
नागपूर,ता.२२ मार्च २०२३: विधानसभा निवडणुकीदरम्यान निवडणूक आयोगाकडे दिलेल्या प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याप्रकरणी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात ॲड.सतीश उके यांनी दाखल केलेल्या समरी क्रिमिनल केस २७०३६/२०१९ मध्ये ॲड. सतीश उके यांची उलटतपासणी नुकतीच पूर्ण झाली. या प्रकरणी न्यायालय काय निर्णय देणार, याची उत्कंठा राज्यात निर्माण झाली आहे.
लोकप्रतिधीत्व कायद्याचे कलम १२५ ए अंतर्गत उके यांनी नागपूरच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्याकडे यासंबंधी खटला दाखल केला होता. सर्वोच्च न्यायालयातही फडणवीस यांना याप्रकरणी दिलासा मिळालेला नाही.
त्यांचे वकील ॲड. सुबोध धर्माधिकारी यांनी ॲड. सतीश उके यांची उलटतपासणी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे पूर्ण केली. ॲड. उके हे सध्या प्रवर्तन निदेशालय (ईडी )च्या ताब्यात असल्याने ही उलटतपासणी वारंवार लांबणीवर पडत होती. या प्रकरणाचा निकाल फडणवीस यांच्या विरोधात गेला तर त्यांना ६ महिने कारावास आणि दंड किंवा दोन्ही शिक्षा भोगाव्या लागू शकतात.
देवेंद्र फडणवीस हे नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातील आमदार आहेत. फडणवीस यांच्याविरोधात १९९६ आणि १९९८ मध्ये मानहानी, फसवणूक आणि खोट्या कागदपत्रांसर्भात गुन्हा दाखल केला होता. परंतु दोन्ही प्रकरणात आरोपांची निश्चिती झाली नव्हती. ॲड. सतीश उके यांच्या आरोपांनुसार, फडणवीसांनी आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात या गुन्ह्यांची माहिती लपवली होती. .ॲड. सतीश उके २०१४ पासूनच देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात न्यायालयीन लढाई लढत आहेत.
……………………………………..

आमचे चॅनल subscribe करा