
महापौरांचा सूचक इशारा:ऑन-लाईन आहात विसरु नका
नागपूर,ता. २१ ऑगस्ट: महानगरपालिकेच्या ऑन-लाईन सभेचा गुरुवार दि.२० ऑगस्ट रोजी चांगलाच फज्जा उडाल्यानंतर महापौरांनी ‘क्रोधित’होऊन संपूर्ण तांत्रिक बाबी २४ तासात सुधारण्याचे निर्देश देत सभा पुन्हा शुक्रवारी ११ वा.घेण्याचे ठरवले.मात्र शुक्रवारी देखील मनपा प्रशासनाने ‘युद्धस्तरावर’ कोणतीही सुधारणा केल्याचे दिसून पडले नाही. नगरसेवकांचे सातत्याने आवाज बंद होत होते.कोणालाही कोणाचे म्हणने ऐकू येत नसल्याने महापौरांनी दहा मिनिटांसाठी सभा स्थगित केली व या मध्यांतरात सर्व पक्ष्ाच्या नगरसेवकांची चांगलीच ऑन-लाईन ‘चक्कलस’ रंगली.
महापौरांनी भाजपचे ज्येष्ठ नेते दयाशंकर तिवारी यांच्या भाषणात वारंवार व्यत्तय येत असल्याने व कोविड सारख्या गंभीर विषयावर बोलताना वारंवार आवाजच बंद होत असल्याने वैतागून दहा मिनिटांसाठी सभा स्थगित केली. मात्र दहा मिनिटांचे अर्धा तास झाला तरी महापौर काही ऑन-लाईन दिसलेच नाही.परिणामी या मधल्या फावल्या वेळेत नगरसेवकांचे ’नमस्कार-चमत्कार’सुरु झाले.
एका नगरसेवकाने दूस-या नगरसेवकाला ’तू तर ऑन-लाईन कॅमे-यामध्ये खूप गोरा दिसून राहीला ’अशी स्तुती करताच उत्तर आले ‘करोनामुळे गोरा झालो!’आणि यावर नगरसेवकांमध्ये एकच हास्यकल्लोळ उडाला. ’क्या बोलते भाऊ?’’आप बोलो’सारखे संवाद रंगले.तिसरा आवाज आला ’सांभाळून बोला आपण सभागृहात नाही,ऑन-लाईन आहोत’,एका नगरसेवकाला सांगण्यात आले ’भाऊ मोबाईलचा कॅमरा खालती घ्या ना जी,नुसतं टकलंच दिसून राहीलं ’‘आता ठिक आहे,चेहरा दिसून राहीला’एका नगरसेवकाचे नाव घेऊन ‘याच्या नावातच प्रकाश आहे,किती उजेड पडला दाखवत नाही’खी..खी…खी…खी..हास्याचा आवाज!
यानंतर चर्चा गणपतीमध्ये मटण-चिकन खाणा-यावर रंगली. एका नगरसेवकाने घरी गणपती बसत असल्याने सध्या खाता येत नसल्याची व्यथा सांगितली तर दुस-याने लगेच या चर्चेत महापौरांनाच ओढले!‘महापौराले विचारा..खाता येते का चिकन?जोशीले विचार,मुंढेंनी पंचांग थोडे ना पाहिला?पुन्हा खी…खी..खी…खी.हास्याचा आवाज.एका नगरसेवकाने टोकलेच ‘ओ भाऊ लाईव्ह आहोत ना!’गणपतीत चिकन खाणार पाप नाही लागण का?यावर उत्तर मिळाले ’आता ५० वर्षांचा झालो..पाप नाही लागण’पुन्हा एक आवाज आला‘ओ काही नकं बोला रे..नागपूर शहर लाईव्ह बघत आहे!’
काही वेळाने चर्चा पुन्हा मुंढेंवर घसरली. ‘आयुक्त ऑफिसमध्ये बसून खूप सह्या करुन राहीला…काम देतील का इमरजेंसीचं’
एका नगरसेवकाला वेळ आहे तर गाणं ऐकून देण्याची तर एका नगरसेवकाला वारंवार शायरी ऐकवण्याची फरमाईश होत होती.
प्रसन्न चेह-याने‘ गंभीर‘ विषयावर सभेत चर्चा करणारे हे ‘लोकप्रतिनिधी‘आणि त्यांची चकल्लस समस्त नागपूरकर जनता बघत होती. महापौरांनी देखील लाईव्ह आल्यानंतर या नगरसेवकांना धारेवर धरत ‘ऑन-लाईन आहात हे विसरु नका!‘अशी नाराजी व्यक्त केली.
आज मनपाच्या वर्तुळात विविध पक्ष्ांच्या नगरसेवकांमध्ये रंगलेली ऑन-लाईन शाब्दिक ‘चक्कलस‘ चांगलाच करमणूकीचा विषय ठरली.

आमचे चॅनल subscribe करा