
महामेट्रोत ओबीसींच्या आरक्षणनिहाय नोकरीसाठी सुरु असलेल्या साखळी उपोषणस्थळावर बावणकुळे फिरकलेच नाहीत
नागपूर,ता. २४ जानेवारी २०२२: मेट्रोच्या नोकरभरतीत ओबीसी,अनुसूचित जाती-जमाती तसेच आर्थिकरित्या दुर्बल घटकांसाठी राखीव जागेवर आरक्षणनिहाय पदभरती न करता पैश्यांचा व्यवहार करुन या जागा भरण्यात आला असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते व ‘जय जवान जय किसान‘संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार यांनी केला होता.याच मुद्दावर १० जानेवारीपासून दीक्षाभूमीजवळील महामेट्रोच्या प्रशस्त कार्यालयासमोर साखळी उपोषणाला सुरवात करण्यात आली मात्र दररोज ओबीसींच्या नावाने गळे काढणारे भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस आमदार चंद्रशेखर बावणकुळे यांना मात्र महामेट्रोमधील हा गौडबंगाल दिसत नाही,दररोज प्रेस क्लबमध्ये ओबींसींच्या राजकीय आरक्षणासाठी गळे काढणा-या बावणकुळेंना महामेट्रोमध्ये ओबीसींवर झालेला हा अन्याय दिसत नाही,त्यामुळे बावणकुळे यांचे ओबीसी प्रेम हे पुतना मावशीचे प्रेम असून मूळात बावणकुळे हे ओबीसींचे नेतेच नसल्याचा घणाघाती आरोप प्रशांत पवार यांनी आज उपोषणस्थळी माध्यमांकडे केला.
मेट्रोच्या नोकरभर्तीत आरक्षीत वर्गाचे हक्काचे आरक्षण डावलण्यात आले.या विरोधात ‘जय जवान जय किसान संघटनेने’ पत्र परिषदा घेऊन अनेकदा या गंभीर प्रकाराविषयी वाचा फोडली.एवढंच नव्हे तर गेल्या बारा दिवसांपासून हक्काच्या आरक्षणाच्या मागणीवरुन महामेट्रोच्या कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरु आहे.मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेतील राजकीय आरक्षण न्यायालयाच्या निर्णयामुळे संपुष्टात आल्यानंतर बावणकुळे हे दररोज महाविकासआघाडी सरकारच्या नावाने ‘शंखनाद’ करतात मात्र राजकीय आरक्षणा सारखेच दररोजच्या पोटापाण्याशी निगडीत असणा-या नोेकरीत महामेट्रोने शे-दोनशे नव्हे तर चक्क नऊशे संवैधानिक आरक्षीत जागांवर इतर वर्गीयांची भर्ती केली,त्यामुळे राजकीय आरक्षणापेक्षाही हा भ्रष्टाचार व शासकीय व्यवहार हा गंभीर आहे.असे असतानाही ओबीसींचे कैवारी चंद्रशेखर बावणकुळे यांनी महामेट्रोच्या विरोधात कोणतीही भूमिका घेतली नाही,अनेक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महामेट्रोसमोर आंदोलने केली,मोर्चे काढले मात्र बावणकुळे यांना महामेट्रोच्या या भ्रष्ट कारभाराविषयी चौकशी करण्याचे किवा अधिका-यांना विचारपूस करण्याचे धाडस झाले नाही कारण महामेट्रो हा प्रकल्पच भाजपचा आहे.
त्यामुळे भाजपचा पदाधिकारी भाजपच्याच प्रकल्पातील ‘महाभ्रष्ट’ कारभाराच्या विरोधात उपोषण स्थळाला कसा भेट देणार?असा प्रतिप्रश्न करीत बावणकुळे यांचे ओबीसींविषयीचे प्रेम हे पूतना मावशीचे प्रेम असल्याचा घणाघाती आरोप पवार यांनी माध्यमांशी बोलताना केला.
महामेट्रोमट्रोत ओबीसींच्या ३३८,अनूसूचित जातीचे १३२,अनुसूचित जमातीचे ६६ तर इतर आर्थिक दूर्बल घटकांसाठीच्या ८८ जागा आहेत.मात्र महामेट्रोने ओबीसींच्या १२५,अनुसूचित जातीच्या ९०,अनुसूचित जमातीच्या ४२ तर आर्थिक दुर्बल घटकांच्या ६६ जागांवर मनुस्मृतीचा अवलंब करीत उच्च वर्णीयांची नियुक्ती करुन आरक्षीत वर्गाच्या तरुणांच्या पोटावर लाथ मारण्याचे दृष्कृत्य केल्याचा घणाघाती आरोप प्रशांत पवार यांनी केला.
या अन्यायाच्या विरोधात ‘जय जवान जय किसान’संघटना १० जानेवारीपासून महामेट्रो कार्यालयासमोर साखळी उपोषणाला बसली आहे मात्र बावणकुळे दररोज ओबींसींच्या नावाने कंठशोष करण्यासाठी पत्र परिषद घेतात,त्यांना ओबीसींवर झालेला हा अन्याय दिसत नाही का?असा प्रश्न पवार यांनी उपस्थित केला.दररोज टी.व्ही लावला की बावणकुळे यांचा चेहरा समोर दिसतो.त्यात ते ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर पोटतिडकीने बोलताना दिसतात मात्र ज्याच्या घरी खायलाच काही नाही त्या ओबीसींना राजकीय आरक्षणापेक्षाही महामेट्रोमधील हक्काच्या नोकरीची जास्त गरज असताना या विषयावर मात्र बावणकुळे गप्पच असतात.
बावणकुळेंना खरंच ओबीसींचा पुळका असेल तर या त्यांनी ‘जय जवान जय किसान’संघटनेसोबत ओबीसींच्या न्याय हक्कासाठी उपोषण स्थळावर यावे,असे आव्हान प्रशांत पवार यांनी केली.

आमचे चॅनल subscribe करा