
संपादकांचा ’डर्टी पिक्चर’(भाग-२)
नागपूर,ता. ३० ऑगस्ट: मार्चच्या ९ ता.ला शहरातील एका फार मोठ्या नेत्याच्या फोनने पत्रकारिता जगतात ’राजकीय तसेच वृत्तपत्रीय भूकंप’आणला. संपादकांच्या कोटीच्या कोटी उड्डाणाविरोधात तक्रार मालकाच्या कानावर त्यांनी करताच,एचआरच्या माध्यमातून महाराष्ट्रील नंबर-१ च्या रेसमधील वृत्तपत्राच्या मालकाने संपादकाला घरी बाेलावले. मालकाने घरी बोलवताच या संपादकाच्या काळजात धस्स..झालं. व त्यांनी तातडीने करोनाचा काळ असल्याने व मालाकाला कोविड होऊ नये म्हणून काळजीपोटी कापूर आणि नीलगिरीचे तेल सोबत घेऊन गेलेत मात्र….कोविड विषय बाजूला सारुन…मालकाने त्यांना दोन टूक सांगितले….’राजीनामा द्या नाही तर कामावरुन काढू…!’
नीलगिरीच्या तेलाने स्वत:शीच मालिश करण्याची वेळ नियतीने त्यांच्यावर आणली तर कापूर जाळून ही जळणारे काळीज शांत होणे शक्य नसल्याने तो ही संपादकांनी तसाच ठेऊन दिल्याची चर्चा पत्रकार वर्तुळात रंगली.शेवटी अब्रू ही ’भ्रष्टाचा-यांना’ देखील असतेच… त्यामुळे अब्रू राखली… मधूमेहाचे कारण सांगून ’खूप झाली पत्रकारिता’असे फेसबूकवर राग आलापून, राजीनामा दिला आणि घरी बसले!ज्या मोठ्या नेत्याच्या फोनमुळे घरी बसले आता त्याच नेत्याच्या आश्रयाला ते गेल्याची चर्चा आहे. त्यांनीच आता त्यांचे ‘पुर्नवसन’करावे अशी गळ घालण्यात येत आहे.शेवटी प्रदीर्घ पत्रकारिता केली असल्याने आता जीवनाच्या या टप्प्पयावर दूसरे तरी काय करणार?
जरूर वाचा : मेयो वॉर्डातील शौचालयात वृद्धाचा तीन तास मृतदेह शौचात पडून!
शहरातील सर्वच राजकीय पक्ष्ांसोबत सलोख्याचे संबंध असणारी एक ’गांधीवादी’विभूती यांना देखील यावेळी त्यांचे पुर्नवसन जमले नाही.कारण मागच्यावेळी शहरातील ज्या संपादकाचे त्यांनी मोठ्या वृत्तपत्रात पुनर्वसन केले त्याच वृत्तपत्राच्या मालकाला याच मोठ्या नेत्याचा,शहरातील गांधीवादी विभूती यांच्या सांगण्यावरुन सिफारिश गेली होती….!आता कोणत्या तोंडाने ही गांधीवादी विभूती त्या नेत्याकडे जाणार होती?चौघांपैकी एकेका संपादकाने ६०-६० लाखांचे भरघोस ’पॅकेज’मालकाला अंधारात ठेऊन त्या सुप्रसिद्ध बिल्डरकडून घेतले असल्याची खात्रीलायक वृत्त आहे.या संपादकांना पगारच लाखांच्या घरात असतानाही लोभ सुटला नाही आणि ’विनाशकाले विपरित बुद्घीने ’घात केला.
मोठमोठे संत सांगून गेलेत ’लोभ आणि काम’हे दोन रिपू पुरुषाला आयुष्यातून उठवतात मात्र संतांची वचने या काही संपादकांनी आचरणात न आणता शहरातील अनेक सार्वजनिक कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलावले असताना केवळ ’भाषणातच ’आचरणात आणली!
यातील एक संपादक तर संपादक पदासाठी एवढे हपापलेले होते की महिनाभर ते त्या वृत्तपत्राच्या कार्यालयात ’विना केबिनचे’बाहेर सर्व कर्मचा-यांसोबत बसले! वृत्तपत्रातून मिळणारा पुढचा ’मलिदा’डोळ्यासमोर तरळत असताना स्वाभिमान,आत्मसन्मान वगैरे-वगैरे या सर्व निरर्थक बाबी गुंडाळून ठेऊन तब्बल महिनाभर विना केबिनचे बसणा-या या संपादकाची खासगीत बरीच चर्चा रंगली होती.
मालकाचे मन जिंकण्यासाठी या संपादकाने अनोखी क्लृप्ती रचली होती.आधीच्या वृत्तपत्राच्या मालाकाला इतर वृत्तपत्रासारखीच मराठी वाहीनी सुरु करायची होती,या संपादकाने त्यांच्यासाठी एक प्रेझेंटेशन बनवून घेतले. ते घेऊन ते मालकासोबत मुंबईला देखील पोहोचले मात्र वाहीनी सुरु करण्यासाठी पुढे पैशांचा डोंगर बघता या मालकाने तो विचारच रद्द केला.संपादकाच्या पदरी निराशा पडली.याच दरम्यान त्यांची त्या वृत्तपत्रातून हकालपट्टी ही झाली. पुन्हा ते शहरातील गांधीवादी विभूतीच्या शरणी आलेत. मोठ्या नेत्याच्याकरवी दुस-या मोठ्या वृत्तपत्राच्या मालकाला फोन गेला. या मालकाला या संपादकांनी त्यांच्या मराठी वाहीनीसाठी तेच सादरीकरण दाखवले आणि स्वत:ची इमेज बनवली. हा माणूस नागपूर आवृत्तीसाठी खूप कामाचा असल्याची दूर्देवाने मालकाची धारणा झाली आणि पुढचा इतिहास सर्वांनाच माहिती आहे…..!
काय झाले आहे असे : रुग्ण म्हणतो ‘मेयाे वर बॉम्ब फेकून देतो आता !
वृत्तापत्र अंकांचा खप निम्म्यावर आला. या संपादकाने आपल्या मर्जीतील कमकुवत प्रतिभेची माणसे पेरली. प्रामाणिक आणि अडचणीच्या ठरणा-या माणसांची हकालपट्टी केली.हजार किलोमीटर दूर राहणा-या मालकाला नागपूर आवृत्तीत काय चालले आहे?याचा अदमासच घेता आला नाही.अवघ्या साढे पाच वर्षात या वृत्तपत्राचा ’बॅण्ड बाजा बारात’वाजले.कारण वृत्तपत्राचा खप वाढवणे,बातम्यांचा दर्जा सुधरावणे इ. कोणत्याही गोष्टीत परिश्रम खर्ची न करता या भ्रष्ट संपादकांनी केवळ आणि केवळ आपली तुंबडी भरण्याचे काम केले. तरीही पोट भरले नाही तर राजकीय नेत्यांच्या वर्तुळात उठ-बस याचा फायदा घेत शहरातील या बिल्डरला गाठले.सोबत आणखी तीन संपादकांचे त्रिकूट हे होतेच!
मात्र ग्रह पालटले, करोना नावाचा संसर्गजन्य विषाणू चीनच्या यूवान प्रांतातून सरळ नागपूरात आला इतर सर्व क्ष्ेत्रांसोबतच वृत्तपत्रांचे देखील सर्व आर्थिक गणित गडगडले परिणामी बिल्डरने या संपादकांसोबत केलेला आर्थिक सौदा फिस्कटला.तक्रार हाय लेवलवर गेली.त्यांचा फोन मालकांना गेला.. मालकांना ४४० वॉल्टचा करंट बसला.…दोन संपादक घरी बसले तर दोन घरी बसण्याचा मार्गावर आहेत…..!
हे जरूर वाचा : रविनगरच्या सुविख्यात हॉस्पीटलमध्ये ’डर्टी पिक्चरच्या ’संपादकांची बैठक!
मालकांनी पुढे यावे…..
काल ’सत्ताधीश’ने संपादकांचा ’डर्टी पिक्चर’ही बातमी प्रसिद्ध करताच वृत्तपत्र वर्तृळात एकच चर्चा उमटली…व्हॉटस ॲपवर देखील संतप्त प्रतिक्रिया उमटली. या संपादकांची नावे बातमीसोबत प्रसिद्ध करण्याची मागणी अनेक वाचकांनी केली. वृत्तपत्र जगताकडे सामान्य वाचक हा अद्यापही फार सन्मानाने बघत असतो. प्रसिद्ध झालेल्या बातमीवर डोळे झाकून विश्वास करतो. त्यातील काही बातम्या या पेड न्यूज असल्याचे तसेच त्या बातम्या काही संपादकांद्वारे बिल्डर किवा राजकीय नेत्यांकडून कोट्यावधीचे पॅकेज घेऊन छापून आणल्या जात असतात हे कळल्यावर वाचकांचा संताप होणे क्रमप्राप्त आहे.परिणामी नागपूरातील ज्या भ्रष्ट संपादकांना, वृत्तपत्र मालकांनी निलंबित केले त्यांची नावे उजागर करुन समाजाप्रति आपले सामाजिक आणि नैतिक कर्तव्य निभवावे अशी मागणी केली जात आहे.
हा विषय केवळ ’सत्ताधीश’चा नसून एक सामाजिक आणि नैतिक विषय आहे. वृत्तपत्रसारख्या जगतात गेल्या काही काळापासून शिरलेली भ्रष्ट आणि कामातूर,स्त्रियांचे लैंगिक शोषण करणारी किड ही नष्ट झालीच पाहिजे.समाजाने मालकांना हे लक्ष्ात आणून देणे गरजेचे आहे. वाचक आंधळा विश्वास मालकावर करीत असतो.त्यामुळे हा विषय केवळ मालक आणि संपादकांपुरता मर्यादित न राहता संपूर्ण समाजाच्या नैतिक स्वास्थ्याचा विषय झाला असल्याचे मोठ्या प्रमाणात संदेश प्राप्त झाले.

आमचे चॅनल subscribe करा