
गडकरी म्हणतात मनपाची सत्ता गमावू नका: असे नगरसेवक करणार नागपूकरांचे कल्याण?
नागपूर,ता.५ फेब्रुवारी २०२२: शराब,मदिरा हे असे शब्द आहेत ज्याला जगातील प्रत्येक शायरने आपल्या अंदाजात बया केले.शराबची लज्जत आणि सरुर याचा आनंद तर मद्यप्रेमीच सांगू शकतील मात्र जगभरात मद्याचा सरुर भोगला नाही असे विरळेच असतील.शेख इब्राहीम जौक हा मशहूर शायर म्हणतो ’जाहीर शराब पिने से काफिर हूआ मैं क्यो,क्या डेढ चुल्लू पानी में इमान बह गया’तर शाहीर अंजुम सांगतो‘शराब चीज ही ऐसी है ना छोडी जाये,ये मेरे यार की जैसी है ना छोडी जाये’शराब आणि सत्तेचा नशाच असा असतो की या दोन्ही गोष्टी अनेकांची नीतीमत्ता,जीवनमुल्ये खूंटीवर टांगत असतना दिसून पडतो..नागपूरातील एका आमदार पूत्र याने देखील शराबची जी झिंग अनुभवली,हजारो रुपयांच्या मद्याची उधळण केली ते बघता, हलबा समाजाचा गेल्या दहा वर्षात त्यांच्या पिताश्रीच्या आमदारकीच्या काळात किती उद्वार झाला याची प्रचितीच येते.मध्य नागपूरचे भारतीय जनता पक्षाचे आमदार विकास कुंभारे यांचे चिरंजीव श्रेयस कुंभारे ज्यांना येत्या मनपाच्या निवडणूकीत नगरसेवकाचे तिकीट दिले जाने निश्चित आहे त्यांनी मित्रांसोबत मद्याची केलेली ‘बरसात’मात्र वाखाण्याजोगी आहे.
सध्या मदार विकास कुंभारे यांचे हे कतृत्ववान चिरंजीव व मध्य नागपूरातील युवा मोर्चाचे मंत्री श्रेयस कुंभारे यांचा मद्याची धार उडविणारा व टेबलवर चढून देसी गर्लच्या गाण्यावर ठुमका’लावणा-या नृत्याचा व्हिडीयो माध्यमांमध्ये चांगलाच व्हायरल झाला आहे,गेल्या दोन टर्मपासून मध्य नागपूर विधान सभा मतदारसंघात मागास समजल्या जाणा-या हलबा समाजाचे प्रतिनिधित्व आमदार विकास कुंभारे करीत आहेत,अर्थात देशात जे घडतं तेच मध्य नागपूरात देखील घडलंय,नेता विकसित झाला त्यांचे सुपूत्र तर ‘अतिविकसित’झालेत,समाज मात्र होता तिथल्या तिथेच राहीला!
गेल्या निवडणूकीत भाजपाच्या नेत्यांनी ‘निष्क्रीय’ समजल्या जाणारे आमदार विकास कुंभारे यांचे तिकीट कापण्याचा संपूर्ण मानस बनवला होता मात्र ऐन वेळेवर कुंभारे यांना पुन्हा उमेदवारी न दिल्यास ही जागा गमवावी लागणार असल्याचे ‘संशोधन’पुढे आले.कुंभारे यांच्या विरोधात काँग्रेसने युवा काँग्रेसचे नेता बंटी शेळके यांना उमेदवारी दिली होती.एका नगरसेवकाने मात्र कुंभारे यांना या निवडणूकीत रडकुंडीला आणले होते.मध्य नागपूरची मतमोजणी होताना मतदार केंद्रातील दृष्य अद्याप ही माध्यमकर्मींच्या चांगलेच लक्षात आहे.शेवटच्या क्षणापर्यंत बंटी शेळके यांनी एक वेळचे आमदार राहीलेले विकास कुंभारे यांना तगडी लढत दिली होती.फक्त २६०० च्या जवळपास मतांनी बंटी शेळके यांना पराभव स्वीकारावा लागला.यासाठी देखील भाजपची ’बी’टीम समजल्या जाणारी एमआयएम भाजपच्या मदतीला यावेळीही धावून आल्याचे विश्लेषण तेव्हा देखील माध्यमांत प्रसिद्ध झाले होते.एमआयएमच्या ‘पतंग’ने बंटी शेळके यांची विधान सभेत जाण्याची डोर कापल्याचे शीर्षक ही प्रसार माध्यमात उमटले.आ.विकास कुंभारे यांचा हा विजय डीजिटल माध्यमात मात्र ‘लाजिरवाणा विजय’म्हणून व्हायरल झाला होता.

आपल्या दुस-या टर्ममध्ये ही हलबा समाजाच्या उद्वारासाठी,त्यांच्या न्याय व संवैधानिक हक्कासाठी,त्यांच्या विकासासाठी आमदार विकास कुंभारे यांनी जी ‘नेत्रदिपक’निष्क्रियता दाखवली आहे त्याबद्दल आता उघडपणे चर्चा घडू लागली आहे.
दोन वेळा मध्य नागपूर मतदारसंघातून हलबा समजाच्या मतदारांनी संधी देऊन देखील या आमदारांनी हलबा समाजाला त्यांचा संवैधानिक हक्क मिळवून देण्यासाठी कोणताही लढा दिलाच नाही.केंद्र सरकारच्या सहाव्या सूचीमध्ये संशोधन करुन हलबा समाजाच्या मुलांच्या नोकरी,भविष्य निर्वाह निधी,निवृत्ती वेतन,ग्रज्यूटी व्हॅल्यूसाठी केंद्राकडे पाठपुरावा केला का,असा प्रश्न विचारणे औचित्याचा मुद्दाच या समाजासाठी झाला आहे.यामुळे हलबा समाजाचा शासकीय नोकरदार वर्ग हा ३० ते ३५ वर्षे नोकरी करुन देखील आज ही या सर्व सुविधांना अद्याप ही मुकला आहे.
‘मूकनायक’असणारे आमदार हे आपल्याच समाजाच्या संवैधानिक लढ्याप्रतिही मूकच राहीलेले दिसून पडतात.
आता त्यांचेच सुपूत्र श्रेयस कुंभारे यांनी मात्र वडीलांच्या राजकीय निष्क्रियेतेचा रेकॉर्ड तोडण्याचा जणू विडा उचलला आहे.केवळ श्रेयस नव्हे तर मध्य नागपूर मतदारसंघातील भाजपचे विद्यार्थी आघाडी संयोजक प्रतीक राऊत व भाजपचे कार्यकर्ते यांची देखील ‘झिंग’व्हिडीयोमध्ये बघण्यासारखी आहे.हातात मद्याच्या बाटल्या घेऊन टेबलवर चढून भाजपचा हा ‘भावी’ नगररसेवक ‘देसी गर्ल’ चित्रपटातलं ‘झुमका गिरा दे,जो मिला ले अगर वो नज़र से नज़र मिटा दे,नचके दिखा दे,सबकी धड़कन भी कदम से कदम मिला ले,लहरों सी चाल के जाल बिछा दे,दिल को यु बेहाल बना दे,सारे दीवाने माने, न देखी कोई ऐसी गर्ल’या ओळींवर दिलखुलासपणे नाचताना दिसून पडतोय,हे बघूून हलबा समाजाचे सर्वच प्रश्न,समस्या या फक्त कुंभारे यांच्या ‘हवेली’च्या आतच सुटल्याचा भास होतो,हजारो रुपयांच्या मद्याची अक्षरश:उधळण हे भाजपचे कार्यकर्ते करीत आहेत हे बघून देशात खरोखरच कूपोषणाची समस्या आहे का?बालमृत्यू याच देशात होतात का?शासकीय आरोग्याची सेवा वेळेवर न मिळाल्यामुळे लाखो माता आपल्या नवजात बाळांचा चेहरा न बघताच मृत्यूमुखी पडतात का?या अश्या संशोधनावरही शंका निर्माण होते.
सार्वजनिक जीवनात वावरणारे यांनी निदान भारतासारख्या देशात साधनसूचिता पाळावी हे बिच्चा-या मतदारांची किमान अपेक्षा असतेच.आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीला किंवा त्यांच्या चिरंजीवांना किमान मद्यात बुडालेला,सत्तेचा माज आलेला,पैशांचा उन्माद अंगात आलेला, आम जनतेला रुचत नाही.ते त्यांच्या नीतीमुल्यात व संस्करातही बसत नाही.मात्र राजकारणी नेत्यांना व त्यांचे वारसदार हे मात्र या ‘फालतूच्या’नीतीमूल्यांना अपवादच ठरतात.मद्य पिने ही एक सवय आहे,जगातील निम्मे नागरिक मद्य पितात,मद्य पिने ही मायबाप सरकारनेच महसूलीसाठी करुन दिलेली व्यवस्था आहे मात्र मद्याची अश्यारितीने बरसात करने,मद्य इतरांच्या अंगावर फेकणे हे कोणत्याही तत्वात बसत नाही.
आता या भावी नगरसेवकाला, हजारो रुपयांच्या मद्याची अशी मुक्त हस्ताने उधळण करताना बघून नागपूरकर जनता काय बोध घेणार?
आ.कृष्णा खोपडे यांचे सुपूत्र देखील नगरसेवक पदाच्या उमेदवारीसाठी घुडग्याला बांशिग लाऊन बसले आहेत.अद्याप त्यांची कोणतीही ‘कीर्ती’अजून तरी समोर आली नाही. अर्थात यांना उमेदवारी देखील मिळेल,निश्चितपणे जनता त्यांना मत देखील देतील,ते मनपा मुख्यालयात नगरसेवक म्हणून देखील पोहोचतील मात्र नागपूरात कसा ‘विकास’ घडवून आणनार आहेत?याची झलक नागपूरकरांना मिळाली. आधीच विकसित झालेले असताना त्यांचाच ’महाविकास’ घडवून आणण्यासाठीच केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजपच्या वर्धापन दिनाच्या साेहळ्याप्रसंगी नगरसेवकांन ’आता तरी कामात सुधारणा करा,मनपाची सत्ता गमावू नका’असा सल्ला हे सर्व बघूनच दिला होता का?असा प्रश्न आता जनतेच्या मनात श्रीमान चिरंजीव श्रेयस कुंभारे यांचा व्हिडीयो बघून निर्माण झाला आहे.
याबाबत आ.विकास कुंभारे यांना संपर्क केला असता प्रतिसाद मिळाला नाही.

आमचे चॅनल subscribe करा