Homeब्रेकिंग न्यूजडीजे: नागपूरात भाजप आमदारांमध्येच ‘वाजव,वाजवू नको’चा ’नाद’!

डीजे: नागपूरात भाजप आमदारांमध्येच ‘वाजव,वाजवू नको’चा ’नाद’!

माजी आमदार संदीप जोशींचा डीजेला नकार,विद्यमान आमदार प्रवीण दटकेंसाठी हा ‘हिंदूंचा’सण

जोशी,दटके दोघेही माजी महापौर तर आणखी एक माजी महापौर दयाशंकर तिवारी यांचीही वादात उडी
मुद्दा भटकवण्यासाठीचा हा नियोजित कट:नागपूरकर बुद्धीवंतांचा आरोप
डॉ.ममता खांडेकर
संपादक ‘सत्ताधीश’
नागपूर,ता.३ सप्टेंबर २०२६: उत्सव कोणताही असो, आनंद साजरा करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. मात्र आनंदाच्या नावाखाली होणारा कर्णकर्कश डी.जे. ध्वनिप्रदूषण आणि अतितीव्र लेजर लाईटचा अतिरेक आता थांबला पाहिजे. डी.जे.च्या वापरावर बंदी आणण्याच्या मागणीसाठी नागपुरात व्यापक जनचळवळ उभारण्यात आली असून, या चळवळीचा पहिला टप्पा म्हणून ऑनलाइन पिटिशनद्वारे नागरिकांचा सहभाग नोंदविण्यात येत असल्याची माहिती आज प्रेस क्लबमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत भाजपचे माजी आमदार व माजी महापौर संदीप जोशी यांनी दिली.
ही चळवळ कोणत्याही धर्माच्या, उत्सवाच्या किंवा समाजाच्या विरोधात नाही. सर्वधर्मीय सण-उत्सव, लग्नसमारंभ, सामाजिक कार्यक्रम, शहरातील मोठे इव्हेंट तसेच निवडणुकीच्या मिरवणुका यामध्ये आनंद व्यक्त करण्याचा अधिकार सर्वांना आहे. मात्र एका व्यक्तीच्या किंवा समूहाच्या आनंदासाठी दुसऱ्या नागरिकाच्या आरोग्याशी आणि शांततेशी तडजोड होऊ नये,असे ठाम मत याप्रसंगी संदीप जोशी यांनी व्यक्त केले.
उत्सवाचा आनंद हवा, जल्लोष हवा; पण कर्णकर्कश आवाज नको. डी.जे.चा अतिरेक हा केवळ काही मिनिटांचा त्रास नसून नागरिकांच्या आरोग्याशी आणि शांततेशी संबंधित प्रश्न आहे. त्यामुळे आता या विषयाकडे केवळ तक्रार म्हणून न पाहता व्यापक लोकचळवळीच्या माध्यमातून कायमस्वरूपी तोडगा काढण्याची वेळ आली आहे, असे संदीप जोशी यांनी सांगितले.
डी.जे.च्या मोठ्या आवाजामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, विद्यार्थी, रुग्ण आणि सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे विद्यमान ध्वनिप्रदूषण नियमांची कठोर आणि समान पद्धतीने अंमलबजावणी करावी आणि पुढील काळात डी.जे.च्या वापरावर बंदी आणण्यासाठी आवश्यक कायदेशीर व प्रशासकीय प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी करण्यात येणार आहे. अतितीव्र लेजर लाईटच्या वापराबाबतही स्पष्ट नियम व नियंत्रण असावे, अशी भूमिका घेणार असल्याचे जोशी म्हणाले.
जोशी यांच्या पाठपुराव्यानंतर नागपूरचे पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे पाटील यांनी अधिसूचना काढून आज ३ सप्टेंबर पासून १ नोव्हेंबर २०२६ पर्यंत नागपूरात डीजे व लेझर लाईट्स वापरावर बंदी आणली आहे.
दुसरीकडे माजी महापौर व मध्य नागपूरचे विद्यमान आमदार प्रवीण दटके यांनी पोलिस आयुक्तांच्या या डीजे बंदी आदेशावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करीत ‘हिंदू सणांच्या काळातच ही बंदी का?’असा प्रश्‍न केला आहे.बंदी आणायचीच होती तर ती १ जानेवरीपासून का लागू केली नाही?असा प्रश्‍न केला आहे.नियम सर्वांसाठी समान असावेत,सण धर्म पाहून नाही असे सांगत आस्था,परंपरा,संस्कृती आमचा अअधिकार असल्याचे पत्रक दटके यांनी काढले.विशेष म्हणजे हेच पत्रक विश्‍व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्याही सोशल मिडीयावरील विविध प्लॅटफॉर्मवर दिसून पडंतय.
याच वादात उडी घेत भाजपचेच आणखी एक माजी महापौर व विद्यमान शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी देखील यात त्यांच्या राजकीय पक्षाला साजेसा ‘हिंदूत्वाचा’अँगल घेतला आहे.
नागपूर पोलीस आयुक्तांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अंतर्गत दिनांक ०३ सप्टेंबर २०२६ ते ०१ नोव्हेंबर २०२६ या कालावधीसाठी डॉल्बी, मल्टीस्पीकर साऊंड सिस्टिम तसेच बीम व लेझर लाईटच्या वापराबाबत काढलेल्या अधिसूचनेचा पुनर्विचार करावा,अशी मागणी दयाशंकर तिवारी यांनी केली. सरसकट यंत्रणा किंवा साऊंड सिस्टिमवर बंदी घालण्यापेक्षा ध्वनी प्रदूषण (विनियमन व नियंत्रण) नियम, २००० नुसार आवाजाची डेसिबल मर्यादा निश्चित करून तिची कठोर अंमलबजावणी करणे अधिक योग्य ठरेल.अशा साऊंड सिस्टिम व्यवसायावर अनेक कुटुंबांचा रोजगार अवलंबून असून, सरसकट बंदीमुळे त्यांच्या रोजगारावर संकट येण्याची शक्यता आहे. तसेच हा नियम केवळ गोकुळाष्टमी, दहीहंडी, गणेशोत्सव, धम्मचक्र प्रवर्तन दिन, दुर्गादेवी उत्सव यांसारख्या विशिष्ट उत्सवांपुरता मर्यादित न ठेवता, शहरातील सर्व प्रकारच्या सार्वजनिक कार्यक्रमांसाठी समान निकषांवर लागू व्हावा. त्यामुळे पोलीस प्रशासनाने यंत्रांवर बंदी न घालता डेसिबलची स्पष्ट मर्यादा निश्चित करून तिचे काटेकोर नियंत्रण व अंमलबजावणी करावी आणि अधिसूचनेचा तातडीने पुनर्विचार करण्याची मागणी तिवारी यांनी केली.
मात्र,नागपूरातील काही बुद्धीजीवींना हा या तिघांनीही ठरवून हिंदू -मुस्लिम चा मुद्दा हातात घेतला असल्याचा आरोप केला.जनसंताप बघून,जनतेचे लक्ष भरकवटण्यासाठी मुद्दामून सणासुदीच्या काळात ‘वाजव रे, नको वाजवू रे‘चा वाद उरकून काढण्यात आल्याचे ते सांगतात. हजारो कोटींची कामे करणारा कंत्राटदार आज रस्यावर आहे.अारोग्य,शिक्षणच नव्हे तर रस्ते,पाणी,वीज,गडर लाईन यासारख्या मूलभूत गरजांसाठी देखील सामान्य नागपूरकर भाजप नेते,मंत्री व पदाधिकारी यांच्या नावाने शंख वाजवित आहेत, जीवघेणे सिमेंट रस्ते व खड्डे यामुळे सर्वसामान्य नागपूरकरांची सुरक्षित जगण्याची अवस्था अतिशय वाईट आणि गंभीर झाली असून,नागपूरकरांचे लक्ष संदीप जोशींना पुढे करुन बँलेस करुन घेतले जात असल्याचा त्यांचा दावा आहे.
दक्षिण-पश्‍चिम नागपूरातील सुशिक्षित  नागरिकांना डीजे नको आहे तर महाल भागात आमदार दटके यांच्या भागातील नागरिकांना किंबहूना भाजपच्याच कार्यकर्त्यांना डीजे हवा आहे.एकाच पक्षाचे दोन आमदार आणि माजी महापौर नागपूरकर जनतेची दिशाभूल करत आहेत, दटके किंवा दयाशंकर तिवारी यांना ध्वनि प्रदुषणाच्या संदर्भातील न्यायालयाचे आदेश मान्य नाही का? असा सवाल ते करतात.
यावर कहर म्हणजे मुख्यमंत्र्यांच्याच शहरात प्रशासकीय अधिका-यांची भूमिकाही स्पष्ट नाही.मनपा आयुक्त डॉ.विपीन इटनकर हे वारंवार डीजेच्या संदर्भात न्यायालयाच्या आदेशाकडे बोट दाखवतात मात्र, लंदन स्ट्रीट प्रकरणात पर्यायी झाडे लावून मगच तेथील शेकडो झाडे कापण्याचे आदेश न्यायालयाने दिले असताना,बिल्डरने पर्यायी झाडे न लावताच ४७ झाडे एका दमात कापली.इटनकरांना झाडांच्या बाबतीत मात्र न्यायालयाचा आदेश आठवत नाही, असा संताप ते व्यक्त करतात.
प्रशासन असो की नेते मंडळी,नागपूरात ‘ठरवून’ जनतेची दिशाभूल करणे सुरु असून ख-या मुद्दां पासून जनतेला भरटकवण्यात भाजपचा हतकंडा आहे,असे ‘कौतूकोग्दार’देखील हे बुद्धीवंत भाजपच्या कार्यशैलीसाठी काढतात.
पर्यावरण आणि प्रदुषण हा कळीचा मुद्दा असून.निदान गोकुळाष्टमी व गणेशोत्सव सारखे पारंपारिक सण हे पारंपारिक उत्साहातच साजरे व्हावे.अशी अपेक्षा ते व्यक्त करतात.त्यामुळेच संदीप जोशी यांच्या भूमिकेला हे बुद्धीवंत पाठींबा देखील दर्शवतात.
हिंदू-मुस्लिम करायचेच असेल तर  सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाजपला हिंदुंच्या मुलींना बलातका-यांपासून वाचवा, असे आवाहन करावे,हेच खरे हिंदूत्व आहे, अशी मागणी ही ते करतात.मुलींना मानसन्मान द्या,उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकारने कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी दिव्या  मित्तलला एका तहानलेल्या गावात पिण्याचे पाणी पोहोचवले मात्र,स्थानिक भाजप आमदाराला महत्व न दिल्याने त्यांना नोकरीवरुन पायउतार व्हावे लागले,भागवतांनी का नाही या हिंदू महिला अधिकारीसाठी योगी सरकारचे कान टोचले?हिंदू-मुस्लिम फक्त सण-उत्सवांमध्येच बघण्यापेक्षा विविध राज्यातील भाजप सरकारच्या कारभारात बघावे,असा मोलाचा सल्ला ही देण्यास ते विसरत नाही.
थाेडक्यात,संदीप जोशी व प्रवीण दटके इतके चांगले मित्र असून त्यांच्यात उद् भवलेल्या या वैचारिक वादावर नागपूरकर बुद्धीवादी विश्‍वास ठेवण्यास तयार नाही.संदीप जोशी यांच्या भूमिकेशी मात्र अनेकांनी सहमती दर्शवली आहे.प्रदुषण आणि शारिरीक व मानसिक आरोग्याविषयीची जोशी यांची काळजी व भूमिका, हिंदू-मुस्लिम विचारपातळीहून वेगळी व महत्वपूर्ण असल्याचे ते सांगतात.
(छायाचित्र सौजन्य:- नागपूर टूडे)
…………………………………………..

Latest बातम्या