

कोरडे घसे झाले ओले: मद्यपींची निराशा दूर
नागपूर,ता.१५ मे: गेल्या ५२ दिवसांपासून ‘जीवघेणे’लॉक डाऊन सहन करणा-या नागपूरकर मद्यपींसाठी कालचा दिवस हा ‘आनंदवार्ता’घेऊन आला. जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे व महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नियमांमध्ये काही अंशी शिथिलता देत,शहरात ’हॉट स्पॉट’ भाग सोडून इतर ठिकाणी ऑन लाईन मद्य विक्रीला परवानगी दिली. आज शुक्रवार दि. १५ मे पासून शहरात ऑन लाईन विक्रीला सुरवात ही झाली. परिणामी अनेकांचे कोरडे घसे फार मोठ्या काळखंडानंतर ओले झाले यासोबतच मद्यपींच्या व्हॉट्स ॲप ग्रूपवर विनोदी मॅसेजेसची भरमार पडली.

कालपर्यंत जे प्रशासकीय अधिकारी शहरातील मद्यपींना अक्ष् रश: ‘गूंडे’वाटत होते तेच आता त्यांनी ‘फंडे’(निर्णय)बदलल्यामुळे खूप चांगले वाटू लागले.त्यांच्यावर सोशल मिडीयावर मद्यपींनी चांगलीच स्तृतीसुमने उधळली.‘जुने सोडून द्यावे मरणालागूनी’असे संतच सांगून गेले आहेत या न्यायाने मद्यपींनी जुनी सगळी नाराजी एका ’बाटली’वरील प्रेमापोटी लगेच विसरुन या प्रशासकीय अधिका-यांचे गोडवे गाण्यास सुरवात केली. एकाची तर ‘मार्मिक’प्रतिक्रिया होती ’मी आधी बाटलीला हळद-कूंकू वाहीले,फूल मिळाले असते तर ते ही वाहीले असते,हे नाही करु शकलो म्हणून श्रद्धापूर्वक ती कपाळावर लावली!
बाटली एवढी भक्ती परमेश्वरावर केली असती तर जिवनाचे सोने झाले असते,हे या वेड्या मद्यपींना कोण सांगणार? अर्थात हा झाला विनोदाचा भाग.यात देवाशी बाटलीची तुलना करण्याचा उद्देश्य नाही.
मात्र, एवढ्या मोठ्या काळखंडानंतर ज्याच्यावर नितांत ‘प्रेम’आहे अश्या ‘बाटली’चा विरह त्यांनी किती मानसिक,भावनिक यातना सहन करुन कंठला याचे ही किस्से चांगलेच रंगले होते.अनेकांना स्वप्नात ‘बाटलीच’दिसत होती.प्रत्यक्ष्ात ती मिळत नसल्यामुळे अनेक मद्यपी हे नैराश्यात दिवस कंठत होते. एका तपानंतर आपल्या ‘आवडत्या ब्रॅण्ड’ची बाटली बघताच ‘ तिला बघताच माझ्या डोळ्याचे पारणे फिटले’अश्या शब्दात एका मद्यपीने आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली.
आज सकाळी शहरातील मद्याची दूकाने उघडताच मद्यपींनी दूकाने गाठली. शासनाचे संपूर्ण नियमांचे पालन करीत सामाजिक अंतर राखून त्यांनी दूकानदाराने दिलेला अर्ज व्यवस्थित भरुन दिला.दूकानदारांनी त्यांचा मोबाईल नंबर लिहून नंतर त्यांना लिंक पाठवली. त्या लिंकवरुन ऑन लाईन प्रत्येकाने आपापल्या आवडीचा ‘ब्रॅण्ड’ मागवला. यासाठी त्यांना १०० रुपये जास्तीचे द्यावे लागले मात्र याबाबत मद्यपींना कोणतीही नाराजी नव्हती. दूकानात जी ६०० ला मिळते, बारमध्ये जी ८०० ला मिळते, ती ‘ना नफा ना नुकसान’असे चमत्कारीक अर्थगणित आणि अंकगणित मांडून ७०० ला मिळाली,असे देखील चांगलेच किस्से रंगले.
५२ दिवसांच्या प्रदीर्घ ‘तपानंतर’प्रशासनाने मद्यपींना ऑन लाईन खरेदी करण्याची सोय उपलब्ध करुन दिल्यामुळे मद्यपींना चांगलाच दिलासा मिळाला.मात्र असे असले तरी प्रशासन केव्हा हा ‘सात्विक’ निर्णय मागे घेईल,अशी धाकधूकही त्यांच्या ’ह्दयात’अद्यापही असल्यामुळे अनेकांचा कल हा ‘जास्तीचा स्टॉक’साठवण्याकडे देखील दिसून पडला.तिस-या लॉक डाऊनमध्ये राज्य सरकारने मद्य विक्रीला परवानगी दिली होती मात्र मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागपूरात मद्य विक्रीला ‘पूर्णविराम’दिला होता त्यामुळे शहरातील मद्यपींचा आयुक्तांवर चांगलाच ‘रोष’होता. मुंढे यांच्या या निर्णयाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका देखील दाखल करण्यात आली होती. मुंढे यांनी एकल दूकाने देखील सुरु करण्यास नकार दिला होता.
मुंढे यांना ‘विलेन’ ठरवत सोशल मिडीयावर त्यांच्यावर पराकोटीची टिका-टिपण्णीही करण्यात आली होती.मात्र शहरात आज शुक्रवारी हे चित्र पार पालटलेले होते. अनेक मद्यपी यांनी व्हाटॅस ॲपवरच ‘कोरडे घसे ओले होताच’ मुंढे यांना ‘दिल से’दूवा दिल्या,हे विशेष!प्रतिबंधित क्ष्ेत्रातून किवा क्ष्ेत्रात अश्याप्रकारच्या ऑन लाईन मद्य विक्रीला मात्र अद्याप परवानगी प्रदान करण्यात आली नाही. लॉक डाऊन-३ मध्ये अनेक राज्यांनी केंद्राच्या सूचना पाळून अनेक निर्बंध शिथिल केले होते.यात मद्य विक्रीला देखील परवानगी देण्यात आली होती.मात्र कर्नाटक,हिमाचल प्रदेश,आंध्र प्रदेश,राजस्थान,चंडीगड आणि महाराष्ट्राच्या मुंबईत मद्य दूकानांसमोर मद्यपींनी एकच झुंबड केल्याने प्रशासनाचेही धाबे दणाणले होते.
या ठिकाणी मद्याच्या दूकानांसमोर ५-५ किलोमीटरच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र संपूर्ण देशाने बघितले होते. अति उत्साही लोकांनी तर रेड झोनमधील भागातील मद्याच्या दूकानांसमाेरही रांगा लावल्या होत्या. नागपूरात मात्र मद्यपींनी ‘शिस्ती’चे पालन करुन प्रशासनाला एकप्रकारे सहकार्यच केल्याचे समाधान सोशल मिडीयावर व्यक्त केले जात होते.




आमचे चॅनल subscribe करा
