Homeसांस्कृतिक / मनोरंजनअखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी जब्बार पटेल

अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी जब्बार पटेल

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements

मुंबई: अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध सिनेनिर्माते, दिग्दर्शक जब्बार पटेल यांची निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी ही घोषणा केली असून नाट्यसंमेलनाचं हे यंदाचं शंभरावे वर्ष आहे.

अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदासाठी जब्बार पटेल आणि प्रसिद्ध अभिनेते मोहन जोशी या दोघांचेच अर्ज आले होते. त्यावर नाट्य परिषदेच्या कार्यकारी समितीत चर्चा करण्यात आली. या बैठकीत पटेल यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आलं असून येत्या १५ डिसेंबर रोजी होणाऱ्या नियामक मंडळाच्या बैठकीत पटेल यांच्या नावाची घोषणा करण्यात येणार असल्याचं प्रसाद कांबळी आणि परिषदेचे प्रवक्ते मंगेश कदम यांनी सांगितलं.

जब्बार पटेलांचा प्रवास

डॉ. जब्बार पटेलांनी अनेक नाटके व चित्रपट दिग्दर्शित केले. ‘ सामना’, ‘सिंहासन’, गो. नी. दांडेकरांच्या कादंबरीवर आधारीत ‘जैत रे जैत’, ‘मुक्ता’, पु ल. देशपांडेनी लिहिलेला ‘एक होता विदूषक’ आदी दर्जेदार चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले आहेत. अनेक पैलू असणार्‍या आंबेडकरांचे जीवन तीन तासाच्या चित्रपटात रेखाटणे ही अवघड बाब असताना त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर’ हा चित्रपट केला. या चित्रपटाने त्यांना अनेक पुरस्कार मिळवून दिले. जवळपास सर्व प्रमुख भारतीय भाषांत हा चित्रपट भाषांतरीत झाला आहे. पटेलांनी थिएटर अकादमी या प्रायोगिक नाटकांसाठीच्या नाट्यसंस्थेची स्‍थापना केली आहे.

प्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकर यांच्या ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकाचे जब्बार पटेलांनी दिग्दर्शन करून ते परत रंगमंचावर आणले होते. या नाटकाने आता विक्रमी प्रयोगांची नोंद केली आहे. जब्बार पटेलांनी अनेक लघुपटही तयार केले आहेत. नाशिकच्या प्रसिद्ध कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे ते अध्यक्ष आहेत. त्यांना २०१४मध्ये अखिल महाराष्ट्र नाट्यविद्यामंदिर समितीतर्फे विष्णुदास भावे पदकाने गौरवण्यात आले. पुणे विद्यापीठाच्या जीवनसाधना पुरस्कारसह दिल्लीच्या संगीत नाटक अकादमीच्या पुरस्कारानेही त्यांना गौरविण्यात आले आहे.

पटेलांनी अभिनय केलेली नाटके

>> तुझे आहे तुजपाशी
>> माणूस नावाचे बेट
>> वेड्याचे घर उन्हात

दिग्दर्शन केलेले सिनेमे

>> उंबरठा
>> एक होता विदूषक
>> जैत रे जैत
>> डॉ बाबासाहेब आंबेडकर
>> पथिक
>> मुक्ता
>> मुसाफिर
>> सामना
>> सिंहासन

Advertisements

Latest बातम्या