Advertisements

दिग्गज अभिनेते पंकज कपूर यांनी उलगडला अनुभवांचा खजिना
Advertisements

केवळ रिल्स बनवून अभिनेता होता येत नाही
नागपूर,११ एप्रिल २०२६: रंगभूमी, दूरदर्शन आणि सिनेमा ही माध्यमे जरी वेगळी असली तरी त्यातला अभिनय बदलत नाही. अभिव्यक्तींच्या या माध्यमांपेक्षा माझे अभिनयावर अधिक प्रेम आहे, असे मत मागील ५० वर्षांपासून अभिनयाच्या क्षेत्रात कार्यरत असलेले दिग्गज अभिनेते पंकज कपूर यांनी व्यक्त करताच टाळ्यांचा कडकडाट झाला.
नागपूर एडिशन ऑफ पिफ आणि मेराकी थिएटर्सच्या वतीने शनिवारी वनामती सभागृहात पंकज कपूर यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रसिद्ध निवेदक अजेय गंपावर यांनी पंकज कपूर यांना विविध विषयांवर बोलते केले. त्यांनीदेखील अतिशय दिलखुलासपणे आपल्या अनुभवांचा खजिना नागपूर रसिकांसमोर उलगडला. तत्पूर्वी, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी, माजी विभागीय आयुक्त अनुप कुमार यांच्या हस्ते पंकज कपूर यांचा सत्कार करण्यात आला. पंकज कपूर यांनी गणेश चक्करवार यांचा सत्कार केला. पन्नास वर्षातील पंकज कपूर अभिनय कारकीर्दीची माहितीपटाच्या माध्यमातून आढावा घेण्यात आला.
केवळ रिल्स बनवून अभिनेता होता येत नाही, तर त्यासाठी शिक्षण, सातत्य आणि मेहनत आवश्यक आहे, असे स्पष्ट करत त्यांनी तरुणांना योग्य दिशा दिली. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा येथील शिक्षण आणि सांस्कृतिक वातावरणाने आपल्याला घडवले, असे त्यांनी नमूद केले. त्यांनी सिनेमा हा आर्ट आणि कॉमर्स यांचा संगम असल्याचेही स्पष्ट केले.
लुधियानातील बालपणापासून अभिनयाची आवड जोपासत त्यांनी या क्षेत्रात पाऊल ठेवले. त्यांच्या वडिलांनी दिलेला “जिंकूनच परता” हा सल्ला त्यांच्या आयुष्याचा आधार ठरला. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा येथे शिक्षण घेत असताना त्यांना नाटक, कविता आणि उर्दू-आवधी भाषेचा सखोल अभ्यास करण्याची संधी मिळाली. या संस्कारांचा त्यांच्या अभिनय आणि लेखनावर खोल परिणाम झाला.
अभिनयासाठी वाचन गरजेचे –
आजच्या पिढीतील कलाकारांना मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, केवळ सोशल मीडियावर रिल्स बनवून अभिनेता होता येत नाही. अभिनयासाठी सखोल शिक्षण, सातत्यपूर्ण सराव आणि वाचनाची सवय आवश्यक आहे. मेहनत आणि संयम यांशिवाय यश मिळत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. वडिलांच्या आठवणींना उजाळा देताना त्यांनी पालकांनी मुलांच्या आवडीला प्रोत्साहन द्यावे, असा सल्ला दिला.
‘करमचंद’मधील भूमिका आणखी सशक्त करता आली असती: पंकज कपूर यांची खंत
एकेकाळी करमचंद, ऑफीस ऑफीस व इतर मालिकांमुळे टेलिव्हीजनवरचे सर्वाधिक पैसे घेणारे अभिनेते म्हणून ख्याती असलेल्या पंकज कपूर यांना मात्र ‘करमचंद’ चा रोल अजिबात आवडत नाही. ‘करमचंद ’आणि ‘रुका हुआ फैसला’ यातील भूमिका मला आवडत नाहीत. करमचंद मी खूप स्टायलाईज केला होता. आता या भूमिकांकडे पाहतो तेव्हा आपण यापेक्षा वेगळे आणि चांगले करू शकलो असतो असे वाटते, अशी प्रामाणिक खंत पंकज कपूर यांनी व्यक्त केली.
शाहीद कपूर उत्तम अभिनेता-
मुलगा शाहीद कपूरबद्दल बोलताना पंकज कपूर म्हणाले, तो एक उत्तम अभिनेता आहे. त्याच्यासोबत काम करणे सोपे नाही. त्याच्या भूमिकांची निवड आणि त्याने केलेल्या भूमिका पाहिल्या की इतक्या लहान वयात इतकी हिंमत करणे मोठी गोष्ट आहे, असे वाटते. तो आपला मार्ग सातत्याने शोधत असतो आणि हेच अभिनेत्याच्या विकासाचे लक्षण आहे, असे अभिमानाने ते म्हणाले.
पंकज कपूर यांची कथा, दिग्दर्शन व शाहीद कपूर ची भमिका असलेल्या ‘मौसम’ या सिनेमाबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, या चित्रपटातून त्यांना क्रिएटिव्ह सॅटिसफॅक्शन मिळाले, मात्र आर्थिकदृष्ट्या अपेक्षित यश मिळाले नाही. सिनेमा हा आर्ट आणि कॉमर्स यांचा समतोल साधणारा प्रकार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या चित्रपटासाठी त्यांनी अनेक वर्षे मेहनत घेतली आणि त्यातून त्यांना समाधान मिळाले, असे त्यांनी सांगितले.
मजहब बेनाम हो जाए तो सुकून मिले-
नागपूर शहराबद्दल बोलताना त्यांनी येथे भेटलेल्या लोकांची समज आणि सांस्कृतिक जाणीव याचे कौतुक केले.येथील प्रेक्षक ‘जाणून ’घेण्याची इच्छा ठेवतात, असे ते म्हणाले. कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी एक सुंदर कविता सादर करीत उपस्थितांची मने जिंकली.
मजहब बेनाम हो जाए तो सुकून मिले
हर खुदा में खुदा‘ हर‘ में हो
ये बात आम हो जाए तो सुकून मिले,
नजर का उठना कुछ कहना लाजिम है,
हर नजर पाक हो जाये ताे सुकून मिले,
चांद तारे सूरज आसमां,सब के सब,सबके सांझे है.
इंसान भी इंसान हो जाए तो सुकून मिले ।
…………………………………..