Homeनागपूर न्यूजमहापाैरांची बैठक आणि मुंढेंचा करोना!अचूक टायमिंगवर सोशल मिडीयावर रंगली चर्चा

महापाैरांची बैठक आणि मुंढेंचा करोना!अचूक टायमिंगवर सोशल मिडीयावर रंगली चर्चा

डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)

नागपूर,ता.२५ ऑगस्ट: मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ट्वीट करुन त्यांचा करोना चाचणीचा अहवाल हा पॉझिटीव्ह आला असल्याचे सांगितले आणि सकाळपासून मनपाच्या कर्मचारी वर्गात तसेच सोशल मिडीयावर मुंढे यांच्या करोनाबाबत चर्चेची झोड उठली. आज सोमवारी सकळी १२ वा. महापौरांनी शहरातील समस्त आमदार तसेच जनप्रतिनिधींसोबत कोविड-१९ तसेच व्यापा-यांच्या प्रश्‍नावर महत्वाची बैठक बोलावली होती मात्र मुुंढे यांच्या ट्वीटनंतर महापौरांनी बैठकच रद्द केली.

मुंढे यांनी त्यांचा करोना चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याची माहिती फेसबूकवर देखील टाकली मात्र त्यात ते नेमक्या कोणाच्या संपर्कात आले? कोणत्या लॅबमधून त्यांनी तपासणी करुन घेतली?या विषयी कोणताही तपशील टाकला नाही,त्यामुळे मनपा मुख्यालयात आज दिवसभर यावर चांगलीच चर्चा रंगली होती. विशेष म्हणजे आपल्या ट्वीटर तसेच फेसबूक पोस्टमध्ये मी जरी पॉझिटीव्ह आलो तरी शहरवासीयांनी पॉझिटीव्ह येऊ नये,यासाठी माझी धडपड सुरुच राहील असा उल्लेख केला तसेच घरुनच संपूर्ण व्यवस्था हाताळणार असल्याचा त्यांनी सूतोवा केला.

मात्र घरुनच मुंढे हे प्रशासनाची कमान सांभाळण्यास समर्थ आहेत तर एक तास ते महापौरांच्या बैठकीत देखील घरुनच ऑन-लाईन सहभागी होऊ शकले असते,असा प्रश्‍न आता उपस्थित केला जात आहे. एकीकडे शहरात वाढलेल्या करोनाचा प्रकोप,दूसरीकडे व्यापा-यांची नाराजी,आंदोलन,संप इ.सारख्या महत्वपूर्ण विषयांवर बैठक असताना मुंढे यांनी अचानक त्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याचे सांगून,बैठक टाळल्याची खमंग चर्चा मनपात सुरु होती.

आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शनिवारी दूपारी २ वाजता फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून सत्ताधारी तसेच व्यापारी यांच्या विरोधात अतिशय परखड मत व्यक्त केले हाेते. यामुळे शहरातील व्यापारी वर्ग हा चांगलाच नाराज झाला. व्यापा-यांनी व्यापार करावा,राजकारण करु नये,असे मत मुुंढे यांनी व्यक्त केले असता शहरातील व्यापा-यांच्या विविध संघटनांनी आज या विरोधात बंद पुकारला. याशिवाय करोनावर उपचारासाठी मनपातर्फे कोविड केअर केंद्रात उपलब्ध एकूण खाटांची संख्या किती?राज्याचे पालकमंत्री बाळासाहेब थोरात तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या बैठकीत मुंढे यांनी ही संख्या दहा हजारच्यावर असल्याचा दावा केला होता यावर मनपाच्या २० ता.च्या ऑन लाईन सभेत भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी ही संख्या २१०० च्या वर नसल्याचा आरोप केला होता.यावर देखील मुंढे यांनी चांगलेच तोंडसूख घेतले होते.

परिणामी,महापौरांनी आज बाेलावलेल्या बैठकीत मुंढे हे चांगलेच अडचणीत सापडणार असल्याची शक्यता गृहीत धरुनच मुंढे यांनी बैठकीला उपस्थित राहण्याचे टाळले असल्याचा संशय आता व्यक्त केला जात आहे.

महापाैरांनी चाचणी अहवाल व्हायरल केला मुंढे का नाही करत?
महापौर संदीप जोशी यांनी ते एका करोना बाधिताच्या संपर्क साखळीत आलेल्या व्यक्तिच्या संपर्कात आल्याचे सांगून स्वत:ला विलगीकरणात ठेवीत असल्याची माहिती सोशल मिडीयावर पोस्ट केली होती,यानंतर त्यांनी त्यांचा चाचणी अहवाल जो निगेटीव्ह आला तो देखील त्यांनी सोशल मिडीयावर पोस्ट केला. मुंढे यांनी मात्र त्यांचा करोना पॉझिटीव्ह आलेला अहवाल सोशल मिडीयाच्या पोस्ट सोबतच जोडला असता जर तो जास्त विश्‍वसनीय राहीला असता,असे आता बोलले जात आहे.

करोना एकच…कर्मचा-यांना मात्र वेगळा न्याय!
मनपा मुख्यालयातील अनेक विभागात सातत्याने करोना बाधित कर्मचारी आढळत असताना आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कोणालाही विलगीकरणाची परवनागी न देता कामावर बोलवले असल्याचे सांगितले जात आहे. यात अग्निशमन विभाग,सामान्य प्रशासन विभाग,वित्त विभाग, पेंच प्रकल्प, उपद्रव शाेध पथक इ. अनेक विभागाचे कर्मचारी समाविष्ट आहेत. आयुक्तांचा अहवाल आता पॉझिटीव्ह आला असता त्यांना विलगीकरणात राहण्याचा संवैधानिक अधिकार आणि आम्ही कर्मचारी असल्याने आम्हाला कोणतेही अधिकार नाही?असा संताप मनपा मुख्यालयात दबक्या आवाजात व्यक्त केला जात होता. आयुक्तांना विलगीकरणात राहायचे असले तरी किमान महापौरांच्या बैठकीत ते ऑन-लाईन उपलब्ध राहू शकले असते,असे झाले असते तर त्यांचा आदर्श इतरांनीही घेतला असता,मात्र त्यांनी बाधित झाल्याचे सांगून चक्क बैठकीलाच दांडी मारल्याने शहरात वेगळा संदेश गेला असल्याचे आता बोलले जात आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये त्यांना करोनाची कोणतीही लक्ष् णे नाही मात्र अहवाल पॉझिटीव्ह आल्याचे जाहीर केले आहे,मग एक तास इतक्या महत्वाच्या बैठकीला उपस्थित राहीले असते तर त्यांच्या समर्थकांनाही अभिमान वाटला असता,असेही सूर ऐकू आले.

फेसबूकवर मुंढे विरोधक-समर्थक भिडले-
आयुक्तांचा करोनाचा अहवाल पॉझिटीव्ह आला यावर फेसबूकवर पोस्ट व्हायरल होताच मुंढे यांचे समर्थक आणि विरोधक हे आपापसातच चांगलेच भिडले. ‘चांगले झाले मुंढे मेला पाहिजे’अश्‍या‘ असमर्थनीय’पोस्ट पासून तर ’जेव्हा खासदार,आमदार,महापौर,पक्ष्ाचे नगरसेवक मिळून मुंढेंचं काहीच बिघडवू शकले नाही तर करोना काय बिघडवणार?’असे समर्थनही सोशल मिडीयावर उमटले.एका समर्थकाने तर ’भाजपनेच मुंढेंच्या अहवालात काही फेरफार तर नाही केली?असा संशय येत आहे,त्यांनीच मुंढेंचा अहवाल हा पॉझिटीव्ह आणला,म्हणजे मुंढे साहेब चौदा दिवस घरात बसतील आणि त्यांना मनमानी कारभार करता येईल’अशी पोस्ट केली.

एकंदरित मुंढे यांचा करोना अहवाल तसेच महापौरांची बैठक यांच्या ‘अचूक’टायमिंगनेच आजचा दिवस मनपा मुख्यालयाच्या तसेच सोशल मिडीयाच्या भिंती चांगल्याच रंगल्या होत्या.

मुंढें ट्वीट आणि फेसबूक पोस्ट-

मी पॉझिटिव्ह…We Shall Win…!

कोरोनाच्या संक्रमण काळात यंत्रणा प्रमुख म्हणून कार्य करताना अनेकांच्या संपर्कात आलो. काळजी म्हणून काही वेळा कोरोना चाचणी केली. मात्र काल केलेल्या चाचणीत ‘पॉझिटिव्ह’ आलो. लक्षणे नसताना पॉझिटिव्ह आल्याने नियमानुसार ‘गृह विलगीकरणा’त (Home Isolation) आहे. मागील 14 दिवसात जे माझ्या संपर्कात आले असतील, त्यांनी स्वतःची चाचणी अवश्य करून घ्यावी.

मागील साडे पाच महिने कोरोना या विषाणूशी आपण सगळे लढा देत आहोत. लॉकडाऊन, मिशन बिगीन अगेन या माध्यमातून कोरोनाचे संक्रमण थांबविण्याचा आपण सर्वांनीच प्रयत्न केला. या साडे पाच महिन्याच्या काळात प्रत्येक कोरोना वॉरियर्सने कोरोनाला हद्दपार करण्यासाठी निकराचा लढा दिला. आजही देत आहेत. स्थानिक प्रशासन म्हणून नागपूर महानगरपालिका आजही झटत आहे. वेळोवेळी नागरिकांना आवाहन करीत आहे. प्रत्येक व्यक्ती कोरोनाबाधित आहे, असे समजून वागा, असे मी स्वतः वेळोवेळी सांगत आहे. कारण काळजी घेतली नाही तर हा विषाणू जीवघेणा ठरू शकतो. आपल्या आरोग्याची काळजी आपणच घ्यायला हवी. कोरोनाच्या नागपुरातील एन्ट्री नंतर अत्यावश्यक सेवा म्हणून कार्य करताना माझ्यासोबत माझ्या प्रत्येक सहकाऱ्याने आवश्यक ती सर्व काळजी घेतली. मात्र, सेवा देताना कुठे ना कुठे कोरोना रुग्णांशी संपर्क येत गेला. यातून मनपाचे कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली. आज मी स्वतः पॉझिटिव्ह निघालो. काळजी म्हणून मी गृह विलगीकरणात राहीन. परंतु, आपल्या सेवेचे कार्य थांबणार नाही. मी जेथे असेल तेथून नागपुरातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेणे सुरू राहील. कारण मी जरी पॉझिटिव्ह आलो तरी आपण पॉझिटिव्ह येऊ नये, यासाठी माझी धडपड सुरूच राहील. जे पॉझिटिव्ह आलेत त्यांना योग्य उपचार मिळावे, यासाठी व्यवस्था सुदृढ ठेवण्याचा माझा संकल्प या काळातही पूर्णत्वास नेईन, हा विश्वास देतो.

We shall Win…!

Latest बातम्या