Homeनागपूर न्यूजअखंड हिंदू राष्ट्रासाठी सावरकरांनी आयुष्य वेचले– शरद पोंक्षे

अखंड हिंदू राष्ट्रासाठी सावरकरांनी आयुष्य वेचले– शरद पोंक्षे

Advertisements

स्वा. सावरकर जयंती महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी व्याख्यानाला हाऊसफुल गर्दी

Advertisements

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अखंड हिंदू राष्ट्राच्या संकल्पनेसाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. सेल्युलर जेलमधील अमानुष छळ, हिंदूंवरील भेदभाव आणि धर्मांतराच्या प्रयत्नांचा अनुभव घेत असताना त्यांनी विविध धर्मग्रंथांचा अभ्यास केला. त्यातून हिंदू धर्म आणि हिंदुत्वाची व्यापक व सर्वसमावेशक संकल्पना त्यांनी समाजासमोर मांडली, असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते व वक्ते शरद पोंक्षे यांनी केले.

श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्टच्या वतीने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या १४३ व्या जयंतीनिमित्त आयोजित “अंदमान एक तीर्थक्षेत्र…” या त्रिदिवसीय महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी प्रसिद्ध अभिनेते व वक्ते शरद पोंक्षे यांच्या “हिंदुत्व…” या विषयावरील व्याख्यानाला नागपूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. व्हॉलीबॉल मैदान, लक्ष्मीनगर, आठ रस्ता चौक येथे झालेल्या कार्यक्रमाला श्रोत्यांनी अक्षरशः हाऊसफुल गर्दी केली.

कार्यक्रमाला पद्मश्री डॉ. विलास डांगरे, शरद पोंक्षे, भा ज प विदर्भ कार्यालयाचे कार्यालय प्रमुख संजय फांजे, श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्टचे अध्यक्ष तथा माजी महापौर संदीप जोशी आणि सेल्युलर जेलची प्रतिकृती साकारणारे कलाकार व सिव्हिल इंजिनीअर प्रफुल्ल माटेगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

“हिंदुत्व ही केवळ धार्मिक नव्हे, तर भारताच्या सांस्कृतिक ओळखीची आधारशिला आहे,” असे सांगताना पोंक्षे म्हणाले की, राष्ट्राची भाषा, संस्कृती आणि इतिहास हे त्याच्या अस्तित्वाचे मूलभूत घटक असतात. भाषा आणि संस्कृतीचा ऱ्हास झाला तर राष्ट्राची ओळखही धोक्यात येते. ब्रिटिशांनी भारतावर राज्य करताना याच नीतीचा अवलंब केला होता. सावरकरांचे “जे इतिहास विसरतात, त्यांचा भूगोल बिघडतो” हे वाक्य आजच्या काळातही तितकेच समर्पक असल्याचे त्यांनी नमूद केले.

पोंक्षे यांनी भारतीय ज्ञानपरंपरेचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, आयुर्वेद, योग, भारतीय सण-उत्सव, पूजा-पद्धती आणि जीवनशैली या सर्व गोष्टी निसर्गाशी आणि ऋतुचक्राशी जोडलेल्या आहेत. वेद, उपनिषदे आणि प्राचीन ग्रंथांमध्ये या परंपरांचे सखोल तत्त्वज्ञान दडलेले आहे. संस्कृत ही त्या ज्ञानपरंपरेची वाहक भाषा असून तिच्यापासून दूर गेल्याने आपण आपल्या सांस्कृतिक मुळांपासूनही दूर जात आहोत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

जगातील सर्वांत प्राचीन आणि सातत्याने टिकून राहिलेल्या संस्कृतींपैकी सनातन संस्कृती ही एक असल्याचे सांगून, तिचे ज्ञान, मूल्ये आणि परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी प्रत्येकाने स्वीकारली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

प्रास्ताविकातून माजी महापौर संदीप जोशी यांनी महोत्सवाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. अंदमानच्या सेल्युलर जेलची वास्तवदर्शी प्रतिकृती उभारणारे प्रफुल्ल माटेगावकर यांच्या कार्याचे त्यांनी विशेष कौतुक केले. तसेच अंदमानमधील क्रांतिकारकांच्या त्यागाची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचावी यासाठी हा उपक्रम राबविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीरज दोन्तुलवार यांनी केले.

महोत्सवात उभारण्यात आलेली अंदमानच्या ऐतिहासिक सेल्युलर जेलची भव्य प्रतिकृती आणि त्यासोबत सादर करण्यात येणारा लाईट अँड साउंड शो हे विशेष आकर्षण ठरत असून नागरिकांकडून त्याला मोठी पसंती मिळत आहे.

…….

आज महोत्सवाचा समारोप

महोत्सवाच्या समारोपदिनी, शनिवार ३० मे रोजी सायंकाळी ६.३० वाजता प्रसिद्ध वक्ते आशुतोष अडोनी यांचे “समाज क्रांतिकारक सावरकर” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. तसेच सेल्युलर जेलची प्रतिकृती आणि लाईट अँड साउंड शो पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Advertisements
Advertisements

Latest बातम्या