फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeblog२१ सा व्या शतकातही  ‘ती’चं अस्तित्वं घूसमटलेलंच 

२१ सा व्या शतकातही  ‘ती’चं अस्तित्वं घूसमटलेलंच 

Advertisements
(जागतिक महिला दिन विशेष(भाग-१)

डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर,ता.८ मार्च २०२६: जागतिक पातळीवर सर्वदूर साजरा होणा-या जागतिक महिला दिनाचे कवित्व याला एक वेदनेची किनार देखील ठलकपणे उमटलेली आढळते,ज्याचा उल्लेख आजच्या डिजिटल माध्यमांच्या काळात घरोघरी असलेल्या स्त्रीच्या हातातील मोबाईलमध्ये वाचल्या जात आहे.विशेषत:इराणमध्ये त्या देशाचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमैनी यांचा अमेरिका-इस्राईलतर्फे झालेल्या ड्रोन हल्ल्यात मृत्यू यावर जगभरातील स्त्री ही समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्यक्त होऊ लागली आहे.परिणामी,वर्षभरातून फक्त एकच दिवस जगभरातील महिलांच्या कतृत्वाला समर्पित करणे कितपत औचित्यपूर्ण आहे,याचा उहापोह करणे गरजेचं ठरतं.
यासाठी फार मागे जाण्याची गरज नाही तर १६ सप्टेंबर २०२२ ची इराणमधील घटना ही या भूतळावर स्त्री म्हणून जन्माला आलेल्या महिलांची स्थिती किती भयावह आहे,याची साक्ष देणारी ठरते.अवघे २२ वर्ष वय असलेली महसा अमिनी हिचा हिजाब अयोग्यरित्या परिधान केल्याबद्दल तिला इराणी सदाचारण पोलिसांच्या ताब्यात मरण येतं!तिचा मृत्यू ह्दयविकाराच्या झटक्याने झाला असल्याचा दावा पोलिसांनी केला असला तरी रुग्णालयातील तिच्या रक्त आणि जखमांनी झाकलेल्या ‘स्त्री’ देहाच्या छायाचित्रांनी सत्य उजागर केलं होतं.तिच्या मृत्यूनंतर इराणमध्ये प्रस्थापितांविरुद्ध निषेधाच्या तीव्र लाटांनी आणखी दोनशेच्या वर मृत्यू ओढवले.गेल्या तीन वर्षात आपल्या अस्तित्वाच्या लढ्यासाठी दिल्या जाणा-या संघर्षात तीस हजारपेक्षा जास्त आंदोलकांचा पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाला असल्याचा दावा केला जातो.महत्वाचं म्हणजे यात इराणी पुरुषांचा देखील समावेश आहे जे इराणमधील जुल्मी राजवटीच्या विरोधात संघर्ष करीत होते.
या चळवळीत इराणमधील सर्व वयोगटातील व वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेल्या महिला सहभागी होत्या.न्याय,सुधारणा आणि माणूसकीच्या हक्कांच्या मागणीचा लढा अद्याप इराणमध्ये इतके जीव गेल्यानंतर देखील थांबला नाही.इराणमधील तेहरानपासून इतर ५० शहरांमध्ये निषेधाचा लढा हा जगभरातील लक्षाचे केंद्र बनला आहे.इराणमधील शासनाच्या कठोर नियंत्रणाला विरोध करीत स्त्रिया या डोक्यावर स्कार्फ जाळत आहेत आणि केस कापत आहेत.इराणी अधिका-यांनी या निदर्शकांना देशासाठी धोकादायक संबोधले असून पाश्‍चिमात्य देशांचा प्रभावात असल्याचा आरोप केला आहे.इराणमध्ये इंटरनेट सेवा व सोशल मिडीयावर अनेक नियंत्रणे प्रस्थापित केली आहे.
१९७९ च्या इस्लामिक क्रांतीनंतर इराणमधील महिलांवर कडक इस्लामिक कायदे आणि अनिवार्य हिजाबची बंधने लादण्यात आली.सार्वजनिक ठिकाणी चेहरा आणि हात वगळता केसांसह संपूर्ण शरीर झाकणे बंधनकारक असून,नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर दंड होतो.याच नियमांची बळी ठरली ती अवघी २२ वर्षीय महसा अमिनी
महसा अमिनी तिच्या कुटूंबियांसोबत इराकमध्ये आपल्या नातेवाईकांकडे जात होती.सायंकाळची वेळ होती.या प्रवासात इराणच्या सदाचारण पोलिसांनी(मोरालिटी पोलिस) त्यांची गाडी थांबवली.अमिनीने त्या वेळी कारच्या आतमध्ये हिजाब परिधान केला होता मात्र,तो थोडा व्यवस्थित नव्हता.तिचे कपाळावरचे केस त्यामधून दिसत होते.परिणामी,सदाचारण पोलिस तिला जबरदस्ती कारमधून ओढून पोलिसांच्या गाडीत बसवतात.तिचा भाऊ खूप गयावया करतो पण,पोलिस त्याला सांगतात त्याच्या बहीणीला एका तासासाठी नैतिकतेच्या पाठ शिकवण्यासाठी पोलिस ठाण्यात घेऊन जात आहोत.आमिनीच्या कुटूंबियांनी ही घटना इराणच्या मानवाधिकार संघटनेला त्यांच्या वेबसाईटवर तात्काळ कळवली.अमिनीच्या भाऊ सांगतो की पोलिस ठाण्यातील एका खाेलीतून त्याला अमिनीच्या किंचाळण्याचा आवाज येत होता.यानंतर अचानक पोलिस ठाण्या समोर एक रुग्णवाहिका आली.अमिनीला लपून कासरा रुग्णालयात घेऊन जाण्यात आले.पोलिसांनी तिच्या भावाला सांगितले की अमिनीला हार्टअटैक आला.अमिनी ही फक्त २२ वर्षांची होती आणि स्वस्थ होती.तिच्या भावाला सांगितल्या जातं की ती कोमामध्ये आहे!
दोन दिवसांनंतर १५ सप्टेंबर रोजी तेहरानची पोलिस एक अधिकृत बयाण जारी करते,अमिनीला अटक केल्यानंतर पोलिस ठाण्यात तिला हार्टअटैक आला.अमिनीचा भाऊ सांगतो की तिला अटक केल्यानंतर फक्त दोन तासांचा वेळ ती अटकेत होती.पण,पोलिस ठाण्यातून ती सरळ रुग्णालयात,रुग्णालयात ती सरळ कोमात आणि १६ सप्टेंबर रोजी ती हे जगच सोडून निघून जाते.याचा अर्थ त्या दोन तासात ,ते ही सार्वजनिक ठिकाणी नाही,तर आपल्याच कुटूंबियांसोबत कारमध्ये प्रवास करीत असताना हिजाब फक्त थोडासा योग्य पद्धतीने घातला नसल्याची तिला इतकी क्रूर शिक्षा इराणच्या पोलिसांकडून मिळाली…!
एकविसाव्या शतकातील तिसरे दशक सुरु आहे आणि या काळात कोणी कल्पना ही करु शकत नाही एखाद्या देशात महिलांसह अगदी लहान-लहान मुलींनाही सख्तीने हिजाबमध्ये राहण्यास बंदी घालणारा कठोर कायदा अनेक इस्लामिक देशात आजच्या काळातही आहेत.त्यात ही फक्त हिजाब तपासण्यासाठी रस्तोरस्ती सदाचारण पोलिस तैनात असतात!अगदी कारमध्ये जात असतानाही महिलांनी हिजाब योग्य रितीने घातला आहे की नाही फक्त यावर लक्ष ठेवण्याचे काम ते करत असतात.इतकंच नव्हे तर कायदा मोडणा-या ,तो ही अनावधानाने का होईना,अश्‍या महिलांना क्रूरतम मारहाणीतून अगदी मृत्यूदंडाची शिक्षा देण्याचीही अर्निबंध मोकळीक त्यांच्या हातात आहे.या देशांच्या कायदानुसार महिला .तसेच लहान मुली  त्यांच्या कपाळावरील  एक केस ही दिसता कामा नये इतका घट्ट हिजाब त्यांना अगदी लहानवयापासून घालावा लागतो.स्त्री म्हणून जन्माला आलेल्या लहान-लहान चिमुकल्यांवर जन्मापासूनच हिजाबमध्ये बंदिस्त राहण्याची अमानवीय शिक्षा,धर्माच्या नावावर एखाद्या राष्ट्रात मिळत असेल तर जगाला महिलांच्या सन्मानासाठी ‘जागतिक महिला दिवस’साजरा करण्याचा नैतिक अधिकार तरी राहतो का?हा प्रश्‍न अस्वस्थ करुन जातो.
अमिनीच्या मृत्यूने इराणला हलवून सोडले.अनेक प्रत्यक्षदर्शींनी तेथील पत्रकारांना सांगितले की अमिनीला पोलिस व्हॅनमध्ये बसवल्यानंतर मारहाण करण्यात आली.अमिनीचे वडील अमजद अमिनीने देखील एका मुलाखतीत सांगितले की,त्यांच्या मुलीची क्रूर हत्या करण्यात आली मात्र,सरकारी अधिका-यांनी त्यांच्या या दाव्यांना नाकरले.इराणचे आंतरिक व्यवस्था मंत्री अहमद वहिदी यांनी दावा केला की अमिनीला आधीपासूनच अनेक व्याधी होत्या आणि मोरेलिटी पोलिसांकडे तसे पण कोणतेच हत्यार नव्हते ज्याने तिला मारहाण केली जाऊ शकते.मात्र,एका ग्रूप ऑफ हॅकर एक्टीवीस्टने त्या रुग्णालयातील एक वैद्यकीय अहवाल लिक केला ज्यामध्ये अमिनीचा स्कलचा सिटी स्कॅन,बोन फ्रॅक्चर,ब्रेन हेमरेज आणि बोन एडिमा स्कॅनचा अहवाल होता!३० सप्टेंबर  रोजी हा गुपित अहवाल समाज माध्यमांवर व्हायरल झाला ज्यामध्ये अमिनीच्या डोक्यावर वारंवार तसेच शरिरावर जोरदार प्रहार झाला असल्याचे स्पष्ट झाले.
ज्यावेळी अमिनीचा हा वैद्यकीय अहवाल व्हायरल झाला त्यावेळी इराणमध्ये तिच्या समर्थकांमध्ये व सरकारच्या समर्थकांमध्ये जोरदार वाद जुंपले.मात्र,इराणमधील एक धाडसी डॉक्टर हुसैन करमपूर यांनी ते छायाचित्र व्हायरल केले ज्यात तीचा देह जखमांनी भरलेला दिसत होता.हे लक्षण हार्टअटैकचे नव्हते.तिच्या त्या नाजूक देहाला खूप बेरहमीने मारहाण करण्यात आली होती.डॉ.करमपूर हे इराणमधील मेडीकल कॉउंसिलमधील अधिकारी रईसजादे यांना पत्र लिहून,’सच्चाई का सामना करो’अशी मागणी करतात.हा वाद इराणमध्ये इतका जास्त पेटला की ते बघून पोलिसांनी एक खोटा व्हिडीयो व्हायरल केला ज्यामध्ये पोलिस ठाण्यात एक महिला अचानक कोसळून पडताना दिसून पडते.मात्र,फार लांबून एकाच एंगलने तो व्हिडीयो बघून अमिनीच्या वडीलांनी त्याच पोलिस ठाण्यातील कोर्ट यार्ड आणि कारमधील वेब्ह कॅमरेतील छायाचित्रणांची मागणी केली.मात्र,पोलिसांकडे ते नव्हतेच तर देणार कुठून.

यानंतर इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी हे मासा अमिनीच्या कुटूंबियांप्रति फोनवरुन सहानूभूती दर्शवतात व त्यांना खात्री देतात की या घटनेची निष्पक्षपणे चौकशी केली जाईल व दोषींना शिक्षा दिली जाईल.मात्र,या वेळेपर्यंत मासा अमिनीचा मृत्यू हा जगभरातील निषेध चळवळीचा विषय झाला होता.

हे आंदोलन इतके पेटले की इराणमधील अनेक महिला उघडपणे आपल्या हिजाबला आग लावताना दिसून पडल्या.अनेक महिलांनी कात्री घेऊन आपले केस कापतानाचे व्हिडीयो समाज माध्यमांवर टाकले.अनेक महिलांनी त्यांच्यासोबत भर रस्त्यात मोरेलिटी पोलिस कसा जनावरांसारखा व्यवहार करते,याचे व्हिडीयोज टाकले.नारे लावले गेले ‘डेथ टू द डिक्टेटर फॉर वूमेन लाईफ फ्रिडम’चे.लवकरच हे आंदोलन हिंसक होताना दिसून पडले.पोलिसांकडून अश्रू नळकांड्या व बंदूकींचा वापर होतो.तीनशेपेक्षा जास्त आंदोलनका-यांचा मृत्यू होतो.शेकडो आंदोलक जखमी होतात.शेकडो आंदोलकांना अटक होते.याच वेळी अनोनिमस हॅकर्स ग्रूप दोन सरकारी वेबसाईट्स हॅक करतात व एक व्हिडीयो व्हायरल करतात.यामध्ये या आंदोलनाची पार्श्वभूमी या देशात खूप आधीपासून तयार झाली होती कारण या देशात महिलांची हत्या हिजाबसाठी खूप आधीपासून होत आहेत,मासा अमिनी ही फक्त अलीकडची पिडीत आहे मोरेलिटी पोलिसांच्या क्रोर्याची…!असे ते नमूद करतात.
याच वेळी इराणचा प्रसिद्ध फूटबॉल खेळाडू अली करिमी यांनी देखील मासा अमिनीच्या समर्थनार्थ आपला पाठिंबा उघडपणे ट्टीटरवर दर्शवला.इराणच्या ‘मॉरेलिटी पोलिस’च्या डीएनएमध्येच महिलांना मारहाण करणे समाविष्ट आहे.अनिवार्य हिजाब फक्त कपडा नाही तर महिलांच्या दडपशाहीचे प्रतीक आहे.तेथील महिला हिजाबच्या विरोधात नाही तर फक्त जबरदस्तीच्या विरोधात आहेत.इराणी महिला हक्क कार्यकर्त्या मसीह अलीनेजाद यांनी २०१४ मध्ये  ‘माय स्टेल्थी फ्रीडम ’नावाचे फेसबुक पेज सुरु केले,जिथे इराणी महिला हिजाबशिवाय आणि त्यांच्या संघर्षाची छायाचित्रे निर्भयपणे शेअर करतात.
८० टक्के इराणी जनता ही बदल घडवू इच्छिते.इस्लामी प्रजासत्ताकने त्यांच्याकडून आशेव्यतिरिक्त सगळं काही हिरावून घेतल्याचे ते मानतात.संसदेच्या २९९ जागांपैकी केवळ ९ जागांवर महिला आहेत आणि त्याही शासनाच्या समर्थक आहेत,महिलांच्या रक्षक नाहीत.इराणमध्ये गश्‍त-ए-इरशाद सारख्या संस्था रस्त्यांवर गस्त घालतात आणि ड्रेस कोडच्या उल्लंघनाबद्दल महिलांना अटक करीत असतात.ताब्यात घेताना सुरक्षा रक्षक महिलांशी गैरवर्तन करतात,तरुण मुलींनाच लक्ष्य केले जाते.कायदा महिलांच्या खासगी आयुष्यावरही निर्बंध घालतो.
एक काळ असा होता,जेव्हा विद्यापीठांमध्ये जवळपास ६६ टक्के विद्यार्थिनी होत्या.पण हळूहळू संधी कमी झाल्या.राेजगारातही अडथळे आले.
खोमेनीच्या मृत्यूनंतर गेल्या अनेक दशकांपासून सामाजिक आणि धार्मिक जाळ्यात अडकलेल्या इराणी महिलांच्या स्वातंत्र्याची सुरवात आहे का,अशी चर्चा इराणी महिलांमध्ये सुरु आहे मात्र,बेभरवश्‍याच्या अमेरिकेच्या कृतीमुळे पुन्हा एकदा संशयाचे कल्लोळ त्यांच्या जीवनात निर्माण झाले आहे.
खोमेनी यांच्या सत्ताकाळात जरी इराणी महिलांचे स्वातंत्र्य पूर्णपणे संपुष्टात आणण्यात आले असले तरी ते इराणी महिलांनी शांतपणे स्वीकारले नाहीत.त्याऐवजी हिंसेचा वापर करुन त्यांना सबमिशन करण्यास भाग पाडले गेले.ज्यामुळे त्यांना कोणत्याही क्षमतेत समाजात भाग घेणे कठीण झाले.१९९० च्या दशकात महिला कार्यकर्त्यांनी कौटूंबिक कायद्यांतर्गत त्यांचे गमावलेले अधिकार पुनर्संचयित करण्यावर लक्ष केंद्रित केले आणि घटस्फोट घेण्याचे आणि मुलाचा ताबा मिळविण्याचे अधिकार पुन्हा मिळवण्यात यशस्वी झाले.या संपूर्ण कालावधीत अनेक स्त्रियांनी ते ज्या परिस्थितीत जगत होते ते अधोरेखित करण्यासाठी आज्ञाभंगाची धाडसी कृत्ये केली.फेब्रुवरी १९९४ मध्ये,अनिवार्य बुरखा घालण्याच्या निषेधार्थ होमा दरबारीने सार्वजनिकपणे तिचा हिजाब काढला आणि स्वत:ला पेटवून घेतले….!२०१९ मध्ये,सहार खोडयारी हीला फुटबॉल खेळात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल अटक झाली व त्यानंतर आत्मदहन करुन तिचा मृत्यू झाला,ती शासनाच्या स्त्रियांवरील अत्याचाराची प्रतीक बनली.
खोमेनीच्या मृत्यूनंतर अतिफेह रब्बी सहलीह या मुलीचा विषय देखील पुन्हा एकदा सोशल मिडीयावर खूप व्हायरल झाला.जगात झालेल्या सर्वात क्रूर शिक्षेचे हे प्रकरण मानल्या जातं.ही अवघ्या १३ वर्षांची मुलगी होती आतिफेह रब्बी सहलीह…अतिफेच्या आईचा कार अपघातात मृत्यू झाला तेव्हा ती फक्त ५ वर्षांची होती.काही दिवसांनी तिचा लहान भाऊ नदीत बुडाल्याची माहिती समोर आली.ती तिच्या वृद्ध आजी आजोबांसोबत राहत होती.तिच्या जीवनात वाईट अवस्था तेव्हा सुरु झाली जेव्हा एका ५१ वर्षीय निवृत्त गोरड अली दरबीची तिच्यावर वाईट नजर गेली.५१ वर्षीय अलीने या निष्पाप १३ वर्षाच्या मुलीवर एक दोनदा नाही तर शेकडो वेळा बलात्कार केला.

आतिफेहच्या कुटूंबाला मजुरीसारखे कामामुळे दिवसभर घराबाहेर पडावे लागत होते.त्याचवेळी दरबीच्या कामुकतेला ही चिमुरडी बळी पडत होती.त्याने तिला धमकी दिली की कोणाला सांगितले तर कुटूंबियांना मारुन टाकील.हा घाणेरडा प्रकार ही चिमुकली तब्बल तीन वर्ष सहन करीत राहीली.

एकदा मात्र हिंमत करुन तिने घरच्यांना हे सांगण्याचा प्रयत्न केला पण,घरच्यांनी तिलाच फटकारले आणि गप्प केले.पण हळूहळू दरबीची कामुकता मर्यादेपलीकडे वाढत गेली व अतिफेच्या लाख विनंतीवरुन तिच्या आजोबांनी हा प्रकार पोलिसांना कळवला.पोलिसांना हे कळताच पोलिसांनी दरबी ऐवजी पिडीतेलाच अटक केली.तिच्यावर इस्लामिक शरिया कायद्यानुसार शुद्धताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.याचा अर्थ स्त्री देहाची वर्जिनीटी आणि लैंगिक वर्तवणुकीचे उल्लंघन केल्याचा गुन्हा तिच्यावर दाखल झाला.या कायद्यानुसार एखाद्या पुरुषासोबत कोणत्याही प्रकारच्या सबंधांसाठी शिक्षा केली जाते,या कायद्यानुसार तिलाच आपले निर्दोषत्व सिद्ध करावं लागतं की तिने हे नाते जाेडण्याची सुरवात केली नाही!
या चिमुरडीवर पोलिस ठाण्यात देखील बलात्कार झाला.अनेक पोलिसांनी तिच्या देहाचे लचके तोडले.दीर्घ संघर्षानंतर जेव्हा तिच्या आज्जीला तिला भेटण्याची परवानगी मिळाली तेव्हा ती स्वत:च्या पायावर चालू देखील शकत नव्हती,तिच्या जांघेतून सतत रक्त वाहत होते, इतकी वाईट अवस्था तिची झाली होती.ती दोन हात आणि दोन पायांनी घासत आज्जीला भेटण्यासाठी आली….!
यानंतर हे प्रकरण कोर्टात गेले.कोर्टात आरोपी दरबी व पोलिसांनी मिळून असे बयाण दिले की संपूर्ण प्रकरण आतिफे रब्बीवर उलटले.न्यायाधीश हाजी रेझाइ‘ यांनी रब्बीला समजावण्यास सुरवात केली.पण जेव्हा रब्बीला हे कळले की आपण ही केस हरतोय तर तिने घाईत स्वत:च्या चेह-यावरुन हिजाब ओढून काढला व न्यायाधीशाला म्हणाली या अली दरबीला कोर्टाने शिक्षा करावी,तिला नाही.पण त्या हूशार अंध न्यायाधिशाने हिजाब काढल्याबद्दल कोर्टाचा घोर अपमान केल्याचे दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली.हे ऐकून ती रागाने लाल झाली.इतका अन्याय सहन करुनही  न्याय देण्या ऐवजी पुन्हा त्या नरकात त्या चिमुरडीला ढकलल्या जात होते.तुरुंगातील ते वेदनादायी क्षण तिच्या अंगावर शहारा आणून गेले.
तिने निषेध म्हणून आपले बूट काढून न्यायाधीशाच्या अंगावर भिरकावले.न्यायाधीश हाजी रेझाई यांनी लगेच तिला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली.१५ ऑगस्ट २००४ रोजी या चिमुरडीला मध्य बाजारात क्रेनने फासावर लटकवण्यात आले.इराणी सरकारने तिचे वय २२ वर्ष असल्याची मखलाशी केली मात्र,तिचा जन्म दाखला सांगतो मृत्यूच्या वेळी तिचे वय अवघे १६ वर्ष होते.
इराणसारख्या कट्टर इस्लामिक देशात अश्‍या घटना सामन्य होत्या.इराणमध्ये अनेक महिलांना फाशीची शिक्षा झाली आहे.एका १५ वर्षाच्या मुलीचा देखील यात समावेश आहे जिचे लग्न जबरीने एका पोलिस अधिका-यांनी स्वत:शी लावून घेतले होते.इराणी मानवाधिकार गटाने सांगितले की २०२१ मध्ये मृत्यूदंड दिलेल्या लोकांच्या संख्येत २०२२ मध्ये दुप्पट लोकांना मृत्यूदंड देण्यात आला.
मूळात १९७९ पूर्वी कोणत्याही पाश्‍चात्य देशाप्रमाणेच इराणमधील महिला या बंधनमुक्त होत्या.शिक्षण,पेहराव,विचार,कर्तुत्व,संधी आणि समानता याबाबत त्या इराणमधील पुरुषांसारख्याच मुक्त होत्या.मात्र,१९७९ साली इराणमध्ये इस्लामिक क्रांती झाली.त्या पूर्वी शाह मोहम्मद रझा पहलवी हे खूप खुल्या विचारांचे व लंदनमधून उच्चविद्याभूषित असलेले तेथील शासक होते.त्यांनी बहूपत्नीत्व प्रथेवर बंधन घातलं.मुलींच्या लग्नाचं वय १८ वर्ष केलं.त्यांच्या काळात इराणमध्ये झपाट्याने आर्थिक व औद्योगिक प्रगती झाली.इराणमध्ये हिजाब घालणे हे फार पूर्वीपासून बंधनकारक नव्हते.
मात्र, इस्लामिक क्रांती करुन त्यांचा शासनकाळ संपुष्टात आल्यानंतर लगेच सत्ताधा-यांनी एक अध्यादेश काढला की महिलांना नोकरीच्या ठिकाणी हिजाब घालावा लागेल.हा अध्यादेश काढताच हजारो इराणी महिला रस्त्यावर उतरल्या की आम्ही क्रांतीमध्ये यासाठी सहयोग केला नाही की आम्ही पुन्हा मध्ययुगात ढकलल्या जाऊ.मात्र,इराणमधील परिस्थिती दिवसेंदिवस खूप वाईट होऊ लागली.१९८१ साली हिजाब महिलांसाठी बंधनकारक करण्यात आला.या कायद्याचे कलम ६३८ सांगतो की सार्वजनिक ठिकाणी महिलांनी हिजाब धारण न केल्यास ताे दंडनीय अपराध असेल.याशिवाय इराणमध्ये मुलींच्या लग्नाचे वय १८ वरुन ९ वर्ष करण्यात आले व बहूपत्नीत्व कायदा पुन्हा लागू करण्यात आला!
यानंतर इराणमध्ये महिलांसाठी खूप कठोर कायदे पारित झाले.त्यांना सतत त्यांची मान आणि खांदे हे झाकूनच ठेवावे लागतील.घरातील कोण्याही एका पुरुषाशिवाय त्या बाजारात एकट्याने जाऊ शकत नाहीत.महिलांना उंच हिल्सचे सॅण्डल व शॉकिंग्स वापरण्यास मज्जाव करण्यात आला.या देशात ७ वर्षानंतर मुलींना हिजाब बंधनकारक आहे.चेहरा व हात सोडून हिजाबने संपूर्ण चेहरा व केस झाकणे अनिवार्य आहे.गळ्याखालील शरीराचा कोणताही भाग दिसला किंवा घट्ट वस्त्र परिधार केले तर जबर शिक्षेची तरतूद आहे.हा कायदा मोडल्यास दंड तसेच कोडे मारले जातात.जर दुस-यांदा पुन्हा हिजाबचा नियम मोडला तर तिचा प्रवास,शिक्षण,नोकरी इत्यादीपासून तिला कायमचं वंचित केल्या जातं.तिच्यावर नजर ठेवण्यासाठी फक्त सदाचारण पोलिसच नाहीत तर विविध ऐप्स,ड्रोन आणि देशभर कॅमरे लागले आहेत. पुरुषांना सगळे हक्क बहाल करण्यात आले आहे.तलाकच्या प्रकरणात मुलांचा ताबा फक्त पुरुषांकडेच दिला गेला आहे.वडीलांच्या संपत्तीत बहीणीपेक्षा भावाला दुप्पट अधिकार मिळतो.विवाहित महिला पतीच्या परवागनीशिवाय विदेश यात्रेवर जाऊ शकत नाही.
१९७९ ते आजपर्यंत त्यामुळे सरकारच्या या अमानवीय व पक्षपातपूर्ण कायद्यांच्या विरोधात अनेक वेळा इराणमध्ये आंदोलने झाली.२००६ मध्ये महिला आंदोलनका-यांनी एक आंदोलन पुकारले होते ’द वन मिलियन सिग्नेचर कॅम्पेन: एन एर्फट बॉर्न ऑन स्ट्रीट्स’.यानंतर २०१४ मध्ये पुन्हा एकदा हिजाबच्या विरोधात महिलांनी आंदोलन पुकारले.अनेक तरुणींनी आपले केस मोकळे ठेऊन हवेत आपला दुपट्टा लहरवित असतानाचे फोटोज मोठ्या प्रमाणात सोशल मिडीयावर व्हायरल केले.‘स्वातंत्र्याची इतकी मोठी आस त्यांना होती की देशाची ‘धार्मिक’ विचारांची सरकार व सदाचारण पोलिसांच्या र्क्रार्याची देखील भीती त्यांनी जिंकली होती’.हे एक ऑन लाईन आंदोलन होते.’
इराणमध्ये १२ जुलै हा राष्ट्रीय हिजाब दिवस म्हणून साजरा होत असतो.या दिवशी देखील खूप मोठी चळवळ महिलांनी केली.महत्वाचे म्हणजे महिलांच्या या चळवळीत पुरुषांनी देखील बरोबरीने सहभाग नोंदवला व त्यांच्या या माणूसकीच्या मागणीला पाठिंबा दर्शवला.फरहाद मेयसाम या डॉक्टर आंदोलनका-याला ऑगस्ट २०१८ मध्ये यामुळे अटक झाली.त्याला सहा वर्षे तुरुंगात काढावे लागले.
कोणालाही प्रश्‍न पडेल एकेकाळी मुक्त विचारांचा हा देश असलेल्या इराणमध्ये सत्तरीच्या दशकानंतर कसा काय इतका पराकोटीचा स्त्री-पुरुषांमध्ये भेदाभेद व स्त्रीचं जगणं हिरावून घेणारा बदल घडला?याचं उत्तर तो देश चालविणारे खोमेनी यांच्या लहानपणापासूनच्या शिक्षणात,विचारात आणि धार्मिक संस्कारात दडलं आहे.
अयातुल्हाह अली खोमेनी.ज्यांना जग मोठा शैतान संबोधतात.वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षी खोमेनी हे मौलाना बनले होते.त्यांनी इराणचे सर्वात मोठे धार्मिक नेते रोहूल्ला खोमेनीला आपला गुरु मानला होता.१९ एप्रिल १९३९ चा तो दिवस होता ज्यावेळी इराणचा सर्वाधिक धार्मिक शहर म्हणून ओळख असणा-या मशकमध्ये सय्यदअली खोमेनीचा जन्म झाला.घरातील वातावरणही खूप जास्त धार्मिक होते कारण त्यांचे वडील ही जवळच्याच मस्जिदमध्ये मौलवी होते.अली खोमेनी हे आपल्या आठ भाऊ बहीणींमध्ये दुस-या क्रमाकांचे पूत्र होते.ते फक्त ४ वर्षांचे होते त्या वेळी त्यांना जवळच्या एका इस्लामिक शाळेत पाठवण्यात आलं,तिथेच योग्यरित्या कुराण शिकण्याची संधी त्यांना मिळाली.याच ठिकाणी अरबी भाषा त्यांनी शिकली.
हा तो दौर होता जेव्हा इराणमध्ये शाह मोहम्मद रजा पहलवी यांचा शासनकाळ होता.शाह हे एक धर्मनिरपेक्ष राजा मानले जात होते.त्यांच्यावर पाश्‍चिमात्य विचारसरणीचा सखोल प्रभाव होता.त्यांच्या सत्ताकाळात इराणमध्ये मुक्त वातावरण होते.इराणमधील महिला पाश्‍चात्य कपडे परिधान करीत होती.पार्टी,क्लबमध्ये जात होती.महिलांना पुरुषांइतकेच व पुरुषांसारखेच जीवन जगण्याचे स्वातंत्र्य होते.
यानंतर १९५० मध्ये अली खोमेनीला मशकमधीलच एका नव्या इस्लामिक शाळेत प्रवेश दिला जातो.याच शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांनी कुराणमधील आयते म्हणून दाखवली.ज्याचे खूप कौतूक झाले.हीच ती वेळ होती ज्यावेळी खोमेनीने ठरवलं की ते देखील त्यांच्या वडीलांसारखेच मौलवी बनतील.यावेळी त्यांचे वय अवघे ११ ते १२ वर्ष होते.याच वेळी त्यांना इराणच्या आणखी एका शहरात ’कौम’मध्ये जाण्याचा योग आला.याच शहरात वयाच्या अवघ्या ११-१२ व्या वर्षी ते सर्वात कमी वयाचे मौलवी बनले होते.
कौममधून मशतमध्ये परत आल्यानंतर ते जेव्हा आपल्या जुन्या बाल मित्रांसोबत खेळत होते त्यावेळी त्यांच्या मौलवीच्या वेशभूषेवर मित्र तसेच मित्रांच्या कुटूंबियांनी त्यांचा उपहास केला.यावेळी जरी इराणमध्ये पूर्णपणे धार्मिक स्वातंत्र्य होते तरी देखील माेहरममधील सुरवातीचे दहा दिवस मात्र,धार्मिक नियम पाळण्याचे बंधन नागरिकांवर होते.या दहा दिवसात इराणमधील सर्व पाश्‍चात्य मनोरंजनाची केंद्र ही बंद राहत होती.मात्र,१९५५ मध्ये मशतच्या शहर प्रमुखांनी एक नवी घोषणा केली की,माेहरमचे आधीचे दहा दिवस मनोरंजनाची सर्व केंद्रे आता प्रतिबंधित राहणार नसून ती खुली राहतील.यामुळे या निर्णयातून इराणमधील जितके काही धार्मिक नेते होते ते नाराज झाले.
अली खोमेनी त्यावेळी १६-१७ वर्ष वयाचे होते ते देखील या निर्णयाच्या विरोधात चळवळीत सहभागी झाले.त्यांनाही यामुळे तुरुंगात जावे लागले होते.नंतर १९६० ची पहाट उजाडली.अली खोमेनी आता उघडपणे धार्मिक आंदोलनात सहभागी होऊन इराणी नागरिकांना चळवळीत उतरण्यासाठी प्रेरित करीत होते.याच वेळी शाह पहलवीच्या नियमांची पायमल्ली करण्यासाठी खोमेनीला सहा वेळा तुरुंगात जावे लागले होते.हा तो काळ होता जेव्हा अली खोमेनीवर इराणचे फार मोठे धार्मिक नेते अयातुल्लाह रोहूल्ला खोमेनीचा खूप मोठा प्रभाव होता.अयातुल्हा खोमेनी त्यावेळी इराकमधून व त्यानंतर फ्रांसमधून आपली चळवळ चालवित होते.अली खोमेनी त्यांचे शिष्य बनले.ते अयातुल्लाह खोमेनीचे विचार व भाषणे लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम करीत होते.
अयातुल्लाह खोमेनी हे सुरवातीपासून शाह यांच्या ’व्हाईट रिव्होल्यूशन’मोहिमेच्या विरोधात होते.या रिव्होल्यूशनमध्ये इराणला पाश्‍चात्य देशांप्रमाणे विकसित करण्याची नीती स्वीकारण्यात आली होती.मात्र,रोहूल्ला खाेमेनी हे पाश्‍चात्य संस्कृतीला इस्लाम व इराणी संस्कृतीच्या विरुद्ध मानत होते.इस्लाम आणि सत्तेला वेगवेगळं मानू शकत नाही,असं त्यांचं म्हणनं होतं.त्यामुळेच त्यांनी सातत्याने इराणवर धार्मिक नेत्यांचंच राज्य असेल,तेच पंतप्रधान आणि राष्ट्राध्यक्ष बनतील अशी त्यांची विचारधारणा होती.हीच ती विचारधारा होती ज्यावर २२ वर्षीय अली खोमेनी प्रभावित झाले होते.
१९६२-६३ साली जेव्हा अयातुल्लाह खान खोमेनीने उघडपणे इराणमधील शाह राजवटीविरुद्ध आवाज उठविण्यास सुरवात केली,त्यावेळी अली खोमेनींनी त्यांच्या घोषणा आणि विचारांचा मशत व इतर शहरात मोठ्या प्रमाणात प्रचार केला.१९६३ साली अली खोमेनीने मशतच्या एका मज्सिद मध्ये एक बैठक बोलावली.या बैठकीत अली खोमेनीने भाषण दिले की शाहची राजवट ही इस्लामच्या विरुद्ध आहे.आपल्याला आपला धर्म आणि देशाला यापासून वाचवायचं आहे.या भाषणासाठी अली खोमेनीला लोकांची प्रशंसा तर मिळाली मात्र,त्यांना अटक झाली.
यानंतर १९७० चा दशक येतो.या दशकापर्यंत इराणमध्ये अली खोमेनी हे एक सर्वविदीत युवा नेता बनले होते.हा तोच काळ होता जेव्हा रोहूल्ला खोमेनीला शाह राजवटीने इराणमधून हद्दपार केले होते.एकदा अली खोमेनीने एका मजलिसमध्ये रोहूल्ला खोमेनीचा आवाज लोकांना चोरुन टेपरिकॉर्डरवर ऐकवला.यात अली खोमेनीने जनतेला आव्हान केले होते की इराणमधील शाहची राजवट ही गैर-इस्लामिक राजवट आहे आणि प्रत्येक मुलसमानाचे हे कर्तव्य आहे की ही गैर-इस्लामिक राजवट उखडून फेंका.ही टेप ऐकल्यानंतर शाह राजवटीविरुद्ध इराणी जनतेमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला व तब्बल एका दशकापर्यंत लोकांच्या मनात खदखदत राहीला.
यानंतर १९७९ वर्ष उजाडलं.या वर्षी इराणमध्ये मोठी क्रांती झाली व शाह पहलवीची राजवट पूर्णपणे उलथवून टाकण्यात आली.अली खोमेनीसाठी एका नव्या दौरची सुरवात होती व यापासूनच नव्या इराणाची घडण होणार होती.फेब्रुवरी १९७९ साली अयातुल्ला खोमेनी पॅरिसमधून इराणमध्ये परततात्त आणि आपल्या नव्या राजवटीची इराणमध्ये सुरवात करतात.देशातील सर्व मोठ्या पदांवर त्यांनी जवळच्या लोकांना बसवले.अली खोमेनीला देखील त्यांनी रिवॉल्यूशनरी काऊंसिलमध्ये सहभागी करुन घेतले.ही काऊंसिल म्हणजे इराणमध्ये जी राजवट येणार होती त्याची नींव होती.याच वेळी अली खोमेनीला तेहरानमध्ये जुम्मेच्या नमाजचा प्रमुख देखील बनवण्यात आले.
याच वेळी एक मोठा बदल अली खोमेनीच्या जीवनात आला.त्यावेळी हसन रुहानी जे इराणचे अध्यक्ष बनले होते त्यांनी रोहूल्ला खोमेनीकडे मंत्रीमंडळाच्या बैठकीत एक सिफारस केली.त्यांनी सांगितले की आम्हाला एका अश्‍या व्यक्तिची फार गरज आहे जो इस्लामिक क्रांतीला पुढे नेईल.इराणी जनतेत इस्लामिक तत्वज्ञानाला रुजवेल ,पुढे नेईल,सैन्यामध्ये याचा प्रचार करेल,या पदासाठी सय्यद अली खोमेनी हे सर्वाधिक योग्य व्यक्ति आहे.त्यांच्या याच सिफारीशीनंतर अली खोमेनी इराणी सैन्याचे उप प्रमुखाचे पद बहाल केले जाते.यानंतर अली खोमेनीने सैन्यात आयआरजीसी,इस्लामिक रेव्हूलेशनरी गार्ड कॉब्ज इत्यादी निर्माण केले.ज्याची सर्वाधिक चर्चा आज इराण-अमेरिका युद्धात होत आहे.इराणच्या सैन्याला त्या काळापासून अली खोमेनीने बलशाली करण्याची प्रक्रिया सुरु केली होती.
मात्र,अली खोमेनीच्या जीवनात आणखी एक मोठा बदल घडून येणार होता.१९८० मध्ये इराण-इराकमध्ये युद्धाला सुरवात झाली होती.अली खोमेनी या युद्धाची तपशीलवार माहिती घेण्यासाठी गेले होते.तिथून ते परत आले.२७ जून १९८१ रोजी  तेहरानच्या अबूजार मस्जिदमध्ये ते पोहोचतात आणि नेहमीसारखेच लोकांच्या प्रश्‍नांना ते उत्तरे देत होते.परंपरेप्रमाणे त्यांच्या समोरील टेबलावर लोकांच्या प्रश्‍नांचा ढेर लागला होता.मात्र,याच वेळी त्यांच्या समोर एक टेपरिकॉर्डर ठेवण्यात आला.हा टेपरिकॉर्डर एका इसमाने ठेवला होता.खोमेनी तरीही लोकांच्या प्रश्‍नांना उत्तरे देत होते.पण,अचानक त्यात एक स्फोट झाला.खाेमेनी रक्ताने माखले गेले.टेपरिकॉर्डरच्या आत लिहले होते ‘इस्लामिक रिपब्लीक के लिये फूलकान ग्रूप का तोहफा!‘.
फूलकान ग्रूप हा इराणी दहशतवाद्यांची एक संघटना होती जी शिया तत्वज्ञानाला मानत होती व इराकचे राष्ट्रपती सद्दाम हुसैनचा पाठीराखा होती.सद्दाम हुसैन हा देखील इराणमधील रोहूल्ला खोमेनीची राजवट नष्ट करु पाहत होते.सद्दामच्या या मोहिमेत आयजीसीचे प्रमुख अली खोमेनी हे फार मोठे अडसर ठरले होते.या हल्ल्यात अली खोमेनीच्या उजव्या हाताला खूप मोठे नुकसान झाले.त्यांचा आवाज खराब झाला.त्यांना तेहरानच्या बेहरुलू रुग्णालयात भर्ती करण्यात आले मात्र,अनेक महिनांच्या उपचारानंतर देखील ते पूर्णपणे बरे झालेच नाही.त्यांचा उजवा हात पूर्णपणे निकामी झाला होता व एका कानाची ऐकण्याची शक्ती नष्ट झाली होती.या हल्ल्यानंतर एक दिवस अली खोमेनीने म्हटले की,‘जर माझं डोकं आणि जीभ काम करत आहे तर मला हातांची गरज नाही.’
दोन महिन्यानंतर ३० ऑगस्ट १९८१ रोजी तेहरानच्या पंतप्रधान कार्यालयात नॅशनल सिक्यूरिटी काऊंसिलची एक बैठक सुरु होती.या बैठकीत त्यावेळेचे इराणचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद अली रजाई व पंतप्रधान मोहम्मद जवर हे देखील उपस्थित होते.याच वेळी एमइच्या एका दहशतवादी मसूद कश्‍मीरीने एका सूटकेसमध्ये स्फोटके ठेवली.थोड्यावेळात त्यात एक मोठा स्फोट होतो व या हल्ल्यात पंतप्रधान व इराणचे राष्ट्राध्यक्ष यांच्यासह बैठकीत उपस्थित असणारे सगळे लोक मारल्या जातात.
हा एक असा काळ होता ज्याने इराणच्या राजवटीला खोलवर हादरवून टाकले.देशभरातून नव्या राष्ट्राध्यक्षांसाठी मागणी उठू लागली.रोहूल्ला खाेमेनी व आयआरसीच्या इतर सर्व मोठ्या नेत्यांनी राष्ट्राध्यक्ष पदासाठी आता अली खोमेनीचे नाव पुढे केले.२ ऑक्टोबर १९८१ रोजी इराणमध्ये राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणूका झाल्या.१३ ऑक्टाेबर १९८१ रोजी जेव्हा या निवडणूकीचा निकाल लागला तेव्हा असं घडलं की अली खोमेनीसाठी फक्त रोहूल्ला खोमेनीचाच पाठिंबा नव्हता तर ९५ टक्के मत अली खोमेनीला इराणचा राष्ट्राध्यक्ष होण्यासाठी पडली होती.
या मतदानानंतर ते इराणचे तिसरे राष्ट्राध्यक्ष बनतात.शपथ घेतानांच त्यांनी सांगितले की माझा जीव देईल पण इस्लामिक क्रांतीला वाचवण्यासाठी आणि इराणच्या आवामाची खिदमत करण्यासाठी मागे हटणार नाही.यातच चार वर्षे उलटून जातात.१९८५ हे वर्ष उजाडतो.हे तेच वर्ष होते जेव्हा रोहतुल्ला खाेमेनी यांना आपला उत्तराधिकारी घोषित करायचा होता.त्यांनी हुसैन अली मुर्तूज अलीला आपला उत्तराधिकारी घोषित केला.मात्र,काहीच दिवसांनंतर हा निर्णय बदलल्या जातो.यानंतर पुन्हा चार वर्षे उलटून गेली पण रोहूल्ला खोमेनीने उत्तराधिकारीची घोषणा प्रलंबित ठेवली होती.परंतु, ३ जून १९८९ रोजी त्यांचे निधन झाले.
आता इराणसाठी इराणचा पुढील सुप्रीम नेता निवडण्याची वेळ आली होती . दुस-या दिवशी रोहूल्ला खोमेनीची ३५ पानांची एक लिफाफाबंद वसीयत होती ती सर्व सर्वोच्च नेत्यांच्या बैठकीत उघडली जाते.महत्वाचे म्हणजे,हे वाचन अली खोमेनी यांनीच केले.
यानंतर याच बैठकीत एक प्रस्ताव ठेवण्यात आला की एक लीडरशिप काऊंसिल बनवली जावी,काऊंसिलच्या निर्णयानंतर इराणचा सुप्रीम लीडर घोषित करावा किंवा एकाच व्यक्तिचे नाव घोषित करावे ज्याच्यावर इराणची राजवट चालविण्याचा भार असावा.या दोन्ही प्रस्तावांवर मतदान झाले.मतदानामध्ये ४८ मते एकाच व्यक्तिवर इराणच्या राजवटीचा कारभार सोपवावा या प्रस्तावाला मिळाले.लीडरशिप काऊंसिल गठीत करावी या प्रस्तावावर २३ मते पडली.आता वेळ होती उमेदवार निवडण्याची.उमेदवारीमध्ये दोघा जणांची नावे समोर आली.एक नाव होते अली खोमेनी व दूसरे नाव होते ग्रॅण्ड अयातुल्ला गोलपे गनी.यावर पुन्हा मतदान झाले.अली खोमेनीला ६० मते मिळाली तर गोलपे गनीला १४ मते मिळाली.अश्‍या रितीने अली खोमेनीच्या हातात इराणच्या राजवटीचा कारभार आला.
मात्र,यात ही एक अडथळा होता.इराणच्या संविधानानुसार इराणचा सर्वोच्च नेता तोच बनेल जो अयातुल्ला असेल.अयातुल्ला म्हणजे इराणच्या शिया मुसलमानांचा धार्मिक नेता.या नियमावर अली खोमेनी पात्र ठरत नव्हते.त्यामुळे इराणच्या संविधानातच ६ ऑगस्ट १९८९ रोजी बदल करण्यात आला आणि अली खोमेनी हे इराणचे सर्वोच्च नेते झाले.ज्या बैठकीत इराणचा सर्वोच्च नेता निवडण्यासाठी मतदान झाले त्या मतदानात सहभागी झालेल्या इमान कशानी यांनी फार नंतर एका मुलाखतीत सांगितले की,आमच्याकडे दूसरा पर्याय नव्हता.लवकर निर्णय घ्यायचा होता कारण इराकचे सैन्य इराणच्या सीमेवर येऊन धडकले होते.
अली खोमेनीच्या कार्यकाळाची सुरवातच इराणमधील विरोधकांना संपवण्यापासून झाली.पत्रकारांवरही अगणिक हल्ले झाले.महिलांच्या स्वातंत्र्यांवर अगणिक बंधने लादण्यात आली. खोमेनी या इराणच्या सर्वोच्च धार्मिक नेत्याने इस्लामिक कट्टरवादाला खतपाणी घातले.इराणमधील मुक्त संरचना संपुष्टात आली ,इतकंच नव्हे तर खोमेनीने इराक,लेबनान,सिरीया आणि यमनमध्ये दहशतवादी नेटवर्क बनवले.  
खोमनीच्या इराणने इस्त्राईलच्या अस्तित्वाला अमान्य केले होते.पेलेस्टीनच्या बाजूने समर्थन घोषित केले.हिजबूल,हमाससारखे दहशतवादी नेटवर्क हे जगाला खोमनी यांचीच देण आहे.या संघटनांनी इस्त्राईलविरोधात सातत्याने हल्ले केल्याचा इतिहास आहे.याशिवाय खोमनीने इराणला अणवस्त्र संपन्न देश बनवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला.अमेरिका आणि इस्राईलच्या बरोबरीने सैन्य सामर्थ्यसाठी शेवटच्या घटकापर्यंत अली खोमेनी प्रयत्नरत होते.
इजराईलचे इराणला घेऊन दोनच मुख्य उद्देश्‍य आहेत.एक तर इराणचे अणू संशोधन केंद्र पूर्णपणे नेस्तनाबूत करणे व दुसरे इराणची आयडीसी क्रांतीकारी संघटनासंपुष्टात आणने.यासाठीच इजराईलने २०१८ मध्ये इराणच्या तेहरानमधून तब्बल ५० हजार कागदपत्रांची चोरी केली.यानंतर जून २०२५ मध्ये याच कागदपत्रांच्या आधारावर इस्राईलने इराणच्या विविध अणू संशोधन प्रकल्पांवर बमवर्षाव केला.इजराईल हे मानतो की खोमेनीची हत्या झाली तर इराणचा अणू संशोधन प्रकल्प हा देखील संपुष्टात येईल व इराणची क्रांतीकारी चळवळ ही देखील थंड पडेल.मात्र,अली खोमेनीने आपल्या हयातीतच त्यांचा मुलगा मुस्तफा खोमेनीला आपला उत्तराधिकारी घोषित केले आहे.मात्र,आता इराणचे पूर्व शासक रझा पहलवी यांचा मुलगा जो अमेरिकेत राहत आहे,त्याच्याकडे इराणची राजवट सोपविण्याचा अमेरिकेचा डाव होता.
नोव्हेंबर २०२४ मध्ये डोनाल्ड ट्रम्प दुस-यांदा अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यानंतर रझा पहलवीने एका मुलाखतीत सांगितले की इराणमध्ये पुन्हा एकदा लोकशाही प्रस्थापित झाली पाहिजे,जी पुन्हा पाश्‍चात्य देशांसोबत खुशहाली,चांगले संबंध जोपासेल.इजराईलसोबत शांतिप्रिय चर्चा ठेवेल.
मात्र,गेल्या आठ दिवसांपसून इराणवर अमेरिका-इजराईलाचा हल्ला,त्यात अली खोमेनीसोबत नातेवाईकांचा झालेला मृत्यू,यांनतर इराण जोरदार पद्धतीने संपूर्ण मध्य पूर्वेतील अरब देशातील अमेरिकेच्या तळावर करीत असलेले हल्ले  बघता,जागतिक स्तरावरील महिलांच्या नैतिक,धार्मिक,आर्थिक,शैक्षणिक स्वातंत्र्यांची लढाई ही पुन्हा एकदा मागे पडून राजकीयस्तरावर स्फोटांमध्ये विलीन झालेली आढळते.
ट्रम्प यांनी युद्धकाळात काल अचानक पलटी खालली व आता ते इराणमधील धार्मिक नेत्याला पाठिंबा दर्शवतात.खोमेनी यांच्या हत्येनंतर याच ट्रम्प महोदयांनी इराणमधील महिलांना रस्त्यावर येऊन त्यांच्या स्वातंत्र्याचा आनंद साजरा करण्याचे आवाहन केले होते.घडले ही तसेच.इराणमधील लाखो महिलांनी खोमेनीचे छायाचित्र जाळून त्याने सिगारेट सुलगवतानाचे फोटो व्हायरल केले.तेच ट्रम्प आता इराणकडून त्यांचे युएईमधील संपूर्ण अमेरिकन सैनिक तळांवर झालेल्या हल्ल्यातून कावरेबावरे होऊन, इराणमध्ये पुन्हा एकदा एखाद्या कट्टर धार्मिक नेत्याच्या राजवटीला समर्थन देताना दिसून पडतात!इटलीला त्यांनी साठी इराणसोबत बोलणी करण्यासाठी पाठवले मात्र,इराणने अमेरिकेची मागणी साफ धुडकावली.तोच अमेरिका आज स्वत:च्या देशात ’जागतिक महिला दिन’साजरा करताना दिसून पडतोय…!यात इराणच्या महिलांवर पडणारी बंधनांची शेकडाे टन वजनाची जोखडे जागतिक महासत्तेच्या या विभूतीने किंबहून जोकराने,सोयीस्कररित्या दूर्लक्षीत केली.
थोडक्यात,इराणमध्ये खोमेनी यांच्या हत्येनंतर महिलांमध्ये दोनप्रकारे प्रतिक्रिया उमटलेली दिसून पडली.रोष आणि आनंदाची.खोमेनी हे इस्लामिक मूलतत्वांसाठीच म्हणजे धर्माच्या रक्षणासाठीच अशी राजवट राबवित होते,असे त्यांच्यासाठी रडणा-या महिलांचे म्हणने होते तर खोमेनीचे छायाचित्र जाळून त्याने आपली सिगारेट ओढणारे छायाचित्र प्रसिद्ध करणा-या इराणी महिला हा,खोमनीचा मृत्यू त्या २२ वर्षीय निष्पाप अमिनाच्या हत्येच्या सूड मानून आंनद साजरा करीत असताना दिसून पडल्या.खोमेनी हे कसे ही शासक असले तरी स्वत:च्या देशासाठी ते एक किती चांगले शासक होते हे त्यांच्या मृत्यूनंतरही बलाढ्य अमेरिका व इस्राईल कश्‍याप्रकारे नामोहरम झाले आहेत,यावरुन दिसून पडतं.तसेच महिलांसाठीचे त्यांचे धोरण हे लहापणापासूनचे घरातील धार्मिक वातावरण  कुराणचे शिक्षण,स्वत: मौलवी राहीले असल्याने घट्ट रुजलेले तर्क,विचारसरणी याकडे दोष देता येईल.माणूस मरतो,विचारसरणी आणि धार्मिक संस्कार हे संपवता येत नाही,हे पुन्हा एकदा अली खोमेनी यांच्या जीवनावरुन आणि धोरणांवरुन सिद्ध होतं….!
कदाचित इराणच्या राजवटीत मोठा बदल होऊन वेगळ्या विचारपद्धतीचा शासक इराणमध्ये होऊ शकतो.भविष्यकाळातील ही आशाच इराणमधील महिलांसाठी पुढील जागतिक महिला दिवस आशेची नवी किरण घेऊन येऊ शकेल.
(वाचा पुढील भागात भारतातील जागतिक महिला दिन)
………………………………………………………
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या