
गंटावारांना पाठीशी घालणारे मुंढे हे देखील आंधळे!
नागपूर,ता. २४ जुलै: मानकापूर जवळील सुप्रसिद्ध अलेक्सीस रुग्णालयावर ४ जुलै २०२० रोजी पंधरा ते वीस असामाजिक तत्वांनी मनपाचे सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रवीण गंटावार यांच्या उपस्थितीत जे कृत्य केले त्याचा व्हीडीयो चांगलाच व्हायरल झाला आहे. मनपाचा एवढ्या मोठ्या पदावरील एक वैद्यकीय अधिकारी शहरातील बहूचर्चित गुंडासोबत कसा उपस्थित राहू शकतो?याचा अर्थ डॉ.गंटावार हे गुन्हेगार साहिल सय्यदचे हस्तक असून त्याच्या सर्व अपराधिक कामात लिप्त असल्याचा धक्कादायक आरोप भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी आज शुक्रवार दि. २४ जुलै रोजी मनपा मुख्यालयात घेतलेल्या पत्र-परिषदेत केला.
याप्रसंगी सत्ता पक्ष् नेते संदीप जाधव हे देखील उपस्थित होते. यावेळी दयाशंकर तिवारी म्हणाले की, साहिल सय्यद यानेच फोन करुन डॉ.गंटावारला अलेक्सीसमध्ये बोलावून घेतले. गंटावार यांनी रुग्णालयाच्या व्यवस्थापनासोबत चर्चा केली. त्या संपूर्ण चर्चेचा तो व्हिीडीयो सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. फेब्रुवारी महिन्यात साहिल सय्यद याने एक स्टिंग ऑपरेशन केले. सय्यदचे असे म्हणने आहे की त्याची तक्रार त्याने मनपाच्या आरोग्य विभागात केली. तर अलेक्सीस रुग्णालयाचे म्हणने आहे की डॉ.गंटावार यांनी अलेक्सीस मध्ये एकूण सहा वेळा भेट दिली. मात्र या सहा भेटीत गंटावार यांनी या रुग्णालयाला एकदा ही कारणे दाखवा नोटीस दिली नाही. कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण ही मागितले नाही.
अलेक्सीस व्यवस्थापनाचे असे सांगणे आहे की जेव्हा ही गंटावार हे रुग्णालयात आले ते एकच गोष्ट म्हणायचे ’तुम्ही तक्रारकर्ते म्हणजे साहिल सय्यदसोबत बसून हा विषय निपटवून टाका!’महापालिकेचा एक वैद्यकीय अधिकारी हा कारवाई करायला जातो की विषय निपटवायला?७ व्या वेळी गंटावार अलेक्सीसमध्ये गेले तेव्हा ते स्वत:हून नाही गेलेत तर गुंडांनी त्यांना रुग्णालयात बोलावले. हाच व्हिडीयो व्हायरल झाला आणि गंटावार यांनी मनपा आरोग्य विभागाच्या वरिष्ठ आधिका-यांना या प्रकरणाची माहिती दिली व त्याच दिवशी ४ ता. या रुग्णालयाला ’कारणे दाखवा’नोटीस पाठवण्यात आली.
गंटावार अलेक्सीसमध्ये उपस्थित असताना महाराष्ट्राचे माजी मंत्री अनिस अहमद यांचे बंधू अल्ताफ अहमद यांचा मला फोन आला की गंटावार हे अवैधरित्या त्यांची छळवणूक करीत आहेत. मी त्यांना सांगितले की जर गंटावार यांनी तुम्हाला कोणतीही नोटीस दिली असेल तरच ते कारवाई करु शकतात,नोटीस मिळाल्यानंतर ही तुम्हाला तुमची बाजू मांडण्याची संपूर्ण संधी या देशाचा संविधान आणि संविधानातील कायदे तुम्हाला देतात.
हा व्हिीडीयो व्हायरल झाल्यानंतर आणि अलेक्सीस रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने ठाम भूमिका घेतल्यानंतर की आम्हाला आधी नोटीस इश्यू करा किवा तक्रारीचे पत्र द्या. तरीही नागपूर महानगरपालिकेने त्यांना त्यांचा नैसर्गिक न्यायाचा हक्क नाकारला आणि त्यांना पत्र देण्यात आलेच नाही. त्यातही त्यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी फक्त २४ तासांचा वेळ दिला. जेव्हा अलेक्सीस रुग्णालयाला माहितच नाही कि त्यांच्या विरोधात कोणती तक्रार देण्यात आली आहे?तर ते उत्तर काय देणार?तरीही अलेक्सीस रुग्णालयाने मनपाला आपले उत्तर सादर केले.
त्यांचे उत्तर प्राप्त झाल्यावर मनपाने या रुग्णालयातील जेवढी पण सोनोग्राफी मशीन होती आणि रेडीयालॉजी मशीन होती त्यांना सील करण्याचा निर्णय घेतला.हे प्रकरण सामान्य प्रकरण नसून एक मोडस ऑपरेंडी अाहे. भारत सरकारने जो पी.सी.पी.एन.डी.टी कायदा बनवला अाहे त्या कायद्याप्रमाणे कारवाई करण्यासाठी एक समिती स्थापित केली आहे ज्या समितीमध्ये प्रसुतीरोगतज्ज्ञ आहे,रेडीयोलॉजिस्ट आहेत,या समितीत कायदा अधिकारी आहे, जिल्हाधिकारी कार्यालयातील कायदा अधिकारी आहे,या समितीमध्ये चार स्वयंसेवी संस्थांचा समावेश आहे आणि या समितीने बैठकीत निर्णय घेतल्यानंतर कारवाई करण्यात येत असते.
यातही ही बैठक बोलवण्यासाठी ७ दिवसांचा अवधी दिला जातो.यात असेही निर्गमित केले की खूपच जास्त आणिबाणि असेल तर अशी बैठक तीन दिवसात बोलावली जाऊ शकते. आश्यर्च म्हणजे गंटावार यांनी ४ जुलै ला अलेक्सीसला पहीली नोटीस दिली ताे दिवस शनिवार होता, ५ ता. रविवार होता,सोमवारी ६ जुलै रोजी अलेक्सीसने उत्तर सादर केले आणि ७ ता. अलेक्सीसवर कारवाई करण्यात आली!
न्यायालयात अलेक्सीसचा मुद्दा मान्य-
अलेक्सीसने या संपूर्ण प्रकरणावर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून न्यायालयातही दाद मागितली होती. या प्रकरणावर न्यायालयाने देखील आपले मत नोंदवित या संपूर्ण प्रकरणात डॉ.गंटावार आणि साहिल सय्यद यांच्यामध्ये एक ‘साझेदारी’दिसून पडतेय,हे मान्य केले.एवढा मोठा आरोप न्यायालयाने अश्या अधिका-यावर लावला ज्याला मनपाच्या आयुक्तांनीच न्यायालीयीन अधिकार दिले आहेत. ते डॉ.गंटावार हेच आपल्या पदाचा अश्यारितीने दुरुपयोग करीत होते.आपल्या स्वार्थ,लोभ आणि गोपनीय उद्देशांना पूर्ण करण्यासाठी गंटावार याने आपल्या पदाचा दुरुपयोग केला हे न्यायालयाच्या टिपण्णीनंतर सिद्ध झाले,असे दयाशंकर तिवारी यांनी सांगितले. डॉ.गंटावार आणि साहिल सय्यद यांनी दोघांनी संगममत करुन अलेक्सीसवर हेतूपुरस्सर कारवाई केली हे न्यायालयात ही सिद्ध झाले.
एवढेच नव्हे तर अलेक्सीसवर कारवाई करणा-या समितीवर देखील न्यायालयाने ताशेरे ओढत,समितीतील सदस्यांनी देखील आपले कर्तव्य योग्यरित्या पार पाडले नसून, एक निर्णय घेणा-या अधिका-याच्या रबर स्टॅम्प सारखा आपल्या अधिकारांचा समितीनेही दुरुपयोग केला आणि त्या निर्णयावर केवळ स्वाक्ष् री करण्याचे त्यांनी काम केले,असे ताशेरे ओढले.
या संपूर्ण प्रकरणावरुन हे सिद्ध झाले की मनपाचे सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रवीण गंटावार हे शहरातील गंुडे बदमाश यांच्यासोबत मिळून या रुग्णालयावर दडपण आणण्याचे प्रयत्न करीत होते,असे तिवारी म्हणाले.
जमिनीसाठी केले कटकारस्थान-
या संपूर्ण प्रकरणात अलेक्सीस रुग्णालयाच्या मागे जी जमीन आहे त्याच्यावर यांची नजर असल्याचा आरोप या रुग्णालयातर्फे जी तक्रार दाखल करण्यात आली आहे त्यात असा उल्लेख असल्याचे दयाशंकर तिवारी यांनी सांगितले.अलेक्सीस विरोधात जे काही स्टिंग ऑपरेशन करण्यात आले ते या जमीनीसाठी करण्यात आले असा या रुग्णालयाचा आरोप आहे. आणि गंटावार हे जर अलेक्सीस व्यवस्थापनाला सांगत आहे की ’आपापसात तडजोड करुन घ्या’तर याचा अर्थ या संपूर्ण प्रकरणात गंटावार यांची स्वत:ची मुख्य भूमिका आहे.
आयुक्तांची भूमिकाही संश्यास्पद-
न्यायालयाने इतके स्पष्ट आदेश दिल्यानंतर देखील मनपा आयुक्त तुकाराम मुंढे हे अश्या वैद्यकीय अधिका-याला निलंबित न करता पाठीशी घालत आहेत याचा काय अर्थ ध्वनित होतो?यामुळे आयुक्तांची भूमिका ही देखील संशयाच्या भोव-यात येते. डॉ.गंटावार हे शहरातील गुंड-मवालीसोबत कार्यभार करतात.नियमांची धज्जीया उडवतात. प्रशासनाच्या सर्वच नियमांची अवहेलना करतात. या सर्व कारभारामुळेच मनपाच्या सभागृहाने गंटावार यांना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्याचा आदेश दिला होता मात्र आयुक्तांनी गंटावार यांच्यावर कारवाई तर केलीच नाही मात्र त्या आदेशाला राज्य सरकारकडे विखंडीत करण्यासाठी पाठवले!
याचा अर्थ या गुन्हेगाराला संरक्ष् ण देण्याचे काम ‘प्रामाणिक ’ म्हणून घेणारे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे हे करीत आहेत. जर आता ही मुंढे, गंटावारांना निलंबित करीत नाही तर यातून दोन गोष्टी सिद्ध होतात,एक तर मुंढे हे आंधळे आणि बहीरे आहेत, किंवा आयुक्तांचा गंटावार यांना, सर्व पाप करण्यासाठी आर्शिवाद प्राप्त आहे,असा सणसणीत आरोप या प्रसंगी दयाशंकर तिवारी यांनी केला. जर त्यांना या कलंकपासून वाचायचे असेल तर त्यांनी डॉ.गंटावार यांना त्वरीत निलंबित करावे,अशी मागणी दयाशंकर तिवारी यांनी केली.

आमचे चॅनल subscribe करा