Homeनागपूर न्यूजआज बॅनर फाडणारे उद्या लावणार शुभेच्छांचे फलक!

आज बॅनर फाडणारे उद्या लावणार शुभेच्छांचे फलक!

Advertisements

(छायाचित्र: नागपूरातील मनीष नगरातील तुळजा भवानी मंदिरात आरती करताना एकनाथ शिंदे व दादाजी भुसे)

नागपूरात अनेक शिवसैनिकांचा शिंदेंना पाठींबा

एकनाथ शिंदेंच्या एका फोनवर तुळजाभवानीची मूर्ती प्रशासनाकडून परत

नागपूर,ता.२८ जून २०२२: महाराष्ट्राच्या राजकारणात किंबहूना शिवसेना या पक्षात जो अभूतपूर्व प्रसंग ओढवला आहे याचे पडसाद महाराष्ट्राच्या उपराजधानीतही उमटलेले दिसतात.नगरविकास मंत्री एकनाथ शिदेंच्या या बंडानंतर मुंबईवरुन प्राप्त होणा-या आदेशाप्रमाणे दरराेज नागपूरात निर्दशने आणि आंदोलने होत असली, तरी एक फार मोठा आजी-माजी शिवसैनिकांचा वर्ग हा ‘आतून आणि मनातून‘एकनाथ शिंदेंसोबत असल्याचे समोर आले आहे.मुंबईच्या आदेशाप्रमाणे दररोज आंदोलन आणि प्रदर्शनात शिंदे यांचे बॅनर जरी आज फाडले जात असले तरी उद्या याच शिवसैनिकांवर त्यांच्या नावाचे शुभेच्छा फलक लावण्याची वेळ येणार असल्याचे उघडपणे आता बोलले जात आहे.

दक्ष्णि-पश्‍चिम विभागाचे माजी विधान सभा संघटक प्रवीण शर्मा यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह उघडपणे एकनाथ शिंदे यांना आपले समर्थन जाहीर केले असून आपला व्हॉट्स ॲप डीपी देखील त्यांनी शिंदे यांच्यासोबतचा ठेवला आहे.शिंदे हे आमच्यासाठी ‘देव’असल्याचे ते सांगतात.

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जुलै २०१८ मध्ये जेव्हा नागपूरात अनाधिकृत धार्मिक स्थळांवर मनपाचे बुलडोजर चालत होते त्यावेळी मनीष नगर येथील आई तुळजाभवानी यांच्या मंदिरावर देखील बुलडोजर चालला.हे मंदिर अनाधिकृत नसताना व रस्त्यामध्ये येत नसतानाही हे मंदिर तोडण्यात आले व आई तुळजाभवानीची मूर्ती ही नागपूर सुधार प्रन्यासच्या गोदामान दोन महिन्यांपर्यंत बंदिस्त ठेवण्यात आली होती.

प्रवीण शर्मा यांनी तेव्हा शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश जाधव,संपर्क प्रमुख गजानन किर्तीकर आदी सर्व वरिष्ठ नेत्यांकडे धाव घेतली मात्र कोणीही काहीच प्रयत्न केले नसल्याची टिका ते करतात.

अश्‍यावेळी मुंबईला जाऊन एकनाथ शिंदे यांना शर्मा व त्यांचे सहकारी जाऊन भेटले असता त्यांनी एका क्षणात तत्कालीन जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्गल यांना फोन लावला.हे मंदिर रस्त्यावर येत होते का?अशी विचारणा केली व तात्काळ तुळजाभवानीची मूर्ती शिवसैनिकांना सोपवा,असा आदेश दिला.

त्यांनी फोन ठेवताच अश्‍विन मुद्गल यांच्या कार्यालयातून प्रवीण शर्मा यांना फोन आला,साहेबांनी सांगितले आहे तुमची मूर्ती घेऊन जा,शर्मा यांनी नागपूरला परतताच मूर्ती ताब्यात घेतली व पुन्हा तिची मंदिरात प्राण प्रतिष्ठा केली मात्र दोन महिने ज्या आई तुळजाभवानीसाठी शिवसैनिक वरिष्ठांच्या कार्यालयाच्या चकरा मारत होते,व कोणीच पुढाकार घेतला नाही, त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्या एका फाेनने अनेक शिवसैनिकांची आस्था जडलेली आई तुळजाभवानीची मूर्ती त्यांना परत मिळाली होती,त्या क्षणापासून एकनाथ शिंदेे हे या शिवसैनिकांसाठी ‘देव’झालेत.

आज शिवसैनिकांच्या व्हॉट्स ॲप ग्रूपवर शिंदे यांच्या बंडानंतर जिल्हा प्रमुख,संपर्क प्रमुखांचे दरराेज नारे,निर्दशने,आंदोलनासाठी निरोप येत आहेत,उद्या देखील बुधवार दि.२९ जून रोजी दुपारी अडीच वाजता झांसी राणी चाक,सीताबर्डी येथे शहर संपर्कप्रमुख दुष्यंत चतुर्वेदी यांच्या मार्गदर्शनात शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ पैदल मार्च व शक्ती प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे मात्र वरिष्ठांच्या आदेशामुळे शरिराने प्रदर्शनात सहभागी होत असलो तरी मनाने आम्ही शिंदे साहेबांसोबत असल्याचे अनेक शिवसैनिक ‘खासगीत ’आपल्या भावना व्यक्त करतात.

तुळजा भवानींचे देवस्थान मनीषनगरात आहे.भाजपचे प्रभाग क्र ३५ चे नगरसेवक,त्यांना साथ देणारे नासुप्रचे सभापती,अधिका-यांनी न्यायालयाची दिशाभूल करुन जबरदस्तीने अतिक्रमात येत नसतानाही देवस्थान पाडले.हे देवस्थान मुख्य रस्त्यापासून २५० फूट अंतरावर दूर होते.एवढंच नव्हे तर,ते पी.यू.लैण्ड पब्लिक युटिलिटीच्या जागेवर सुरक्षा भिंतीच्या आत होते.हे देवस्थान पुरातन असून मंदिराची देखभाल व दुरुस्ती भाविकांनी आपल्या पैश्‍यातून केली होती.

(छायाचित्र: हीच ती आई तुळजाभवानीची मूर्ती)

लाखो भाविकांची गर्दी होत असल्याचे पाहून भाजपच्या नगरसेवकांनी न्यायालयाच्या आदेशांचा गैरफायदा घेत, अधिका-यांना हाताशी धरुन मंदिर तोडल्याची वेदना या शिवसैनिकांनी एकनाथ शिंदेंकडे मांडली.झालेल्या अन्यायाविरुद्ध नागपूरात कोणत्याच वरिष्ठ शिवसैनिकांकडून दाद न मिळाल्यामुळे प्रवीण शर्मा हे भाविकांच्या शिष्टमंडळासह मुंबईत मंत्रालयात गेले व तिथे सार्वजनिक बांधकाम मंत्री(उपक्रम)एकनाथ शिंदेंना भेटून निवेदन दिले.शिंदेंनी क्षणाचाही विलंब न लावता अश्‍विन मुद्गल यांना फोन लावला व दोन महिन्यांपासून नासुप्रच्या गाेदामान कोणत्याही पूजेविना बंदिस्त असणा-या मूर्तीचा ताबा भाविकांना मिळाला.

बाळासाहेबांचीच शिकवण आहे,कुठेही अन्याय,अत्याचार होत असेल तर शिवसैनिकच उभा राहणार आहे.आज किशोर कुमेरिया असो किवा दुष्यंत चर्तुर्वेदी,ते कार्यकर्त्यांना फक्त आदेश देऊ शकतात,कार्यकर्ते गोळा करु शकतात मात्र आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांवर गर्व आहे,असे उद् गार नागपूरातील हे शिवसैनिक काढतात.

(छायाचित्र: एकनाथ शिंदेंसोबत प्रवीण शर्मा)

शिंदे साहेबांचा वाढदिवस हा ९ फेब्रुवरी रोजी असतो,मागे त्यांच्यावर एक अरिष्ट संकट ही येऊन गेलं,याच तुळजा भवानीच्या मंदिरात शिंदेंसाठी विशेष पूजा अर्चना केली जाते.

‘माय नेम इज खान’हा चित्रपट कुठेही प्रदर्शित झाला नाही पाहीजे,असा अादेश शिवसेना प्रमुखांचा होता त्यावेळी नागपूरातील चित्रपटगृहात या चित्रपटाला शिवसेना प्रमुखांच्या एका आदेशावर विरोध करुन चित्रपट बंद पाडणारे आम्हीच होतो.

मेट्रोने स्थानिकांना डावलून परराज्यातून कर्मचा-यांची भर्ती केली त्यावेळी देखील मेट्रो भवनासमोर स्थानिकांच्या हक्कासाठी कडवे शिवसैनिक म्हणून आम्हीच लढलो मात्र या आंदोलनासाठी नागपूर व जिल्हा पक्ष श्रेष्ठींचे फोन आलेत ’कोणाला विचारुन आंदोलन केले?मी माझ्या नोकरीसाठी आंदोलन केले नाही तर स्थानिकांच्या हक्कासाठी लढा दिला होता,मला माझा स्वत:चा व्यवसाय आहे मात्र स्थानिक पक्ष श्रेष्ठीं, मार्गदर्शनाएेवजी पक्षातील कार्यकर्त्यांचे मनोबल खच्चीकरण करण्यास धन्यता मानतात याचा अनुभव घेतला असल्याचे प्रवीण शर्मा सांगतात.

एकनाथ शिंदे हे जेव्हा कधी नागपूरात येतात तेव्हा ‘अरे त्या तुळजाभवानीच्या शर्माला बोलव’अशी आठवण काढतात.आज मी पदावर नसलो तरी कडवा शिवसैनिकच आहे आणि एकनाथ शिंदे हे माझ्यासाठी आणि माझ्यासारख्या अनेक शिवसैनिकांसाठी ’देव’असल्याची भावना खास ‘सत्ताधीश’कडे प्रवीण शर्मा हे व्यक्त करतात.

Latest बातम्या