Homeनागपूर न्यूजकेंद्रिय योजनेचे राज्यात गडकरी एकमेव कैवारी!

केंद्रिय योजनेचे राज्यात गडकरी एकमेव कैवारी!

Advertisements

राष्ट्रीय वयोश्री योजनेचा लाभ गडकरींच्या मतदारसंघात इतरांनाही

नागपूर,ता. ४ एप्रिल २०२२: केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी दिनांक २५ फेब्रुवारी २०२२ रोजी त्यांच्या छत्रपती चौकातील निवासस्थानवर पत्र परिषद घेऊन राष्ट्रीय वयोश्री योजनेची माहिती दिली होती.यावेळी त्यांनी नागपूरचा खासदार असल्याकारणाने विदर्भाशिवाय इतर जिल्ह्यातील लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकणार नाही फार-फार तर विदर्भातील जिल्ह्यातील लाभार्थी या योजनांचा लाभ घेऊ शकतील असे सांगितले होते मात्र बघता बघता या योजनेचा परिघ ’वाढता वाढता वाढे’ या उक्तीप्रमाणे इतका वाढला की आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी चक्क पुणे व मुंबईतील लाभार्थ्यांनी देखील नागपूरात येऊन नोंदणी केली आहे. त्यामुळे केंद्रिय योजनेचे राज्यात गडकरी हे एकमेव कैवारी असल्याचे चित्र उमटले.आज पत्रकार भवन येथे माजी परिवहन समितीचे सभापती बाल्या बोरकर,भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक संजय बंगाले व राम आंबूलकर यांनी नागपूरात या योजनेचा कालावधी वाढला असल्याची माहिती दिली.

याप्रसंगी बाल्या बाेरकर म्हणाले,की केंद्र शासनाच्या ’एडीआयपी’ योजनेअंतर्गत आणि राष्ट्रीय वयोश्री योजनेतंर्गत दिव्यांग तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत सहाय्यक साधने वाटली जात असून यासाठी नागपूरात सुरेश भट सभागृहात हे तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.या योजनेची मुदत ४ एप्रिल रोजी संपली होती मात्र आता या योजनेला मिळणारा प्रतिसाद बघता १८ एप्रिल पर्यंत दररोज सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत नोंदणी सुरु राहणार आहे.नागपूरात या तपासणी शिबिराची सुरवात २२ मार्च रोजी झाली होती.ज्येष्ठ नागरिकांना अधार देण्याच्या उद्देशाने भारत सरकारने ही योजना सुरु केली असून ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना ज्यांचे वार्षिक उत्पन्न एक लाख ८० हजार पेक्षा कमी आहे जसेच ज्यांना ४० टक्के किवा त्यापेक्षा अधिक दिव्यांगत्व असेल व ज्यांचे वार्षिक उत्पन्न एक लाख ऐंशी हजारपेक्षा कमी असेल त्यांना या योजनेला लाभ मिळत असून नागपूरात आतापर्यंत भट सभागृह तसेच सर्व झोनमध्ये झालेल्या नाेंदणीनुसार १०,३६५ लाभार्थ्यांची संख्या असून ७०५५९ एवढे साहित्य वाटप त्यांना केले जाणार असल्याचे बोरकर यांनी सांगितले.

लाभार्थ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद बघता भट सभागहात आणखी १५ संगणक वाढवण्यात आले असून १५संगणक ऑपरेटर्सची नियुक्ती करण्यात आली आहे.नांदेड,पुणे,अकोला,औरंगाबाद,यवतमाळ,गोंदिया पासून तर मुंबईहून देखील लाभार्थ्यांनी भट सभागृहात येऊन साहित्यासाठी नोंदणी केली असल्याचे त्यांनी सांगितले.मुंबई,पुण्याचे लाभार्थी नागपूरात येऊन नोंदणी करतात याचा अर्थ तेथील खासदार आपल्या मतदारांनासाठी या योजनेचा लाभ पोहोचविण्यास निष्क्रिय आहेत का?या प्रश्‍नावर बोलताना नागपूरातील नोंदणी संपल्यानंतर ग्रामीण पातळीवर नोंदणी केली जाणार आहे,रोस्टरप्रमाणे ही योजना महाराष्ट्रातील खासदार त्यांच्या-त्यांच्या मतदारसंघात राबवणार असल्याचे बाेरकर यांनी सांगितले.

या योजनेत अंध लोकांनाही विविध साहित्य वाटप केले जात असल्यामुळे पुणे,मुंबईहून अंध लांकांनी देखील भट सभागृहात येऊन नोंदणी केली असल्याचे बोरकर यांनी सांगितले.यावर अंध किवा दिव्यांगाना एवढ्या किलोमीटरचा प्रवास करुन एकवेळा नोंदणीसाठी तर दुस-यांदा साहित्य घेण्यासाठी नागपूरात यावे लागणार आहे,ही सेवा त्या त्या गरजूंना घरपोच का दिली जात नाही?यावर बोलताना हा विचार आम्ही केंद्रिय यंत्रणेसमोर मांडू व शक्य असल्यास ज्यांची नोंदणी झाली आहे त्यांना घरपोच साहित्य उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करु,असे संजय बंगाले यांनी सांगितले.

दीड महिन्यानंतर या साहित्याचे वाटप नागपूरात होणार आहे,महानगरपालिकेची निवडणूक डोळ्या समोर ठेऊन साहित्य वाटप केले जाणार आहे का?असा प्रश्‍न विचारता मनपाची निवडणूक कधी होणार आहे हे कोणालाही माहितीच नाही,पण नोंदणी झालेल्या साहित्यांची मोजमाप करुनच निर्मिती जयपूर येथे होणार असल्याने तेवढा काळ लागणारच आहे,असे बाल्या बोरकर उत्तरले.२०१६ मध्ये देखील हे शिबिर रेशीम बाग येथे झाले होते,आता २०२२ मध्ये हे होत आहे,दर पाच वर्षात असे साहित्य वाटपाचे शिबिर होत असतात त्यामुळे याचा निवडणूकीशी सबंध नसल्याचे संजय बंगाले यांनी सांगितले.

मात्र निवडणूकीच्या तोंडावरच दर पाच वर्षांनी गरजूंना असे साहित्य वाटपाचे शिबिर का आयोजित केले जातात?पाच वर्षातील मध्यंतरीच्या काळात गरजूंना या सहित्याची,केंद्र सरकारकडून प्राप्त होणा-या या मदतीची गरज नसते का?या प्रश्‍नावर मात्र वेळ मारुन नेण्यात आली.

थोडक्यात एकीकडे गडकरी स्वत:च्या निवासस्थानी या योजनेच्या लाभार्थी फक्त विदर्भातील जिल्ह्यांपुरतेच मर्यादित असणार आहे असे ठासून सांगतात,इतर खासदारांच्या मतदारसंघात मला असे साहित्य वाटपाचा अधिकार नसल्याचे सांगतात दुसरीकडे विदर्भ तर सोडा संपूर्ण राज्यातूनच गडकरी यांच्या मतदारसंघात या योजनेचे लाभार्थी नोंदणी करीत असल्यामुळे राज्यात गडकरी हे एकमेव केंद्रिय योजनांचे कैवारी असल्याचे चित्र उमटले आहे.

राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत देण्यात येणारी उपकरणे खालील प्रमाणे
चालवण्यासाठी काठी
कुबडी
श्रवण यंत्र
तीन चाकी खुर्ची
दाताची कवळी
संडास खुर्ची
कमरेचा पट्टा
मानेचा पट्टा आणि
चष्मा ही उपकरणे देण्यात येईल.

एडीआयपी योजनेअंतर्गत देण्यात येणारी उपकरणे खालील प्रमाणे-
चालवण्यासाठी काठी
कुबडी
तीन चाकी खुर्ची
तीन चाकी सायकल
संडास खुर्ची
ट्रायसायकल ( बॅटरी)
कॅलीपस
कुत्रिम अवयव
श्रवणयंत्र
शैक्षणिक संच
ब्रेलकीट (दृष्टिहीन करिता)
स्मार्टफोन (दृष्टिहीन करिता)
स्मार्ट केन (दृष्टीहीन करिता)
ही उपकरणे देण्यात येईल.

Latest बातम्या