पश्चिम नागपूर युवा मोर्चाचे लक्ष्मीनगर चौकात दहीहंडीचे भव्य आयोजन
‘मिर्झापूर‘फेम ‘भौकाल मुन्नाभाई’ची विशेष उपस्थिती
नागपूर,ता.५ सप्टेंबर २०२६: नागपूरात डी.जे.बंदची चळवळ उभारणारे माजी आमदार व माजी महापौर संदीप जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली उद्या,६ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील पहिली डी.जे.मुक्त आणि भजन जॅमिंगयुक्त दहीहंडी अायोजित करण्यात आली आहे.महाराष्ट्राची खरी परंपरा आणि संस्कृतीचे दर्शन घडविणारी ही दहीहंडी असणार आहे,असा दावा संदीप जोशी यांच्या वतीने प्रभाग क्र.१४ चे नगरसेवक विनोद कन्हेरे यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

महाराष्ट्राची पंरपरा आणि संस्कृतीचे कोणत्याही सणासुदीमध्ये अनन्य साधारण महत्व आहे.याच पार्श्वभूमीवर भजनाचे आधुनिक सादरीकरण ज्याला ‘भजन जॅमिंग’असे संबोधले जाते,हे या दहीहंडीचे प्रमुख आकर्षण राहणार असल्याची माहिती कन्हेरे यांनी दिली.यासोबतच ढोल-ताशा पथकाचा जल्लोष आणि नंद महोत्सवाची रंगतही नागपूरकरांना अनुभवायला मिळणार आहे.
विशेष म्हणजे,जेन-झी पिढीतील तरुणाईचा उस्फूर्त सहभाग या कार्यक्रमाचे महत्वाचे पैलू ठरणार आहे.याशिवाय लोकप्रिय चित्रपट ‘मिर्झापूर’फेम ‘मुन्नाभैया त्रिपाठी’यांची भूमिका साकारणारे दिव्येंदू आणि ज्यूनिअर देवानंद किशोर भानुशाली यांची उपस्थिती कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरणार असल्याची माहिती कन्हेरे यांनी दिली.
महाराष्ट्राची खरी संस्कृती,परंपरा व धार्मिक महत्व जपत डी.जे.मुक्त पद्धतीने आयोजित होणा-या या आगळ्यावेगळ्या दहीहंडी सोहळ्याला नागपूरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे व महाराष्ट्रातील पहिल्या डी.जे.मुक्त व भजन जॅमिंगयुक्त दहीहंडीचे साक्षीदार व्हावे,असे आवाहन पश्चिम नागपूर भाजयुमोच्या वतीने करण्यात आले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाच्या तसेच नागपूरचे पोलिस आयुक्त यांच्या सूचनेच्या अधीन राहून हा डी.जे.मुक्त दहीहंडी उस्तव उद्या साजरा होणार असल्याचे कन्हेरे यांनी सांगितले.
गेल्या पाच वर्षापासून संदीप जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली हा दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा केला जात आहे.यंदा त्यांनी जी डी.जे.मुक्त दहीहंडी व सणवार साजरे करण्याची चळवळ सुरु केली आहे,त्या चळवळीला आमचा संपूर्ण पाठींबा असल्याचे कन्हेरे यांनी सांगितले.
काल बडकस चौकात मध्य नागपूरचे भाजपचे आमदार प्रवीण दटके व भाजप शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांच्या नेतृत्वाखाली साजरा झालेला दहीहंडी उत्सव याला संदीप जोशी यांची ही दहीहंडी ‘प्रतिउत्तर’ आहे,असं तुम्हाला वाटत नाही का?असा प्रश्न केला असता,कोणाच्या भावना कशा असतील पण आमच्या भावना कोणालाही दुखावण्याचे नाही,असे उत्तर त्यांनी दिले.
एकच राजकीय पक्ष असताना दोन वेगवेगळ्या भूमिका कश्या?नागपूरकरच संभ्रमात आहे की हे काय चाललंय?एकच सामाजिक मुद्दा असताना एकाच पक्षातील वरिष्ठ पदाधिका-यांमध्ये एकवाक्यता दिसून पडत नाही,काल बडकस चौकात डी.जे वाजलाच पण तुमचा आग्रह आहे की आम्ही उद्याची दहीहंडी डी.जे.मुक्तच साजरी करुन दाखवू,तुम्हाला हे सिद्ध करायचं आहे का,की डी.जे.मुक्तही सण साजरे होऊ शकतात?यावर कन्हेरे यांनी काल बडकस चौकात डी.जे.वाजला नसून ध्वनियंत्र(म्यूझिक सिस्टम)वाजले असल्याचे सांगितले.याशिवाय पोलीस आयुक्तांसह वरीष्ठ पोलीस अधिकारी व्यक्तिश: उपस्थित होते,त्यांनी संपूर्ण ध्वनियंत्रे तपासूनच वाजवण्याची परवानगी दिली,बडकस चौकात कोणत्याही नियमांचे उल्लंघन झाले नाही असे कन्हेरे म्हणाले.
मात्र,डेसिबलच्या नियमांची हुलकावणी देऊन ‘दणदणाट’तर झाला ना?ही धूळफेक नाही का की आम्ही टॉप नाही सुरु केले फक्त बॉटमचे स्पीकर सुरु होते ,असे विचारले असता,पोलिस विभागातील अधिकारीच प्रत्यक्ष हजर होते व तपासणी करीत होते तर त्यात आम्हाला काहीच वावगं वाटत नसल्याचे उत्तर कन्हेरे यांनी दिले.
संदीप जोशी यांनी डी.जे.मुक्त दहीहंडीसह संपूर्ण धार्मिक सणवार साजरे करण्याची जी चळवळ उभी केली आहे त्याला नागपूरातील अनेक संस्थांनी पाठिंबा दिला आहे.सोशल मिडीयावरही मोठ्या प्रमाणात हे समर्थन दिसून पडतं तरी देखील भाजपाचे शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी जोशी यांच्या चळवळीला ‘वैयक्तिक’मत संबोधले असून ही भाजपची भूमिका नाही? त्यांच्या या मताकडे लक्ष वेधले असता,आपले सणवार याविषयी आपल्या देशात कोणीही आपलं वैयक्तिक मत ठेऊ शकतात,त्यांना मत ठेवण्यापासून थांबवू शकत नाही.आमचे मत हेच आहे की डी.जे.वर सरसकट बंदी असावी.आपल्या आनंदासाठी नागरिकांना त्रास होऊ नये.
पत्रकार परिषदेत नगरसेवक विनोद बघेल, नगरसेवक विनय दाणी,धरमपेठ मंडळाचे भाजयुमाचे अध्यक्ष अक्षय शर्मा,सुरेंद्रगढ मंडळाचे अध्यक्ष उदय मिश्रा व माजी अध्यक्ष विक्की पांडे आदी उपस्थित होते.
(बातमीशी संबंधित व्हिडीयो Sattadheesh official युट्यूब चॅनलवर उपलब्ध)
……………………………………