Homeनागपूर मनपा‘ऐपत ’नसल्याने मनपा आयसोलेशन दवाखान्यातील जागा खासगीला!

‘ऐपत ’नसल्याने मनपा आयसोलेशन दवाखान्यातील जागा खासगीला!

भाजप नगरसेवक दिलीप दिवे यांची सभागृहात मुक्ताफळे

महापौरांनी काढला कामकाजातून हा दांभिक ‘शब्द’
डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर,ता.१० ऑगस्ट २०२६: नागपूर महानगरपालिका व चॅरीटी संस्था यांच्या पी.पी.पी.तत्वावर मौजा जाटतरोडी येथील आयसोलेशन हॉस्पीटल कॅम्पसमधील एकूण १०४९६.५० चौ.मी.जागे पैकी २६९०.०० चौ.मी जागा ही इंटिग्रेटेड डायग्नोस्टिक केंद्राच्या उभारणीसाठी नाममात्र १ रुपया प्रति चौ.फूट प्रति वर्ष  दराने ३० वर्षे कालावधीकरिता शासनाच्या मंजुरीने भाडेतत्वावर देण्याचा प्रस्ताव आज मनपा सभागृहात मांडण्यात आला.सत्ताधा-यांच्या या प्रस्तावाला विरोधकांनी पुरजोर विरोध केला.
इतकी मोक्याची जागा कोणत्याही खासगी संस्थेला न देता मनपाने स्वत: असे आरोग्य केंद्र उभारावे,अशी मागणी विरोधी पक्ष नेते संजय महाकाळकार यांनी सभागृहात केली.मात्र,माजी शिक्षण सभापती दिलीप दिवे यांनी याला प्रत्युत्तर देताना ‘ऐपत’नसल्याने मनपा असे केंद्र चालवू शकत नसल्याचे आपल्या भाषणात सांगताच एकच गदारोळ उडाला.
महाकाळकर यांच्यासह विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी दिवे यांच्या या असंवैधानिक शब्दावर तीव्र आक्षेप नोंदवला.यानंतर महापौरांनी हा शब्द कामकाजातून काढण्यास सांगितले तसेच दिवे यांनी देखील हा शब्द मी मागे घेत असल्याचे सभागृहाला सांगितले.
मात्र,कश्‍या प्रकारे या खासगी केंद्राची नागपूरकर रुग्णांना गरज आहे,लोकसंख्या किती वाढली आहे,बाहेर किती रुपयांत कोणत्या आरोग्य सुविधा उपलब्ध होतात,याची जंत्री वाचताना व या प्रस्तावाचे समर्थन करताना नकळत त्यांनी, मनपाच्या दिवाळखोर झालेल्या तिजाेरीचा उल्लेख करीत,मनपाची ऐपत नाही असे इंटिग्रेटेड डायग्नोस्टिक केंद्र उभारण्याचे,असा उल्लेख करताच विरोधकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली.
महाकाळकर यांनी भांडेवाडी येथील ७५ एकर इतकी अतिशय मोक्याची जागा सिम्बॉयसिस सारख्या जागतिक शैक्षणिक संस्थेला १ रुपया नाममात्र शुल्कावर दिली त्याचा नागपूरकरांना व वैदर्भिय विद्यार्थ्यांना काय फायदा झाला?असा सवाल केला.करारानुसार खरंच नागपूर व वैदर्भिय विद्यार्थ्यांसाठी राखीव २५ टक्के प्रवेश या संस्थेत मिळतो का?असा सवाल करताच बंडू राऊत यांनी इतर विद्यार्थ्यांकडून सिम्बॉयसिस २६ लाख रुपये प्रवेश शुल्क वसूल करते मात्र,नागपूर व वैदर्भिय विद्यार्थ्यांकडून केवळ १८ लाख रुपये शुल्क आकारले जात असल्याची चमत्कारिक माहिती दिली.
यावर महाकाळकर यांच्यासह सर्व विरोधकांनी उपरोधिकपणे टाळ्या वाजवून बंडू राऊत यांच्या या विधानाचे अभिनंदन केले.१८ लाख रुपये!भाजपचे नगरसेवक विकी कुकरेजा यांनी या वादात मध्ये उडी घेत,सिम्बॉयसिस सारखी जागतिक दर्जाची शिक्षण संस्था गडकरी यांनी नागपूरात आणल्याचे कौतूक केले.नाही तर नागपूर आणि विदर्भातील मुले ही पश्‍चिम महाराष्ट्रात शिक्षणासाठी जात होती आता ते नागपूरात शिकण्यासाठी येतात,आमच्या नेत्यांनी खूप चांगले काम केले असून याचा नागपूरच्या विद्यार्थ्यांना फायदा झाल्याची मखलाशी केली.या विषयाला मंजूर करण्याची मागणीही कुकरेजा यांनी महापौरांना केली.
दिलीप दिवे यांनी या प्रकल्पात सविस्तर निविदा प्रक्रिया राबविण्यात आली असल्याचे सांगत एकूण पाच संस्थांनी निविदा प्रक्रियेत भाग घेतला असल्याचे सांगितले.यात मे.स्व.भानुताई गडकरी मेमोयिरल विथ मे.मानस अग्राे इंन्डस्ट्री ऐंड इंफ्रा.लि तसेच श्री.भवानीमाता सेवा समितीच्या निविदांचा समावेश असल्याचे सांगितले.
आर्थिक निविदांच्या परीक्षणानुसार मे.स्व.भानुताई गडकरी मेमोयिरल विथ मे.मानस अग्राे इंन्डस्ट्री ऐंड इंफ्रा.लि हे निविदाकार CGHS दरावर २२ टक्के सूट देण्याची ऑफर सादर करुन सर्वाधिक(H१)निविदाकार म्हणून घोषित केलेले आहे.याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीकडे प्रकल्प विभागातर्फे सादर केलेला आहे.
ही जागा मनपाच्या मालकी हक्काची असून, नागपूर शहराच्या मंजूर विकास आराखड्यानुसार विषयांकित जागा आयसोलेशन हॉस्पीटल करीता नामनिर्देशित असल्याचे स्पष्ट आहे.सदर जागा सार्वजनिक आरोग्य,लोकहीत लक्षात घेता नाममात्र दराने ३० वर्ष कालावधीकरीता भाडेपट्यावर देण्याबाबतचा प्रश्‍न स्थायी समितीने विचारात घेऊन एकमताने मंजूर केला असून अंतिम मंजुरीकरीता मनपा सभागृहाच्या पटलावर ठेवला आहे.
याद्वारे आयसोलेशन हॉस्पीटलच्या एकूण ११३९४ चौ.मी.पैकी २६९० चौ.मी.जागा इंटिग्रेटेड डायग्नोस्टिक सेंटर उभारणी,संचालन,देखभाल व व्यवस्थापन करण्याकरिता ज्यामध्ये इमारत उभारणे,सर्व इंस्ट्रमेंट्स,डॉक्टर्स व स्पेशालिस्ट नेमणे व संचलन करणे हा खर्च संस्थेने करावयाच्या असल्याने मे.स्व.भानुताई गडकरी मेमोयिरल विथ मे.मानस अग्रा इंन्डस्ट्री ऐंड इंफ्रा.लि १ रुपया प्रति चौ.फुट प्रति वर्ष दराने ,३० वर्ष कालावधी करीता भाडेतत्वावर देण्याचा हा प्रस्ताव आज सभागृहात ‘गदारोळातच’मंजूर करण्यात आल्याने,लोकसभेत गदारोळात पारित होणा-या विधेयकांची आठवण झाली.
इतक्या घाईने हा प्रस्ताव मंजूर न करता यावर धोरण निश्‍चित झाले पाहिजे अशी मागणी महाकाळकर यांच्यासह विरोधकांनी केली मात्र,विकी कुकरेजा यांनी हा चांगला प्रस्ताव असल्याचे सांगून या प्रस्तावाचे समर्थन केले.
मनपाचा आणखी एक मोक्याचा भुखंड आरोग्य सेवेच्या नावावर केंद्रीय मंत्र्यांच्या खासगी संस्थेला देण्यावर विरोधकांनी विरोध नोंदवला.आता शहरातील काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे व आ.नितीन राऊत यांनी या प्रस्तावावर आपली भूमिका नागपूरकरां समोर मांडावी,अशी मागणी केली जात आहे.
……………………………………..

Latest बातम्या