
(रविवार-विशेष)
भाई-भतीजावादाला मनपाही अपवाद नाही
नागपूर,ता. ११ ऑक्टोबर: निसर्गाचा अभ्यास केल्यास या भू-तळावरील प्रत्येक प्रजाती स्वत:च्या अस्तित्वासाठी नेहमी संषर्घ करत असते आणि हाच नियम माणसालासुद्धा लागू होतो.पुढे माणूस एवढा प्रगत झाला की त्याच्या परिवाराचा त्याचा नातेवाईकांच्या अस्तित्वासाठी अविरत प्रयत्न करु लागला. १७ व्या शतकातपासून ‘नेपोटिझम’ हा शब्द उदयाला आला आहे. आपल्या परिवाराला किंवा नातेवाइकाला पुढे करणे ,लाभ पोहोचवणे ही पद्धत हजारो वर्षांपासून सुरु आहे. नागपूर शहरातील महानगरपालिका ही देखील नेपोटिझमला अपवाद नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मनपाच्या आरोग्य विभागात औषधी वखार व्यवस्थापक (स्टोर इंचार्ज) असणारे प्रशांत भातकुलकर यांचा मुलगा यश भातूकलकर यांना मनपाच्या गांधी नगर येथील इंदिरा गांधी रुग्णालयात,राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत फॉर्मासिस्ट पदावर समाविष्ट करण्यात आले.त्यांच्याकडे या पदासाठी आवश्यक असणारी पुरेशी शैक्ष् णिक अहर्ता नसल्याचे सांगितले जात आहे!
याच श्रीमान भातकूलकर यांचे बहीण-जावई डॉ.सुधनवा भूत हे देखील याच रुग्णालयात चक्क आयसीयूचे इंचार्ज या अत्यंत जवाबदारीचे पद भूषवतात आहेत! ते फक्त डिप्लोमा इन चाईल्ड हेल्थ (डीसीएच)असून एवढ्या महत्वाच्या पदावरील पगार घेत आहेत.या पदासाठी डिप्लोमा नव्हे तर डीग्रीधारक असणे बंधनकारक आहे,हे विशेष! या डिप्लोमा धारक कर्मचारीवर सध्या नागपूर महानगरपालिका ही ‘फक्त’ दीड लाख पगार खर्च करीत आहे….!याहून अधिक महत्वाचे म्हणजे हे महाशय सहसा कामाच्या ठिकाणी फिरकतसुद्धा नाही,साधा फोन देखील उचलत नाही,अशी यांची या रुग्णालयातील कर्मचा-यांमध्ये ख्याती आहे, पगार मात्र अगदी रेग्यूलर उचलतात…!फक्त दीड लाख !
भातकूलकर हे सत्ताधारी पक्ष्ातील एका मोठ्या नेत्याचे अंत्यंत जवळचे ‘खास’असून त्यांच्याकडे स्टोरचा इंचार्ज म्हणून महत्वाचे काम सोपवण्यात आले आहे. सर्वांसाठी,सर्व बिलाची व्यवस्था ते अत्यंत चोखपणे बजावतात. कोविडच्या काळातही राज्यासरकारकडून मिळालेल्या पाच कोटीहून अधिक रकमेची बिले त्यांनी व्यवस्थित ॲडजस्ट केली असल्याची देखील चर्चा चांगलीच ऐकू येते.याच अंगभूत हुशारीच्या कलागुणामुळे त्यांना आरोग्य विभागातून चक्क मुख्यालयात बिल बनवायच्या कामात ‘जुंपण्यात’ आल्याची देखील कुजबुज ऐकू येत आहे.
याशिवाय मनपातील सहायक आरोग्य अधिकारी डॉ.विजय जोशी यांचाही मूलगा मोहित जोशी यांची देखील राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत इंदिरा गांधी रुग्णालयात फॉर्मासिस्ट पदावर नियुक्ती करण्यात आली.विशेष म्हणजे या रुग्णालयात गेल्या वीस वर्षांपासून रजनी फूलझले नावाच्या फॉर्मासिस्ट अाधीपासून आहेत मात्र तरीदेखील नागपूर महानगरपालिकेची आर्थिक स्थिती ही अतिशय ’भरभक्कम’असल्यामुळे इतर आणखी दोन फॉर्मासिस्टचा पगार मनपाला देणे परवडत आहे,असेच आता म्हणावे लागेल….!महत्वाचे म्हणजे डॉ.विजय जोशी हे साधे नॅचरोपॅथीचे पदवीधर असून त्यांना मनपाच्या आरोग्य विभागात एवढ्या जवाबदारीचे पद दिल्या गेल्याने भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी २० ते २६ जून दरम्यान भट सभागृहात पार पडलेल्या सभेत चांगलेच तोंडसूख घेतले होते!
इंदिरा गांधी रुग्णालय हे नोकरीसाठी अनेकांसाठी अत्यंत आवडीचे ठिकाण असल्याचे सांगितले जाते.या ठिकाणी सोयीची नोकरी करता येते. नावाजलेले,गाजलेले मनपाचे डॉ.प्रवीण गंटावार हे याच इंदिरा गांधी रुग्णालयाचे प्रमुख पदी असून त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ.शीलू गंटावार या अद्यापही याच ठिकाणी सेवेत आहे,त्यांच्याच हजेरीची पुस्तिका जब्त करण्याचे आदेश महापौर संदीप जोशी यांनी सभेत दिले होते,हे विशेष!कोविड काळात याच डॉ.शीलू गंटावार यांच्याकडे वैद्यकीय अधिक्ष् क पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे,त्या देखील दूपारी २ नंतर सही करण्यासाठी उगवतात व निघून जातात,नागपूर शहरात म्हणूनच महानगरपालिकेच्या अश्या या सर्व कारोनायोद्धांपासून सामान्य नागरिकांना करोनासारख्या महामारीच्या काळात किती व कसा दिलासा मिळाला ,याचा अनुभव नागपूरकर जनता कोरोना काळ संपल्यानंतरही विसरणार नाही…..!
एकीकडे महानगरपालिकेच्या दवाखान्यांमध्ये नर्सेसची कमतरता असल्याची आेरड मनपाचे पदाधिकारी आणि अधिकारी करीत असतात मात्र चार-चार नर्सेस यांना मुख्यालयात कारकूनीच्या कामासाठी ठेऊन घेण्यात आल्याची धक्कादायक माहिती आहे.यातील एका परिचारिकेची बदली पाचपावली मॅटनिर्टी होममध्ये करण्यात आली होती मात्र मनपाच्या एका अतिरिक्त आयुक्तांची ‘खास’मर्जी त्यांच्यावर असल्याने व ‘नयन सुखा’मध्ये अडथळा निर्माण होईल,या कारणामुळे या अति.आयुक्तांनी या परिचारिकेची बदली रद्द करुन त्यांना ५ व्या मजल्यावर मुख्यालयातच ठेऊन घेतल्याने ’जनरल नर्सिंग मिडवाईफ’विषयी वेगळीच चर्चा मनपाच्या कर्मचा-यांमध्ये रंगत असते.
या शिवाय मनपाच्या आरोग्य विभागात कार्यरत मुकुंद खूजे या फॉर्मासिस्टचे ‘कोरडे’नावाचे मामा हे देखील मनपाच्या आयसोलेशनमध्ये पदभार भूषवितात आहेत,या मामा-भाच्याच्या जोडगोडीची देखील चर्चा मनपाचे कर्मचारी हे चवीने करताना आढळतात…!
चार-चार एक्सरे टेक्नीशीयन-एक्सरे एक ही नाही!
मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालयाचे कवित्व इथंच संपत नाही तर याच रुग्णालयातील एक्सरे विभागातील इंचार्ज ईश्वर मेश्राम हे यूनियन लीडर असून या रुग्णालयात एकाही रुग्णाचा एक्सरे अद्याप झालाच नाही कारण एकच एक्सरे मशीन असून ती देखील फार जुनी असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.असल्यास ती सुरवतीपासूनच बंद अवस्थेत आहे.मात्र तरीदेखील याच रुग्णालयात एक्सरे तंत्रज्ञ पदावर आणखी एकाची नियुक्ती करण्यात आली,हे देखील कमी होते म्हणून कोविड काळात आणखी दोन नवीन मुलांची नियुक्ती याच पदावर करण्यात आली,परिणामी हे दोन नवीन मुले सध्या दिवसभर कार्यस्थळी बसतात तर सत्ताधारी पक्ष्ाच्या एका पदाधिकारीच्या ‘खास’मर्जीतील ते दोन्ही एक्सरे टेक्नीशीयन फक्त सही करण्यासाठी कार्यस्थळी उगदवतात आणि गायब होतात.पगार मात्र त्यांचा रेग्यूलरपणे निघतो….!या दोघांनाही लोकशाही असणा-या देशात मनपाचे महाराज म्हणून संबोधलं जातं…!
अति.आयुक्त रिपोर्टिंग घेतात सफाई मजुराकडून!
इंदिरा गांधी रुगण्यालयाचे या ही पुढचे मनोरंजक आणि तेवढेच संतापजनक कवित्व म्हणजे मनपाचे अति.आयुक्त हे दररोज या रुग्णालयाचा फिड बॅक वैद्यकीय अधिक्ष् क असणा-या डॉ.शीलू गंटावार यांच्याकडून न घेता तेथील एका महीला सफाई मजूर जया तांबे यांच्याकडून घेत असल्याची माहिती समाेर आली आहे!
याच रुग्णालयात ईसीजी तज्ज्ञ म्हणून अलका शेवाळे या गेल्या अनेक दशकांपासून ठाण मांडून बसल्या आहेत.त्यांची एकदाही इतर रुग्णालयात बदली करण्यात आली नाही.कोविड काळात त्यांचाच मुलगा डॉ.अखिलेश शेवाळे यांना मेडीकल ऑफिसर पदावर नियुक्ती देण्यात आली,विशेष म्हणजे त्यांची नियुक्ती ही आपल्या आईच्याच रुण्यालयात करण्यात आली,ते देखील रुग्णालयात फिरकलेच नाही,पगार मात्र नियमित उचलतात,सध्या ते करोना पॉझिटीव्ह असल्याने घरीच आहेत,अति.आयुक्त हे सफाई मजूर तसेच याच अलका शेवाळे यांच्याकडूनच माहिती घेत असल्याची खात्रीशीर बाब समोर आली आहे!
दटकेंचा अभिनिवेश फसवा-
२० ते २६ जून दरम्यान भट सभागृहात पार पडलेल्या सभेत आमदार व माजी महापौर प्रवीण दटके यांनी माजी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर शिरसंधान करताना ’मनपा मुख्यालयात एक सुई जरी पडली तरी आम्हाला लगेच त्याविषयी कळतं’असे शब्द उच्चारले होते.मात्र त्यांच्याच कार्यकाळात इंदिरा गांधी रुग्णालयात एवढे गौडबंगाल घडत असल्याने त्यांना याची कल्पना देखील नाही,याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे!मग दटके यांनी मुख्यालयात काय घडतंय याचा दावा कोणत्या आधारावर केला?असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
आयुक्त राधाकृष्णन.बी. यांना अंधारात ठेऊन वादग्रस्त डॉ.प्रवीण गंटावार यांच्याकडे आरोग्य विभाग प्रमुख म्हणून पदोन्नती देण्यात आली,हे प्रपोजल ‘परग्रहातून’आले नव्हते…ते मनपा मुख्यालयातच तयार झाले होते,तरी देखील सत्ताधारी हे अंधारात कसे?सामान्य प्रशासन विभागा आजपर्यंत सत्ताधा-यांना अंधारात ठेऊन एका चपराश्याची देखील नियुक्ती करु शकली नाही मग आताच हे अघटीत कसे घडले?कोणाच्या कृपादृष्टिमुळे डॉ.गंटावार यांना निलंबना ऐवजी पदोन्नती मिळाली?असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
थोडक्यात नेपोटिझमवर संपूर्ण चित्रपटसृष्टि ढवळून निघाली असताना नागपूर महानगरपालिकेतील देखील या नेपोटिझमची चांगलीच चर्चा रंगली आहे.

आमचे चॅनल subscribe करा