फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजमुंढे यांच्या विरोधात पाेलीसात तक्रार दाखल: कोराना काळात रजवाडा येथे भरली कौतूक...

मुंढे यांच्या विरोधात पाेलीसात तक्रार दाखल: कोराना काळात रजवाडा येथे भरली कौतूक सभा

Advertisements


२०० लोकांचा जीव घातला धोक्यात:इतरांना सांगे ज्ञान,आपण कोरडे पाषाण

नागपूर,ता. ६ जून: मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात गणेशपेठ पाेलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून,नुकतेच ३१ मे २०२० रोजी गांधीसागर येथील रजवाडा पॅलेस येथे भरलेल्या कौतूक सभेत आयुक्तांनी २०० च्या जवळपास लोकांना संबोधित केल्याचा अारोप यात करण्यात आला आहे.

मनीष प्रदीप मेश्राम असे तक्रारकर्त्याचे नाव असून तक्रारीत त्यांनी एका व्हिडीयोचा संदर्भ दिला आहे.या व्हिडीयोमध्ये आयुक्त तुकाराम मुंढे हे रजवाडा पॅलेसमधील भव्य-दिव्य सभागृहात २०० लोकांच्या उपस्थितीत मंचावरुन संबोधन करताना आढळून येत आहेत. त्या कार्यक्रमात महाराष्ट्र शासनाने पारित केलेल्या नियमांचे कुठल्याही प्रकारे पालन करण्यात आले नसल्याचे आपल्या तक्रारीत मेश्राम यांनी नमूद केले असून कोरोना महामारीच्या काळात, भारत सरकारने अद्याप कोणत्याही स्वरुपाच्या राजकीय, सामाजिक,धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी प्रदान केली नसताना,मुंढे यांनी अश्‍या स्वरुपाचा कौतूक सोहळा रजवाडा येथे आयोजित केल्याने भारत सरकारच्या दिशानिर्देशांचा भंग झाला असल्याने,सरकारचे प्रतिनिधित्व करणारे सनदी अधिकारी आयुक्त मुंढे यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी मेश्राम यांनी केली आहे.

मुंढे यांनी अश्‍या स्वरुपाचा कार्यक्रम आयोजित करुन २०० लोकांचा जीव धोक्यात घातला असल्याचे त्यांनी नमूद केले.जिथे लोकांची गर्दी जमेल आणि महामारीचा प्रादुर्भाव वाढेल,अशी शासन विरोधी कृती एका सनदी अधिका-यानेच केली असल्याने तसेच शासनाच्या मार्गदर्शक तत्वालाच हरताळ फासल्यामुळे,शासन नियमांची अवहेलना करणा-या मुंढेंवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
मुंढे यांनी अशी शासनविरोधी कृती करुन,अनेकांचा जीव धोक्यात घालून, नागपूरात चुकीचा संदेश पसरवला आहे.कायद्याने त्यांनी गुन्हा केला आहे. ज्या अधिका-यावर नागपूर शहरातील महामारी रोखण्याचे दायित्व प्रदान करण्यात आले आहे,जनतेचे कोरोनापासून संरक्ष ण करण्याची,त्यांना वाचवण्याची जवाबदारी देण्यात आली आहे,जर तेच सनदी अधिकारी लॉक डाऊनच्या नियमांचे पालन करीत नसतील तर हा गंभीर गुन्हा ठरतो.

रजवाडा पॅलेसचीही चौकशीची मागणी-
आपल्या तक्रारीत मेश्राम यांनी शहरातील संपूर्ण हॉटेल्स,मॉल्स,रेस्टॉरेंट हे बंद असताना, रजवाडा पॅलेसला असा कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी कोणी बहाल केली?याची देखील चौकशी करण्यात यावी,अशी मागणी केली आहे.अशी परवानगी त्यांनी घेतली नसल्यास त्यांच्याविरुद्ध देखील कठोर कारवाई करण्याची मागणी मेश्राम यांनी नमूद केली. या सार्वजनिक कौतूक सोहळ्यात मनपा आयुक्तांसोबत जे महापालिकेचे अधिकारी सहभागी झाले त्यांच्यावर देखील कठोर कारवाई करण्याची मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.

इतरांना सांगे ज्ञान…आपण कोरडे पाषाण-
आयुक्त तुकाराम मुंढे यांचा ३१ मे चा हा व्हिडीयो व्हायरल होताच अनेकांना आश्‍चर्याचा धक्काच बसला. शिस्तप्रिय व कर्तव्यकठोर मुंढे कोरोना काळात अशी शासनविरोधी कृती करुच कशी शकतात?अशी चर्चा आता नागपूरकरांमध्ये रंगली आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून सलून,चहा टपरी,नाश्‍ता पॉईट,रेस्टॉरेट सक्तीने बंद ठेवणारे व शहरातील लाखो नागरिकांना उपासमारीच्या खोल दरीत ढकळणा-या आयुक्तांची ही अशी ‘दोगली’वागणूक बघून नागपूरकर थक्क झाले आहेत. मे महिन्यात तसेच जूनच्या पहील्याच आठवड्यात एकीकडे कोरोना संसर्गाचा आकडा हा ७०० च्या घरात पोहोचला असताना मुंढे हे रजवाडा पॅलेसमधील एका सार्वजनिक कार्यक्रमात चक्क सहभागी होतात,एवढेच नव्हे तर राणा भीमदेवी थाटात उपस्थितांना संबाेधित करतात! हे बघून अनेकांच्या मुंढे यांच्यावरील विश्‍वासाला चांगलाच धक्का बसला आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून सांस्कृतिक कार्यक्रम बदं असल्यामुळे शहरातील हजारो कलाकार,बॅक स्टेज आर्टिस्ट,ध्वनि व्यवस्थापक, प्रकाश योजना व्यवस्थापक, हेल्पर,डी जे,बॅण्डवाले,गायक,वादक असे शेकडो कलाकार अक्ष् र: बेरोजगार झाले असून गुढी पाडवा,रामनवमी,हनुमान जयंती, आंबेडकर जयंती या सारख्या उत्सवादरम्यान त्यांना ‘कोरोना’च्या नावाखाली तसेच महामारीचा फैलाव होऊ नये या कारणाने घरी बसून राहवे लागले.दूसरीकडे मात्र आयुक्तच स्वत: अश्‍या सार्वजनिक सभेत उपस्थित राहून भाषण देत असल्याचे बघून शहरातील कलाकार जगत हा मुंढेवर अधिकच चिडला असून ते देखील मुंढे यांच्याविरोधात आता गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

नुकतेच मुंढे यांचा वाढदिवस ३ जून रोजी साजरा झाला.याप्रसंगी पोलीस दलातील काही लोकांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांचे अभिष्टचिंतन केले. हा फोटो देखील चांगलाच व्हायरल झाला. यात मुंढे यांनी कोणताही मास्क वापरला नव्हता याशिवाय ते एकसाथ ५ पेक्ष्ा कितीतरी अधिक पोलीसकर्मींकडून पुष्पगुच्छ स्वीकारताना दिसून पडत आहेत. पोलीसांची ओळख कोणत्याही माध्यमात समोर येऊ नये म्हणून काही कायदे आहेत. या कायद्यांचे पालन करणे अत्यावश्‍यक असल्याने तो फोटो ‘सत्ताधीश’ बातमीसोबत प्रसिद्ध करु शकत नाही.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या