

मेयो-मेडिकलमध्ये ८९ दाखल
नागपूर, ता. ३० : सतरंजीपुरा येथील कोरोनाबाधितांची संख्येवर नियंत्रण येत नाही. मृत कोरोनाबाधिताच्या संपर्कात आलेल्या २३ वर्षीय युवकासह ५० वर्षांचा व्यक्ती कोरोनाबाधित झाला. दोघांनाही मेयोत दाखल करण्यात आले. दोन रुग्ण वाढल्याने शहरातील बाधितांची संख्या १३८ वर पोहोचली. मेयोत ८९ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, रुग्णांचे नमुने ठेवण्यात येणाऱ्या नळीचा तुटवडा असल्याची माहिती पुढे आली.
गुरुवारी मेयो आणि मेडिकलमधील प्रयोगशाळेतून प्रत्येकी एक जण कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले. या अहवालानुसार जे कोरोनाबाधित आढळले, त्या रुग्णांना सर्दी, खोकला, ताप, श्वसनाचा त्रास अशी कोणतीही लक्षणे नव्हती. पूर्वी लोणारा येथील केंद्रात विलगीकरणात असलेल्या २३ वर्षीय युवकाला आमदार निवासात नुकतेच हलवण्यात आले. त्याचा प्रयोगशाळेतील अहवाल सकारात्मक आल्यावर त्याला उपचारासाठी मेडिकलला हलवण्यात आले. तर बाधिताच्या संपर्कात आल्यानंतर विलगीकरण केलेले सतरंजीपुरा येथील ५० वर्षीय व्यक्ती पॉझिटिव्ह आहेत. मेयो रुग्णालयात कोरोना रुग्णांच्या वॉर्डात हलवून त्यावर उपचार सुरू आहेत. या रुग्णामुळे शहरातील आजपर्यंत विषाणूची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या १३८ वर पोहचली. सध्या मेडिकल आणि मेयोत ४४ कोरोनाबाधित बरे झाले. तर ८९ कोरोनाबाधित मेडिकल आणि मेयोत भरती आहेत.
उपराजधानीत आमदार निवास, सिम्बॉयसीस, व्हीएनआटी, वनामती, पाचपावली येथील पोलिस वसाहत, लोणारा, तसेच रविभवनसह इतर विलगीकरण केंद्रात सध्या १ हजार ६७८ व्यक्तींचे विलगीकरण केले आहे. विशेष म्हणजे, २०१ जणांचे गुरुवारी नमुने तपासण्यात आले. यापैकी तिघांना कोरोनाची बाधा असल्याचे नागपुरातील प्रयोगशाळेने दिलेल्या अहवालातून स्पष्ट झाले.
“ती’ चिमुकली अतिदक्षता विभागात
मेयोच्या प्रसूतीरोग विभागात बुधवारी कोरोनाबाधित प्रसूत मातेच्या पोटी चिमुकलीने जन्म घेतला. मायलेकींची दोघींचीही प्रकृती बरी आहे. मात्र, चिमुकलीवर योग्य उपचार व्हावे या हेतूने तिला अतिदक्षता विभागात (एनआरसीयू) ठेवण्यात आले. नातेवाइकांच्या मदतीने तिला वेळेवर दूध दिले जात आहे. तर कोरोनाबाधित मातेवर कोरोना वॉर्डात उपचार सुरू आहेत. येथील स्वतंत्र खोलीत या मातेची सोय केली आहे. उद्या त्या बाळाचे नमुने घेण्यात येतील.
दैनिक संशयित : २८१
एकूण संशयित : १७८४
सध्या भरती संशयित : १२०
एकूण भरती संशयित : १५२३
एकूण भरती कोरोनाबाधित रुग्ण :८९
दैनिक तपासणी नमुने : २०१
एकूण तपासणी नमुने:२९३८
आतापर्यंत पॉझिटिव्ह नमुने: १३८
घरी सोडलेले सकारात्मक रुग्ण : ४४
घरी सोडलेले संशयित : १४०२
आज विलगीकरण केलेले संशयित: ७१२
विलगीकरण कक्षात भरती संशयित १६७८
विलगीकरण कक्षातून घरी पाठविलेले संशयित १४
पाठपुरावा सुरू असलेले एकूण संशयित ः ४५४
—




आमचे चॅनल subscribe करा
