नागपूरात मेयो-मेडीकलमध्ये रुग्णांसाठी ‘नो वेकेन्सी!’प्रशासनाचे दावे सपशेल फेल
नागपूर,ता. १२ सप्टेंबर: शहरात करोना बाधितांच्या संख्येने उच्चांक गाठला असून त्या तुलनेने उपचार व्यवस्था ही किती तोकडी पडत आहे याचे एक ज्वलंत उदाहरण म्हणजे कुही व सावनेर तालुक्यातील आलेल्या रुग्णांना आज मेयोमध्ये भरती होण्यासाठी दिवसभर जे हेलपाटे घालावे लागले ते अनुभवता ‘मेयो वर बॉम्ब फेकून देतो आता!’अशी उद्वीग्नता एका रुग्णाने माध्यमकर्मीकडे व्यक्त केली.
हे रुग्ण ‘साडवा’ भागातून आले असून सकाळच्या दहा वाजतापासून लता मंगेशकर,मेडीकल व मेयो या तिन्ही रुग्णालयांचे हेलपाटे घालून बेजार झाले होते.बॉम्ब मिळवावा आणि टाकून द्यावा या रुग्णालयावर,असा संताप त्यांनी मेयो प्रशासनावर व्यक्त केला.ते स्वत:एका मोठ्या दैनिकातील ग्रामीण वार्ताहर असून देखील महाराष्ट्राच्या उपराजधानीत उपचारासाठी आले असता त्यांना कोणाचीही मदत मिळाली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
याशिवाय इतर अनेक रुग्णांना आज मेडीकल प्रशासनाने देखील चक्क ‘नो वेकेन्सी’चा कागद त्यांच्या हातात थमावून दिला व मेयोमध्ये जाण्याचा सल्ला दिला.यामुळे आज अक्ष्रशह: गंभीर रुग्णांची ससेहोलपट झाली. मेयामध्ये आधीच १२ रुग्ण वेटिंगवर आहेत असे त्यांना सांगण्यात आले.न्यूमोनियाच्या रुग्णाला देखील या दोन्ही शासकीय रुग्णालयांनी भरती न करता बेड उपलब्ध नसल्याचे कारण सांगून मरणाच्या दारात सोडून दिल्याचे विदारक दृष्य मेयो रुग्णालयासमोर उमटले. एक्सरेमध्ये या रुग्णाला न्यूमोनिया झाल्याचे निदान झाले आहे. मेडीकलमध्ये ऑक्सीजनची व्यवस्था नसल्याचे कारण रुग्णांना देण्यात आले.
कालच ‘सत्ताधीश’सोबत बोलताना मेडीकलचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉ.अविनाश गावंडे यांनी मेडीकलमध्ये ऑक्सीजनचा पुरेपूर साठा असल्याची माहिती दिली होती.आज मात्र ग्रामीण भागातून आलेल्या या रुग्णांना मेडीकलमध्ये ऑक्सीजन नसल्याचे कारण सांगून भरती करण्यास नकार देण्याचे जळजळीत वास्तव समोर आले.
काल रात्री दहा वाजता ५८ वर्षीय रगडे नावाच्या मृतकाच्या नातेवाईकांनी मेडीकल प्रशासनावर रुग्णाचे ऑक्सीजन सिलेंडर काढून टाकल्याने रुग्णाचा मृत्यू झाला असल्याचा आरोप केला होता.कोणतेही रुग्णालय असले प्रकार करीत नसल्याचे स्पष्टीकरण मेडीकल प्रशासनाने या घटनेवर दिले होते.
शहरातीलच नव्हे तर ग्रामीण भागातून आता शहरात उपचारासाठी येणा-या रुग्णांचे प्रचंड हाल होत आहे. मेडीकल,मेयो प्रशासन तसेच मनपा व जिल्हा प्रशासनाकडून कोणतीही योग्य माहिती रुग्णांना मिळत नसून शहरात सध्या करोना महामारी रोखण्यासाठीचे उपाय म्हणजे ‘बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात’ही उक्ती चपखळ बसते,अशी टिका सामान्य माणूस करीत आहे.
काल माजी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पायावर लोटांगण घालणारे युवा मात्र आज मेडीकल-मेयो रुग्णालयांसमोर या गरीब,गरजू,सामान्य रुग्णांच्या मदतीसाठी गर्दी करताना दिसले नाहीत! मुंढे हे देखील नागपूरातून ‘विजयी‘अर्हीभावात निघून गेलेत मात्र त्यांनी गेल्या ५ महिन्यात नागपूरात लोकशाही वेशीला टांगून जो एककल्ली कारभार केला,त्याची फळे आता नागपूर व ग्रामीण भागातील रुग्ण भोगत आहेत.
मुंढे यांनी सोशल मिडीयाच्या ऐवजी जमिनीस्तरावर खरंच प्रभावी नियोजन राबविले असते तर एका-एका खाटेसाठी रुग्णांना रुग्णालयांसमोर तडफडत प्राण सोडावे लागले नसते. शहरातील राजकीय पक्ष्,नेते,पदाधिकारी,कार्यकर्ते हे तर करोनासमोर ‘पंगू’ झालेल्या अवस्थेत दिसून पडतात आहे,सप्टेंबरमध्ये उपचाराची व्यवस्था अतिशय तोकडी राहणार असून बाधितांची संख्या ही सर्वाधिक राहणार असल्याची केंद्राची सूचना असून देखील हेच का प्रशासनाचे ‘प्रभावी‘उपाय?असा प्रश्न आता जनसामान्यांना पडला आहे.
शहरातील व्यापारी वर्ग ही आता चांगलाच धस्तावलेला असून त्यांनाच आता करोनाची संसर्ग साखळी तोडण्यासाठी शहरात १५ दिवसांचे ‘लॉक डाऊन ’हवे आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचे पुरते कंबरडे मोडले असताना ते ही शक्य नाही.
नागपूरात शासकीय असो किवा खासगी रुग्णालये,एकेका खाटेसाठी रुग्ण तडफडतोय, परिणामी, ग्रामीण भागातील नागरिकांनी तसेच नागपूरकरांनीच आता स्वत:ची काळजी स्वत: घ्यावी,राजकारणी,प्रशासकीय नोकर यांच्यावर अवलंबून राहू नये,हेच सप्टेंबर महिन्यात करोना आपल्याला शिकवून गेला आहे,असेच आता म्हणावे लागेल….!
(व्हिडीयो सौजन्य-सुदर्शन बागडे)

आमचे चॅनल subscribe करा