Homeसांस्कृतिक / मनोरंजनभूमिकेशी प्रामाणिक राहणे हेच कलाकाराचे काम,यश-अपयश प्रेक्षकांच्या हाती: अशोक सराफ

भूमिकेशी प्रामाणिक राहणे हेच कलाकाराचे काम,यश-अपयश प्रेक्षकांच्या हाती: अशोक सराफ

Advertisements
‘दिलखुलास गप्पां’मध्ये ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी उलगडला प्रदीर्घ कलाप्रवास

नागपूर, १९ ऑगस्ट : कलाकाराने कोणतीही भूमिका साकारताना त्या पात्राचा स्वभाव, मानसिकता आणि प्रसंगानुरूप वर्तणूक समजून घेणे आवश्यक आहे. भूमिका एखाद्या व्यक्तिमत्त्वाशी साधर्म्य साधत असली, तरी त्याचा विचार न करता पात्राशी प्रामाणिक राहून अभिनय करणे हेच कलाकाराचे खरे काम आहे. आपल्याला राजकारणाचे फारसे ज्ञान नसतानाही राजकीय पार्श्वभूमीची भूमिका केवळ पात्राचा स्वभाव आणि प्रसंग समजून साकारला आणि त्यासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाल्याची आठवण ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी सांगितली.
नागपूर महानगरपालिका, श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्ट आणि विदर्भ गौरव प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी सिव्हिल लाइन्स येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात ‘दिलखुलास गप्पा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पुष्कर श्रोत्री यांनी अशोक सराफ यांच्याशी साधलेल्या संवादातून त्यांच्या प्रदीर्घ कलाप्रवासातील अनेक आठवणींना उजाळा मिळाला.

राजकीय व्यक्तिरेखा साकारण्याच्या अनुभवाबद्दल बोलताना सराफ म्हणाले, “मी राजकारणी नाही आणि मला राजकारणातलं फारसं काही कळत नाही. मात्र, पात्र कसं लिहिलं आहे, ते कसं वागेल आणि ज्या प्रसंगात आहे, त्या प्रसंगाला त्याची प्रतिक्रिया काय असेल, याचा विचार केला. त्यानुसार भूमिका प्रामाणिकपणे साकारली. ती एखाद्या राजकारण्याशी जुळत असेल, तर मला त्याची कल्पना नाही. मात्र, त्या भूमिकेसाठी मला बेस्ट ॲक्टरचा अवॉर्ड मिळाला.”
पात्राची पार्श्वभूमी किंवा ते कोणाशी साधर्म्य साधते, यापेक्षा लेखकाने निर्माण केलेले पात्र समजून घेऊन ते पडद्यावर नैसर्गिकपणे उभे करणे अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
चित्रपटाच्या यश-अपयशाचा कलाकारावर होणारा परिणाम हा त्याची कलाकृतीशी असलेली नाळ आणि कामाप्रतीची निष्ठा यावर अवलंबून असतो, असेही सराफ यांनी सांगितले. एखादा चित्रपट मनापासून आणि पूर्ण प्रामाणिकपणे केल्यानंतर तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला नाही, तर निश्चितच वाईट वाटते. “हे लोकांना आवडायला पाहिजे होतं; पण आवडलं नाही,” अशी खंत निर्माण होते. मात्र, प्रत्येक कलाकाराची प्रतिक्रिया वेगळी असते. काही जण अपयश फारसे मनावर घेत नाहीत, तर आपल्या कामाशी आणि प्रेक्षकांशी प्रामाणिक असलेल्या कलाकारांना अपयशाची अधिक खंत वाटते, असे त्यांनी नमूद केले.
भूमिका साकारण्यापूर्वी ती कठीण वाटणे स्वाभाविक असते; मात्र योग्य अभ्यास आणि प्रयत्नांनी ती सुलभ होते. शेकडो नाटके आणि प्रयोग केल्यानंतरही रंगमंचावर पहिली एन्ट्री घेताना आजही काही प्रमाणात भीती आणि दडपण जाणवते. मात्र, एकदा प्रवेश करून काम सुरू झाले की ते नाहीसे होते. सुरुवातीची ही धाकधूक कलाकारासाठी सकारात्मक आणि आवश्यक असते. तीच कलाकाराला आपल्या कामाशी आणि भूमिकेशी प्रामाणिक राहण्यास मदत करते, असे त्यांनी सांगितले.
आपल्या गायकीच्या प्रवासातील एक रंजक आठवणही सराफ यांनी सांगितली. “वास्तविक मी काही गायक नाही. पण दिवंगत संगीतकार आनंद मोडक यांनी मला एका गाण्यासाठी आग्रह केला. गाणं खराब होईल या भीतीने मी सुरुवातीला नकार दिला. मात्र, आनंद मोडक म्हणाले, ‘हे गाणं गायकाचं नसून एका नटाचं गाणं आहे.’ त्या गाण्यात लहान मुलाला खेळवताना नटाला वेगवेगळ्या आवाजाच्या आणि चेहऱ्याच्या पट्या बदलाव्या लागत होत्या. त्यांचा हा दृष्टिकोन मला पटला आणि मी ते गाणं गायलं,” अशी आठवण त्यांनी सांगितली.
अभिनयात एखाद्या पात्राला जिवंत करण्यासाठी त्याचे सूक्ष्म बारकावे शोधणे आवश्यक असल्याचे सराफ यांनी स्पष्ट केले. जगातील प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव आणि प्रकृती वेगळी असते. हीच वेगळी वैशिष्ट्ये शोधून ती भूमिकेत उतरवणे कलाकारासाठी महत्त्वाचे आहे. वरवरचा अभिनय केल्यास पात्र जिवंत न वाटता केवळ एक निर्जीव ‘ठोकळा’ वाटू शकतो, असे त्यांनी सांगितले.
कलाकाराच्या हातात केवळ आपले काम असते; त्याच्या यशाचा अंतिम निर्णय मात्र प्रेक्षकांच्या हाती असतो. “आपल्यावर जेवढं अवलंबून आहे, तेवढं लोकांवर जास्त अवलंबून आहे. आपण काही करू शकत नाही, कारण शेवटी समोर आहेत ते प्रेक्षक,” असे सराफ यांनी स्पष्ट केले.
त्यांच्या या मनमोकळ्या संवादाला उपस्थित रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अभिनयातील प्रामाणिकपणा, भूमिकेचा सखोल अभ्यास आणि प्रेक्षकांच्या निर्णयाचा स्वीकार या त्रिसूत्रीतून अशोक सराफ यांच्या प्रदीर्घ कलाप्रवासाचा अनुभव उपस्थितांसमोर उलगडला.
………………………………….

Latest बातम्या