भाजप आमदार परिणय फुकेंसह इतर आठ जणांचा सहभाग:कॅनरा बँकेचा प्रताप
माहितीच्या अधिकरात माहिती देण्यास बँकेचा नकार!
जनतेचा पैसा चोरांच्या घशात!पालकमंत्री बावणकुळेंनी करावी चौकशी
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जनार्दन मून यांची मागणी
नागपूर,ता.३ सप्टेंबर २०२६:भाजपचे आमदार परिणय फुके व इतर आठ जणांनी अंदाजे दहा कोटी रुपये बाजारमूल्य असलेल्या अविकसित भूखंडाच्या आधारे कॅनरा बॅकेकडून तब्बल शंभर कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याची धक्कादायक माहिती ७७ वर्षीय ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते,माजी नगरसेवक व नागरी हक्क संरक्षण मंचाचे केंद्रीय अध्यक्ष जनार्दन मून यांनी आज रवि भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
मौजा रनाळा,तालुका कामठी जिल्हा नागपूर येथील सर्व्हे क्र.१२९/१/१ आराजी २.६७.०९ हे.आर या जमिनीवरील अविकसित ले-आऊटमध्ये नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने(एनएमआरडीए)मंजूर केलेल्या नकाशानुसार एकूण ७९ भूखंडांचा प्लॉटेबल एरिया आहे.आमदार परिणय फुके व इतरांनी दिनांक २७ डिसेंबर २०२३ रोजी कॅनरा बँक,अंबाझरी नागपूर शाखेत शंभर कोटी रुपये कर्जासाठी हा भूखंड गहाण ठेवला.
ही २.६७.०९ हे.आर अकृषक जमीन पंकज नागाेराव साबळे,भाजप आमदार परिणय फुके,त्यांची पत्नी परिणिता फुके,प्रशांत नागाेराव साबळे,विमल नागाेराव साबळे,वैशाली रमेश चोपडे व सुवर्णा प्रशांत साबळे यांच्या मालकीची असल्याचे उपलब्ध दस्तावेजमध्ये नमूद आहे.
सातबारा व उपलब्ध नोंदीनुसार हे ७९ प्लॉट कॅनरा बँक,अंबाझरी नागपूर शाखेकडे तब्बल शंभर कोटी रुपयांचे कर्ज घेऊन गहाण ठेवण्यात आले आहे.एनएमआरडीएने सदर अकृषक जमिनीवरील ले-आऊटच्या मंजूर नकाशानुसार एकूण १६,१२० चौ.मीटर प्लॉटेबल एरिया मंजूर केला.मूळात एनएमआरडीएचा एक ही अधिकारी अशी मंजूरी देण्याआधी नियमानुसार या भूखंडावर तपासणीसाठी आलाच नसल्याचा दावा मून यांनी केला.
राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांचा मतदारसंघ असलेल्या कामठीतील सह दुय्यम निबंधकाकडून प्राप्त झालेल्या कागदोपत्री उत्तरात सदर खसरा याचा शासकीय दर किंवा बाजारमूल्य केवळ चार हजार २०० रुपये प्रति चौ.फूट असल्याचे नमूद आहे.यानुसार या १६.१२० चौ.फूट प्लॉटेबल भूखंडाची एकूण किंमत अंदाजे फक्त सहा कोटी ७७ लाख चार हजार इतकी होते.
या भूखंडाच्या नऊ मालकांपैकी दोन मालक हे ठाणे येथील मुंबई परिसरातील असून, शंभर कोटींचे कर्ज घेण्यात आले त्यात वरील भूखंडाशिवाय ठाण्यातील सेक्टर ३०-१ मधील इंटरनॅशनल इन्फोटेक पार्कचा भाग असलेले दोन प्लॉट यांचा देखील समावेश आहे.
प्लॉट क्र.३९/५ तसेच ३९॒/५-१ असे अंदाजे एकूण ५२७५.११ चौ.फूट क्षेत्रफळ,तसेच त्यावरील बीएसआयएल टेक पार्क इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील दूकान क्र.१११ ते ११९ अंदाजे एकूण ५९.०७ चौ.फूट बांधकाम क्षेत्रफळ या मालमत्तेचा देखील गहाण टाकलेल्या मालमत्तेत समावेश आहे.
मात्र,प्राप्त माहितीनुसार,या ५९.०५ चौ.फूट बांधकामाचेही सध्याचे बाजारमूल्य हे साधारण दोन कोटी रुपये इतकेच आहे.त्यामुळे रनाळा येथील ७९ प्लॉट्स व व ठाणे येथील मालमत्ता यांचे एकत्रित बाजारमूल्य हे अंदाजे ९ ते १० कोटींच्या वर नाही. तरी देखील कॅनरा बँकेने दहा कोटींच्या मालमत्तेवर चक्क शंभर कोटींचे कर्ज आमदार परिणय फुके व त्यांच्या इतर सहका-यांना कोणत्या नियमांतर्गत दिले,असा प्रश्न मून यांनी केला.
सर्वसामान्य नागरिकाला बँकेतून काही लाखांचे कर्ज घ्यायचे असल्यास बँका शंभर चकरा मारायला लावते.शेकडो कागदपत्रांची तपासणी करते.कर्ज घेणा-या ग्राहकाची तारण ठेवली जाणारी मालमत्ता तपासण्यासाठी जबाबदार अधिका-यांना पाठवते.अशा वेळी भाजप आमदार परिणय फुके व त्यांच्या सहका-यांना मालमत्तेचे बाजारमूल्य न तपासता चक्क शंभर कोटींचे कर्ज देऊन कॅनरा बँक मोकळी झाली.
२१४ पानी प्राप्त झालेल्या नोंदणीकृत गहाणखतात संबंधित मालमत्तेच्या अधिकृत शासकीय बाजारमूल्याचा कोणताही स्पष्ट व अधिकृत पुरावाच जोडण्यात आला नाही,असा आरोप करीत, त्या ७९ भूखंडासंदर्भात आवश्यक नियमितीकरण पत्र(आर.एल)अथवा त्यासंबंधी आवश्यक वैधानिक कागदपत्रे तरी जोडली आहेत की नाही,याचीही स्वतंत्र व सखोल चौकशीची मागणी जनार्दन मून यांनी याप्रसंगी केली.
या संपूर्ण व्यवहारासंदर्भात कॅनरा बँकेकडे माहितीचा अधिकार अधिनियम,२००५ अंतर्गत माहिती मागितली असता,बँकेने ७ जुलै २०२६ रोजी माहिती देण्यास नकार दिला! बँकेने नमूद केले की,मागितलेली माहिती ही माहितीचा अधिकार अधिनियमातील कलम ८(१)(र)अंतर्गत वैयक्तिक माहिती असल्याने ती विश्वसनीय नातेसंबंधाच्या आधारे व व्यावसायिक गोपनीयतेच्या स्वरुपात उपलब्ध असल्याने कलम ८)१)(ई) व ८(१)(ड)अंतर्गत प्रकटनातून वगळण्यात आलेली आहे!कॅनरा बँक ही राष्ट्रीयकृत बँक असून त्यात जनतेचा पैसा जमा आहे.असे असून देखील शंभर कोटी रुपयांच्या एवढ्या मोठ्या कर्ज व्यवहारामध्ये तारणाचे मूल्यांकन,कर्ज मंजुरीची प्रक्रिया व संबंधित कागदपत्रांची पडताळणी या संदर्भातील आवश्यक माहिती उपलब्ध होऊ शकली नसल्याचे मून यांनी सांगितले.
याहून महत्वाचे म्हणजे कामठीतील सह दुय्यम निबंधक यांनी २२ जुलै २०२६ रोजी मून यांना दिलेल्या उत्तरात, गहाणखत मंजूर करणे व त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची तपासणी करणे हे बँकेचे काम असून गहाणखतावर कर्जाच्या रकमेवर ०.३ टक्के दराने,कमाल वीस लाख रुपये इतके मुद्रांक शुल्क त्यांना प्राप्त झाले असल्याने, अशा दस्तामध्ये मालमत्तेचे स्वतंत्र मूल्यांकन करणे आवश्यक नसल्याचे त्यांनी नमूद केले.सदर दस्तावर कायद्यानुसार देय मुद्रांक शुल्क आकारण्यात आले असून कार्यालयाकडून कोणतीही त्रुटी किंवा कसूर झाल्याचे दिसून येत नसल्याचे उत्तर मून यांना मिळाले!
गहाणखत नाेंदणी करताना मालमत्तेचे अधिकृत बाजारमूल्य व आवश्यक पुराव्यांची योग्य पडताळणी झाली आहे की नाही,तसेच संबंधित दस्ताची नोंदणी नियमानुसार करण्यात आली आहे किंवा नाही,याबाबत चौकशी करुन संबंधित अधिकारी व कर्मचा-यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी,अशी तक्रर २९ जून २०२६ रोजी सह जिल्हा निबंधक वर्ग-१ तसेच मुद्रांक जिल्हाधिकारी,नागपूर ग्रामीण यांच्याकडे मून यांनी केली होती.
ही तक्रार उचित कारवाईसाठी सह दुय्यम निबंधक,कामठी यांच्याकडे २ जुलै २०२६ रोजी हस्तांतरित करण्यात आली होती.यावर २२ जुलै रोजी मून यांना वरील उत्तर प्राप्त झाले.वीस लाख रुपये मुद्रांक शुल्क प्राप्त झाल्याने कारवाईची गरज नसल्याचे अजब उत्तर त्यांना देण्यात आले.
या उत्तराची फेरतपासणी करण्याची मागणी मून यांनी केली.या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र,निष्पक्ष व सखोल चौकशी करण्यात यावी.गहाणखत दस्त क्र. १०८३८/२०२४ संदर्भातील सर्व मूळ अभिलेख,नोंदणी फाईल,पडताळणी नोंदी व संबंधित दस्तऐवज तपासण्यात यावेत,कर्ज मंजुरीसाठी तारण म्हणून ठेवलेल्या मालमत्तेच्या बाजारमूल्याची व मूल्यांकन प्रक्रियेची स्वतंत्र पडताळणी करण्याची मागणी मून यांनी बावणकुळे यांच्या कोराडी येथील कार्यालयात निवेदनाच्या स्वरुपात केली आहे.या कार्यालयातील कर्मचा-याने हे निवेदन घेण्यास नकार दिल्याने मून यांनी स्पीड पोस्टने बावणकुळे यांच्या कार्यालयात हे निवेदन संपूर्ण २१४ पानी पुराव्यानिशी पाठवले आहे.
कर्ज मंजूर करताना संबंधित बँकेने तारण मालमत्तेचे मूल्यांकन कोणत्या संस्थेकडून व कोणत्या निकषाच्या आधारावर केले?संबंधित मूल्यांकनकर्त्याचा अहवाल,पात्रता,नियुक्ती व मूल्यांकनाची पद्धत काय होती?मालमत्तेचे वास्तविक,शासकीय व बाजारमूल्य किती होते?शंभर कोटी रुपयांच्या कर्जाच्या तुलनेत तारण मालमत्तेचे मूल्य पुरेसे होते काय?७९ भूखंडांची कायदेशीर स्थिती,मंजुरी,नियमितीकरण व विकसनासंदर्भातील सर्व वैधानिक कागदपत्रे पूर्ण होती काय?संबंधित व्यवहारामध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेच्या लागू मार्गदर्शक तत्वांचे पालन झाले का?असे प्रश्न उपस्थित करीत,एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्ज मंजूर करण्याच्या प्रक्रियेमध्ये तारणाचे मूल्यांकन,जोखीम परिक्षण,कायदेशीर पडताळणी व बँकिंग नियमांचे पालन याची काटेकोर तपासणी होणे अपेक्षीत आहे.या व्यवहारामध्ये गंभीर अनिमियतता झाली असल्याचा आरोप मून यांनी केला.
सदर व्यवहार हा बँकेच्या व पर्यायाने जनतेच्या पैशाशी सबंधित असल्यामुळे,कोणतीही संभाव्य अनियमितता असल्यास सार्वजनिक निधीचे मोठे नुकसान होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.परिणामी जनतेच्या पैशांचे संरक्षण करण्याच्या दृष्टिने आवश्यक प्रतिबंधात्मक कायदेशीर उपाययोजना बावणकुळे यांनी तातडीने करावी,अशी मागणी मून यांनी केली.
(बातमीशी संबंधित व्हिडीयो Sattadheesh Official युट्यूब चॅनलवर उपलब्ध)