Homeनागपूर न्यूजमेयो वॉर्डातील शौचालयात वृद्धाचा तीन तास मृतदेह शौचात पडून!

मेयो वॉर्डातील शौचालयात वृद्धाचा तीन तास मृतदेह शौचात पडून!

( छायाचित्र-शौच आणि मूत्र विर्सजनासाठी रुग्णाने वापरलेले साहित्य!)

मेयाे रुग्णालयात रुग्णांला वाचविण्याचे प्रयत्नच होेत नाही! एका रुग्णाची पंतप्रधान कार्यालयाला तक्रार

तक्रारकर्त्याने स्वत: तीन दिवस पाण्याच्या ५ लिटरच्या कॅनमध्ये केली शौच!

नागपूर,ता. १४ सप्टेंबर: शहरात करोना रुग्णांची स्थिती किती भयावह झाली आहे,याची खरी वास्तवता,भयाणता आणि दाहकता बघायची असेल तर फक्त मेडीकल आणि मेयो रुग्णालयांतील कोविड वॉर्डात डोकावून या.या रुग्णालयांमध्ये काेविड रुग्णांना वाचवण्याचा प्रयत्नच केला जात नसल्याचा गंभीर आरोप मेयोमध्ये भरती असणारा रुग्ण विनोद मानकर यांनी नुकतीच पंतप्रधान कार्यालय,मुख्यमंत्री कार्यालयच नव्हे तर याची चक्क सीबीआय चौकशी करावी म्हणून सीबीआयला देखील पाठवलेल्या तक्रारीत नमूद आहे.

विनोद मानकर या तरुणाने नमूद केलेल्या तक्रारीत या वॉर्डात प्रवेश करताच शौचालय खूप आतील भागात असल्याचं दिसून पडतं. ते ही या अश्‍या शौचालयात रुग्ण हा फक्त मूत्रविसर्जन करु शकतो.इतर शौचालयात पाणीच नसून ती सगळी शौचाने भरली आहेत.यासोबत वॉर्डातील बेडपासून तर शौचालयापर्यंत जाणा-या संपूर्ण मागार्वर बायो-मेडीकल कच-याचा ढिगारा पडला आहे त्यातून मार्ग काढत या वॉर्डातील करोना बाधित रुग्ण हा शौचालयापर्यंत पोहोचतो. याच वॉर्डासारखी स्थिती इतर संपूर्ण कोविड वॉर्डांची आहे.या कच-यामुळे,घाणीमुळे आणि दुर्गंधीमुळे करोना बाधित रुग्ण हा जिवंत परत येऊच शकत नसल्याचा दावा मानकर यांनी तक्रारीत केला आहे.
परिणामी जेवण झाल्यानंतर वॉर्डातील रुग्ण हे शौचासाठी अश्‍या अतिशय घाणेरड्या शौचालयांचा वापर करु शकत नाही आणि वॉर्डाच्या बाहेर ही पडू शकत नाही.यामुळे या वॉर्डातील अनेक करोना बाधितांनी जेवणच सोडून दिल्याचे मानकर सांगतात.

जरूर वाचा  : रुग्ण म्हणतो ‘मेयाे वर बॉम्ब फेकून देतो आता!

याच वॉर्डातील शौचालयात २० आॅगस्ट २०२० रोजी वॉर्डातील सुदृढ व शरीराने धष्टपुष्ट असणारा एक रुग्ण गेला असता या शौचालयात मृतावस्थेत आढळला. सुरवातीच्या तीन तासात वॉर्डातील कर्मचा-यांना हे लक्ष्ात आलेच नाही की तो वृद्ध शौचातच मरण पावला आहे.त्या वृद्ध रुग्णाचा मृत्यू शौचालयात पडल्यामुळे झाला की त्यांची हत्या झाली हे संशयास्पद असल्याचे मानकर यांनी तक्रारीत नमूद केले. महत्वाचे म्हणजे लगेच वॉर्डातील कर्मचा-यानी नागपूर महानगरपालिकेला सूचित केले की वॉर्डात करोनामुळे रुग्ण वृद्धाचा मृत्यू झाला! तो वृद्ध शौचालयात मरुन पडला ही गोष्ट लपविण्यात आली. अश्‍याप्रकारचे किती मृत्यू दररोज मेयोमधील कोविड वॉर्डात होत असाव्या?याची चौकशी करण्यात यावी.

वॉर्डातील रुग्णांना तपासण्यासाठी फक्त सकाळी १० ते ११ वा. डॉक्टर राऊंड घेतात.त्यातही येथील रुग्णांना डॉक्टरांशी बोलण्याची परवानगी नाही. माझ्या सीटी स्कॅनमध्ये मी गर्द न्यूमोनियाने पीडीत निघालो,मला दररोज रात्री ११ ते सकाळी ५ दरम्यान श्‍वास घेण्यास त्रास होतो.मी मासोळी सारखा अख्खी रात्र तडफडत होतो मात्र एकही परिचारिका किवा कमर्चारी रुग्णांकडे फिरकत ही नाही. हे सर्व सरकारी नोकर आहेत,त्यामुळे रुग्ण जगले काय किवा मेले काय?यांचा गलेलठ्ठ पगार हा सुरुच राहणार असल्याने यांची अरेरावी वाढत आहे. त्यांच्या या वर्तवणूकी विरोधात डॉक्टरला काही सांगण्याचा प्रयत्न केल्यास माझी ही दशा ही शौचालयात मरुन पडलेल्या वृद्ध रुग्णासारखी होईल,या भीतीने मी तोंड उघडले नाही.

या पेशंटला मेडीकलच्या डॉक्टरांनी ऑक्सीजन काढून मारले !, वाचलेच पाहिजे असे..

या वॉर्डात ज्यांच्या जवळ स्वत:चा मास्क आहे ते घालतात मात्र ज्यांच्याकडे मास्क नाही त्यांना रुग्णालयातून मास्क पुरविण्यात आलेच नाही,यामुळे देखील करोनाने होणा-या मृत्यूंची संख्या ही सर्वाधिक आहे,याशिवाय सेनिटायझर व मास्कसाठी शासानाकडून करोना रुग्णांच्या नावाखाली जो पैसा मिळतो तो नेमका जातो कुठे?
या वॉर्डात एकूण ७५ रुग्ण आहेत,जेवण देताना सर्व रुग्ण एकाच ठिकाणी जमा होऊन जेवण घेतात त्यामुळे देखील करोनाचे संक्रमण बळावले व बरे होण्याचे प्रमाण नगण्य झाले!

वॉर्डात काम करणारे वॉर्ड बॉय आणि स्वच्छता दूत यांची भरती कंत्राटदाराद्वारे होत असते.मात्र ते रुग्णांकडून लहान सहान सेवेसाठी देखील सतत पैसे उकळत असतात. २० तारखेला या वॉर्डातील शौचालयात वृद्धाचा मृत्यू झाल्यानंतर तीन दिवस मी शौचालयात गेलो नाही तर माझ्या पत्नीने पाणी पिण्यासाठी जी पाच लिटरची कॅन आणून दिली होती,त्यात मी तीन दिवस शौच केली.शेवटी ती भरुन गेली,स्वच्छता कर्मचा-याला ते फेकून देण्यास सांगितले असता त्याने ५० रु.वसूल केले.याशिवाय घरुन येणारा डबा माझ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी देखील प्रत्येक वेळी मला ५० रु.मोजावे लागले!

परिचारिका या सेवा न करता फक्त लेखाजोखा मांडण्याचे कारकूनी कार्य करतात.याशिवाय रुग्णांपासून फार दूर उभे राहून बोलतात. मात्र जेव्हा करोना बाधित मृतकाचा मृतदेह प्लास्टिकमध्ये बांधण्याचे काम करतात तेव्हा खूप खूश होऊन आपापसात थट्टा मसकरी करीत ते मृतदेह प्लास्टिकमध्ये गुंडाळतात! या वॉर्डात पिण्याच्या पाण्यासाठी फक्त एक ड्रम भरुन ठेवला आहे. सर्व ७५ रुग्ण याच ड्रमात हात टाकून आपापली पाण्याची बाटली भरतात.या ड्रमात कुठले पाणी भरल्या जाते,हे सांगता येत नाही मात्र दूसरीकडे या परिचारीका आणि स्टॉफसाठी असणारे वॉर्ड्स कायम चकचकीत आणि स्वच्छ असल्याचे आढळले.

या वॉर्डातील अनेक रुग्ण हे शरीराने जर्जर झाले असून ते कधीही दगावू शकतात तसेच ते वस्त्रहीन असतात. या सर्व जर्जर झालेल्या रुग्णांना एकाच ठिकाणी न ठेवता संपूर्ण वॉर्डभर पसरवून ठेवण्यात आले आहे ते सतत मूत्र विसर्जन करीत असतात व त्यामुळे संपूर्ण फरशी ही ओलीच राहते.परिणामी करोनाचे संक्रमण हे कधीही अश्‍या शासकीय रुग्णालयात बरे होऊ शकत नाही.

या वॉर्डात एका रुग्णाला लावण्यात येणारा ऑक्सीजन मास्कच दुस-या रुग्णाला लावल्या जातात.ते ही कोणतेही सॅनिटाईझ न करता.ऑक्सीजन देताना डिस्टील्ड पाण्याची गरज असते ज्यामुळे ऑक्सीजन रुग्णाला मिळत असतं मात्र या वॉर्डात डिस्टील्ड वॉटरची उपलब्धताच नसून रुग्णांना चक्क पिण्याच्या पाण्याच्या ड्रममधून पाणी आणण्यास सांगितले जाते.या दूषित पाण्यामुळेच रुग्णांच्या फूफ्सूसात संक्रमण मोठ्या प्रमाणात झाले आहे.

वरील सर्व बाबींना घाबरुन मी साढे तीन दिवसात या रुग्णालयातून डॅमा डिस्जार्च मागितला.डॅमा डिस्जार्च हा प्रत्येक रुग्णाचा अधिकार आहे. मात्र मला तो नाकारण्यात आला.यानंतर मी एफआयर करण्याची तंबी दिली तसेच माझी पत्नी या स्वत: एका रुग्णालयात परिचारिका असल्यामुळे मला सुटी देण्यात आली.

रविवार दि. १६ ऑगस्ट रोजी मी करोना पॉझिटीव्ह निघालो.खासगी रुग्णालयात भरती होण्याची परिस्थिती नसल्यामुळे मी १९ ऑगस्ट रोजी सकळी मेयो रुग्णालयाच्या काेविड वॉर्डात भरती झालो. तीन दिवस मी या वॉर्डातील संपूर्ण कारभार बघितला,सहन केलं शेवटी २२ ऑगस्ट रोजी मी सुटी मागितली. मी जर तिथून बाहेर पडलो नसतो तर माझा देहच प्लास्टिकच्या किटमध्ये श्‍मशानात निश्‍चितच पोहोचला असता. यानंतर मी एका खासगी रुग्णालयात उपचार घेतले.

मात्र या तक्रारीची दखल घेत माय-बाय शासनाने एखाद्या डमी रुग्ण मेयोमध्ये पाठवावा व माझ्या सर्व आरोपांची शहनिशा करावी मात्र दोन्ही हात जोडून मी विनंती करतो…सामान्य रुग्णांच्या आरोग्य व जीवाशी चाललेला हा खेळ कृपया थांबवा….!
काल पालकमंत्री नितीन राऊत यांनी विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात कोविड विषयी घेतलेल्या आढाव्यात प्रशासनाला योग्य जबावदारी पार पाडण्याच्या सूचना केल्या असल्याचे म्हटले. या पत्राची दखल घेऊन पालकमंत्री आता या वैद्यकीय प्रशासनाला धारेवर धरणार आहेत का?असा प्रश्‍न आता उपस्थित होतो.प्रश्‍न फक्त खाटांचा नाही….तर पवित्र समजल्या जाणा-या या वैद्यकीय सेवेचा हा ‘अमानवीय ’चेहरा आता तरी मंत्री-संत्री यांना उलगडणार का?

डॉ.सागर पांडे यांची अरेरावी…..
मेयो रुग्णालयातील भयाण वास्तवता याचा आढावा घेण्यासाठी माध्यमकर्मी जेव्हा या रुग्णालयाचा फेरफटका मारतात,रुग्णांसोबत संवाद साधतात, त्यांचा व्हिडीयो शूट करतात तेव्हा डॉ.सागर पांडे हे माध्यमकर्मींना दम देत ‘आधी जिल्हाधिकारी यांचे पत्र आणा मगच शूट करा’अशी धमकी देतात. आता या शहरातील पत्रकारांना पत्रकारिता करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या पत्राची आवश्‍यकता भासणार आहे का?हा खरा प्रश्‍न आहे. मेयोमध्ये असं काय घडतं जे डॉ.सागर पांडे यांना माध्यमांसमोर येऊ द्यायचे नाही?माध्यमकर्मींनी फक्त मेयाेमधील ‘चमकोगिरी‘बातम्यांनाच प्रसिद्धी द्यावी का?असा ही प्रश्‍न उपस्थित होत आहे. करोनाच्या भयाण परिस्थितीत आज आरोग्य व्यवस्थेवरचा ताण वाढला आहे त्यामुळे गलथान कारभार वाढला असावा हे मान्य केले तरी स्वत:ला ‘करोना याेद्धे’ हे बिरुद लावून मिरवणारे यांनी, देशातील सीमेचे रक्ष् ण करणा-या ख-या सैनिकी योद्धांपासून काही तर बोध घ्यावा,असेच आता म्हणायची वेळ आली आहे.

[हा संपूर्ण घटनाक्रम मानकर यांनी लाईव्ह कॅम-यासमाेर देखील उलगडला आहे ] 

(व्हिडीयो साभार- सुदर्शन बागडे)

Latest बातम्या