भाजप नेते धर्मपाल मेश्राम यांची मागणी : बेताल वक्तव्याचा घेतला समाचार
नागपूर, ता. ९ : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याचे नागपूर कनेक्शन असल्याचा आरोप आमदार अमोल मिटकरी यांनी केला, याबाबत मिटकरी यांनी पुरावे द्यावे, अन्यथा पोलीस चौकशीला सामोरे जावे, अशी मागणी भाजप नेते ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी केली आहे.
मागील पाच महिन्यांपासून संपावर असलेल्या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या रोषजनक आंदोलनातून दिसून आला. या आंदोलनाचे नागपूर कनेक्शन असल्याचा आरोप विधानपरिषद सदस्य अमोल मिटकरी यांनी केला. त्यांच्या या विधानाचा भाजपा नेते ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून चांगलाच समाचार घेतला.
ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानावर झालेले आंदोलन दुर्दैवी आहे. गेल्या पाच महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या पाच महिन्यांपासून आंदोलनाकडे शरद पवार यांनी लक्ष दिले नाही की याबाबत शब्दही काढला नाही, सरकारने देखील कुठलीही कारवाई केली नाही. त्यामुळे संतापलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी आंदोलन केले, याचा निषेध आहे. पण यामागच्या घटनेचा त्यांनी विचार चिंतन करणे आवश्यक आहे. असे असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल मिटकरी या आंदोलनाचे नागपूर कनेक्शन असून त्याची चौकशी करण्याची मागणी करतात. मिटकरींकडे असे कुठल्याही स्वरूपाचे पुरावा असल्यास त्यांनी तो पोलिसांपुढे सादर करून उघड करावा, असे आव्हान देतानाच जर पुरावा नसेल तर मिटकरींची देखील पोलीस चौकशी केली जावी, अशी मागणीही ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी केली.
मागील पाच महिन्यात १६४ एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत, त्यांच्या परिवाराची दयनीय स्थिती आहे. त्यांना पगार नाही, घरी खायला अन्न नाही, त्यांच्या मागण्या मान्य करणे दूरच सरकारने त्यांच्याकडे ढुंकून देखील पाहिले नाही. अशा परिस्थितीत कर्मचारी उग्र आंदोलन करीत असेल तर ती जबाबदारी कोणाची हे सुद्धा निश्चित करणे आवश्यक आहे, असेही ॲड. मेश्राम म्हणाले.