Homeनागपूर न्यूजपंचवीस हजार मुस्‍लीम बांधवांनी नरेंद्र मोंदी यांच्‍या विजयासाठी केली प्रार्थना

पंचवीस हजार मुस्‍लीम बांधवांनी नरेंद्र मोंदी यांच्‍या विजयासाठी केली प्रार्थना

बाबा ताजुद्दीन मल्टीस्पेशलिटी चॅरिटेबल हॉस्पिटलचे थाटात उद्घाटन

नागपूर, १५ फेब्रुवारी २०२४: इंडियन मायनॉरिटी फाऊंडेशन, आयएमएफ दिल्ली आणि हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्ट, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सद्भावना एक भारत श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेवर आधारित कार्यक्रमाचे गुरुवारी ताजबाग मध्‍ये आयोजन करण्‍यात आले. यावेळी पंचवीस हजार हून अधिक मुस्‍लीम बांधवांनी आगामी लोकसभा निवडणुक – २०२४ मध्‍ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विजय प्राप्‍त व्‍हावा, यासाठी प्रार्थना केली.

दर्गा परिसरात झालेल्‍या या कार्यक्रमात सुरुवातीला हजरत बाबा ताजुद्दीन रहमतुल्लाह अलैह यांच्या मजारवर चादर चढवण्‍यात आली व देशाच्या शांतता आणि बंधुभावासाठी प्रार्थना करण्‍यात आली. राज्यसभेचे खासदार आणि इंडियन मायनॉरिटी फाऊंडेशन आयएमएफडीचे संयोजक सतनाम सिंग संधू यांच्या हस्ते हजरत बाबा ताजुद्दीन मल्‍टीस्‍पेशालिटी चॅरिटेबल हॉस्पिटलचे उद्घाटन करण्‍यात आले.

यावेळी आयएमएफच्या संस्थापक हिमानी सूद, अजमेर दर्गा शरीफचे संरक्षक सलमान चिश्ती यांची प्रमुख उपस्‍थ‍िती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्टचे अध्यक्ष प्यारे जिया खान होते.

एमएफ संस्थापक प्रोफेसर हिमानी सूद, हज़रत बाबा ताजुद्दीन ट्रस्ट चे उपाध्यक्ष सुरेंद्र जिचकर, सचिव ताज अहमद राजा, शिख समुदायाचे गजेंद्र पाल लोहिया, महमद जमात चे सदस्य फारूक बावला, बोहरा समुदायचे मुस्तफा भाई टोपीवाला, पारसी समुदायाचे बुर्जिन रैंडेलिया, व खादिम समुदायाचे इमरान ताजी यावेळी उपस्‍थ‍ित होते.

सतनाम सिंग संधू म्‍हणाले, आज या दर्गामध्‍ये येऊन आपण सर्वांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍यासाठी प्रार्थना करून आपण संपूण जगात प्रेमाचा संदेश दिला आहे. या देशाला अधिक बळकट करण्‍यासाठी तुमच्‍या या प्रार्थना निश्चितपणे कामात येतील. त्‍यांनी प्‍यारेखान यांच्‍या आरोग्‍य क्षेत्रातील कार्याचे कौतुक केले.

प्‍यारेखान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील सर्व समुदायाच्‍या कल्‍याण व विकासासाठी कार्य केल्‍याचे सांग‍ितले. नरेंद्र मोदी सुफी स्‍थळांना जोडणारे सुफी कॉरिडॉर तयार करणार असून त्‍यांच्‍या नेतृत्‍वात मुस्‍लीम समुदायाचा विकास होत आहे, असे ते म्‍हणाले.

यावेळी शिया, सुन्‍नी, सुफी, पसमांदा बरेलवी, अहमदिया, दाऊदी बोहरा, खोजा यांच्‍यासह सर्व मुस्‍लीम समुदाय, हिंदू, शिख, इसाई, बौद्ध, पारसाी, जैन धर्माचे लोक मोठ्या प्रमाणात उपस्‍थ‍ित होते. त्‍यानंतर सूफी संगीताचे आयोजन करण्‍यात आले.

………………………………………

Latest बातम्या