
प्रशांत पवार यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश
नागपूर, ता. १६: आजवर राष्ट्रवादी शहरात का वाढली नाही, याचा आता सर्वानीच विचार करण्याची वेळ आली आहे. मोजकेच नेते निवडून येत असून निवडणुकीकडे गांभीर्याने न बघण्याची वृत्ती नेत्यांना बदलावी लागेल. लोकांसोबत कार्यकर्त्यांची कामे करावी लागेल. तरच ते टिकतील. आता आपल्याकडे सत्ता आहे, गृहमंत्रालया सारखे महत्त्वाचे खाते आहे. पक्ष वाढवण्यासाठी ही सर्वात चांगली संधी असल्याचे विधान राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफूल्ल पटेल यांनी केले.
’जय जवान, जय किसान’ संघटनेचे प्रमुख प्रशांत पवार यांनी आज राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. याप्रसंगी ते बोलत होते. विविध आंदोलनाच्या मार्फत सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी ही संघटना अग्रेसर असते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत प्रवेश घेताना पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा जुनाच कार्यकर्ता असल्याचे नमुद केले तर पवार यांच्यासारखा आंदोलनकारी नेत्यामुळे नागपूरमध्ये पक्ष बळकट होईल अशी अपेक्षा दोन्ही नेत्यांनी व्यक्त केली.
सिव्हिल लाईनमधील प्रेस क्लबमध्ये झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह माजी मंत्री रमेश बंग, माजी आमदार प्रकाश गजभिये, राष्ट्रवादीचे समन्वयक राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष बाबा गुजर, ओबीसी सेलचे प्रदेश अध्यक्ष ईश्वर बाळबुद्धे, शब्बीर विद्रोही, नगरसेवक दुनेश्वर पेठे, अलका कांबळे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की,मी सुद्धा रविभवनात कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी नियमित घेणार आहो, तुम्ही सुद्धा घ्या असे पटेल यांनी देशमुख यांना सांगितले. महापालिकेच्या निवडणुकांची तयारी जोमाने करा, विदर्भात राष्ट्रवादी आमदारांची संख्याही दुप्पट करायची आहे.
काँग्रेससोबत वाटाघाटी करताना आता आपण बरोबरीचा वाटा मागू, असेही प्रफुल पटेल यांनी सांगितले. अनिल देशमुख यांनी गृह, कामगार, गृहनिर्माण अशी खाती आपल्याकडे असून महापालिका निवडणूक लढण्यास इच्छुक उमेदवारांनी कामाला लागावे असे आवाहन केले.
राष्ट्रवादी प्रवेशानंतर जनतेसाठी आंदोलने आपली सुरूच राहतील. राष्ट्रवादी पक्षाला मोठे करण्याचे आपले प्रयत्न राहतील, असे प्रशांत पवार म्हणाले.

आमचे चॅनल subscribe करा