

नागपूर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी ९८ टक्के मतदान
नागपूर,ता. १० डिसेंबर: महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर प्राधिकारी मतदार संघ निवडणुकीसाठी आज शुक्रवारी १० डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता पासून सुरुवात झाली. दुपारी दोन वाजेपर्यंत ९० टक्के मतदान झाले होते. या निवडणुकीत एकूण ५६० मतदार असून तीन उमेदवार रिंगणात आहेत.

कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना पाळत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींनी या निवडणुकीत सहभाग नोंदवला. प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांना हातमोजे देण्यात आले. थर्मल स्कॅनिंगद्वारे तापमान मोजूनच मतदारांना मतदान कक्षात प्रवेश देण्यात आला. महानगरपालिकेच्या सदस्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूच्या तहसील कार्यालयात, तर जिल्हा परिषद सदस्यांनी आमदार निवास परिसरातील ग्रामीण तहसिल कार्यालयात मताधिकार बजावला. या निवडणुकीची मतमोजणी १४ डिसेंबरला होणार आहे.
नागपूर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी ९८ टक्के मतदान –
महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर प्राधिकारी मतदार संघ निवडणुकीसाठी आज शुक्रवारी १० डिसेंबर रोजी शांततेत मतदान पार पडले. या निवडणुकीत एकूण ५६० मतदार होते. त्यापैकी ५५४ (९८.९२ टक्के) मतदारांनी सायंकाळी मतदानाची वेळ संपेपर्यंत मतदान केले. या निवडणुकीत तीन उमेदवार रिंगणात आहेत. १४ डिसेंबरला बचत भवन येथे मतमोजणी होणार आहे.
जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विमला आर. यांनी आज मतदान प्रक्रीया पूर्ण झाल्यावर मतदान शांततेत पूर्ण झाल्याचा अहवाल निवडणूक आयोगाला सादर केला.
या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार चंद्रशेखर कृष्णरावजी बावनकुळे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार रवींद्र प्रभाकर भोयर, अपक्ष उमेदवार मंगेश सुधाकर देशमुख असे तीन उमेदवार रिंगणात आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे १४ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. रात्री उशिरापर्यंत बचत भवनातील स्ट्राँग रूम मध्ये मतपेट्या जमा करण्याचे काम सुरू होते. या ठिकाणी पुढील चार दिवस तगडा पोलिस बंदोबस्त राहणार आहे. १४ डिसेंबरला सकाळी ८ वाजता पासून ४ टेबलवर मतमोजणीला सुरुवात होईल. दुपारपर्यंत निवडणुकीचा निकाल येणे अपेक्षित आहे.
या निवडणुकीत नागपूर येथील शहर तहसिल कार्यालय, नागपूर ग्रामीण तहसिल कार्यालय, कामठी या तीन ठिकाणांना वगळता नागपूर शहरातील अन्य एक केंद्र, नरखेड, काटोल, सावनेर, रामटेक, कळमेश्वर, उमरेड, कन्हान, मौदा, बुटीबोरी, पारशिवणी,वानाडोंगरी येथील सर्व केंद्रावर १०० टक्के मतदान झाले.एकूण ५६० मतदारांपैकी एका मतदाराला निवडणूक आयोगाने अपात्र ठरवले होते. तर आज ५ मतदारांनी मतदान केले नाही. त्यामुळे एकूण ५५४ मतदान झाले. मतदानाची एकूण टक्केवारी ९८.९२ आहे.
सकाळी १० पर्यंत केवळ २.५ टक्के मतदान झाले. दुपारी १२ पर्यंत ही टक्केवारी २५ वर गेली. दुपारी १२ ते २ ही टक्केवारी ८९.१० टक्के तर शेवटच्या टप्यात ही टक्केवारी ९८.९२ झाली. ग्रामीण भागातही सकाळी केवळ काही ठिकाणी मतदान झाले. बहुतेक मतदान दुपारी झाले. शहर व ग्रामीण भागात या निवडणुकीसाठी तगडा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोणतीही अनुचित घटना या कालावधीत घडलेली नाही.
स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य या निवडणुकीत मतदार होते. सर्व १५ मतदार केंद्रावर कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनेची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली. मतदारांनी देखील हातमोजे, घालून मास्क लावून व थर्मल स्कॅनिंग करीत आपला मताधिकार बजावला. आवश्यकता असणाऱ्या काही केंद्रांवर व्हीलचेअर देखील उपलब्ध करण्यात आली होती.
मतदान विशेष-
• शांततेत मतदान प्रक्रिया पूर्ण
• १२ केंद्रावर १०० टक्के मतदान
• एक मतदार आयोगाकडून अपात्र
• ५६० पैकी ५५४ मतदारांचे मतदान
• १४ डिसेंबरला मतमोजणी
• बचत भवनात स्ट्राँग रूम

आमचे चॅनल subscribe करा