.(रविवार विशेष)
साढे पाच वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करुनही सरकारच्या लेखी ‘अयोग्य!’
केंद्राच्या मार्गदर्शकतत्वात ‘कम्युनिटी हेल्थ आफिसर’ पदासाठी बीएससी नर्सिंग,आर्युर्वेद डॉक्टर्स पात्र:होमिआेपॅथी डॉक्टर्सना वगळले!
नर्सिंगपेक्षाही होमिओपॅथी डॉक्टर्सच्या पदवीचे मूल्य कमी आहे का?उपमुख्यमंत्र्यांना निवेदन
शासनाच्याच आदेशानुसार अतिरिक्त एका वर्षाचा ‘फॉरमॅकोलॉजी’कोर्स करुन देखील शासनाचे ‘घुमजाव!
एनएचएम दिल्लीचा ’हम करे सो कायदा’चा पवित्रा:म्हणे होमियोपॅथी डॉक्टर्सला मॉर्डन फॉरमॅकोलॉजीचे ज्ञान नाही!
एनएचएम महाराष्ट्रही ’खामोश!’महाराष्ट्र सरकारने आर्युर्वेद डॉक्टर्सला मात्र योजनेत केले समाविष्ट!
महाराष्ट्राच्या ऐंशी हजार होमियोपॅथी डॉक्टर्सचा प्रश्न ऐरणीवर : आरोग्य विभागाच्या ९ डिसेंबर २०२२ च्या जाहीरातीत होमियोपॅथी डॉक्टर्संना सुद्धा करावे समाविष्ट
डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर,ता.२५ डिसेंबर २०२२:केंद्र सरकारची दूरदर्शी धोरणे याचा भारतातील अनेक वृत्त वाहीन्यांसह जगभर डंगा वाजवला जातो मात्र केंद्राच्या आरोग्य विभागासारख्या अतिशय महत्वाच्या समजल्या जाणा-या विभागाचे काही निर्णय हे किती ‘अदूरदर्शी’ असतात याचेच एक ज्वलंत व तितक्याच भोंगळ कारभाराचे उदाहरण म्हणजे सन २०१९ सालापासून BHMS, CCMP उत्तीर्ण डॉक्टर्स यांना कम्युनिटी हेल्थ आफिसर ( CHO) या पदापासून केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाद्वारे वंचित ठेवणे,हे आहे!
केंद्र शासनातर्फे ‘आयुष्यमान भारत’ ही आरोग्य क्षेत्रातील , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील महत्त्वाकांक्षी योजना सुरू झाली असून त्याअंतर्गत खेडोपाडी, वाड्या वस्त्या पर्यंत शासकीय आरोग्य व्यवस्था पोहोचत आहे. केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शकतत्वानुसार बीएससी नर्सिंगसह आयुष पध्दती मधील फक्त BAMS ( आयुर्वेद डॉक्टर्स) या वैद्यकीय शाखेतील विद्यार्थ्यांचाच, कम्युनिटी हेल्थ ऑफिसर पदभरती मध्ये समावेश करण्यात आला, तर BHMS (होमिओपॅथी डॉक्टर्स ) या वैद्यकीय शाखेतील विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला नव्हता.
होमिओपॅथी डॉक्टर्सला या योजनेमध्ये सामावून न घेण्याच्या प्रश्नाचा, केंद्र सरकार कडे मागोवा घेतला असता केंद्र सरकारने होमिओपॅथी पदवी अभ्यासक्रमात मॉडर्न फॉरमॅकोलॉजी ( Allopathy) या विषयाचा अंतर्भाव नसल्यामुळे त्यांना या योजनेमध्ये सामावून घेतले नाही असे लेखी उत्तर राज्य शासनास कळविण्यात आले होते.
BAMS या पदवी अभ्यासक्रमात मॉडर्न फॉरमॅकोलॉजी (Allopathy) ह्या विषयाचा अंतर्भाव असुन या विषयाची फक्त ३० गुणांची लेखी परीक्षा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत ( नाशिक) घेतली जाते. बीएससी नर्सिंग या पदवी अभ्यासक्रमात मॉडर्न फॉरमॅकोलॉजी ( Allopathy) ह्या विषयाचा अंतर्भाव असुन या विषयाची फक्त ४० गुणांची लेखी परीक्षा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान ( नाशिक) विद्यापीठामार्फत घेतली जाते.
महाराष्ट्र राज्यामध्ये ८०,००० होमिओपॅथिक डॉक्टर्स आहेत. महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य व्यवस्थेची गरज लक्षात घेऊन सर्वदूर प्राथमिक आरोग्य व्यवस्था उपलब्ध व्हावी म्हणून सन २०१६ साली महाराष्ट्र शासनाने होमिओपॅथिक डॉक्टर्सकरिता ‘Certificate Course in Modern Pharmacology ( CCMP)’ हा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत १ वर्षाचा अभ्यासक्रम राज्यातील एमबीबीएस मेडिकल कॉलेज मध्ये सुरू केला आहे. आजमितीस महाराष्ट्रात सुमारे १५,००० होमिओपॅथी डॉक्टर्सनी हा अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे.
CCMP ह्या अभ्यासक्रमाचे परिक्षण केले असता त्यात मॉडर्न फॉरमॅकोलॉजी ( Allopathy) ह्या विषयाचा अंतर्भाव असुन या विषयाची १०० गुणांची लेखी परीक्षा ह्या अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या बीएचएमएस डॉक्टर्स ची महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत (नाशिक) घेतली जाते,मात्र,याचाही विचार केंद्राच्या आरोग्य विभागाने अापले आरोग्य विषयीचे धोरण राबवताना केला नाही..
बीएचएमएस,सीसीएमपी उत्तीर्ण डॉक्टर्सना कम्यूनिटी हेल्थ ऑफिसर पदभरती मध्ये समाविष्ट करण्यासाठी आयुक्त एनएचएम महाराष्ट्र यांनी दि. ४ जुलै २०१९ रोजी Additional Director, NHM, Delhi यांना विनंतीपत्र लिहिले होते. त्याच्या उत्तरादाखल BHMS, CCMP पदवीधारकांना ” Modern Pharmacology ” या विषयाचे ज्ञान नाही असे वस्तुस्थितीशी पुर्णतः विसंगत स्पष्टीकरण केंद्र शासनाकडुन देण्यात आले!
त्याबद्दल यानंतर आयुक्त एनएचएम महाराष्ट्र यांनी Additional Director, NHM, Delhi यांच्याकडे कुठलेही स्पष्टीकरण अद्यापपर्यंत दिलेली नाही व पाठपुरावा सुध्दा केला नाही. आरोग्य विभागाच्या या तांत्रिक चुकीमुळेच बीएचएमएस,सीसीएमपी उत्तीर्ण डॉक्टर्स ला कम्युनिटी हेल्थ आफिसर पदभरती समावेश पासून वंचित राहावे लागत आहे.
सीएचओ पदाच्या मार्गदर्शकतत्वा मध्ये या योजनेमध्ये कम्युनिटी हेल्थ ऑफिसर म्हणून कोणास समाविष्ट करावे? याची शिफारस वेळोवेळी राज्य शासनाने केंद्र शासनास करावी असा स्पष्ट उल्लेख आहे. त्याच आधारे सन २०१९ मध्ये बीयूएमएस डॉक्टर्स करिता महाराष्ट्र शासनाने, केंद्र शासनास शिफारस केली होती. ती मान्य करण्यात येवून बीयूएमएस डॉक्टर्सचा कम्यूनिटी हेल्थ ऑफिसर पदभरतीमध्ये समावेश करण्यात आला होता.
त्यामुळे महाराष्ट्र शासनाने बीएचएमएस,सीसीएमपी उत्तीर्ण डॉक्टर्सचा ,कम्युनिटी हेल्थ पदभरती मध्ये समावेश करावा,अशी शिफारस केंद्र शासनास त्वरित करावी, अशी मागणी बीएचएमएस,सीसीएमपी उत्तीर्ण डॉक्टर्सनी नुकतेच हिवाळी अधिवेशन दरम्यान होमियोपॅथी डॉक्टर्सच्या शिष्टमंडळाने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन सोपवून केली असल्याचे खास ‘सत्ताधीश’ला सांगितले..
या संदर्भात निर्णय होईपर्यंत आरोग्य विभागाकडून दि. ९ डिसेंबर, २०२२ रोजी कम्युनिटी हेल्थ ऑफिसर पदभरती करिता बीएचएमएस,सीसीएमपी डॉक्टर्सना वगळून प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीस, त्वरित स्थगिती मिळावी, अशी मागणी सुध्दा बीएचएमएस,सीसीएमपी उत्तीर्ण डॉक्टर्सच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

आमचे चॅनल subscribe करा