Homeब्रेकिंग न्यूजभाजप सत्ता पक्ष नेते बाल्या बोरकरांची गोसेवकाला धमकी!

भाजप सत्ता पक्ष नेते बाल्या बोरकरांची गोसेवकाला धमकी!

गोसेवक बेपत्ता! न्यायासाठी नागपूरात गोसेवकांची एकजूट

बाल्या बोरकरांचा अभद्र बोललो नसल्याचा खुलासा:आमच्याकडे साक्षीदार आहेत,गोसेवकांचा दावा
मोक्याच्या भूखंडासाठी बोरकरांचा थयथयाट!गोसेवकांचा आरोप
नागपूर,ता.६ सप्टेंबर २०२६: लकडगंज येथील गो-सेवा चौकातील चार ते पाच एकर मनपाच्या जागेवर अविरत गो-सेवा करणारे गो-सेवक राजू भैया पांडियान हे मागील तीन दिवसांपासून बेपत्ता आहेत.भाजपचे सत्ता पक्ष नेते बाल्या बोरकर यांनी गो -शाळेत येऊन त्यांना दमदाटी केली व अतिशय अभद्र भाषेचा प्रयोग केल्याने, हळव्या मनाचे राजू पांडियान आपल्या आजारी गोमातांनाच नव्हे तर १६ वर्षीय मुलगी,१९ वर्षीय मुलगा व आपल्या पत्नीलाही न सांगता कुठेतरी निघून गेले.त्यांचा कुठेही शोध लागत नसल्याने शहरातील विविध गो-सेवकांनी बाल्या बोरकरांच्या विरोधात आता मोर्चा उघडला आहे.
१९ ऑगस्ट रोजी सकाळी साढे सात वाजताच्या सुमारास बाल्या बोरकर यांनी लकडगंज येथील गो-शाळा गाठली.त्या ठिकाणी पोहोचून त्यांनी निस्सीम गो-भक्त असणारे व अहोरात्र आपल्या पोटच्या गोळ्याप्रमाणे आजारी गाईंची सेवा करणारे गो-भक्त राजू पांडियान यांना अर्वाच्च भाषेत गोष्टी ऐकवल्या.राजू पांडियान यांना गो-शाळा रिकामी न केल्यास परिणाम भोगून देण्याची धमकी देखील दिली.या घटनेने व्यथित झालेले पांडियान हे बाल्या बोरकर यांना चांगल्याने ओळखणा-या माणसासोबत बोरकर यांच्या घरी गेले.त्यांना वाटलं बोरकर यांच्या मनातील राग,स्वत:ची बाजू मांडल्याने निघून जाईल.मात्र,येथे ही बाल्या बोरकरांनी राजू पांडियान यांचा भरपूर अपमान केला,असे प्रत्यक्षदर्शीचे सांगणे आहे.परिणामी हीच बाब संवेदनशील मनाचे निस्सीम गो-भक्त राजू पांडियान यांच्या मनाला लागल्याने ते घरच सोडून निघून गेले!

(छायाचित्र : निस्सीम गो-भक्त राजू पांडियान)

पांडियान यांना गो-शाळेत येऊन धमकी दिल्यानंतर एका गो-भक्ताने एक पोस्ट व्हायरल केली.त्यात गो-सेवक पांडियान व गो-मातांसाठी अभद्र बोलणारे बाल्या बोरकर यांचा त्याने निषेध केला.ही पोस्ट बाल्या बोरकर यांना चांगलीच जिव्हारी लागली.बोरकर यांनी लकडगंज पोलिस व मनपाच्या अधिका-यांच्या माध्यमातून पांडियान यांना प्रताडीत करण्यास सुरवात केली.

प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यानुसार लकडगंज पोलिस ठाण्यातून दोन पोलिस अधिका-यांनी पांडियान यांच्या कामधेनू गो-शाळेत येऊन पांडियान यांना बाल्या बोरकरची माफी मागण्याचे फर्मान सोडले!तसेच मनपाने देखील त्यांची लीजवर दिलेली जागा खाली करण्यास दबाव वाढवला.खाकी वर्दीच्या या बेकायदेशीर वागण्यामुळे व सातत्याने होणा-या अपमानातून राजू पांडियान यांनी केवळ गो-शाळाच नव्हे तर घरच सोडले!
पांडियान हे गेल्या अनेक वर्षांपासून मनपातर्फे त्यांच्या गो-शाळेत सोडण्यात येणा-या लाचार,आजारी,दुर्घटनाग्रस्त गो-वंशाची अविरत सेवा करीत होते.शहरातील गोशाळा परिवारातर्फे आता पांडियान यांच्या बेपत्ता होण्या मागे बाल्या बोरकर यांचा व्यवहार,धमकी,अभद्र शिवीगाळ तसेच लकडगंज पोलिसांची धमकी असल्याचा आरोप केला जात आहे.त्यांनी बाल्या बोरकर,गोशाळेत येऊन पांडियान यांना धमकी देणारे दोन्ही पोलिसकर्मी तसेच त्यांचे सहकारी यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांतर्गत एफआयर नोंदवण्याची तसेच दोषींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे.
अतिशय संवेदनशील मनाचे राजू पांडियान यांच्यासोबत कोणतीही अनुचित घटना घडल्यास याची संपूर्ण जबाबदारी बाल्या बोरकर व लकडगंज पोलिस ठाण्यातील पोलिसकर्मींवर राहील,असा इशारा देखील गोशाळा परिवारातर्फे देण्यात आला.आज गोशाळा परिवाराचे सदस्य लकडगंज पोलिस ठाण्यात पोहोचले व येत्या २४ तासांच्या आत या घटनेची निष्पक्ष चौकशी न झाल्यास नागपूरातील समस्स गो-भक्त हे विशाल जन आंदोलन करतील असा इशारा त्यांनी पोलिसांना दिला.
राजू पांडियान यांच्या न्यायासाठी गोशाळा परिवार उद्यापासून दररोज दुपारी १२ वाजता लकडगंजच्या कामधेनू गोशाळा परिसरात शांततापूर्ण आंदोलन करणार आहे तसेच हनुमान चालीसेचा पाठ करणार आहे.याशिवाय राजू पांडियान घरी सुखरुप परत येई पर्यंत अखंड रामायणाचा पाठ देखील करणार आहे.राजू पांडियान हे गो-ऋषि होते.त्यांच्यावर आलेले संकट हे शहरातील प्रत्येक गो-सेवकावर आलेले संकट समजून या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन कामधेनू गोशाळा परिवाराने केले आहे.
मूळात बाल्या बोरकर हे या प्रभागाचे नगरसेवक नसताना त्यांनी या क्षेत्रात येऊन ढवळाढवळ करणे योग्य नसल्याचे गो-सेवक सांगतात.या भागातील ९० टक्के स्थानिक रहीवाशियांना गो-शाळा,गो शाळेकडून चालविले जाणारे औषधी केंद्र किंवा लाकडी टालचे गोडाऊन यांचा कोणताही त्रास नाही.फक्त सोसायटीतील चार कुटूंब असे आहेत ज्यांनी बाल्या बोरकरकडे तक्रार केली.
राजू पांडियान यांचीही मागणी केवळ दोन हजार चौ.फूट जागा गोसेवेसाठी कुठेही द्या,अशीच होती.त्यांनी पूर्व नागपूरचे भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनाही यासाठी निवेदन दिले होते. मात्र,गोशाळाच खाली करण्यासाठी बाल्या बोरकर ज्या पद्धतीने गो-शाळेत दाखल होत, राजू पांडियान यांना धमकी देऊ लागले,ते अक्षम्य असून शहरातील अनेक मोक्याच्या ठिकाणी असणा-या मनपाच्या जागा, ज्या पद्धतीने बिल्डर्सच्या घश्‍यात जात आहेत ते बघता,येथील गो-शाळा व लीजवर देण्यात आलेले लाकडी टाल गोदामे रिकामे करुन आधी मनपाच्या ताब्यात व पुढे बिल्डरच्या घश्‍यात देण्याचा हेतू दिसून पडत असल्याचा आरोप देखील गोसेवकांनी केला.
बाल्या बोरकर यांनी या संपूर्ण घटनेवर त्यांची बाजू मांडताना, स्थानिक रहीवाश्‍यांना गोशाळा व लाकडी टालचे गोडाऊनमुळे रात्री-अपरात्री होणारा त्रास यामुळे लकडगंज पोलिस अधिका-याला निवेदन दिले असल्याचे सांगितले.मात्र,गोशाळा परिवाराच्या सदस्यांच्या मते त्या निवेदनावर फक्त ३० लोकांच्या सह्या आहेत ज्यात हनिलिसा अपाटमेंटमधील एकाच कुटूंबातील सहा ते सात जणांच्या स्वाक्षरी आहेत.आम्ही राजू पांडियान व गो-शाळेसाठी जे निवेदन दिले त्यात १८०० स्थानिक लोकांच्या सह्या असल्याचे गोसेवक सांगतात.
बाल्या बोरकर यांनी मी गो-शाळेत जाऊन कोणताही अभद्र व्यवहार पांडियान यांच्यासोबत केला नसल्याचा दावा केला आहे मात्र,आमच्याकडे या घटनेचे साक्षीदार असल्याचे गोसेवकांनी सांगितले.सीसीटीव्ही बंद असल्याने फूटेज नसल्याचे मात्र त्यांनी मान्य केले.

बाल्या बोरकर अश्‍या एका राजकीय पक्षाचे प्रतिनिधित्व करतात जी स्वत:ला गोभक्त मानते.असे असताना एका समर्पित गो भक्ताला, मै तुझे हटा दूंगा,तू व्यापार कर रहा.ऐसी गोशाळा होती हे क्या?अश्‍या शब्दात धमकावणे हे भाजप विचारधारेत तरी बसतं का?असा सवाल ते करतात.केवळ पांडियान यांनाच नव्हे तर गाेमातेसाठी देखील बाल्या बोरकर यांनी अर्वाच्य शब्द उच्चारले.यावर तरी गोभक्त भाजपातील वरिष्ठ त्यांच्यावर कारवाई करेल का?असा सवाल ते करतात.
बाल्या बोरकर आता वाठोडामध्ये गोसेवेसाठी केंद्र उभारणार असल्याचे सांगत आहेत त्यात पांडियान यांना समाविष्ट करणार असल्याची भाषा बोलत आहेत मात्र,वाठोडामध्ये जेव्हा कधी गोसेवेचे हे केंद्र उभारले जाईल तिथे चोवीस तास गो मातेची सेवा होणार आहे का?कोण करणार?मनपा प्रशासन?बोरकर यांच्या मनात गोसेवेसाठी इतकेच नियोजन होते तर,पांडियान यांच्या गोशाळेत गेल्यावर त्यांनी त्यांच्याकडे हा विषय का नाही मांडला?डोक्यात आणि व्यवहारात भिनलेला सत्तेचा माज दाखवण्याची निदान ती जागा नव्हती.जनता मूर्ख आहे का?शिवीगाळ,धमकी,आवाजाची चढलेली पट्टी,सत्तेची गुर्मी,पोलिस आणि मनपा प्रशासनाला खिशात घेऊन फिरत असल्याची मस्ती,यावर नागपूरातील गोसेवक आता न्याय मिळेपर्यंत गप्प बसणार नाही असा कामधेनू पाठशाळाच्या सदस्यांनी इशारा दिला आहे.
(बातमीशी संबंधित व्हिडीयो Sattadheesh official युट्यूब चॅनलवर उपलब्ध)
……………………………..

Latest बातम्या