Homeनागपूर न्यूजदेशप्रेमाच्या भावनेवर स्वार ...राष्ट्रध्वजांचा भ्रष्टाचार!

देशप्रेमाच्या भावनेवर स्वार …राष्ट्रध्वजांचा भ्रष्टाचार!

‘मेरी माटी -मेरा देश’उपक्रम स्तुत्यच,पण….!

गेल्या वर्षीच्या भ्रष्ट काराभाराची सोशल मिडीयावर उजळणी

महाराष्ट्रात आले गुजरातवरुन राष्ट्रध्वज!राज्यातील सूत गिरणी कामगारांवर फडणवीस सरकारचा ही विश्‍वास नव्हता?

गुजरातच्या सुरतमधील अरिहंत सिल्क मिलचा राष्ट्रध्वजावरच शिक्का!गुजरातच्या कंपन्यांना राष्ट्रध्वजाचा अवमान करण्याचे प्रमाणपत्र!

मोदी म्हणाले खादीचा राष्ट्रध्वज फडकवा:नागपूरच्या प्रशासनाने वाटले अरिहंत कंपनीचे सिल्कचे राष्ट्रध्वज

नागपूरातील तरुणाईच्या संघटनेने आणला होता मनपा व जिल्हाधिकारी कार्यालयांचा राष्ट्रध्वज वाटपाचा भ्रष्टाचार उघडकीस

कोट्यावधीच्या गौडबंगालाविषयी चौथ्या स्तंभाची अशीही चुप्पी!

डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)

नागपूर,ता.१० जुलै २०२३: केंद्र सरकारच्या निर्देशानुसार या वर्षी पुन्हा एकदा ९ ऑगस्टपासून ‘मेरी माटी-मेरा देश’उपक्रमाला प्रारंभ झाला आहे,यावेळी तर घरोघरी तिरंगासोबतच,दिव्यांसह सेल्फी काढून पाठविण्याचे देखील आवाहन करण्यात आले आहे मात्र,स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची सुरवात म्हणून गेल्या वर्षी ज्या सर्वसामान्य नागरिकांनी,शालेय विद्यार्थ्यांनी स्थानिक प्रशासनाकडून दुप्पट किंमतीत राष्ट्रध्वज विकत घेतले,फाटके राष्ट्रध्वज नागरिकांच्या व शालेय विद्यार्थ्यांच्या माथी मारण्यात आले,त्याची पुन्हा एकदा चर्चा सोशल मिडीयावर चांगलीच व्हायरल झाली आहे.

(छायाचित्र :मनपाची गेल्या वर्षीची जाहीरात! अत्यंत कमी दरात राष्ट्रध्वज मिळवण्याबाबत!)

देशप्रेमासाखी भावना ही देखील ‘व्यापारिक’वृत्तीने पैसा कमविण्याचे घबाड कसं सिद्ध होऊ शकतं हे एखाद्या गुजराती माणसाकडून महाराष्ट्रातील जनतेने शिकण्यासारखंच आहे.केंद्र सरकारच्या निर्देशानुसार गेल्या वर्षी नागपूरच्या महानगरपालिकेने राष्ट्रध्वज नागरिकांना उपलब्ध करुन देण्याबाबत एक जाहीरात प्रसिद्ध केली होती.त्यावेळी राधाकृष्णन.बी हे मनपाचे आयुक्त होते तर राज्यात महाविकासआघाडीची सरकार ही ३० जून २०२२ रोजी जाऊन, शिंदे-फडणवीस यांची सरकार राज्यात रुढ झाली होती.परिणामी,केंद्रातील मोदी सरकारच्या विविध ‘कौतुकास्पद’ उपक्रम राबविणे राज्य सरकारला व त्यातल्या त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृहनगरात नागपूरात क्रमप्राप्तच होते.

मनपाने त्यावेळी आपल्या जाहीरातीत २६ बाय ४२ आकाराचे तसेच २० बाय ३० अश्‍या दोन प्रकारच्या आकाराचे राष्ट्रध्वज मनपा मुख्यालय तसेच मनपाच्या दहा ही झोनमध्ये नागरिकांना अनुक्रमे २६ रुपये व १४ रुपयात उपलब्ध असल्याचे प्रसिद्ध केले होते.मात्र,मनपा मुख्यालयासह दहा ही झोनमध्ये अक्षरश: राष्ट्रप्रेमींची लृट करण्यात आली व कोणत्याही अधिकृत पावत्यांशिवाय नागरिकांना ६५ व ६२ रुपयात ते राष्ट्रध्वज विकण्यात आले होते!

(छायाचित्र : मनपा मुख्यालय तसेच मनपाच्या झोन कार्यालयात साध्या रजिस्टरवर नाव लिहून घेताना मनपाचा एक कर्मचारी!)

फक्त एका साध्या रजिस्टरवर नाव व मोबाईल क्रमांकाची नोंद घेतली जात होती.या सर्व रजिस्टर्डमधील नोंदणीचे नंतर काय झाले?यावर कोणीही संशोधन केले नाही.तरी देखील सर्वच वयोगटातील,सर्वच वर्गातील,सर्वच जातीतील नागपूरकर राष्ट्रप्रेमींनी मनपाकडून तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आलेले राष्ट्रध्वज दामदुपटीने खरेदी केलेत!

महत्वाचे म्हणजे पंतप्रधान मोदी यांनी खादीचा प्रचार करीत खादीचे राष्ट्रध्वज वाटप करण्यात येतील असे जाहीर केले असतानाही,नागपूरात चक्क सिल्कचे राष्ट्रध्वज वाटण्यात आले!कहर तर तेव्हा झाला जेव्हा गुजरातच्या सूरतमधील अरिहंत सिल्क मिलने, महाराष्ट्रात पुरविण्यात आलेल्या या सिल्कच्या राष्ट्रध्वजांवर चक्क आपल्या मिलचा ठप्पा मारला!एकीकडे देशाचे पंतप्रधान स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात घरोघरी राष्ट्रप्रेम जागृत होण्यासाठी घरोघरी तिरंगा फडकविण्याची घोषणा करतात,दुसरीकडे त्यांच्या गृहराज्यातील कंपन्यांकडून केवळ व्यवसायिक हेतू समोर ठेऊन राष्ट्रध्वाजांचा सर्रास अवमान केला गेला.चक्क अशोक चक्राच्या खाली मिलने आपले नाव कोरले मात्र….महाराष्ट्रातील सत्ताधा-यांची ताब नव्हती गुजरातमधील कोण्या कंपनीविरुद्ध कारवाई करण्याची आणि याविरुद्धची तक्रार गेल्या वर्षी अगदी पंतप्रधान कार्यालयापर्यंत होऊन देखील सूरतमधील त्या मिलविरुद्ध कोणतीही कारवाई झालीच नाही….!

(छायाचित्र : गुजरातच्या सूरतमधील अरिहंत सिल्क मिलने चक्क राष्ट्रध्वजाच्या अशोक चक्राखाली मारलेला मिलचा शिक्का!)

नागपूरातील एका स्वयंसेवी संस्थेच्या तरुणांनी मनपा मुख्यालयासह दहा ही झोनमध्ये एक स्टिंग ऑपरेशनच राबवले होते.केंद्राचा ‘हर घर तिरंगा’हा जाज्वल्य उपक्रम पोस्ट ऑफिसद्वारेही राबविण्यात अाले होते,तेथेही १५ रुपयांचा राष्ट्रध्वज चक्क २५ रुपयांत विकण्यात आला!किंमत ‘जाहीर‘ करायची वेगळी,‘वसूल’ करायची वेगळी…हा कित्ताच संपूर्ण राज्यात गिरवला गेला असल्याची ओरड गेल्या वर्षी चांगलीच चर्चिली गेली होती.हा सर्वसामान्य राष्ट्रप्रेमी नागरिकांकडून वसूल करण्यात कोट्यावधींचा पैसा…कोणा-कोणाच्या खिशात गेला?यावर देखील समाज माध्यमांवर चांगलंच मंथण रंगलं होतं.

नागपूरात एका वकील महिलेला तर चक्क फाटलेला राष्ट्रध्वज ६५ रुपयात देण्यात आला वरुन,घ्यायचा असेल तर घ्या नाही तर पैसे परत घेऊन जा,अशी मुजोर अरेरावी देखील मनपाच्या झोन कर्मचा-यांनी केली,याचा देखील व्हिडीयो चांगलाच व्हायरल झाला होता.

सर्वात मोठे गौडबंगाल म्हणजे केंद्राने किंमत तर जाहीर केली मात्र राष्ट्रध्वजाचा ‘आकार’जाहीर केला नाही,त्यामुळे राष्ट्रध्वजांचे आकार वेगवेगळे असल्याने किंमत देखील वेगवेगळी असल्याची मखलाशी प्रशासनाकडून करण्यात आली व येथेच भ्रष्टाचारातून प्रचंड पैसा कमविण्याची संधी साधता आली.मनपाच्या व जिल्हा परिषदेतील शाळांमधील कश्‍याप्रकारे गरीब विद्यार्थ्यांवर देखील राष्ट्रध्वज विकत घेण्याची सक्ती मनपा प्रशासन व जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आली,यावर बरेच व्हिडीयो व्हायरल झाले हाेते.घर एकच असताना दोन भावंडे अश्‍या शासकीय शाळेत शिकत असतानाही, दोन्ही भावंडांवर राष्ट्रध्वज विकत घेण्याची सक्ती करण्यात आली होती,पंतप्रधानांच्या घोषणेत मात्र शालेय विद्यार्थ्यांना राष्ट्रध्वज फूकट देण्याची बाब जाहीर झाली होती.

(छायाचित्र : पुरावा!मनपा मुख्यालय तसेच सर्व झोन कार्यालयातील साध्या रजिस्टरवरील नोंद,एक राष्ट्रध्वज चक्क ६५ रुपयात विकल्याचा! )

नुकतेच मनपाचे नवनियुक्त आयुक्त डॉ.अभिजित चौधरी यांनी ‘मेरी माटी-मेरा देश’उपक्रमाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली असता,गेल्या वर्षी राष्ट्रध्वजांसाठी वसूल करण्यात आलेली दामदुपटीची किंमत,यावर प्रश्‍न केला असता,त्यांनी देखील राष्ट्रध्वजांचा आकार हा वेगवगेळा असू शकतो त्यामुळे असे घडले असावे,अशी मखलाशी केली तसेच, आता माझ्या कार्यकाळात असे काही घडणार नसल्याचा दावा ही केला,याशिवाय मनपाच्या शालेय विद्यार्थ्यांना अगदी नि:शुल्क राष्ट्रध्वज वितरीत करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले,त्यामुळे नवनियुक्त मनपा आयुक्त डॉ.अभिजित चौधरी यांच्या कार्यकाळात नागपूरकर नागरिकांना यंदाही देशप्रेमाने भारावलेल्या ‘मेरी माटी-मेरा देश’उपक्रमाचा अनुभव कसा येणार,याकडे आता नागपूरकरांचे लक्ष लागले आहे.

गेल्या वर्षी तरुणांच्या एका संघटनेने केंद्र सरकारच्या राष्ट्रध्वजाविषयी जीआरची कॉपी मुजोर प्रशासनाला अट्टहासाने मागितली,त्यावर राष्ट्रध्वाजांचा आकाराच नमूद करण्यात आला नव्हता…..!

गेल्या वर्षी शहरातील एका स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक डॉ.प्रणय चांदेकर यांनी अनेक झोन कार्यालयात राष्ट्रध्वजांच्या विक्रीतून कोट्यावधींची माया जमविणा-या या अतिशय भ्रष्ट कारभाराचे व्हिडीयो समाज माध्यमांवर व्हायरल केले होते.इतकंच नव्हे तर बाकायदा १२ ऑगस्ट २०२२ रोजी पत्रकार भवनात पत्रकार परिषद घेतली होती मात्र,भाजपचे नेते चंद्रशेखर बावणकुळे यांच्या घरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा असल्याने एक ही पत्रकार,पत्रकार भवनात फिरकला नाही,त्यामुळे महाराष्ट्राच्या दोन मानांकन बिंदूसाठी दावा करणा-या मराठी वृत्तपत्रांचे कार्यालय गाठले असता,त्यांनी देखील सर्व पुरावे बघता यात कोट्यावधींचा गौडबंगाल असल्याचे मान्य केले मात्र,हे वृत्त प्रसिद्ध केल्यास फडणवीस सरकारची व पर्यायाने दिल्लीश्वरांची खप्पामर्जी होऊन नोकरीवरच गदा येण्याची शक्यता वर्तवित, वृत्त प्रसिद्ध करण्यास नकार दिला….!

सत्तरीच्या दशकात काँग्रेसने लादलेली आणिबाणि असो ज्यात माध्यम स्वातंत्र्याची पुरेपूर गळचेपी करण्यात आली होती किवा मोदींच्या काळात डेटा संरक्षण कायद्याच्या नावाखाली अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आलेली गदा असो,सत्ता बेलगाम होते तेव्हा भ्रष्टाचाराला वाव मिळतो आणि व्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी ही होते.,ही उक्ती स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातही,राष्ट्रप्रेमाच्या नावावर विकण्यात आलेल्या राष्ट्रध्वजांबाबत खरी ठरली.आता या वर्षी तर दिव्यांसोबत सेल्फी पाठवण्याचे आवाहन जिल्हाकारी व मनपा आयुक्तांनी पत्रकार परिषदा घेऊन केले आहे.हे दिवे देखील गुजरातमधून आयात करण्यात आल्याची चर्चा आहे.

फक्त १५ ऑगस्ट हा एक दिवस,घरोघरी राष्ट्रध्वज फडकवून राष्ट्रप्रेम दाखविण्याचा नसतो तर बाकीचे ३६४ ही दिवस जागरुक व दक्ष नागरिक बनून, राष्ट्राला खिळखिळे करणा-या व पोखरुन काढणा-या राजकीय व प्रशासकीय भ्रष्टाचाराला बळी न पडता, आपापल्या परिने भारतमातेच्या स्वातंत्र्याचा हा अमृत महोत्सव कोणत्याही बडेजावपणा न दाखवता घरोघरी साजरा केला जाऊ शकतो,हे राष्ट्रभक्तांनी ठरवले, तर भ्रष्टाचाराला चटावलेल्या अनेक राजकीय व प्रशासकीय धुरंधरांना आपोआप चाप बसेल व राष्ट्रप्रेमी नागरिकांकडून देखील ही एक देशसेवाच घडले,यात दुमत नाही.
………………………

 

Latest बातम्या