Homeनागपूर न्यूजधक्कादायक! डॉ.गंटावारची आरोग्य विभागाचा प्रमुख म्हणून फाईल झाली तयार

धक्कादायक! डॉ.गंटावारची आरोग्य विभागाचा प्रमुख म्हणून फाईल झाली तयार

भ्रष्ट वैद्यकीय अधिका-याची पदोन्नती: पदाधिका-यांची ’अर्थपूर्ण’ खामोशी

डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)

नागपूर,ता. ६ ऑक्टोबर: शहराच्या महानगरपालिकेत केव्हा,कसे,कोणते चमत्कार घडतील याविषयी साक्ष्ात ब्रम्हदेव देखील आता सांगू शकणार नाही,असाच एक चमत्कार मनपाच्या आरोग्य विभागातील बहूचर्चित नाव म्हणजे सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रविण गंटावार यांच्याबाबत घडलल्याची माहिती समोर आली आहे. आपली प्रदीर्घ कोविड काळातील सुटी संपवल्यावर डॉ.गंटावार हे मनपात आज ‘प्रगट’झाले. यावेळी डॉ.योगेंद्र सवाई हे प्रदीर्घ सुटीवर असल्याने डॉ.गंटावार यांच्याकडे आता आरोग्य विभागाचा प्रमुख म्हणून जवाबदारी सोपवण्यासाठी फाईल ‘तयार’झाली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे!

२० ते २६ जून दरम्यान भट सभागृहात चाललेल्या ६ दिवसीय मॅरॉथान सभेत याच डॉ.गंटावार यांच्या संपूर्ण काळ्या कारनाम्यांविषयी पाच दिवस सभागृह गाजले. भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी तब्बल साढे सहा तास डॉ.गंटावार यांच्या कृकृत्याचे कारनामे सभागृहात वाचले,महापौर संदीप जोशी यांनी सभागृह स्थगित करण्यापूर्वी तात्काळ प्रभावाने डॉ.गंटावार यांच्या निलंबनाचे आदेश दिले होते तसेच गंटावार दाम्पत्याच्या चौकशीचे तसेच त्यांच्या डॉ. पत्नीचे हजेरीचे पुस्तक ताब्यात घेऊन पुढील सभागृहात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.

मात्र माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली होताच डॉ.गंटावार यांचे काही खास ‘आर्थिक व्यहाराचे’ मुरीद असणारे पदाधिकारी यांनी पुन्हा डॉ.गंटावार यांना आरोग्य विभागात ‘स्थानापन्न’करण्याचा ध्यास घेतला व पडद्यामागील हालचालीनंतर एका गाजलेल्या भ्रष्ट सहायक वैद्यकीय अधिका-याला आणखी जास्त बढती देऊन सरळ आरोग्य विभागाचा प्रमुख करण्याचाच घाट घातला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मनपात पडला नवा पायंडा-
मनपातील कोणताही अधिकारी किवा कर्मचारी हा सुटीनंतर पुन्हा कर्तव्यावर हजर होताना सामान्य प्रशासन विभागाला तसे लेखी पत्र देऊन कळवतो.. मात्र प्रथमच डॉ.गंटावार हे आपल्या केबिनमध्ये ‘राजेशाही’थाटात खूर्चीवर बसताच त्यांचा अर्ज घेऊन उपायुक्त निर्भय जैन तसेच सामान्य प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त महेश धामेचा हे स्वत: त्यांच्या केबिनमध्ये हजर झाल्याची धक्कादायक माहिती सूत्राने दिली! डॉ.गंटावार यांना आरोग्य विभागाचा प्रमुख करण्याचा प्रस्ताव हेच दोन प्रशासकीय अधिकारी उद्या बुधवार दि. ७ ऑक्टोबर रोजी मनपाचे नवनियुक्त आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्याकडे घेऊन जाणार असल्याची धक्कादायक माहिती प्राप्त झाली.आता कोविडच्या काळात शहरातील अनेक नामांकित रुग्णालयांकडून कोट्यावधीचा पैसा लाटणा-या तसेच ज्यांच्यावर एका पोलिस कॉन्सटेबल मडावी यांनी त्यांच्या पत्नीच्या हत्येचा आरोप डॉ.गंटावार यांच्या कोलंबिया रुग्णालयात कसा झाला,तसेच त्यांच्या काेलंबिया रुग्णालयाचा संपूर्ण भ्रष्ट कारभारच गुन्हे शाखेकडे मांडला,ज्या डॉ.गंटावार यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत, गुंड साहिल सय्यद प्रकरणातही आरोप दाखल झाले, जे न्यायालयाकडून जामिन मिळवण्यासाठी प्रयत्नरत आहेत अश्‍या कुख्यात ‘महानुभवालाच’जर मनपा चक्क आरोग्य विभागाचा प्रमुख करण्यास पुढे सरसावली असेल तर नागपूरची जनता याचा हिशोब पुढील निवडणूकीत सत्ताधा-यांना विचारल्याशिवाय राहणार नाही,अशी कुजबुज ऐकू येत आहे.

दटके यांचा ‘मौनराग’-
ज्या सभागृहात दयाशंकर तिवारी यांनी डॉ. गंटावार यांच्यावर एकानंतर एक अश्‍या गंभीर आरोपाच्या फैरी झाडल्या,त्या सभागृहात मात्र माजी महापौर प्रविण दटके यांनी एक ही शब्द डॉ.गंटावार यांच्या विरोधात उच्चारल्याची नोंद नोंदवहीत नाही.याबाबत तेव्हा देखील आश्‍चर्य व्यक्त केले जात होते. डॉ.गंटावार हे दटके यांचे ‘खासमखास’ मर्जीतील अधिकारी असल्याची चर्चा मनपात सुरवातीपासून आहे. आता डॉ.गंटावार यांना चक्क आरोग्य विभागाचा प्रमुखच करण्यामागे देखील कोणाची ’कृपादृष्टि’आहे ?अशी चर्चा दबक्या आवाजात केली जात आहे.

विभाग प्रमुख बनणे हे अयोग्यच-महापौर
या विषयावर महापौर यांची प्रतिक्रिया विचारली असता खास ‘सत्ताधीश’सोबत बोलताना त्यांनी डॉ.गंटावार यासारख्या भ्रष्ट आरोग्य अधिका-याने विभाग प्रमुख बनणे हे अयोग्यच असल्याचे सांगितले. माझ्यासाठी देखील ही धक्कादायक माहिती असल्याचे ते म्हणाले. जर असे घडले तर मनपा प्रशासनाच्या या निर्णयाच्या विरोधात सभागृहात एक्शन घेतली जाईल,असे विधान त्यांनी केले.

गडकरी यांच्याकडे नागपूरकरांचे लक्ष्-
माजी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांची तडकाफडकी बदली होण्यामागे शहरातील हेवीव्हेट नेते केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांचाच फोन कारणीभूत ठरला अशी चर्चा शहरात चांगलीच रंगली. परिणामी त्यांच्याच शहरात त्यांच्याच पक्ष्ाची सत्ता असणा-या महानगरपालिकेत अगदी कोविडच्या महामारीच्या काळातच, गुन्हेगार पार्श्वभूमीचे व भ्रष्टाचारामध्ये लिप्त असण्याचा अारोप असणा-या डॉ.प्रविण गंटावार यांनाच आरोग्य विभागाचा प्रमुख म्हणून नियुक्ती दिल्यास गडकरी या सर्वस्वी अयोग्य कृतीकडे लक्ष् देतील का?असा प्रश्‍न आता उपस्थित केला जात आहे.

डॉ.गंटावार यांची अारोग्य विभागाच्या प्रमुख पदी नियुक्तीबाबत आमदार व माजी महापौर प्रविण दटके तसेच ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांच्याशी प्रतिक्रियेबाबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता,कॉल रिसिव्ह झाले नाही…!

Latest बातम्या