Homeनागपूर न्यूजक्रियेला देणार प्रतिउत्तर :प्रशांत पवार

क्रियेला देणार प्रतिउत्तर :प्रशांत पवार

Advertisements

काँग्रेसनेही ओबीसी उमेदवार द्यावा अन्यथा विरोधात करणार प्रचार-प्रशांत पवार यांचा इशारा

नागपूर,ता. २० नोव्हेंबर: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बुलढाण्यातील एका सभेत राष्ट्रवादीला इशारा देत, विदर्भातील एकमेव दूकान देखील बंद करु,असे वक्तव्य केले होते,‘जय जवान जय किसान’संघटनेचे अध्यक्ष व विद्यमान राष्ट्रवादीचे नेते प्रशांत पवार यांची पटोले यांच्यासोबतची राजकीय मैत्री जगजाहीर असता ,पटोले यांच्या या विधानावर प्रसार-प्रचार माध्यमांनी प्रशांत पवार यांना बोलते करण्याचा प्रयत्न केला असता,नाना यांनी माझ्या पक्षाविषयी जे विधान केले ते चुकीचेच आहे,यावर आमच्या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतेच तोडीस तोड उत्तर दिले आहे मात्र ज्यावेळी नाना पटोले हे माझ्यावर व्यक्तिश: आरोप करतील त्यावेळी मात्र क्रियेला प्रतिउत्तर देणारच अशी प्रतिक्रिया प्रशांत पवार यांनी दिली.

प्रशांत पवार यांचे बजाज नगर येथील वासवी लॉन येथील कार्यालय एकेकाळी नाना पटोले यांचे प्रचार कार्यालय राहीले असून भाजपला ‘राम राम’करीत पक्षत्याग केल्यानंतर पटोले यांच्या काँग्रेसतफे लोकसभेच्या निवडणूकीत प्रशांत पवार यांच्या कार्यालयातच त्यांच्या बैठकी,सभा व पत्र-परिषदा पार पडल्या होत्या.

‘कालाय तस्मै नम:’या म्हणी प्रमाणे लोकसभेच्या निवडणूकीनंतर नागपूरच्या राजकारणातील बरेच पाणी पूलाखालून वाहून गेले आहे.२०१९ च्या विधान सभेची निवडणूक जिंकून नाना हे काँग्रेसचे आमदार झाले आहेत तर प्रशांत पवार यांनी गेल्या वर्षी फेब्रुवारी २०२० मध्ये ऐन करोना काळात राष्ट्रवादीची घड्याळ हातात बांधली.

परिणामी नाना पटोले प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर ज्याप्रकारे ते सातत्याने भाजपसोबतच, राष्ट्रवादीवर देखिल शाब्दिक प्रहार करत आहेत ते बघता,ऐकेकाळचे जिवलग राजकीय मित्र आता राजकारणामुळे दोन वेगवेगळ्या पक्षांशी असलेल्या बांधिलकीमुळे एकमेकांच्या ‘राजकीय विरोधकाच्या’भूमिकेत आले आहेत.

नुकतेच प्रशांत पवार यांनी त्यांच्या कार्यालयाचे कायापलट करुन आतापर्यंत दिमागदारपणे उभे असणा-या पटोले यांचे भले मोठे कटआऊट खाली उतरवले व त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे कार्यालय थाटले यामुळे देखील चर्चेला उधाण आले.त्यांच्या कार्यालयाचे उद् घाटन नुकतेच पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते झाले.पवार यांनी देखील प्रशांत पवार यांच्या भव्य अश्‍या जनसंपर्क कार्यालयात लागलेले स्वत:चे कटआऊट निरखून पाहिले.

यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफूल्ल पटेल,प्रदेश उपाध्यक्ष अनिल अहिरकर,शहराध्यक्ष दुनेश्‍वर पेठे,राष्ट्रवादी नेत्या आभा पांडे,जिल्हाध्यक्ष बाबा गुजर,प्रवीण कुंटे,ईश्‍वर बाळबुधे,माजी आमदार दिनानाथ पडोळे,प्रकाश गजभिये,लक्ष्मी सावरकर,शैलेंद्र तिवारी आदी उपस्थित होते.

याशिवाय शरद पवार यांनी नुकतेच आपल्या नागपूर जिल्हा दौ-यात केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या विकासाच्या ध्यासाचे जाहीर कौतूक केले होते मात्र प्रशांत पवार हे सातत्याने गडकरी यांनी नागपूरात अट्टहासाने आणलेल्या दहा हजार कोटींच्या महामेट्रोवर अडीच हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप करत आले आहेत.

अश्‍यावेळी एकीकडे पक्षाचे सर्वेसर्वा गडकरी यांचे कौतूक करतात दूसरीकडे राष्ट्रवादीचेच नेते प्रशांत पवार हे भ्रष्टाचाराच्या आरोपांची राळ उठवतात,यावर बोलताना राष्ट्रवादीचे धोरण हे व्यक्तीवर टिका करण्यासंबंधी नसून यंत्रणेवर, कार्यपद्धती व भ्रष्टाचारावर टिका करणारे आहे.त्यामुळे महामेट्रो ही जरी गडकरी यांनी नागपूरकरांवर लादलेले ड्रीम प्रकल्प असले तरी या प्रकल्पात झालेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलत राहणार असल्याचे ते धाडसीपणे सांगतात.

याच वेळी ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्यामुळे ज्याप्रमाणे भारतीय जनता पक्षाने ओबीसी उमेदवार दिला आहे त्याच प्रमाणे आता काँग्रेसने देखील स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निवडणूकीत ओबीसी उमेदवारच द्यावा अन्यथा ‘जय जवान जय किसान’संघटना काँग्रेसच्या उमेदवाराच्या विरोधात प्रचारात उतरेल असा इशारा देखील प्रशांत पवार यांनी दिला आहे.

 

 

Latest बातम्या