Homeसांस्कृतिक / मनोरंजनवसाहतवाद ते व्यवसायिकवादावर मार्मिक व्यंग

वसाहतवाद ते व्यवसायिकवादावर मार्मिक व्यंग

‘मुगलों नें सल्तनत बख्श दी’नाटकाचा अप्रतिम प्रयोग

राष्ट्रभाषा परिवार सामाजिक संस्थेचा उपक्रम

नागपूर,ता.२८ एप्रिल २०२६: मोगलांच्या काळात मुगल हे कश्‍याप्रकारे सत्ता आणि सुंदरीमध्ये व्यग्र असत,कशाप्रकारे एक इंग्रज शाहजहाँच्या भोळेपणाचा फायदा घेऊन,त्यांच्या सल्तनतमध्ये फक्त एक तंबू गाडण्याची व त्या तंबू खालील जमीन इंग्रजाला देण्याची परवानगी मागतो,मुगल बादशाह त्याला परवानगी देतो,मग कशाप्रकारे तो इंग्रज कलकत्तामध्ये तंबू गाडतो,इंगलॅण्डमधून संपूर्ण फौज आणतो,त्यांचे तंबू प्लासीपर्यंत पाेहोचतात,मग काशी,मथूरा, आग्रा व नंतर राजधानी दिल्ली. हरकारा(वर्णी देणारा) अनेकवेळा बादशहाला येऊन याची वर्णी देतो पण,पूर्वजांच्या वचनामध्ये फसलेला बादशाह तलवार उचलत नाही उलट दिल्लीचा तख्त सोडून, आपली सल्तनत इंग्रजांना बख्शून देतो.काशी विश्‍वनाथ ते दिल्लीचा तख्त,यांचा उल्लेख, अप्रत्यक्षपणे त्या काळी हिंदू असो किंवा मुस्लिम,संकट घराच्या आत आलं तरी किती बेफिकिर होते,यावर जणू व्यंग करतो.
दीडशे वर्ष भारतावर राज्य केल्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळतं मात्र, पाश्‍चात्यांची आधूनिक वसाहत जाहीराती व विविध वस्तूंच्या विक्रीच्या माध्यमातून तरीही भारतीयांवर राज्य प्रस्थापित करतात,त्यांना भोगवस्तूंचे गुलाम बनवतात,अगदी साबूण,टूथपेस्ट,बिस्कूट,कोकाकोला,पेप्सी ते ब्लिंकिट पर्यंत जवळपास ३०० परदेशी उत्पादने व सोशल मिडीया प्लॅटफॉर्म आज १४० कोटीं भारतीयांना व्यवसायिक गुलामगिरीत जखडून ठेवीत आहे,हा मार्मिक व्यंग उलगडला आहे आज राष्ट्रभाषा परिवार सामाजिक व सांस्कृतिक संस्थेतर्फे सादर झालेल्या ‘मुगलो ने सल्तनत बख्श दी’ या नाट्यप्रयोगाने.

भारताचेच पाणी,जमीन आणि संपूर्ण नैसर्गिक संसाधने वापरुन या विदेशी कंपन्या अब्जावधींचा नफा त्यांच्या देशात घेऊन जात आहेत,भारताला यातून काय मिळत आहे?उद्या या देशातील श्‍मशान घाट हे देखील विदेशी स्पॉनर्सच्या जाहीरातीतून भारतीयांना मिळू शकेल. ‘श्‍मशानघाट’ स्पॉनसर बाय Whisper’श्‍मशानातील मुडदे ही मग बोलतील,‘ये दिल मांगे मोर’.कब्रिस्तान देखील एखादी विदेशी कंपनी स्पॉन्सर करतील व त्यासाठीही अशीच आकर्षक जाहीरात बनवून भारतीयांना मोहात पाडतील.‘हे कलियुग नाही कोक युग आहे’हा संवाद,भारतात पराकोटीच्या विदेशी व्यवसायिकवादावर व्यंगात्मक टिका करतो.
‘खरी समस्या भारताचे अहोरात्र दोहन आणि शोषण करणा-या कोकाकोला फॅक्टरीमध्ये नसून भारतीयांच्या ‘सवयीं’मध्ये आहे’या संवादात तरुणाईसाठी एक संदेश लपला आहे.
नाटकात,ट्रम्प यांचे भारताताील निर्यात होणा-या वस्तूंवरील ५० टक्के टेरिफ,५०० बिलियन डॉलरच्या व्यापारिक कराराचा संदर्भ,इराण व रशियाकडून तेल न घेण्याची अट व भारतातील राजकीय धुरिणांची परराष्ट्रीय धोरणातील अगतिकता,यावर देखील संवादाच्या माध्यमातून व्यंगात्मक टिका प्रेक्षकांच्या कानी पडते व टाळ्यांचा कडकडाट होतो.
हे नाटक राष्ट्रभाषा परिवार सामाजिक,सांस्कृतिक संस्थेच्या वतीने ४५ दिवसीय नाट्य कार्यशाळेत सहभागी विद्यार्थ्यांनी अप्रतिमरित्या सादर केले.रंगमंचावर त्यांचा वावर अगदी सहज व कसलेला होता.यावरुन जेन-झी ची कामाप्रतिची कटिबद्धता दिसून पडते.हे विद्यार्थी अगदी पहिल्यांदा रंगमंचावर नाटक सादर करीत आहेत,याची कुठेही प्रेक्षकांना जाणीव झाली नाही.अवघ्या तीन आठवड्याच्या रिहर्सलनंतर हे नाटक बसवण्यात आलं तर एका आठवड्या आधीपर्यंत संवादाचा सराव करीत असल्याचे नाटकात मुख्य सूत्रधाराची भूमिका साकारणा-या कार्तिक मुलतानी याने खास ‘सत्ताधीश’ला सांगितले.

(छायाचित्र:जाहीरातींचा भडीमार…भारत बेजार..!नाटकातील एक व्यंगात्मक दृष्य साकारताना कार्तिक मुलतानी व अन्य)

कार्तिक मुलतानी हा व्होकहॉर्ट रुग्णालयात न्यूरोसर्जन असून त्याला नाटकाची आवड खूप आधीपासून आहे.आपल्या अतिशय व्यस्त दिनचर्येतून आपल्या आवडत्या छंदासाठी त्याने आवर्जून वेळ काढला व ही कार्यशाळा अटेंड केली.या नाटकात त्याची मध्यवर्ती भूमिका होती,जी त्याने अतिशय चोखपणे साकारली.याशिवाय सुजल दुधे,प्रज्वल सोनटक्के,कार्तिक मुल्तानी,जान्हवी जुम्हारे,दिप्ती गुडधे,सलोनी राठौड,राहूल सुखदेवे या सर्व कलावंतांनी नाटकात जीव ओतला.

महत्वाचे म्हणजे या कलावंतांच्या वाट्याला एक साथ तीन-तीन भूमिका आल्या होत्या मात्र,कुठेही गल्लत न करता,कपडे बदलून मंचावर येत ते सहज आपल्या भूमिकेत शिरत होते,मग ती मोगलकालीन भूमिका असो किंवा आधूनिक भारतातील जाहीरातींचे जग साकारणे असो.या कलावंतांनी अगदी पहिल्यांदा मंचावर सादरीकरण केले आहे,यावर प्रेक्षकांचाही विश्‍वास बसला नाही.
‘मुगलो ने सल्तनत बख्श दी’ही मूळ कथा भगवती चरण वर्मा यांची असून यावर राजेश कुमार यांनी तयार केलेल्या एकल(monoact)सादरीकरणावरुन हे विडंबनात्मक नाट्य तयार करण्यात आले आहे.या नाटकाचे दिग्दर्शन युवा पिढीचा प्रयोगशील दिग्दर्शक रुपेश पवार याने केले.कार्यशाळेच्या प्रक्रियेदरम्यानच त्याने या नाटकाची रुपरेषा आखली व उत्कृष्ट सादरीकरण करवून घेतले.
युवा विद्यार्थ्यांसाठी ४५ दिवसांची ही कार्यशाळा मंगला सानप व गुरुविंदर कुमार(राष्ट्रीय नाट्य विद्यालय,नवी दिल्ली)यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी थिअट्रिकल गेम्स,विविध एक्सरसाइज,आवाजाचे तंत्र,शरीराच्या संवेदनांची जाणीव, अभिनयातील बारकावे यांचा सखोल अनुभव घेतला असल्याची माहिती देण्यात आली.राष्ट्रभाषा परिवाराचे अध्यक्ष राजाराम शुक्ल यांच्या हस्ते कार्यशाळेतील सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
या प्रयोगाला ज्येष्ठ नाट्यकर्मी पराग घोंगे,अजय गंपावार,सुपंथ भट्टाचार्य,अतुल-प्राजक्ता,प्रदीप वैद्य यांच्यासह अनेक नाट्यरसिकांनी उपस्थिती लावली.
रंगमंचा मागील सहायक कलावंत अमित मेश्राम,सागर रंगलानी,अल्पना गुप्ता,वैष्णवी,पुष्पक भट,अंकित ठाकरे हे होते.ध्वनि व्यवस्था मयूर मानकर,प्रकाश योजना अक्षय खोब्रागडे तर रंगभूषा ऋतुजा वानखेडे यांची होती.

राष्ट्रभाषा संकुलातील एका लहानशा हॉलमध्ये दरवेळी तरुणाई गेल्या दीड दशकांपासून अप्रतिम नाटकांचे सादरीकरण करते,प्रेक्षक ही दाटीवाटीने बसतात.नाट्यप्रेमींचं त्यांना भरभरुन प्रेमही मिळतं मात्र,सीताबर्डीसारख्या ठिकाणी अनोखे व काळानुरुप प्रयोग करणारा प्रयोगशील तरुण रुपेश पवार व त्याच्या चमूला हक्काचे एक लहानशे नाट्यगृह मिळावे,यासाठी नागपूरातील राजकीय नेत्यांनी पुढाकार घेण्याची मागणी देखील पुन्हा एकदा ऐकू आली.
झाेपडपट्टीतील बाल कलांवतांसाेबत ‘अक्कड बक्कड’-
रुपेश पवार व त्याची चमू ही नागपूर शहरातील विविध झोपडपट्टीत जाऊन बाल प्रतिभांचा शोध घेते.त्यांची कार्यशाळा घेते.त्यातून प्रतिभावान मुलांना घेऊन नाटक बसवते.या निमित्ताने जिवनाचा हा देखील एक ‘रंग’आहे याची जाणीव त्या निरागस व ‘नाही रे’गटातील मुलांना होते.येत्या ९ मे रोजी सीताबर्डी ,उत्तर अंबाझरी मार्गावरील राष्ट्रभाषा संकुलात याच मुलांचा ‘अक्कड बक्कड’हा नाट्यप्रयोग होणार आहे.प्रेक्षकांनी या मुलांना प्रोत्साहित करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रभाषा सामाजिक व सांस्कृतिक संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
(बातमीशी संबंधित व्हिडीयो sattadheesh official युट्यूब चॅनलवर उपलब्ध)

Latest बातम्या