

पाच-सहा महिन्यांचे बाळही कोरानाच्या विळख्यात!
नागपूर, ता. ४ मे: कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेदिवस वाढत आहे. शहरातील काही भागात नव्याने संसर्गाचा जोर धरत आहे. सतरंजीपुरातील संसर्गाची लाट रोखण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर काम सुरू आहे. त्यातच शहरात सतरंजीपुरा, डोबीनगर परिसरातील ९ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे पुढे आले. विशेष असे की, सोमवारी दि. ४ मे रोजी मेडिकलमधील प्रयोगशाळेतून आलेल्या अहवालात पाच आणि सहा महिन्यांच्या बाळांनाही कोरोनाची बाधा झाली असल्याचे सामोरे आले. या चिमुकल्यांसह शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा १५९ वर पोहचला आहे.
उपराजधानीत ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे, अशा वस्तीचे विलगीकरण महापालिका आयुक्तांनी केले आहे. यामुळे या विलगीकरणातूनच निघणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. नव्याने शहरातील इतर वस्त्यांमध्ये होणाऱ्या संसर्गावर नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला यश आले असले तरी यशोधननगरातून ७ वर्षाच्या मुलाला कोरोनाची बाधा झाल्याचे उघड झाले. सोमवारी मेयो रुग्णालयात दोघांना तर मेडिकलमध्ये चौघांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती अहवालातून पुढे आली आहे. मेयोतून बाधित आलेल्या अहवालात ४० वर्षीय युवकासह ३० वर्षांय महिला आहे. हे डोबीनगर आणि सतरंजीपुरा येथील रहिवाशी आहेत.
तर मेडिकलमधील अहवालातून ५ आणि ६ महिन्यांच्या बाळाला कोरोनाची बाधा झाल्याचे पुढे येताच डॉक्टरांनी चिंता व्यक्त केली. आई आणि मुलीला बाधा झाली असल्याचे या अहवालातून पुढे आले आहे. ७ वर्षाच्या यशोधरानगरातील चिमुकल्यासह २९ आणि ३० वर्षाच्या महिलांना कोरोनाने विळख्यात घेतले असल्याची माहिती मेडिकलच्या प्रयोगशाळेतील अहवालातून स्पष्ट झाली आहे. याशिवाय नीरी प्रयोगशाळेतून विलगीकरणात असलेल्या नागपुरातील दोघांना बाधा झाल्याचा अहवाल प्राप्त झाला. मात्र अद्याप विलगीकरणातून या बाधितांना मेयो-मेडिकलमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती नाही.
शहरात एकूण १५९ कोरोनाबाधितांपैकी आतापर्यंत ५८ रुग्ण हे ठणठणीत बरे झाले आहेत. तर दोघांचा मृत्यू झाला असून मेडिकलमध्ये ५६ रुग्ण दाखल आहेत. मेयोमध्ये ४४ जणांवर उपचार सुरू आहेत. अशाप्रकारे मेयो आणि मेडिकलमध्ये सध्या १०० कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.
कॅन्सरग्रस्तासह सहा जणांची कोरोनावर मात-
आठवड्याचा पहिला दिवस असलेला सोमवार उपराजधानीसाठी दिलासादायक ठरला आहे. पंधरा दिवस कोरोनाशी युद्ध करीत तब्बल सहा जणांनी कोरोनाला हरवले. मेयो रुग्णालयाने पाच जणांना कोरोनामुक्त घोषित केले तर मेडिकलमधूनही एकाने कोरोनावर विजय मिळवला. अशाप्रकारे सहा जण कोरोनावर मात करीत घरी पोहचले. विशेष असे की, ४० वर्षीय कॅन्सरग्रस्ताने कोरोनावर मात केली असून डॉक्टर, परिचारिकांनी कोरोनाबाधेतून मुक्त झालेल्यांसाठी टाळ्या वाजवित आनंद व्यक्त केला.
उपराजधानीत प्रथमच सतरंजीपुरा, शांतीनगर, कुंदनलाल गुप्त नगर अशा विविध वस्त्यांमधील सहा जण सोमवारी कोरोनामुक्त झाले. सतरंजीपुरा येथील ११ वर्षीय मुलीसह शांतीनगरातील १३ आणि ४० वर्षे वय असलेल्या व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे. तर कुंदनलाल गुप्त नगरातील ४० वर्षीय व्यक्तीनेही कोरोनाला जिंकले. सोमवारी सुटी होताच मेयोतील डॉक्टर परिचारिकांचे आभार व्यक्त करीत बाधेतून मुक्त झालेल्यांनी विजयी मुद्रेने साऱ्यांना अभिवादन केले. मेयोचे वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. सागर पांडे यांनी यावेळी घरी स्वतःला विलगीकरणात राहण्याचा सल्ला दिला. उपराजधानीत ११ मार्च ते ४ मे या कालावधीत सुमारे १५९ जणांना कोरोनाने विळख्यात घेतले आहे. यातील ५८ जण बरे झाले असून बरे होणाऱ्या रुग्णांची टक्केवारी ही ४० पेक्षा अधिक आहे.
……………..
बरे झालेल्या रुग्णांच्या तीन-चार चाचण्या निगेटिव्ह आल्यानंतरच तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कोरोनामुक्त घोषित करण्यात येते. मेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, वैद्यकीय अधीक्षक डॉ. रवी चव्हाण यांच्या मार्गदर्शनात औषधवैद्यक शास्त्र विभागाच्या सहयोगी प्राध्याक डॉ. तिलोत्तमा पराते, डॉ. राखी जोशी यांनी त्यांच्यावर योग्य उपचार केले.
-डॉ. सागर पांडे, उपवैद्यकीय अधीक्षक, मेयो, नागपूर.
—




आमचे चॅनल subscribe करा
