Homeनागपूर न्यूजपुरुषाऐवजी कुटुंबियांना दिले महिलेचे पार्थिव! नातेवाईक संतप्त

पुरुषाऐवजी कुटुंबियांना दिले महिलेचे पार्थिव! नातेवाईक संतप्त


लता मंगेशकर रुग्णालयाचा सावळा गोंधळ

नागपूर,ता. ७ ऑगस्ट: लता मंगेशकर रुग्णालयात एका ६५ वर्षीय वृद्धाचे करोनामुळे मृत्यू झाल्यानंतर त्यांचे पार्थिव कुटुंबियांना सोपविण्यात आले मात्र गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कारापूर्वी मृतकाचा चेहरा बघण्यासाठी किट बाजूला केली असता पुरुषा ऐवजी महिलेचे पार्थिव बघून कुटुंबिय अचंभित झाले!

केडीके कॉलेजजवळील व्यंकटेश नगर येथील रहीवासी व पंजाब नॅशनल बँकेचे निवृत्त सहायक व्यवस्थापक शंकरराव शेटे(वय ६५) यांची करोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याने त्यांना २६ ऑगस्ट रोजी लता मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ५ सप्टेंबर रोजी संध्याकाळी शेटे यांचे निधन झाल्याचे त्यांच्या नातेवाईकांना कळविण्यात आले.

’पार्थिव घेण्यासाठी ६ सप्टेंबर रोजी आम्हाला बोलविण्यात आले’अशी माहिती शेटे यांचे नातेवाईक व माजी नगरसेवक प्रेमलाल पुणेकर यांनी माध्यमांना दिली.किटमध्ये गुंडळालेला मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला होता.त्यावर ‘शंकरलाल शेटे’अशी चिठ्ठी देखील चिपकवण्यात आली होती.

त्यामुळे महापालिकेच्या कर्मचा-यांसह शववाहिकेने नातेवाईक हे अंत्यसंस्कारासाठी गंगाबाई घाट येथे पाेहोचले. तेथे मृतक यांच्या मुलीला आपल्या पित्याचे अंत्यदर्शन घ्यायचे होते.त्यामुळे पार्थिव लाकडांवर ठेवल्यानंतर किटची चेन काढली असता आप्तांना धक्काच बसला!
कारण तो मृतदेह शेटे यांचा नसून महिलेचा मृतदेह होता!ही बाब कळताच इतर अंत्यसंस्काराठी आलेल्या लोकांनीही तेथे गर्दी केली.’आमच्या कुटंबियाचा मृतदेह कोणाला दिला?’असा संतप्त सवाल नातेवाईकांनी मनपा कर्मचा-यांना केला मात्र यात मनपाचा कोणताही दोष नसून लता मंगेशकर रुग्णालयाकडूनच चूक झाली असल्याचे नातेवाईकांना सांगण्यात आले.त्यावेळी तिथे उपस्थित सामाजिक कार्यकर्ते गुणवंत झाडे यांनी नातेवाईकांची समजूत घालून शांत केले.यानंतर भांदककर यांनी कोव्हिड नियंत्रण कक्ष्ाला फोन केला मात्र कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

शेवटी लता मंगेशकर रुग्णालयाशी संपर्क साधून’ आम्हाला आमच्या कुटुंबियाचा मृतदेह स्वाधीन करा’अशी मागणी नातेवाईकांनी लावून धरली. मात्र रुग्णालयात शेटे यांचा मृतदेहच नव्हता!तो असाच अन्य कोण्यातरी कुटुंबियांच्या सुपुर्द करण्यात आला होता.हा शोध सुरु असतानाच मोक्ष्धाम घाट येथे महिलेऐवजी पुरुषाचा मृतदेह मिळाल्याचे उघडकीस आले.त्यातून मोक्ष् धाम मध्ये पोहोचलेल्या मृतदेहाचा किटवर ’मीना मस्के’ अशी चिठ्ठी होती.आत मात्र पुरुषाचा मृतदेह होता.

रुग्णालयातून ही माहिती कळताच शेटे यांचे नातेवाईक त्याच शववाहिकेने मोक्ष् धाम घाटावर पोहोचले.तेथे ओळख पटवून शंकरराव शेटे यांचे पार्थिव गंगाबाई घाटावर घेऊन आले व त्याच शववाहिकेने मीना मस्के यांचे पार्थिव मोक्ष् धामकडे रवाना केले.
या सर्व गोंधळामुळे शेटे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी तीन तास उशिर झाला वरुन आप्त-स्वकीयांना पराकोटीचे दू:खं आणि मनस्तापही ही सहन करावा लागला.

मनपा कर्मचा-याला मारहाण-
करोनाबाधित मृतदेह न दाखविल्याने संतप्त नातेवाईकांनी महापालिकेच्या एका कर्मचा-याला मारहाण केली. ही घटना शनिवारी दूपारी २.३० वा.च्या सुमारास गंगाबाई घाटावर घडली.याप्रकरणी कोतवाली पोलीसांनी दोन युवकांविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केला.एका इसमाचा करोनामुळे मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह घेऊन महापालिका कर्मचारी महेंद्र भोयर रुग्णवाहिकेने गंगाबाई घाट येथे आले. नातेवाईकांनी मृतदेह दाखविण्यास महेंद्र यांना सांगितले असता महेंद्र यांनी नकार दिला. परिणामी संतप्त नातेवाईकांनी या कर्मचा-याला मारहाण केली.

Latest बातम्या