Homeनागपूर न्यूजप्रशासनानंतर आता पदाधिका-यांचीही चाैकशी समिती

प्रशासनानंतर आता पदाधिका-यांचीही चाैकशी समिती


मनपा बोगस कंत्राट प्रकरण
स्थायी समिती अध्यक्ष प्रकाश भोयर यांची माहिती
१५ दिवसात सादर करणार अहवाल:२०१७ पासूनची होणार चौकशी
नागपूर,ता. २२ डिसेंबर २०२१:महापालिकेतील ६७ लाखांच्या स्टेशनरी व प्रिटिंग साहित्य घोटाळा प्रकरण सध्या चांगलच गाजत असून या प्रकरणी मनपा आयुक्त राधाकृष्ण बी.यांनी अति.आयुक्त दिपककुमार मीणा यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली आहे मात्र पदाधिका-यांना या चौकशी समितीवर विश्‍वास नसल्याने भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक संजय बंगाले यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यी समितीची घोषणा आज स्थायी समितीचे अध्यक्ष प्रकाश भोयर यांनी केली.विशेष म्हणजे आयुक्तांनी मीणा यांच्या समितीला फक्त मार्च २०२० म्हणजे कोरोना काळातील सर्व विभागांच्या कंत्राट बिलांची तपासणी करण्याची सूचना केली असता भोयर यांची समिती मात्र २०१७ पासूनच्या सर्वच व्यवहारांची चौकशी करणार असल्याचे ,आज मनपा मुख्यालयात स्थायी समितीच्या बैठकीनंतर त्यांनी पत्र परिषदेत सांगितले.

नागपूर महानगरपालिकेत ६७ लाखांचा स्टेशनरी घोटाळा समोर आला असून या प्रकरणात सदर पोलिस ठाण्यात गुन्हा देखील दाखल झाला आहे.शुक्रवारी या प्रकरणात पद्माकर साकोरे व अतुल साकोरे यांना अटक देखील झाली आहे.

कुठल्याही प्रकारची स्टेशनरी व इतर साहित्य खरेदी न करता केवळ अधिका-यांच्या बोगस स्वाक्ष-या व त्यांच्या संगणकाच्या पासवर्डचा दुरुपयोग करुन ६७ लाखांचे बिल काढण्यात आले होेते.विशेष म्हणजे वित्त व लेखा विभागाकडून कुठलीही शहनिशा न करता ६७ लाख रुपये संबंधित एजन्सीला देण्यात आले होते.

आयुक्तांच्या चौकशी समितीत असलेले अति.आयुक्त राम जोशी यांनी आज पत्र परिषदेत सांगितल्याप्रमाणे ६७ लाख रुपये आरोपींकडून मनपाला परत मिळाले असून येत्या ७ दिवसात ही चौकशी पूर्ण होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.एवढा मोठा घोटाळा हा वित्त विभागातील अधिकारी किवा कर्मचा-यांच्या सहभागशिवाय घडू शकत नाही,त्यांची देखील चौकशी होणार का?या प्रश्‍नावर त्यांनी ‘गरज पडल्यास’त्यांची देखील चौकशी होईल,असे उत्तर दिले.एकूण ४१ बोगस बिलांचे ६७ लाख रुपये काढण्यात आले असता १३ डिसेंबर रोजी सदर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली असून या पाचही एजंसींनी मनपाला ६७ लाख रुपये परत केले असल्याचे त्यांनी सांगितले.आयुक्तांनी या संपूर्ण घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या १ वर्ष ९ महिन्यांच्या काळातील जे भूगतान झाले त्याचे जनरल व्हाऊचर(जेवी)तपासायला लावले आहे.हा अहवाल ७ दिवसात त्यांना द्यायचा असून यानंतर पुढील कारवाई केली जाईल,असे जोशी यांनी सांगितले.

भोयर यांनी साकोरे यांनी फक्त ६७ लाख रुपये परत केले नसून १३-१३ लाखांचे ४ धनादेश असे ५२ लाखांचे धनादेश देखील दिले असून ते धनादेश बाऊंस झाले असल्याची माहिती पत्र परिषदेत दिली.यावरुन या भ्रष्टाचाराची व्याप्ती लक्षात येत असल्याचे ते म्हणाले.

आयुक्तांनी एक समिती नेमली असताना दूसरी समिती कशासाठी?या प्रश्‍नावर बोलताना आयुक्तांनी फक्त काेरोना काळातील एक वर्ष ९ महिन्यांच्या वित्तीय बाबींची चौकशी करण्यास सांगितले आहे.आमची सत्ता २०१७ साली सत्तेवर आली आम्ही तेव्हापासून मनपातील वित्तीय अनियमिततेची चौकशी करणार आहोत.ही चौकशी संजय बंगाले,प्रगती पाटील व आयेशा बी.ही तीन सदस्यीय समिती करणार असून येत्या १५ दिवसात या समितीचा अहवाल येईल,असे त्यांनी सांगितले.

या घोटाळ्यात नगरसेवकांचा सहभाग आहे का?या प्रश्‍नावर ठाम नकार देत नगरसेवकांचे काम अगदी छोट्या प्रमाणात असून २-२,३-३ लाखांचे काम असतात.या घोटाळ्यामुळे या पुढे तीन लाखांखाली टेंडर बंद झाले पाहिजे का?या प्रश्‍नावर मात्र त्यांनी ‘हो’असे उत्तर दिले.

आ.विकास ठाकरे यांनी या संपूर्ण घोटाळ्यांची चौकशी शासकीय समितीकडून झाली पाहिजे अशी मागणी केली आहे याकडे लक्ष वेधले असता,यात मनपा प्रशासन,ठेकेदार व अधिका-यांचा दोष आहे,पदाधिका-यांचा यात काय दोष?असा प्रति सवाल भोयर यांनी केला.यावर सत्ताधा-यांचा वचक प्रशासनावर नसल्याचे आ.विकास ठाकरे यांचे म्हणने आहे,असे सांगितले असता,वचकचा प्रश्‍न नसून गुप्तपणे अश्‍या गोष्टी घडवल्या जात असल्याचे ते म्हणाले.

स्थायी समितीच्या आजच्या बैठकीत याच विषयावर प्रशासनासोबत मोठी खडाजंगी झाली असल्याचे सांगून या पुढे प्रशासनावर वचक ठेवावा लागेल,५७ वर्षांचा लेखाजोखा बाहेर काढावा लागेल,असे ते म्हणाले.

असा झाला घोटाळा उघड-
पदाधिका-यांच्या लहान-लहान कामांचे २-२,३-३ लाखांचे टेंडर आयुक्त नाकारतात मात्र प्रशासनाचे लाखांचे बिल कसे मंजूर होतात याचा जाब स्थायी समितीच्या बैठकीत भोयर यांनी आरोग्य अधिकारी डॉ.संजय चिलकर यांना विचारला होता तसेच प्रशासनाकडून मंजूर झालेली बिले देखील त्यांना दाखवण्यात आले.त्यावेळी त्यावरील स्वाक्षरी डॉ.चिलकर यांची नसल्याचे चिलकर यांच्या लक्षात आले व या ‘बोगस ओपरेंडीचे’ बिंग फूटले.

गेल्या ४० वर्षांपासून मनपा प्रशासनासाठी अख्ख्या जगात एकच पुरवठादार!
महापालिकेत गेल्या ४० वर्षांपासून मनोहर साकाेरे हेच स्टेशनरी व प्रिटींग साहित्याचा पुरवठा करीत आहेत.एवढंच नव्हे तर त्यांच्याच कुटुंबातील सुदर्शन,मनोहर साकाेरे,स्वास्तिक ट्रेड लिंक,गुरुकृपा स्टेशनरी,एस.के.इंटरप्राईजेस या ५ एजन्सीलाच सातत्याने साहित्य पुरवठ्याचे कंत्राट मनपाकडून मिळत आहे.महापालिकेत नेहमीच साहित्य खरेदी करावी लागत असल्यामुळे या कंत्राटदारांनी बिले पाठवावी व वित्त विभागाने ती मंजूर करावी,अशी ‘अखंडीत’ प्रक्रिया मनपात सुरु होती.मात्र हीच बाब हेरुन या पाचही एजन्सींच्या मालकांनी मनपातील लिपिकाला हाताशी धरुन ६७ लाखांच्या बोगस बिलांची ‘खेळी’केली.ही बिले आरोग्य विभागासाठी डिसेंबर २०२० ते मार्च २०२१ ‘फक्त’इतक्याच कालावधीसाठीची आहे,हे विशेष.

याज कळस म्हणजे कोणताही संबंध नसलेल्या सामन्य प्रशासन विभागातील सहायक आयुक्त महेश धामेचा यांचीही त्यावर ‘बोगस’मंजुरी घेण्यात आली!यानंतर ही ६७ लाखांची बिले वित्त व लेखा विभागाचे अधिकारी विजय कोल्हे यांच्याकडे गेली.त्यांनी देखील कोणतीही शहनिशा न करता संबंधित एजंसींना ६७ लाख रुपयांचे भुगतान मंजूर केले.विशेष म्हणजे वित्त विभागाकडे जाणा-या प्रत्येक फाईल्सची संगणकात नोंद होते.त्या फाईलला एलएफएमएस(लेटर ऑफ फाईल मॅनेजमेंट सिस्टिम)क्रमांक दिला जातो.६७ लाखांच्या फाईलवर हा क्रमांक नसतानाही जवाबदार पदावरील जवाबदार अधिकारी कोल्हे यांनी बिल कसे मंजूर केले!हा प्रश्‍न आता अनेकांना अस्वस्थ करतो आहे.

चार कनिष्ठ कर्मचा-यांवर निलंबनाची कु-हाड-
या प्रकरणात मनपा आयुक्तांनी सामान्य प्रशासन विभागातील मोहन पडवंशी,वित्त विभागातील राजेश मेश्राम,अफाक अहमद, व श्रीमती नागदिवे यांना निलंबित केले.याशिवाय याच विभागातील निवृत्त अधिकारी कराळे यांच्या विरोधात उपविभागीय चौकशीचे आदेश दिले.

इतर विभागातही बोगस बिले-
आयुक्तांची चौकशी समिती आता ग्रंथालय विभागात अश्‍याच प्रकारच्या ७४ लाखांचा तसेच जन्म-मृत्यू विभागात ६० लाखांच्या बोगस कंत्राटाची देखील चौकशी करणार आहेत.ही बिले नेमकी कोणी काढली व त्यांना आॅन-लाईन मान्यता कोणी दिली हे देखील समोर आले आहे.यामध्ये लिपिक गोखे याने कार्यकारी अभियंता नरेश बाेरकर व संजय इंगळे यांचे युझर आयडी,पासवर्ड वापरले आहे.त्यामुळे त्याला देखील कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.बोरकर व इंगळे यांना देखील आपला युझर आयडी व पासवर्ड लिपिकाला देण्यासंबंधीची नोटीस बजावली जाणार असल्याची माहिती आहे.सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त महेश धामेचा यांनी देखील आपला युझर आयडी व पासवर्ड दिल्याबद्दल ते देखील चौकशीच्या फेर-यात आले असताना, मनपा आयुक्त राधाकृष्णन.बी यांनी नेमलेल्या चौकशी समितीत त्यांचा देखील समावेश असल्याने आता ते ‘स्वत:स्व:ची चौकशी करणार असल्याने अफलातून अहवाल आयुक्तांनी नेमलेल्या समितीकडून येत्या ७ दिवसांच्या ठरलेल्या मुदतीत प्राप्त होणार असल्याचा, मनपाचे कर्मचारी ,खासगीत व्यंग करीत आहेत.

चौघांना अटक-
या गुन्ह्यासंबधी सदर पोसिलांनी मनोहर साकाेरे ॲण्ड कंपनीचे पद्माकर(कोलबा)साकोरे (वय ५५)सुषमा साकोरे(वय ५०,मनोहर साकोरे(वय ७०,रा.दक्ष्णिामूर्ती चौक,महाल)व अतुल साकोरे(वय ४०,रा.नंदनवन)यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून चार जणांना अटक सुद्धा केली आहे.

अधिका-यांचे धाबे दणाणले-
या संपूर्ण घोटाळ्यात मोठे अधिकारी गुंतलेले असल्याची शक्यता असल्याने अनेकांचे चेहरे उतरले असून भ्रष्टाचारच्या आगीची ही धग आता आपल्यापर्यंत येऊ नये म्हणून कनिष्ठ कर्मचा-यांवर प्रकरण ढकलण्यावर मोठ्या अधिका-यांचा प्रयत्न असल्याची कुजबुज कर्मचा-यांनामध्ये सुरु आहे.

 

Latest बातम्या