Homeनागपूर न्यूजनागपूर विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी लवकरात लवकर नोंदणी करावी

नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी लवकरात लवकर नोंदणी करावी

– जिल्हाधिकारी डॉ. इटनकर
 शहरी भागासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज स्विकारण्यात येणार

नागपूर दि. १९ ऑक्टोबर २०२२ : नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक 2023 साठी एक आक्टोंबर पासून मतदार नोंदणी प्रक्रीया सुरू झाली आहे. पात्र शिक्षकांनी निवडणूक आयोगाने जारी केलेला फार्म 19 भरून लवकरात लवकर नाव नोंदणी करावी, असे आवाहन नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचे सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले.

शिक्षक मतदार संघाकरिता विभागीय आयुक्त, मतदार नोंदणी अधिकारी व जिल्हाधिकारी सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी आहेत. तसेच विधानसभा मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी म्हणून कार्यरत असणारे उपजिल्हाधिकारी हे सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी आहेत. जिल्ह्यातील तहसीलदार, गटविकास अधिकारी, नगर परिषद व नगर पंचायत मुख्याधिकारी, अन्न धान्य पुरवठा निरीक्षक यांची पदनिर्देशित अधिकारी म्हणून नमूना 19 मधील मतदार यादीमध्ये नाव समाविष्ठ करण्यासाठी नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाच्या एकूण 43 मतदान केंद्र निहाय नेमणूक केली आहे.

शिक्षक मतदार संघाच्या यादीत नाव नोंदविण्यासाठी पात्र व्यक्तीने दावा अर्ज नमूना-19 मध्ये रंगीत छायाचित्र, रहिवास पुरावा, अध्यक्षांचे प्रमाणपत्रासह अर्ज भरणे आवश्यक आहे. संस्था प्रमुखांचे प्रमाणपत्र नाव नोंदविण्यासाठी ऑनलाईन अर्जाची सोय उपलब्ध नसल्याने प्रत्येक पात्र शिक्षकांना ऑफलाईन पध्दतीने नमूना-19 मध्येच अर्ज सादर करणे आवश्यक आहे. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये एक ऑक्टोबर 2022 पासून तर 9 डिसेंबर 2022 पर्यंत दोन टप्प्यांमध्ये आपल्या नावाची नोंदणी करण्याची संधी मतदारांना मिळणार आहे. यासाठी निवडणूक विभागाचा नमूना 19 भरणे अनिवार्य आहे.

शहरी भागातील शिक्षक मतदार संघाचे मतदारांनी त्यांचे अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निवडणूक शाखेकडे जमा करण्यास हरकत राहणार नाही.

7 नोव्हेंबर पर्यंत पात्र शिक्षक मतदारांना नमूना 19 सहाय्यक नोंदणी अधिकारी, पदनिर्देशित अधिकारी, सहाय्यक पदनिर्देशित अधिकारी यांचेकडे सादर करता येणार आहे. आतापर्यंत 1 हजार 918 अर्ज जमा झाले असून हे प्रमाण अत्यंत कमी आहे. सर्व पात्र शिक्षकांनी लवकरात लवकर मतदार यादीत नावे नोंदवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.
कोण करू शकतो मतदान

नागपूर विभागातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यातील माध्यमिक व त्यावरील शैक्षणिक संस्थांमध्ये एक नोव्हेंबर 2016 ते 1 नोव्हेंबर 2022 या सहा वर्षाच्या कालावधीत सलग किंवा टप्प्याटप्प्याने किमान तीन वर्ष शिक्षक म्हणून सेवा केलेला शिक्षकच यासाठी पात्र मतदार आहे. शैक्षणिक कार्य केल्याचे प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे. सोबतच निवडणूक आयोगाचा फॉर्म 19 भरणे प्रत्येकाला अनिवार्य आहे. शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी प्रत्येक निवडणुकीला नव्याने मतदार यादी तयार होते यासाठी दरवेळी नव्याने अर्ज करणे आवश्यक आहे. नोंदणीकृत मतदारालाच मतदान करण्याचा हक्क आहे.
***

Latest बातम्या