Homeनागपूर न्यूजमुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांकडून समृद्धी महामार्गाची पाहणी

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांकडून समृद्धी महामार्गाची पाहणी

आधुनिक महाराष्ट्राची नवी भाग्यरेखा पुर्णत्वाकडे

राज्यात ठिकठिकाणी उत्साहात स्वागत

मुंबई, दि. ४ डिसेंबर२०२२: ‘हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या ११ डिसेंबरला होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर ते शिर्डी असा प्रत्यक्ष प्रवास करून महामार्गाची पाहणी केली. या दौऱ्यात उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः वाहनाचे सारथ्य केले. महामार्गाच्या विविध टप्प्यांवर लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले.

‘हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गा’च्या नागपूर ते शिर्डी या ५३० किलोमीटर अंतराच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. त्याच्या उदघाटनासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नागपूर येथे येत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी समृद्धी महामार्गावरील झिरो पॉईंट येथून आज दुपारी आपला प्रत्यक्ष पाहणी दौरा सुरू केला. या संपूर्ण दौऱ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः वाहन चालवत होते. तर मुख्यमंत्री त्यांच्यासोबत होते. त्यांच्यासमवेत वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सौनिक, पायाभूत सुविधा प्रकल्प कक्षाचे महासंचालक राधेश्याम मोपलवार व अन्य अधिकारी होते.

उभय नेत्यांनी दौऱ्यास सुरुवात केल्यानंतर या महामार्गाच्या कार्यकक्षेतील जिल्ह्यात अनेक ठिकाणी त्यांचे लोकप्रतिनिधी, नागरिक व अधिकाऱ्यांनी स्वागत केले. विदर्भातील नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलडाणा हे जिल्हे तसेच मराठवाड्यातील जालना, औरंगाबाद उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात पाहणी दौऱ्याचे उत्साहात स्वागत झाले.

मुख्यमंत्री  शिंदे यांचे नागपूर येथे आगमन झाल्यानंतर खासदार कृपाल तुमाने यांच्यासह नागपुरातील विमानतळ व झिरो पॉईंट येथे भव्य स्वागत झाले. त्यानंतर वर्धा जिल्ह्यामध्ये विरूळ टोल प्लाझा येथे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन स्वागताला उपस्थित होते. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे नजीक आमदार प्रताप अडसड तर वाशिम जिल्ह्यामध्ये वारंगी येथे आमदार राजेंद्र पाटणी यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.

बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर इंटरचेंज येथे खासदार प्रतापराव जाधव, आमदार आकाश फुंडकर व संजय रायमुलकर यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज, स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. बुलडाणा जिल्ह्यातून 89 किमीचा महामार्ग मेहकर, सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा या तीन तालुक्यातून जात आहे.

जालना जिल्ह्यातील जालना व बदनापूर तालुक्यातील २५ गावांतून ४२ किलोमीटरचा महामार्ग जात आहे. आज दुपारी महामार्गावरील जालना तालुक्यातील जामवाडी येथे मुख्यमंत्री  शिंदे व उपमुख्यमंत्री  फडणवीस यांचे आगमन झाल्यानंतर त्यांचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी स्वागत केले. याप्रसंगी आमदार नारायण कुचे, माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

औरंगाबाद जिल्ह्यातून ५४ किलोमीटरचा महामार्ग जातो. जिल्ह्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे आगमन झाल्यानंतर पालकमंत्री संदीपान भुमरे, सहकार मंत्री अतुल सावे, आमदार हरिभाऊ बागडे आदींनी त्यांचे स्वागत केले.

कोपरगाव इंटरचेंजवर आमदार बबनराव पाचपुते, आमदार आशुतोष काळे यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री  शिंदे आणि उपमुख्यमंत्रीफडणवीस यांचे स्वागत केले. या दौऱ्याचा समारोप अहमदनगर जिल्ह्यात शिर्डी येथे झाला. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ.सुजय विखे-पाटील, सदाशिवराव लोखंडे यांनी येथे त्यांचे स्वागत केले.

विदर्भात ठिकठिकाणी शिंदे, फडणवीस यांचे स्वागत-

हिंदूहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या पाहणी दौऱ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपूर येथे आगमन झाले. दुपारी १२.४५ वाजता दोन्ही नेत्यांनी नागपूर ते शिर्डी या प्रवासाला सुरुवात केली. विदर्भात नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलडाणा जिल्ह्यामध्ये पाहणी दौऱ्याचे प्रचंड स्वागत झाले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ११ डिसेंबर रोजी हिंदूहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या ५३० किलोमीटरच्या महामार्गाच्या उद्घाटनासाठी येत आहेत. तत्पूर्वी या महामार्गाची पाहणी रस्ते मार्गाने करण्याचे काल त्यांनी जाहीर केले होते. त्यानुसार आज सकाळी साडे अकराच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नागपूर येथे आगमन झाले. त्यानंतर त्यांनी रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांच्या घरी एका खाजगी कार्यक्रमानिमित्त भेट दिली. दुपारी बरोबर १२.४५ वाजता त्यांनी समृद्धी महामार्गावरील झिरो पॉईंट येथून प्रवासाला सुरुवात केली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः वाहन चालवत होते. तर मुख्यमंत्री त्यांच्या बाजूला बसले होते. त्यांच्या समवेत महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार व अन्य अधिकारी होते.

समृद्धी महामार्गाची एकूण लांबी ७०१ किमी आहे. महाराष्ट्रातील दहा जिल्हे २६ तालुके ३९२ गावातून हा महामार्ग जात आहे. त्यामुळे नागपूर येथील झिरो पॉईंट या ठिकाणावरून उभय नेत्यांनी प्रवासाला सुरुवात केल्यानंतर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी काही मिनिटांसाठी त्यांचे स्वागत करण्यात आले. तर अनेक ठिकाणी खास आग्रहाने त्यांचे लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी स्वागत केले.

सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला सुरुवात केली होती. विदर्भ मराठवाडा व विदर्भातील दुर्गम भागांचे मुंबईपासून अंतर कमी करण्यासाठी या महामार्गाची निर्मिती करण्यात आली आहे. एक नवा इकॉनोमिक कॅरीडोर उभारण्याचा हा प्रयत्न प्रत्यक्षात साकारण्यात येत आहे. त्यामुळे या महामार्गाची सुरुवात या प्रदेशातील जनतेसाठी अत्यंत आनंदाची व जिव्हाळ्याची घटना ठरत आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याबद्दल प्रचंड उत्सुकता विदर्भ, मराठवाड्यात असून आज या पाहणी दौऱ्यानिमित्त या रस्त्याच्या दुतर्फा झालेली गर्दी,व नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने दिलेला प्रतिसाद उल्लेखनीय होता.

विदर्भात ठिकठिकाणी स्वागत-

विदर्भात खासदार कृपाल तुमाने यांच्यासह नागपुरातील विमानतळ व झिरो पॉईंट येथे भव्य स्वागत झाले. त्यानंतर वर्धा जिल्ह्यामध्ये विरूळ टोल प्लाझा येथे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन स्वागताला उपस्थित होते.

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे नजीक आमदार प्रताप अडसर, यांच्यासह उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी, पुरुषोत्तम भुसारी हे पाहणी दौऱ्याच्या स्वागतासाठी उपस्थित होते.

वाशिम जिल्ह्यामध्ये मालेगाव तालुक्यातील वारंगी येथे आमदार राजेंद्र पाटणी यांनी त्यांचे स्वागत केले. या ठिकाणी विभागीय आयुक्त दिलीप पांढरपट्टे, मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी त्यांचे स्वागत केले.

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर इंटरचेंज येथे खासदार प्रतापराव जाधव आमदार आकाश फुंडकर आमदार संजय रायमुलकर, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री वीसपुते यांनी त्यांचे स्वागत केले.

विमानतळावर मुख्यमंत्र्यांचे स्वागत
तत्पूर्वी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज सकाळी विशेष विमानाने नागपूर विमानतळावर आगमन झाले. नागपूर विमानतळावर विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी प्रसन्ना बिदरी, पोलीस आयुक्त अमितेश कुमार,महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी.जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा,अतिरिक्त पोलीस आयुक्त अश्वती दोरजे,विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ. छेरिंग दोरजे,अतिरिक्त पोलीस आयुक्त निवा जैन आदींनी त्यांचे स्वागत केले.

Latest बातम्या