Homeनागपूर न्यूजरविनगरच्या सुविख्यात हॉस्पीटलमध्ये ’डर्टी पिक्चरच्या ’संपादकांची बैठक!

रविनगरच्या सुविख्यात हॉस्पीटलमध्ये ’डर्टी पिक्चरच्या ’संपादकांची बैठक!

संपादकांचा ’डर्टी पिक्चर’(भाग-३)

नागपूर,ता. २ सप्टेंबर: शहरातील तडीपारांची शिक्षा रद्द करणे,भूखंडाचे श्रीखंड लाटण्यासाठी शहरातील बिल्डर्सला मदत करणे,मोक्का अंतर्गातील शिक्षेसाठी तडजोड करणे,कोणाच्या कुठे बदल्या करायच्या,पद आणि प्रतिष्ठेच्या जोरावर अवैध कारभार वैध करुन देणे,त्यासाठी लाखोंचा मोबदला घेणे, शहरातील एकूण पाच संपादकांच्या रॅकेटने आपल्या हयातीत केल्याची चांगलीच चर्चा आहे.यासाठी त्यांच्या बैठकीचे आवडीचे ठिकाण म्हणजे रविनगर येथील एक सुविख्यात हॉस्पीटल! याच ठिकाणी कामाचे ‘रेट’ठरायचे.

मिळालेल्या माहितीनुसार शहरातील त्या बिल्डरकडून ६०-६० लाखांची ’वर्गणी‘घेणारे चार नव्हे तर पाच संपादक आहेत. यातील एक संपादक तर असे आहेत ज्यांनी मालकालाच दिल्लीतून ‘पद्मश्री’मॅनेज करुन मिळवून देतो असे आश्‍वासन दिले. मात्र दिल्लीतील सरकार बदलली आणि संपादकचे हात तिथपर्यंत पोहोचू शकले नाही. मध्यंतरी त्यांची काही काळासाठी पदावरुन गच्छंती देखील झाली होती मात्र नंतर पुन्हा ते ‘ससन्मान’खूर्चीवर विराजमान झालेत.

शहरातील वादग्रस्त जागा,बदल्या करुन देणे, रेती माफियांशी संबध याचा पत्रकारितेशी काय संबंध?असा प्रश्‍न आता सामान्य वाचकाला पडला आहे.

धंतोलीत फेंडर प्रकरण चांगलेच बहूचर्चित झाले होते. एका वृत्तपत्राच्या संपादकाला या ठिकाणी गोळ्या घालून फेंडर नावाच्या इसमाने ठार केले होते. यामागे कारण सिद्ध झाले या संपादकांद्वारे त्याच्या प्रेयसीचे वारंवार होणारे लैंगिक शोषण!या प्रकरणावरुन नागपूरच्या ‘डर्टी पिक्चर’मधील संपादकांनी कोणताही बोध घेतला नाही.एका वृत्तपत्रातील ज्येष्ठ पत्रकाराला, एका इंग्रजी दैनिकात विद्यार्थी शिकाऊ एम्पलॉयी पदावर काम करणा-या तरुणीने पत्रकार भवनात सर्वांसमोर मुस्कटात लावली होती,हे प्रकरण अद्याप पत्रकार विसरले नाहीत,त्या ज्येष्ठ पत्रकारने त्या तरुणी पत्रकाराला नको तिथे चूकीचा स्पर्श केल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे अद्यापही या पत्रकाराला महिलांच्या पाठीवरुन प्रेमाने हात फिरवण्याचा मोह आवरत नाही,पाठीवरुन हात फिरवताना‘ ब्रा’ च्या पट्टयाला हात लावण्याची त्याची विकृती जगजाहीर आहे. पद आणि प्रतिष्ठेची इतकी गूर्मी की तरुणीचा स्वाभिमान समजून न घेता त्याने तिची तक्रार त्याच्याच चौकडीमधील खास मित्र असणा-या मुख्य वार्ताहराजवळ केली आणि तातडीने तिला कामावरुन काढण्यात आले!काय दोष होता तिचा? पत्रकारितेत करियर करण्याचे तिची स्वप्ने पत्रकारितेसारख्या पवित्र क्षेत्रात घूसलेल्या अश्‍या मोठ्या काळ्या जाड्या धेंड्यांच्या विकृतीमुळे कायमची धूळीस मिळाली.एवढेच नव्हे तर या कंपूने तिला इतर वृत्तपत्रात देखील कुठेही नोकरी मिळू दिली नाही.

याच इंग्रजी दैनिकाच्या  म्हाता-या संपादकाच्या ‘रासलीलेचे’ तेथील पत्रकार चांगलेच चर्वितचर्वण करत असतात. कोविडचे निमित्त करुन अभ्यासू,हूशार,प्रामाणिक ज्येष्ठ पत्रकारांना बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला मात्र ७० हजार पगार असणा-या नवरा-बायको जोडीला पदवीधर ही नसलेल्या संपादकांनी कायम ठेवले!का?नव-यासमोरच हे संपादक महोदय तिला वारंवार बाहूपाशात घेतात,बोलताना स्पर्श करतात,हास्यविनाेद करतात, त्यांची मर्जी या बयेनी चांगलीच राखल्याने नोकरी साबूत आहे,ज्येष्ठ पत्रकार घरी बसलेत!असं जर घडत असेल तर खरी पत्रकारिता कशाला म्हणायचे?

याच इंग्रजी वृत्तपत्रातील ज्येष्ठ संपादकाला आपल्या मालकाचे सगळे काळे-पिवळे-हिरवे-निळे कारनामे पुराव्यानिशी ‘मुखोद् गत‘ असल्याने मालक त्याचे काहीही बिघडवू शकत नाही. डर्टी पिक्चरमधील गच्छंती झालेले संपादक हे देखील लवकरच याच अश्‍याच ब्लॅकमेलिंगच्या बळावर लवकरच पुन्हा पदावर रुजू झाल्यास आश्‍चर्य वाटायला नको,असे देखील सांगितले जात आहे कारण कोळश्‍याने एका मालकाचे देखील हात चांगलेच काळे झाले आहेत! ‘मामला अभी बहोत गर्म है,थोडा थंडा होने दो,फिर देखेंगे’असे आश्‍वासन त्यांना मिळाले असल्याची चर्चा आहे.संपादकांच्या या रॅकेटने मालमत्ता तर प्रचंड जमवली मात्र पत्रकारितेतील मुल्ये ही कायमची खड्डयात पुरवली.

एक पतित संपादक झाले ‘पावन’-
मुखपत्र असलेल्या व सुसंस्कृत समजल्या जाणा-या वृत्तपत्रात डर्टी पिक्चरमधील एका पतित संपादकाला एका मोठ्या मंत्र्यांकडून आलेल्या ‘फोन’मुळे ‘पावन’करुन घेतल्याची चांगलीच चर्चा वृत्तपत्र जगात रंगली आहे. या भ्रष्ट,स्वैराचारी आणि स्त्रीलंपट संपादकाला नुकतेच ६० लाखांच्या प्रकरणात राजीनामा देण्यास भाग पाडण्यात आले होते,हे विशेष! यामागे रामदासपेठेतील दोन वादग्रस्त जागा यांचा देखील संबंध जोडला जात आहे. या कामात हे संपादक ‘एक्सपर्ट’असल्याने या मुखपत्राला त्यांची ‘सेवा’घेणे क्रमप्राप्त वाटले असावे. विशेष म्हणजे ‘दगडी पार्क’ प्रकरण तसेच रात्रीच्या ११ वा. कार्यालयाच्या संगणकावर ‘पोर्न फिल्म’ बघत असताना रंगे हात तत्कालीन संपादकांने पकडल्यामुळे दुस-या दिवशीच्या बैठकीत तडकाफडकी राजीनामा देण्यास भाग पाडलेहे तेच संपादक आहेत! .आता अचानक घाटाघाटाचे पाणी प्यायलेल्या ,खंडणीखाेर,भ्रष्टाचाराचे आरोप असणा-या त्या संपादकाला डीजिटलसंबधी पदावर सामावून घेण्यात आल्याने नागपूरातील तर सोडा त्या वृत्तपत्रातील सन्माननीय मंडळीही कोमात आहे!या पदावर पूर्वी काम करणा-या तरुणाला फक्त १५ हजार रु.पगार मिळत होता.एवढा अनुभवी माजी संपादक एवढ्या कमी पगारच्या पदावर रुजू झाल्याचे सर्वत्र आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

एका पत्रकाराची तर मार्मिक टिपण्णी होती,तो जाणार कुठे?नागपूरात तर सोडा पश्‍चिम महाराष्ट्रात देखील त्याने खूप हात-पाय मारले मात्र त्याचे ‘शुद्धिीकरण’करुन घ्यायला कोणीच धजले नाही.त्याला पदाची इतकी भूक आहे की काहीही करुन त्याला वृत्तपत्र जगातील कोणते ना कोणते बॅनर हवे,पद हवे,यासाठी तो संपादक उलट कंपनीलाच महिन्याचा १५ हजार रु.मानधन देईल!या संपादकाने पूर्वीच्या मोठ्या वृत्तपत्रातील पद धोक्यात येताच ‘मी आता कॉरपोरेट‘मध्ये जाणार असल्याची ‘हवा’निर्माण केली होती. शेवटी या संपादकाचे ‘कॉरपोरेट’ हे एवढे पोर्टलसारखे छोटेसे क्षेत्र होते का?याचीच चर्चा आता रंगली आहे.या मुखपत्रावर या डर्टी पिक्चरमधील संपादकाला रुजू करण्यासारखे असे कोणते संकट कोसळले होते?असा ही सवाल विचारल्या जात आहे.

परदेशपासून देशांतर्गत वा-या-

नुकतेच पार पडलेल्या विधान सभेच्या निवडणूकीपूर्वी शहरातील काही ज्येष्ठ पत्रकार हे दिल्ली,अजमेरपासून तर अगदी वाघा बॉर्डरपर्यंत फिरुन आलेत. अनेकांनी तर लोकसभेच्या निवडणूकीपूर्वी परदेश वारी केली. ज्या पत्रकारांची पचमढीपर्यंत कुटुंबाला पगाराच्या पैशातून घेऊन जाण्याची क्ष् मता नाही ते कुटुंबातील पाच-पाच सदस्यांना घेऊन परदेस वारी  करतात!. परदेसात एका जेवणाचा खर्च वीस हजार रुपये असतो तिथे ५-७ दिवसांच्या दौ-यात लाखांचा खर्च करतात.काेण करतो हा सगळा खर्च?वृत्तपत्रांच्या वाचकांना देखील हा प्रश्‍न खूप छळतो!वाघा बॉर्डरच्या टूरमध्ये तर शहरातील ‘डर्टी पिक्चर’मधील तो पाचवा संपादक देखील सहभागी झाला असल्याची धक्कादायक माहिती आहे.

शहरातील एका मंत्र्यांच्या जीवावर उदार झालेले हे पत्रकारितेतील नतद्रष्ट संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार यांनीच आपल्या भौतिक स्वार्थासाठी पत्रकारितेचा स्तर इतका खाली पाडला की एका दिवाळीत एका नेत्याने एका ज्येष्ठ पत्रकाराला खडेबोल सुनावताना ‘तुमच्या बायका ज्या साड्या नेसतात ना त्यादेखील माझ्या पैश्‍यांचा आहेत’असे म्हटले होते.अशी वेळ,अशी पाळी पत्रकारांवर यावी,याचे कारण भ्रष्ट माणासाला बोलण्याची मुभा नसते…. तो मंत्री,तो नेता,तो बिल्डर किवा तो गुन्हेगार जो कोणी असेल,त्यांनी पैश्‍यांनी शहरातील काही संपादकांची ,ज्येष्ठ पत्रकारांची तोंडे बंद केली आहे. स्वाभिमान,आत्मसन्मान,तत्वे,मुल्ये,नीतीमत्ता वगैरे-वगैरे शब्द या अश्‍या मनोवृत्तीच्या पत्रकारांसाठी फक्त पुस्तकी शब्द आहेत,आचरणातील नाही,याचेच हे द्योतक आहे.

कोविडच्या काळात एका मोठ्या वृत्तपत्रातील ज्येष्ठ संपादकाने आपल्या तत्वांशी तडजाेड न करु शकल्याने घरी बसणे पसंद केले.कारण ५० टक्के पगार कपातीवर त्यांचा आक्षेप नव्हता तर…त्यांचा पगार हा तेथील सुरक्षा रक्ष् काच्या पगारापेक्षाही कमी करण्यात आला होता!आयुष्यभर ज्यांनी खरी पत्रकारिता केली,पत्रकारितेवर जीवापाड प्रेम केले,मालकाशी,संस्थेशी एकनिष्ठ राहीले, आयुष्यात त्यांनाही इतकी प्रलोभने आलीत मात्र कोणत्याही प्रलोभनाला बळी पडले नाही,त्यांच्यावर ही वेळ यावी….‘!तिथे कर माझे जुळती’या ज्येष्ठ संपादकाला ‘सत्ताधीश’चा सलाम.

मंत्री, नेते,बिल्डर्स,मालक,संपादक,ज्येष्ठ पत्रकार इ.संबंधीचे जुळलेले तार याबाबत अनेक किस्से एका माजी संपादकांनी ‘सत्ताधीश’ला सांगितले.या संपादकांनी सांगितलेली एक मजेदार आठवण म्हणजे काही वर्षांपूर्वी नागपूर-शारजहां अश्‍या विमान उड्डाणाला मोठा गाजावाजा करुन सुरवात झाली. शारजहांचे राजे शेख यांच्या मुलाने नागपूरात पत्र-परिषद घेतली. एका पत्रकाराने प्रश्‍न विचारला,खरंच शारजहांमध्ये तुम्ही जे सांगता आहात त्या सर्व बाबी आहेत की नाही हे आम्हाला कसे कळणार?यावर या राजकुमाराने त्यांनाच शारजहां येथे येण्याची विनंती केली.या दौ-यासाठी तत्कालीन केंद्रिय उड्डयन मंत्री यांनी चांगले नियाेजन केले.शहरातील काही पत्रकार हे चक्क सुटी टाकून शारजहांत मौजमजा करुन आलेत,सुटीवर असल्याने वृत्तपत्रात शारजहांविषयी लिखाण करणे किवा बातमी प्रसिद्ध करणे हे नियमात बसत नव्हते. त्या राजूकूमाराचा मुंबई येथील जनसंपर्क सांभाळणा-या अधिका-याला दररोज फोन येत होता,काय आलं नागपूरात छापून?खाललेल्या मिठाला नागपूरातील अर्थातच ते पत्रकार जागलेच नाही आणि त्या…जनसंपर्क अधिका-याची मात्र नोकरी गेली! ‘अदानी पोर्ट’च्या बाबतीत देखील नेमके हेच घडले.

बलात्काराचे पुरावे असतात का?
‘सत्ताधीश‘ने मागील दोन भागात नागपूरातील वृत्तपत्र जगातील काही भ्रष्ट संपादकांनी घेतलेली लाच यावर वृत्त प्रसिद्ध केले.या वृत्तामुळे नागपूरातील पत्रकार जगात मोठा भूकंप आला. अनेकांनी याचे समर्थन केले तर काहींनी ‘सत्य लिहणं आणि चांगलं लिहीणं यात फरक आहे’अशी अक्कल पाजळली. महिलेने असे लिखाण करणे म्हणजे बदनामीकारक असल्याची अनावश्‍यक टिपण्णी देखील केली. या डर्टी पिक्चरमधील संपादकांना लाखोंची लाच घेताना शरम वाटली नाही मात्र ‘सत्ताधीशने’ सत्य उजागर करणे म्हणजे बदनामीकारक ?भारतातच नव्हे तर जगभरात बलात्कारासाखे गुन्हे घडतात,अगदी अजाण बालिकांपासून तर वयोवृद्ध महिलांसोबत अश्‍या दूर्देवी घटना घडतात. दर पाच मिनिटाला भारतासारख्या सुसंस्कृत आणि वैभवशाली,गौरवशाली परंपरा लाभलेल्या देशात पाच बलात्काराच्या घटना घडतात,या घटनांना पुरावे असतात का?तरी देखील ते न्यायाच्या पटलावर येतातच ना?कि न्याय संस्था ही बलात्काराचे पुरावे मागते? वृत्तपत्र जगतामध्ये काही बातम्या या पुराव्यानिशी देता येतात मात्र काही बातम्या हे ‘सूत्रो के हवाले से’असले तरी त्यातील मूल्य वाचकांच्या दृष्टिने कमी होत नाही,हेच या डिजिटल युगाचे वैशिष्ठ आहे.‘सत्य लिखाणच हे कायम चांगलं असतं,यात भेद करता येत नाही’

नागपूरात काही वृत्तपत्रांच्या संस्थापकांची एक गरिमामय प्रतिमा राहीली असून वृत्तपत्र जगताला त्यांनी आपल्या प्रामाणिक पत्रकारितेतून उज्जवल आयाम प्राप्त करुन दिले आहे. तीच परंपरा शहरातील अनेक ज्येष्ठ संपादकांनी कायम ठेवली उलट त्यात नवे आयाम प्रस्थापित करुन त्यात भरच टाकली.यानंतर मात्र संपादक पदाची जी घसरण झाली ती अतिशय शोचनीय आहे. या काही संपादकांनी साम,दाम,दंड,भेदाने केवळ आपल्या तुंबड्या भरल्या. पत्रकारितेची मात्र अतोनात हानि केली. पत्रकारितेला ‘भिखारीपणा,लाचारीपणा‘आणला.

हीच लाचारी पिडीतांना न्याय मिळून देण्यास कमी पडतेय. अनेक बातम्या या पॅकेज घेऊन प्रसिद्ध केल्या जातात,यातील अर्थकारणाला कोणाचाही विरोध नाही मात्र मालकाला अंधारात ठेऊन डर्टी पिक्चरच्या पाच संपादकांनी नागपूरात जो प्रताप केला आहे,त्याला महाराष्ट्रात कुठेही तोड नाही,असेच म्हणावे लागेल.

Latest बातम्या