Homeनागपूर न्यूजमधुमेहग्रस्तांसाठी शहरात नि:शुल्क विशेष समुपदेशन केंद्र

मधुमेहग्रस्तांसाठी शहरात नि:शुल्क विशेष समुपदेशन केंद्र


आहारतज्ज्ञ डॉ.जगन्नाथ दीक्षीत व इन्फोसिसचा पुढाकार

नागपूर,ता.३० नोव्हेंबर २०२२: मधुमेह टाईप-१ अाणि टाईप-२ असे दोन प्रकारचे असतात. देशातील सुमारे ९५ टक्के नागरिकांना टाईप-२ प्रकारचा मधुमेह होतो. मात्र,या प्रकारच्या आजाराला रिवर्स करता येतो,अशी माहिती असोसिएशन फॉर डायबिटीज ॲण्ड ओबेसिटी रिव्हर्सल(अडोर)चे अध्यक्ष व सुप्रसिद्ध आहारतज्ज्ञ डॉ.जगन्नाथ दिक्षीत यांनी आज प्रेस क्लब येथे आयोजित पत्र परिषदेत दिली.याप्रसंगी मंचावर इन्फोसिसचे उपाध्यक्ष प्रवीण कुलकर्णी,डॉ.सुरेश बत्रा,डॉ.उदय गुप्ता आणि डॉ.शीतल साठे उपस्थित होते.

अडोर संस्थेच्या वतीने शहरात मधुमेहग्रस्तांसाठी विशेष समुपदेशन केंद्र १ डिसेंबरपासून सुरु करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.इन्फोसिस फाऊंडेशनच्या सहकार्याने शहरात तीन वर्षांसाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

पुण्यात जागतिक मधुमेह दिनानिमित्त २१ नोव्हेंबर रोजी अश्‍या केंद्राची सुरवात झाली असल्याचे त्यांनी सांगितले.यानंतर नागपूरातील केंद्राची सुरवात करीत असल्याचे ते म्हणाले.या उपक्रमात तीन वर्षात बारा हजार रुग्णांना लाभ मिळवून देण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

जीवनशैलीतील बदलांद्वारे,अडोर हे रक्तातील साखरेची पातळी व वजन कमी करणे यासारख्या बाबींवर आधारित, रुग्णांच्या प्रगतीचे मूल्यांकन करणार असल्याचे ते म्हणाले.या व्यतिरिक्त कमीतकमी पन्नास टक्के रुग्णांमध्ये मधुमेहावरील औषधांची मात्रा कमी करणार असल्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

नागपूरात याच उद्देशाने मोफत समुपदेशन केंद्रांची सुरवात १ डिसेंबर पासून केली जात असून या केंद्रात मोफत समुपदेशनाची सेवा पुरविली जाणार आहे.या केंद्रात दिनांक ५ ते १४ डिसेंबर या दहा दिवसांसाठी मोफत ‘एचबीए १ सी चाचणी शिबिर’ देखील आयोजित करण्यात आले असून नागरिक विनामूल्य चाचणीसाठी नोंदणी करु शकतात.नाव नोंदणीसाठी 8830825209 तसेच 8830824438 या व्हाट्स ॲप क्रमांकावर मॅसेज करण्याचे आवाहन त्यांनी केले.

पिंगळे निवास,सिटी सर्व्हे क्रमांक ९४८,हिंगणा रोड,दीनदयाळ नगर नागपूर,या ठिकाणी हे केंद्र उघडण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली.

जास्तीत जास्त नागरिकांनी या मोफत मधुमेह समुपदेशन केंद्राचा लाभ घेण्याचे आवाहन प्रवीण कुलकर्णी यांनी याप्रसंगी केले.

Latest बातम्या