

खासदार क्रीडा महोत्सवाचे शानदार उद् घाटन
गडकरींनी केली रोख पुरस्काराची रक्कम १ कोटी
नागपूर,ता.१३ मे २०२२: जीवनात खेळाडू म्हणून यशस्वी व्हायचे असेल तर तीन गोष्टी महत्वाच्या असतात. कठोर परिश्रमाची तयारी,आपल्या खेळावर नितांत प्रेम आणि आपल्या देशाविषयीचा जाजवल्य अभिमान,या तीन गोष्टी कोणत्याही खेळाडूला यशाच्या शिखरावर पोहोचवते असे भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार पद्मश्री धनराज पिल्ले म्हणाले.ते मानकापूर स्टेडियम येथे आज चौथ्या खासदार क्रीडा महोत्सवाच्या उद् घाटनाप्रसंगी उद् घाटक म्हणून बोलत होते.याप्रसंगी मंचावर केंद्रिय मंत्री नितीन गडगरी,माजी केंद्रीय मंत्री . हंसराज अहीर, माजी मंत्री आमदार परिणय फुके, आमदार विकास कुंभारे, अखिल भारतीय सॉफ्टबॉल असोसिएशनच्या अध्यक्ष नीतल नारंग, खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक माजी महापौर संदीप जोशी, माजी महापौर दयाशंकर तिवारी, माजी आमदार सुधाकर देशमुख, गिरीश व्यास, सुधाकर कोहळे, डॉ. मिलींद माने, जयप्रकाश गुप्ता, काटोल नगर परिषदेचे अध्यक्ष चरणसिंग ठाकु आदी उपस्थित होते.
याप्रसंगी केंद्रिय मंत्री नितिन गडकरी व धनराज पिल्ले यांच्या हस्ते क्रीडा स्पर्धेची ज्योत प्रज्जलवित करण्यात आली व स्पर्धेचे विधिवत उद् घाटन करण्यात आले.याप्रसंगी बोलताना धनराज पिल्ले म्हणाले,की देशातील अनेकांचे हे स्वप्न असते की त्यांनी गडकरी यांच्या शेजारी बसावे,मला ती संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो.त्यांच्या कारकीर्दीत देशातील रस्त्यांचे जे जाळे विणन्यात आले ते अत्यंत कौतुकास्पद आहे.माझा जन्म पुण्यातील एका लहानश्या खेडे गावात झाला.गेल्या ३५ वर्षांपासून मी मुंबईत राहत आहे मात्र हॉकी प्रशिक्षणाच्या संदर्भात मी देशातील अनेकर राज्यांमध्ये जात असतो आणि हा प्रवास मला रस्त्यांनीच करावा लागतो,त्या वेळी मला गडकरी यांचीच आठवण येते.काल तर मी त्यांना भेटून फार भावूक झालो.
एक वेळ अशी होती मी पण तुमच्यासारखाच अश्याच एका स्टेडियमध्ये खेळाडू म्हणून बसलो होतो.मान्यवरांची भाषणे ऐकत होतो.देशासाठी मलाही काही तरी करायचे आहे हा भाव,हा जज्बा मनात उमटत होता आणि माझ्या मनातली ईच्छा पूर्ण झाली.
गडकरी यांनी या क्रीडा स्पर्धेत ९३ लाख रुपयांची रोख रक्कम पारितोषिक म्हणून ठेवली आहे,देशातील कोणत्याच राज्यात एवढी मोठी रक्कम खेळाडूंना मिळत नाही.गडकरी सांगत होते त्यांचे हे स्वप्नच आहे नागपूरातील मैदानांवर दररोज एक लाख तरी मुलांना खेळ खेळताना त्यांना बघायचे आहे.येणा-या पिढीने देशाचे नावलौकिक वाढवावे ही गडकरी यांची ईच्छा आहे.नागपूर शहरात ३०० मैदाने खेळण्यासाठी उपलब्ध आहेत ते कोणत्याही राज्यात नाही.हे तुमचे भाग्य आहे तुम्हाला खेळण्याची संधी आणि सोयी दोन्ही मिळत आहेत.मी तर पुणे जिल्ह्याच्या खडगी नावाच्या फार लहानश्या गावात राहत होतो मात्र मला माझ्या कुटुंबियांचा संपूर्ण पाठींबा होता.मी खेळालाच देव मानत होतो.मला महाराष्ट्राचे नाव मोठे करायचे होते.मी नेहमी दूरदर्शनवर मोठे मोठे खेळाडू यांच्या मुलाखती बघत होतो त्यांना राजीव गांधी पुरस्कार,खेलरत्न पुरस्काराने सन्मानित केले जात होते ते बघून मला ही ते मिळवण्याची प्रेरणा मिळत होती.
यासाठीच कठोर परिश्रम,खेळावर नितांत प्रेम आणि देशाचा अभिमान या तीन गोष्टी आत्मसात कराव्या लागतात.माझ्यात खेळण्याची क्षमता होती,जिद्द होती,मोठ्यांचे आर्शिवाद माझ्यासोबत होते यामुळेच मी महाराष्ट्राचे आणि देशाचे नाव उज्जवल करु शकलो.याप्रसंगी त्यांनी सर्व उपस्थित मुलं-मुली खेळाडूंना आपापल्या आई-वडीलांचा नितांत आदर करण्याचा सल्ला दिला.त्यांचे आर्शिवाद घ्याल तरच जीवनात यशस्वी व्हाल,असे ते म्हणाले.
मी १६ वर्षे हॉकी खेळलो,४ ओलोंपिक,४ आशियाड,४ वर्ल्ड कप स्पर्धा,आशिया कप,मी एकमेव असा खेळाडू आहे ज्याला जागतिक दर्जाच्या खेळांमध्ये इतक्या वेळा खेळण्याची संधी प्राप्त झाली.माझ्या आईचा आर्शिवाद आणि चार मोठ्या भावंडांचे प्रेम,काळजी यातून मी हे यश साध्य करु शकलो.यासाठी मला महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकारने पुरेपूर संधी दिली,सगळं काही दिले.
त्यामुळेच तुमच्यात ही कधीही ‘न्यूनगंड’येऊ देऊ नका,मी जेव्हा जागतिक पातळीवरील स्पर्धांमध्ये सहभाग घ्यायचो तेव्हा मला इंग्रजी अजिबात बोलता येत नव्हती,मला याची फार भीती वाटायची,लोकं काय म्हणतील!मला माझी मातृभाषा तमिळ,मराठी आणि हिंदी भाषाच बोलता येत होती.मात्र यानंतर मी गो-यांसमोर इंग्रजी बोलायला शिकलो.
महान खेळाडू सचिन तेंदूलकर यांचे शब्द आहेत ’खेळ अशी गोष्ट अाहे जी सर्वकाही शिकवित असते,खेळ अशी गोष्ट आहे जी अपयशानंतर देखील यशाची संधी प्रदान करते’सचिन तेंदूलकर हे अगदी खरे बोलले आहेत.कधीही निराश होऊ नका,मनापासून खेळा आणि जिवनात आपल्या प्रशिक्षकांची मेहनतही कधीही विसरु नका.आई-वडीलांनतर प्रशिक्षकच अशी व्यक्ती आहे जी तुम्हाला घडवित असते.प्रशिक्षक हे तुम्हाल घडविण्यासाठी आपलं सर्वस्व देत असतो.त्यामुळे नियमात राहून खेळा,शिस्तीत खेळा.
गडकरी हे या क्रीडा स्पर्धांसाठी ९३ लाख रुपये रोख बक्षीस देत आहे मला खात्री आहे पुढील वर्षी ते ही रक्कम तुमच्यासाठी १ कोटी करतील,अशी अपेक्षा पिल्ले यांनी व्यक्त केली.
गडकरी यांनी त्यांची अपेक्षा पूर्ण करीत पुढील वर्षीपासून पुरस्काराची ही रोख रक्कम १ कोटींची केली असल्याची घोषणा केली.
अनेक धनराज पिल्ले घडावेत:गडकरी
खेळातून व्यक्तित्व आणि चरित्राचा विकास होतो. आज तंत्रज्ञानात गुरफटत चाललेल्या मुलांना मैदानात खेळण्यासाठी आणण्याची गरज आहे. नागपूर शहरातील सुमारे १ लाख खेळाडू शहरातील ४५०च्या वर मैदानावर खेळत राहावे व त्यातून त्यांनी आपले शहर आणि देशाचा विकास करावा हा खासदार क्रीडा महोत्सवाचा उद्देश आहे. शहरातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे यासाठी महोत्सवात पद्मश्री धनराज पिल्ले यांच्यासारख्या महान खेळाडूंना आमंत्रित केले जाते. त्यांच्या खेळातील कामगिरीची प्रेरणा घेऊन शहरातूनही असे अनेक धनराज पिल्ले घडावेत, अशी अपेक्षा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.
पुढे बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, खासदार क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून शहरात क्रीडा विषयक वातावरण तयार होत असून शहरातील खेळाडूंसह, पालकांनीही मुलांना खेळाकडे वळवण्यासाठी प्रोत्साहित करावे. कोव्हिडमुळे स्थगित करावा लागलेला खासदार क्रीडा महोत्सव आज पुन्हा सुरू होत असल्याचा आनंद आहे. शहरातील गरीबातील गरीब मुलांनाही खेळाचे व्यासपीठ मिळणे व त्याने त्याच्या प्रतिभेच्या बळावर पुढे जावे हा त्याचा हक्क मिळवून देण्याचे काम खासदार क्रीडा महोत्सव करीत आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जाणाऱ्या खेळाडूंच्या मागे खासदार क्रीडा महोत्सव समिती संपूर्ण ताकदीने उभी राहिल, अशी ग्वाही सुद्धा त्यांनी दिली.

दिव्यांगांनी सर्वांच्या बरोबरीत यावे, ते खेळातही पुढे यावे या हेतूने यावर्षी महोत्सवात दिव्यांगांच्या स्पर्धा होत असल्याचा आनंद असल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. येत्या काळात दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष स्पर्धा आयोजित करण्याची सूचना त्यांनी यावेळी खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक माजी महापौर संदीप जोशी यांना केली.
महोत्सवातून शहराला आंतरराष्ट्रीय खेळाडू मिळाले : संदीप जोशी
प्रास्ताविकामध्ये खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक माजी महापौर संदीप जोशी यांनी महोत्सवाची सविस्तर माहिती सादर केली. खासदार क्रीडा महोत्सवात खेळलेले खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर नागपूर शहर आणि देशाचे नावलौकिक करत आहेत ही शहरासाठी अभिमानास्पद बाब आहे, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी शहराला मिळालेल्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या कार्याचा गौरव केला. यावर्षी २३ मे रोजी एकाच दिवशी दिव्यांगांच्या होणाऱ्या १६ स्पर्धा हे यावर्षीच्या खासदार क्रीडा महोत्सवाचे वैशिष्ट्य असल्याचेही त्यांनी सांगितले.
खासदार क्रीडा महोत्सवाच्या अंतर्गत २८ मे पर्यंत १६ दिवस ३४ खेळांच्या स्पर्धा एकाचवेळी ४० मैदानांवर चालतील. यामध्ये एकूण ९२३७ सामने खेळविण्यात येणार असून ५६० चषक, ७८३० पदक देण्यात येणार असून या क्रीडा महोत्सवाच्या रणसंग्रामात तब्बल ४० हजार खेळाडूंचा सहभाग असणार आहे. विजेत्यांना ९३ लक्ष रुपयांचे रोख पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
खासदार क्रीडा महोत्सवामध्ये सॉफ्टबॉल, योगासन, कबड्डी, बास्केटबॉल, सायकलिंग, बेंच प्रेस पॉवरलिफ्टिंग, कॅरम, खो-खो, तिरंदाजी, बुद्धिबळ, तलवारबाजी, हॉकी, कुस्ती, ॲथलेटिक्स, बॅडमिंटन, हँडबॉल, गर्ल्स बॉक्स क्रिकेट, व्हॉलिबॉल, तायक्वांडो, टेबल टेनिस, जलतरण, मॅरेथॉन, बॉडी बिल्डिंग, फुटबॉल, मलखांब, सेपक टॅकरॉ, रस्सीखेच, ज्यूडो, बॉक्सिंग, टेनिस, फुटसल, जिम्नॅस्टिक, रायफल शुटिंग आदी खेळांच्या स्पर्धांसह दिव्यांगांसाठी सुद्धा स्पर्धा घेण्यात येणार आहेत. केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतील क्रीडा महोत्सव नुकताच भंडारा-गोंदिया जिल्ह्यात आयोजित करण्यात आले. आता ते वर्धा येथेही घेण्यात येणार आहे. खासदार क्रीडा महोत्सवाने क्रीडा क्षेत्र आणि खेळाडूंसाठी नवा आदर्श निर्माण केला असून त्याची वाढणारी व्याप्ती ही खेळ आणि खेळाडूंच्या विकासासाठी महत्वाची ठरणार आहे, असेही ते म्हणाले.
योगासन, रोप मलखांबचा थरार अन लेझीमचा ठेका
द्रोणाचार्य पुरस्कार विजेते विजय मुनीश्वर यांनी खासदार क्रीडा महोत्सवाचे ध्वजारोहण केले. आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये शहराचे नाव लौकिक करणारे खेळाडू निकिता राऊत, कल्याणी चुटे, शुभम वंजारी आणि विधी तराडे हे खासदार क्रीडा महोत्सवाची मशाल घेऊन मंचावर आले. पद्मश्री धनराज पिल्ले व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मशाल पेटवून महोत्सवाचे उद्घाटन केले.
खासदार क्रीडा महोत्सवात घेण्यात येत असलेल्या सर्व स्पर्धांच्या चमूद्वारे पथसंचलन करण्यात आले. यावेळी ‘इंडियाज गॉट टॅलेंट’मध्ये सहभाग घेतलेल्या अमित माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट योगाचे प्रात्यक्षिक सादर केले.
शौर्य स्पोर्ट्स अकादमीच्या खेळाडूंनी प्रवीण केचे यांच्या मार्गदर्शनात रोप मलखांबचे प्रात्यक्षिक सादर केले. केशवनगर माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ढोल ताशाच्या तालावर लेझीमचे सादरीकरण केले. झिरो माईल बँडच्या चमूने सादर केलेल्या गाण्यांवर उपस्थितांनी चांगलाच ठेका धरला.
पद्मश्री धनराज पिल्ले यांनी सर्व खेळाडूंना शपथ दिली. यापूर्वी त्यांनी स्टेडियम मध्ये चौफेर हॉकीने चेंडूला फटका मारून महोत्सवाचे उद्घाटन केले.
कार्यक्रमाला शहरातील क्रीडा संघटक, प्रशिक्षक, खेळाडू प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन अमोल यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी खासदार क्रीडा महोत्सव समितीचे पीयूष आंबुलकर, नागेश सहारे, डॉ. पद्माकर चारमोडे, डॉ. संभाजी भोसले, डॉ. विवेक अवसरे, सचिन देशमुख, अशफाक शेख, अमित संपत, सतीश वडे, सचिन माथाने, सुनील मानेकर, लक्ष्मीकांत क्रिपाने, आशिष मुकीम, प्रकाश चंद्रायण आदींनी सहकार्य केले.

आमचे चॅनल subscribe करा