Homeनागपूर न्यूजऑक्टोबरपर्यंत बाधितांच्या संख्येत आणखी वाढ,खाटांची उपलब्धता असणे महत्वाचे:फडणवीस

ऑक्टोबरपर्यंत बाधितांच्या संख्येत आणखी वाढ,खाटांची उपलब्धता असणे महत्वाचे:फडणवीस

नागपूर,ता. २१ सप्टेंबर: आज नागपूर महानगरपालिकेमध्ये कोव्हिड संदर्भात आढावा बैठक झाली त्यात मनपा आयुक्त राधाकृष्णन बी.यांनी उचललेली पावले निश्‍चितच प्रशंसनीय आहे. आयुक्तांनी कोव्हिड रुग्णालयांची संख्या जी ४२ होती ती १०२ पर्यंत नेली,१८०० खाटा आता खासगीत उपलब्ध झालेत,मात्र आणखी जास्त प्रयत्न वाढविण्याची गरज आहे.कारण ऑक्टोबरमध्ये बाधितांच्या संख्येत आणखी वाढ होणार असून ऑक्टोबरपर्यंत ही पिकींग चालेल,तोपर्यंत खाटांची उपलब्धता असणे महत्वाचे असल्याचे माजी मुख्यमंत्री व विधान सभेचे विरोधी पक्ष् नेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

ते प्रेस क्लब येथे आयोजित पत्र परिषदेत बोलत होते.याप्रसंगी माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे,आ.कृष्णा खोपडे,आ.विकास कुंभारे,आ.गिरीश व्यास,महापौर संदीप जोशी,उपमहापौर मनीषा कोठे,स्थायी समिती अध्यक्ष् पिंटू झलके,सत्ता पक्ष् नेते संदीप जाधव आदी.उपस्थित हाेते.याप्रसंगी बोलताना फडणवीस म्हणाले की,आपण आता पीककडे चाललो आहोत त्यामुळे आणखी खाटा लागतील,ते कसे वाढवता येईल यासाठी प्रयत्न करावे लागेल.याशिवाय कॉन्टेक्ट ट्रेसिंग वाढवावा लागेल
नागपूर जिल्ह्यात करोनाची चाचणीचे प्रमाण हे खूप चांगले आहे.बाधितांची संख्य वाढली तरी चाचणी झाली पाहीजे.त्यातून आयसोलेशन होईल व यामुळे करोनाचा प्रादुर्भाव कमी होईल.

एकच जंबो सेंटर योग्य नाही-
याप्रसंगी बाेलताना फडणवीस म्हणाले की,एकच जंबो सेंटर हे योग्य नाही,मुंबई आणि पुण्यात हा प्रयोग फसला आहे.तिथे जंबो रुग्णालयातील मृृत्यू दर ३७ टक्के होता,पिंपरी-चिंचवडमध्ये मात्र २००-२००,३००-३०० खाटांचे लहान रुग्णालये निर्माण केलीत त्यामुळे योग्य काळजी घेता आली आणि हीच योग्य नियोजन आहे.ॲम्ब्यलेंसची संख्या देखील वाढवावी लागेल,अजूनही सुधारणा करण्याची खूप गरज असल्याचे ते म्हणाले.मनपात रोजगार भरती देखील केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
वाॅकिंग आयसोलेशन सेंटरची व्यवस्था ही देखील महत्वाची ठरणार आहे.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते यांनी कोव्हिडच्या संदर्भात घेतला मनपाच्या कामाचा आढावा-

पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (ता.२१) शहरातील कोव्हिड स्थितीचा आढावा घेतला. मनपा मुख्यालयातील आयुक्त कक्षात झालेल्या बैठकीत त्यांच्यासमवेत महापौर संदीप जोशी, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार सर्वश्री गिरीश व्यास, नागो गाणार, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, उपमहापौर मनीषा कोठे, स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, अतिरिक्त आयुक्त सर्वश्री जलज शर्मा, राम जोशी, संजय निपाणे, उपायुक्त निर्भय जैन, प्रभारी उपायुक्त अमोल चौरपगार, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. भावना सोनकुसळे, टाटा ट्रस्टचे डॉ. टिकेश बिसेन आदी उपस्थित होते.

यावेळी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी शहरातील कोव्हिडची सद्यस्थिती आणि नागपूर महानगरपालिकेतर्फे सुरू असलेल्या उपाययोजनांची सादरीकरणाद्वारे माहिती दिली. ते म्हणाले, शहरातील महत्वाच्या आरोग्य सुविधा सुधारण्याकडे मनपाचे प्रयत्न सुरू आहेत. शहरातील सद्या ४२ खाजगी रुग्णालयांमध्ये कोव्हिड रुग्णांचे उपचार सुरू आहेत. इतरही रुग्णालयांमध्ये सेवा सुरू करण्याबाबत कार्य सुरू आहे. खाजगी रुग्णालयांकडून काढण्यात येणा-या देयकाचे बिलाचे ऑडिट (अंकेक्षण) करण्यासाठी ऑडिटर (अंकेक्षक) नियुक्त करण्यात आले आहेत. याशिवाय प्रत्येक झोनमध्ये प्रत्येकी ५ ॲम्ब्यूलन्स यासह एकूण ६५ रुग्णवाहिका नागरिकांच्या सेवेत आहेत. यामुळे रुग्णवाहिका उपलब्ध होत असल्याच्या तक्रारी कमी झाल्या आहेत. शहरात दररोज ६५०० ते ७ हजार कोव्हिड चाचण्या केल्या जात आहेत. यामध्ये आणखी आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या वाढविण्यात येत आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये येत असलेल्या त्रुट्यांमुळे मध्यंतरीच्या काळात अनेक अडचणी येत होत्या. त्याकडे कटाक्षाने लक्ष देउन आता कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरळीत करण्यात आले आहे. मनपाची रुग्णालये सज्ज असून वैद्यकीय कर्मचा-यांच्या अभावी ते सुरू करण्यास अडचण होती. यावरही उपाय शोधण्यात आले आहेत. रेल्वेने काही दिवसांपूर्वीच मनपाला रुग्णालय देण्याचे जाहिर केले होते. मात्र तांत्रिक अडचणीमुळे काही दिवस ते रुग्णालय सुरू न करता येउ शकल्याने तेथील वैद्यकीय चमू मनपाच्या सदर येथील आयुष रुग्णालयात सेवा देणार आहे. त्यामुळे मनपाच्या सदर येथील रुग्णालयात कोव्हिड उपचार केले जाईल. याशिवाय मनपाच्या आयसोलेशन हॉस्पिटलची जबाबदारी शहरातील साई मंदिर ट्रस्टने घेतली आहे. इंदिरा गांधी रुग्णालयातही उपचार सुरू करण्यात आले आहे. पाचपावली रुग्णालयात कोव्हिड पॉझिटिव्ह गरोदर मातांवर उपचार व त्यांची प्रसूती सुरू करण्यात आली आहे. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) येथील शिक्षण पूर्ण झालेले ६० डॉक्टर आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) येथून शिक्षण पूर्ण केलेल्या २०० डॉक्टरांना लवकरच नियुक्ती देण्यात येत आहे. त्यामुळे महत्वाचा वैद्यकीय कर्मचा-यांचा प्रश्न सुटला आहे. सप्टेंबर महिन्याअखेरीस मनपाकडे मनपा रुग्णालयांचे ४०० बेड्स उपलब्ध होतील, असेही आयुक्तांनी यावेळी सांगितले.

‘जम्बो हॉस्पिटल’ ऐवजी छोट्या रुग्णालयांवर भर द्या

नागपूर शहरात ‘जम्बो हॉस्पिटल’ तयार करणे प्रस्तावित आहे. त्याचे काम लवकरच सुरू केले जाईल, अशी माहिती आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी बैठकीत दिली. शहरात ‘जम्बो हॉस्पिटल’ उभारण्याऐवजी २०० ते ३०० बेड्सची छोटी रुग्णालये उभारा, अशी सूचना यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. एकाचवेळी एक हजार किंवा त्यापेक्षा जास्त बेड्सचे ‘जम्बो हॉस्पिटल’ मध्ये व्यवस्थापनाच्या दृष्टीने त्यात अनेक अडचणी येतात. रुग्णांना उत्तम सुविधा मिळावी, रुग्ण तसेच वैद्यकीय चमूंचे कार्य सुरळीत चालावे यासाठी छोटी रुग्णालये तयार करा. त्यात आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून द्या. शहरातील काही रिकाम्या इमारतींचा यासाठी वापर करता आल्यास त्यादृष्टीने विचार करा, त्यामुळे झटपट कार्यवाही सुरू होईल, असेही ना. देवेंद्र फडणवीस म्हणाले.

बेड्सच्या उपलब्धतेचे ‘एसएमएस’ पाठवा

रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर ते मनपाच्या नियंत्रण कक्षात बेड्सच्या उपलब्धतेसाठी फोन करतात. त्यांची संबंधित रुग्णालयांची माहिती दिली जाते. मात्र प्रत्यक्ष हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्यांना परत पाठविण्याचा प्रकार घडतो. यावर उपाय म्हणून ‘एसएमएस’ प्रणाली अंमलात आणावी, अशीही सूचना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. यामध्ये रुग्णाने नियंत्रण कक्षात फोन करताच त्याची संपूर्ण माहिती मागवून घेणे, त्यानंतर त्याची ऑक्सिजनची स्थिती विचारणे, संबंधित रुग्णाला हॉस्पिटलमध्ये भरती करण्याची गरज असल्यास त्याला बेड्स उपलब्ध असणा-या संबंधित रुग्णालयाची माहिती देणे व लगेच त्यासंबंधी रुग्णाच्या मोबाईल नंबरवर त्यासंबंधीचे ‘एसएमएस’ पाठवायचे. ‘एसएमएस’ हे हॉस्पिटलमध्ये रुग्ण तातडीने दाखल करण्यासाठी ‘टोकन’ची भूमिका निभावेल व संपूर्ण प्रक्रियेत सुसूत्रता येईल, असेही ते म्हणाले.

‘कोव्हिड संवाद’ स्तूत्य उपक्रम-

कोव्हिड संदर्भात नागरिकांमध्ये असलेली भीती आणि संभ्रम दूर करण्यासाठी मनपामध्ये महापौर संदीप जोशी यांच्या संकल्पनेतून ‘कोव्हिड संवाद’ हा फेसबुक लाईव्ह उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यासंबंधी महापौर संदीप जोशी यांनी बैठकीत माहिती दिली. ‘कोव्हिड संवाद’मध्ये दररोज शहरातील विविध क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांना आमंत्रित केले जाते. संबंधित डॉक्टर यासंबंधी सविस्तर मार्गदर्शन करून नागरिकांच्या शंका आणि प्रश्नांचे निरसन करतात. या उपक्रमाला नागपुरकरांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून तो पुढेही सुरू ठेवण्यात येणार आहे, असेही महापौरांनी सांगितले. आजच्या स्थितीत नागरिकांना योग्य माहिती मिळणे व त्यांना भेडसावणा-या समस्या सोडविण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध असणे अत्यावश्यक आहे. यासंबंधी नागपूर महानगरपालिकेने घेतलेला पुढाकार अत्यंत स्तूत्य आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘कोव्हिड संवाद’ची प्रसंशा केली. जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत हा कार्यक्रम पोहोचावा यासाठी त्यांच्या स्वत:च्या फेसबुक पेजवरूनही प्रसारीत करण्याची सूचना ना. देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Latest बातम्या