी यांच्या प्रेरणेतून ‘अनोखा बाजार’ या आगळ्यावेगळ्या सामाजिक उपक्रमाला प्रारंभ करण्‍यात येत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्‍य साधून ‘अनोखा बाजार’ या उपक्रमाचे उद्घाटन बुधवार, दि. २२ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता तात्‍या टोपे हॉल, तात्या टोपे नगर, नागपूर येथे होत आहे. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्‍हणून जिल्‍हाधिकारी कुमार आशीर्वाद (आयएएस) यांची उपस्‍थ‍िती राहील. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी सोबत पालकत्‍व प्रकल्‍पाचे अध्‍यक्ष संदीप जोशी राहतील तर  दि फ्रेण्डस् को-ऑप. हाऊसिंग सोसायटी लि. चे अध्‍यक्ष सुभाष मंडलेकर यांची यावेळी उपस्‍थि‍ती राहील.

घरातील वापरण्यायोग्य परंतु अतिरिक्त असलेल्या वस्तूंना गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा हा अभिनव प्रयत्न आहे. अनेक घरांमध्ये सायकली, अभ्यासाची टेबल-खुर्ची, पुस्तके, संगणक, कपाट, भांडी, कपडे, खेळणी तसेच इतर अनेक वस्तू वापरात नसतानाही पडून असतात. अशा वस्तू एखाद्या कुटुंबासाठी उपयुक्त ठरू शकतात. ‘ज्यांच्याकडे जास्त आहे त्यांनी द्यायचे आणि ज्यांना गरज आहे त्यांनी सन्मानाने घ्यायचे’ या संकल्पनेवर आधारित हा उपक्रम समाजात माणुसकीची भावना अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करणार आहे.
या उद्घाटन सोहळ्यास तसेच उपक्रमात सहभागी होण्यासाठी आपल्या कुटुंबीय, मित्रपरिवार व शेजाऱ्यांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहून या माणुसकीच्या उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
दर महिन्‍याला भरेल ‘अनोखा बाजार’ 
हा सामाजिक उपक्रम शहराच्‍या विविध भागात राबविण्‍यात येणार आहे. दर महिन्‍याच्‍या शेवटच्या रविवारी सायंकाळी ५ ते ९ या वेळात हा ‘अनोखा बाजार’ भरणार आहे. ज्‍यांना अनोखा बाजारमधील वस्‍तू न्‍यायच्‍या आहेत त्‍यांना सुरुवातीला १०० रुपये सेवा शुल्क देऊन फॉर्म भरावा लागेल. त्‍यानंतर एका व्‍यक्‍तीला एकावेळी केवळ दोन वेगवेगळ्या वस्‍तू अगदी नि:शुल्‍क घरी घेऊन जाता येतील.
ज्‍या दात्‍यांना आपल्‍या घरातील वापरण्यायोग्य स्थितीतील वस्‍तू ‘अनोखा बाजार’ मध्‍ये ठेवायच्‍या असतील त्‍यांनी पंचायतन अपार्टमेंट, प्‍लॉट नं. १७६, फ्लॅट नं. १०४, आरपीटीएस रोड, लक्ष्‍मीनगर, नागपूर येथे त्‍या जमा कराव्‍या. दर रविवारी हे कलेक्‍शन सेंटर सकाळी ९ ते ११ या वेळात सुरू राहील.
या उपक्रमाच्‍या यशस्‍वीतेसाठी संयोजक प्रणव घुगरे असून सहसंयोजक म्हणून ज्योत्स्ना कुऱ्हेकर, संदीप मानकर, मंजुषा जोशी, आनंद टोळ, प्रकाश रथकंठीवार, प्रणय मोहबंसी, गजानन निशितकर, कौशिक जोशी आणि वंदना शर्मा कार्यरत आहेत. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी ९८२३०४३१३३, ८६००२७८८८८ किंवा ९५११८५४०८१ या क्रमांकांवर संपर्क साधावा.
पत्रकार परिषदेला प्रणव घुगरे यांनी संबोधित केले. यावेळी संदीप मानकर, मंजुषा जोशी,  प्रकाश रथकंठीवार, गजानन निशितकर, कौशिक जोशी आणि वंदना शर्मा यांची उपस्थिती होती.
…………………………………………

Latest बातम्या