नगरसेवकांची ओरड: मनपा सभेत रंगले पुन्हा ओसीडब्ल्यूचे कवित्व
रितसर कारवाईचे महापौरांचे आदेश
नागपूर,ता.२० ऑगस्ट २०२६: मनपाच्या जलप्रदाय विभागाकडून नागपूरकरांना पाण्याची देयके पाठविली जातात.तो अधिकार ऑरेंज सिटी वॉटर्स(ओसीडब्ल्यू)या खासगी कंपनीचा नाही,अशी माहिती एका प्रश्नाच्या उत्तरात आज मनपा सभेत जलप्रदाय विभागाच्या अधिकारी श्वेता बॅनर्जी यांनी दिली मात्र,२०१२ साली जेव्हा ओसीडब्ल्यूसोबत मनपाचा करार झाला त्यावेळी त्या करारात फक्त ९० रुपये पाण्याची देयक नागपूरकरांना येणार असल्याचा गवगवा करण्यात आला,आज मात्र,अनेकांना लाखांच्या घरात पाण्याची देयके पाठविली जात असल्याचा आरोप सभागृहात नगरसेवकांनी केला.आज देखील ओसीडब्ल्यूच्या कारभारावर मनपा सभेत चांगलेच कवित्व रंगले.
मुस्लिम लीगचे नगरसेवक व गटनेते असलम खान यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता.आेसीडब्ल्यू कपंनी द्वारे ग्राहकांकडून कोणत्या आधारावर पाणी शुल्क आकारले जात असून, ग्राहकांकडून ९० रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय २०१२ मध्ये घेण्यात आला होता का?असा प्रश्न त्यांनी केला.यावर श्वेता बॅनर्जीने असा निर्णय घेण्यात आला होता,अशी कबुली सभागृहात दिली.
ओसीडब्ल्यूमुळे आज ‘पाणी खून से भी ज्यादा महंगा हो गया है’,असा आरोप असलम खान यांनी केला.९० रुपये मासिक देयकाची भलावण करुन ही कंपनी गोरगरीबांना आठशे,हजार,आठ हजार अशी देयके पाठवित असल्याचा आरोप खान यांनी केला.ओसीडब्ल्यू चोबीस बाय सेवन तर पाणी नागपूरकरांना देत नाही मात्र दुसरीकडे त्यांचे मीटर चोवीस तास सुरु असतात व सुरवातीला काही तास तर नुसती हवा मीटरमधून बाहेर पडते.दोन तास एखाद्या वस्तीत जर पाणी येत असेल तर एक तास मीटरमधून नुसती हवाच बाहेर पडते,त्या हवेचे देखील पैसे जोडून ही कंपनी ग्राहकांना आठशे,हजार अशी देयके पाठवित असल्याचे असलम यांनी सभागृहाला सांगितले.
नागपूर हे शहर राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे आहे.देवेंद्र फडणवीस यांचे हे शहर असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व महसूल मंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांचे देखील शहर आहे.तरी देखील नागपूरकर पाणी ग्राहकांवर इतका मोठा अन्याय का?असा सवाल त्यांनी केला.बावणकुळे यांनी त्यांच्या भागासाठी १८० रुपये मासिक एवढे पाण्याचे देयक निश्चित केले आहे,मनपा व ही कंपनी मिळून सात दिवस पाणी देत नाही मात्र ७०० रुपये देयक गोर गरिबांना पाठवते.असा आरोप करीत बावणकुळे यांच्यासारखेच एकच देयक नागपूरकरांसाठी निश्चित करावे,अशी मागणी त्यांनी सभागृहात केली.
बाबा बुद्धाजी नगरमध्ये आज नळांना पाणीच आले नाही.माझ्या प्रभागातील अनेक भागात अतिशय दुषित पाण्याचा पुरवठा ओसीडब्ल्यू करत आहे.सांगतात गोरेवाडातून पाणी पुरवठा करतोय,जोडतात कन्हानची पाईप लाईन. जलप्रदाय विभाग तसेच ओसीडब्ल्यूचा कोणताही जबाबदार अधिकारी येऊन वस्त्यांमध्ये डोकावून जात नाहीत.‘चोवीस बाय सात ’नाही देऊ शकत तर ‘दोन बाय तीन दिवस’ पाणी द्या मात्र,एकदाचे पाण्याचे प्रमाण आणि देयक तर नियोजित करा,अशी मागणी त्यांनी केली.
राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या गटनेत्या आभा पांडे यांनी देखील त्यांच्या प्रभागात अनेक मीटरवर आधी हवाच येत असल्याचे सांगितले.हवेमुळे चालत राहणा-या मीटरची पण देयकामध्ये जोडणी होते का?असा प्रश्न त्यांनी बॅनर्जीला केला.पाणी येण्या आधी या मीटरमधील हवा काही मिनिटे नसून, चक्क एक-एक तास बिना पाण्याचे फिरत राहत असल्याचे आभा पांडे यांनी सांगितले.यावर मीटरच्या वर एक टॉपर बसवले असून ते हवेमुळे फिरत असल्याचे उत्तर श्वेता बॅनर्जी यांनी दिले.यावर केवळ लहान काटा नव्हे तर मोठा काटा देखील फिरत असतो,माझ्याकडे याचा व्हिडीयो असल्याचे आभा पांडे यांनी सांगितले.
यावर एअर व्हॉल्व लगाने के बाद पाणी एअर व्हॉल्व से नाही मीटर से ही आता है,असे उत्तर बॅनर्जी यांनी दिले.
यानंतर, लालगंजमध्ये ओसीडब्ल्यू चक्क दूषित पाणी पुरवठा करीत असून पाण्यातील अळ्या साफ दिसत असल्याचे सांगत आभा पांडे यांनी त्या दूषित पाण्याची बाटली सभागृहाला दाखवली.लालगंज गुजरीमध्ये ओसीडब्ल्यू या दूषित पाणी पुरवठामुळे तेथील ग्राहकांना पाण्याचे देयक कमी करुन पाठवणार का?असा सवाल त्यांनी केला.इतक्या दूषित पाण्याचे देयक माझी जनता भरणार नाही असे बॅनर्जी यांना आभा पांडे यांनी ठणकावले.
यावर मुस्लिम लीगचे मोहम्मद मुस्तफा अंसारी यांनी देखील त्यांच्या प्रभागातील एका ग्राहकाला ओसीडब्ल्यूने चक्क १ लाख ३५ हजार रुपयांचे देयक पाठवले असल्याची धक्कादायक माहिती दिली.महत्वाचे म्हणजे या कुटूंबात फक्त चार सदस्य आहेत.हा व्यक्ती दररोज ३०० रुपये कमावतो,इतके जास्त देयक तो कुठून भरणार आहे?असा सवाल त्यांनी केला.दुस-या एका ग्राहकाला ओसीडब्ल्यूने १ लाख २३ हजार रुपयांचे देयक पाठवले.या कुटूंबात फक्त ६ सदस्य आहेत.याशिवाय एका ग्राहकाला १ लाख ५६ हजार ३०० रुपयांचे देयक पाठवले.महत्वाचे म्हणजे ओसीडब्ल्यू नागपूरात २०१२ साली आले,या ग्राहकाला त्यांनी १९८९ पासूनचे देयक पाठवले असल्याचे त्यांनी सांगितले.
ओसीडब्ल्यू ग्राहकांकडून १२-१२ हजार रुपयांची डिमांड घेत असून जीपीएसने मी असे १५० लोकेशन दाखवू शकतो जिथे डिमांड घेऊनही पाणी पुरवठा केला नाही,असा दावा मोहम्मद मुस्तफा अंसारी यांनी केला.
एका घरात २३ जानेवरी २०२५ राेजी तपासणीत दोन मीटर मधील एकाचे देयक शून्य, नंतर ६८८ रुपये तर दुस-याचे १४ हजार ८०० रुपये पाठवले!हा ग्राहक कोड्यात पडला आहे नेमके मी कोणते देयक खरे मानू! अनेक ठिकाणी या कंपनीने एक इंच वर कनेक्शन दिले असून त्यांचे पुनर्वटण देखील केले नसल्याचा आरोप त्यांनी केला.
केंद्रीय मंत्री यांचा प्रकल्प असलेल्या ऑटोमेटीव्ह चौक ते एलआयसी चौकापर्यंत अमृत योजनेच्या १६ इंचच्या पाईपमध्ये ओसीडब्ल्यू ६ इंचचे पाईप टाकत असल्याचा गंभीर आरोपही अंसारी यांनी केला.मी अमृत योजना राबविणारी तसेच ओसीडब्ल्यू या दोन्ही कंपनीत याविषयी वारंवार विचारणा करीत आहे मात्र,या दोन्ही कपंनी माहितीसाठी एकमेकांकडे ढकलत असल्याचा आरोप त्यांनी केला.मी एक नगरसेवक असून मला माहिती मिळण्यासाठी इतका त्रास होतो तर सामान्य नागपूरकरांचे हे काय हाल करीत असतील?असा सवाल त्यांनी केला.
अनेक ठिकाणी तर अजून ओसीडब्ल्यूने नळ जोडणीही केली नाही मात्र,देयके आधीच पाठवून दिली,असाही चमत्कार ही कंपनी नागपूरात करीत असल्याचे त्यांनी सांगितले.इतकंच नव्हे तर देयके भरा म्हणून या कंपनीकडून ग्राहकांना कॉल देखील येतात!कपिल नगर,तक्षशिला नगर,नारी भाग या ठिकाणी २०२० मध्ये ओसीडब्ल्यूने पाईप लाईन टाकली मात्र,पाणी दिले नाही.नुकतेच सुगत नगर या भागात पाण्याची टाकी बनली व आता कुठे या भागातील नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध झाले पण ओसीडब्ल्यू २०२२ पासूनची देयके आता नागरिकांना पाठवित आहे!
एका नगरसेवकांने सांगितले दोन महिन्यांपासून त्यांच्या स्वत:च्या घरात पिण्याच्या पाण्यात गडरचे पाणि मिसळून येत आहे.दोन महिन्यांपूर्वी पार पडलेल्या जलप्रदाय समितीच्या बैठकीत देखील मी ही व्यथा मांडली होती.पिंटू झलके हे साक्षीदार आहेत.दोन महिने झाले मी पाठपुरावा करतोय मात्र,काम सुरु आहे,एवढंच उत्तर मला मिळतंय.जुने चांगले मीटर काढून ओसीडब्ल्यू नवे मीटर बसवित आहे.महत्वाचे म्हणजे ज्यांचे मीटर चोरी जातात त्यांच्याकडून नव्या मीटरसाठी तब्बल २७०० रुपये वसूल केली जाते.
कॉर्पोरशेन दवाखाना जवळ पाईप लाईन फूटून पाणी वाया जात आहे.या ठिकाणच्या टाकीवर पाण्याचे मीटर लावले गेले आहे.परिणामी,पाणी जरी वाया जात असले तरी त्याचे बिल नागरिकांना भरावी लागणार आहे.
दाभाची व्यथा मांडताना एका नगरसेवकाने सांगितले पूर्वी दाभामध्ये २ पाण्याची टाकी होती आता ती चार झाली तरी पाण्याचा प्रश्न मिटला नाही कारण ओसीडब्ल्यू अजून ही १६ हजार ग्राहकांना त्याच ६०० एमएमच्या पाईपने पाणी पुरवठा करीत आहे.त्यामुळे पाण्याचा दाब कमी होऊन ग्राहकांना कमी पाणी मिळतं.अनेकदा विद्यूत प्रवाह खंडित होतो व ग्राहकांना पिण्याचे पाणीच मिळत नाही.
काँग्रेसचे नगरसेवक अभिजित झा यांनी गिट्टीखदान,पंचशील नगर,धम्मदिप नगर सारख्या भागात गेल्या ६ महिन्यांपासून दोन तासांपेक्षा अधिक पाणी मिळाले नसल्याची माहिती सभागृहाला दिली.कृष्ण नगरच्या नागरिकांनी सांगित्याप्रमाणे काल देखील सकाळी ५ वाजता ट्रीपिंग झाल्याने १२.३० वाजेपर्यंत येथील नागरिक तहानलेलेच होते.आज देखील गिट्टीखदानमध्ये पाणी नाही आले.हा संपूर्ण झोपडपट्टीचा भाग आहे.कंपनीचे कर्मचारी रात्रीच्या १२ वाजता व्हॉल्व खोलत आहेत.गेल्या सहा महिन्यांपासून हीच परिस्थिती आहे मात्र,तांत्रिक बिघाड या पलीकडे ही कंपनी काहीही ग्राहक आणि जनप्रतिनिधींना सांगत नाही,अशी तक्रार झा यांनी केली.
जलप्रदाय विभागाला व्हीएनआयटीने जी एसओपी तयार करुन दिली होती ज्याचे पैशे मनपाने मोजून दिले आहे त्याचे कोणतेही पालन होत नाही.महत्वाचे म्हणजे संबंधित कंत्राटदारांवर कोणतीही कारवाई होत नाही.एकच अधिकारी अमृत योजना व ओसीडब्ल्यू दोन्ही ठिकाणचा कारभार बघतोय.या कंपनीचे पुनर्गठनाचे काम समाधानकारक नाही.हे अधिकारी कंत्राटदारांचे आहेत की जनतेचे?असा खोचक सवाल झा यांनी केला.या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकून जनतेप्रति निष्काळजी असणा-या विभाग प्रमुखाला निलंबित करण्याची मागणी झा यांनी केली.
महापौ यांनी ओसीडब्ल्यूसंबंधी या सर्व तक्रारींची गांर्भीयाने दखल घेत,कमी दाब,पुनर्गठनात निष्काळजीपणा,हवेने मीटर चालणे,वाढीव बिले,यासर्व समस्यांच्या पार्श्वभूमीवर नागपूरकर ग्राहकांना शाश्वत पाणी पुरवठा अपेक्षीत असल्याचे सांगितले.
ओसीडब्ल्यूवर नियंत्रण ठेवणारे अधिकारी मग त्या श्वेता बॅनर्जी असो किंवा वायकर,त्यांनी नगरसेवकांच्या या सर्व तक्रारींची तपासणी करावी,सामान्य नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी प्रयत्न करावे.योग्य देयकेच नागरिकांना मिळेल याची काळजी घ्यावी.ज्या दिवसापासून नागरिकांना दूषित पाणी पुरवठा होईल,त्या दिवसापासून बिल कपात होऊ शकते का,दूषित पाण्याचे मोजमाप करता येईल का?याकडे व्यक्तिश:लक्ष् घालून पाणी पुरवठ्याची स्थिती सुधारावी.हा एक संवेदनशील विषय असून कंत्राटदाराला पाठीशी घालू नये.पाणी ही नागरिकांची मूलभूत गरज असून कर्तव्यात कसूर करणारे अधिकारी दोषी आढळल्यास मनपा आयुक्तांनी त्यांच्यावर रितसर कारवाई करण्याचे निर्देश महापौर नीता ठाकरे यांनी दिले.
……………………………