फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeblogदिल-ए-नादां तुझे हूआ क्या है...

दिल-ए-नादां तुझे हूआ क्या है…

(वेलेंटाईन डे स्पेशल (भाग-४)

नागपूर,ता.१० फेब्रुवरी २०२६: बोलक्या डोळ्यांची आणि निरागस सौंदर्य लाभलेली अभिनेत्री व गायिका सुरैय्या चाळीसच्या दशकातली सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री होती.सुरैय्या हे नाव घेताच तिचा सुंदर चेहरा व अतिशय बोलके डोळे लोकांच्या नजरेसमोर येतात.सुरैयाचे पूर्ण नाव सुरैया जमाल शेख असून १५ जून १९२९ रोजी लाहोरमध्ये अजीज जमाल शेख आणि मुमताज शेख यांच्या घरी तिचा जन्म झाला.सुरैय्या एक वर्षाची असताना तिचे मामा एम.जहूर यांनी तिच्या कुटूंबाला मुंबईत घेऊन आले व पुढे वयाच्या ७ व्या वर्षी बेबी सुरैय्या सिनेमात दिसली. जहूर हे इंडस्ट्रीतल प्रसिद्ध खलनायक पैकी एक होते.सुरैय्या यांचे पूर्ण शिक्षण मुंबईत झाले.ती ऑल इंडिया रेडिओत लहान मुलांच्या रेडिओ कार्यक्रमात गात असे.एकदा सुरैय्या तिच्या मामांसोबत मोहन स्टूडियोत ‘ताजमहल’चित्रपटाचे शुटिंग पाहण्यासाठी गेली.तिथे चित्रपट निर्माते नानू भाई ,सुरैय्या यांच्या सौंदर्याने व साधेपणाने इतके प्रभावित झाले की त्यांनी चित्रपटातील ‘मुमताज महल‘साठी सुरैय्याची निवड केली. यानंतर सहनायिकेच्याही भूमिका सुरैय्याने साकारल्या.नंतर ‘इशारा’या चित्रपटात ती नायिका म्हणून झळकली.
एकदा नौशाद यांनी ऑल इंडिया रेडिओवर सुरैय्या यांना गाताना ऐकले.त्यांना सुरैय्या यांची गाण्याची शैली खूप आवडली.यानंतर त्यांनी सर्वात आधी सुरैय्या यांना कारदार साहेबांच्या ‘शारदा’चित्रपटात गाण्याची संधी दिली.याच काळात गायिका म्हणूनही ती लोकप्रिय होऊ लागली.अगदी मधूबालाही सुरैय्याची चाहती होती.सुरैय्याचा चित्रपट रिलिज होणार त्यावेळी हजारो चाहते प्रेक्षक सिनेमागृहाबाहेर रांगा लावण्याचा तो काळ होता.
देव आनंद आणि सुरैया यांची प्रेमकहाणी बॉलिवूडमधील सर्वात गाजलेल्या आणि दूर्देवी प्रेमकहाणींपैकी एक आहे.१९४० च्या उत्तरार्धात ‘विद्या‘आणि ‘जीत‘सारख्या चित्रपटांमधून एकत्र काम करताना या दोघांमध्येही प्रेम बहरले.सुरैया त्या काळात सुपरस्टार होत्या,तर देव आनंद संघर्ष करत होते.धार्मिक विरोधामुळे,प्रामुख्याने सुरैयाच्या आजीच्या विरोधामुळे,हे प्रेमाचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकले नाही.यानंतर सुरैया आयुष्यभर अविवाहित राहीली मात्र,पुढे देवआनंद यांनी अभिनेत्री कल्पना कार्तिकसोबत विवाह केला.
देव आनंद आणि सुरैया यांची पहीली भेट १९४७ साली ‘जिद्दी’चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान झाली.’विद्या’चित्रपटाच्या चित्रिकीरणाच्या वेळी मात्र,त्यांच्या मनात एकमेकांविषयी आकर्षण निर्माण झालं.फक्त ४-५ वर्ष हे नांत बहरलं परंतू सुरैयाच्या आजीच्या तीव्र विरोधामुळे ते लग्न करु शकले नाही आणि ब्लॅक ॲण्ड व्हाईट काळातील बॉलिवूडमधील आणखी एक लोकप्रिय जोडपे प्रेमभंगाच्या अग्नित होरपळून निघाले..!
या जोडप्याने ‘विद्या’,‘जीत’,शायर’,’अफसर’,’नीली’,’दो सितारे’ आणि ‘सनम’ यासारख्या ७ चित्रपटात एकत्र काम केलं .हे दोघेही एकमेकांना लाडाने ‘स्टीव’आणि ’नोसी’संबोधित असत.सुरैया ही अतिशय सुंदर अभिनेत्री असून त्या काळी तिला ’मलिका-ए-हुस्न’संबोधले जायचे.ही प्रमकहाणी बॉलिवूडमधील ‘रोमियो-जुलिएट’जोडी म्हणून ओळखली जाते कारण शेक्सपिअरच्या नाटकातील शोकांतिकासारखीच या प्रेमकहाणीचीही शोकांतिका झाली.
माझा देवच्या प्रेमावर विश्‍वास होता,पण..मी स्वत:वर विश्‍वास ठेऊ शकले नाही.मी गोंधळले होते,जेव्हा मी देवशी लग्न करण्यास नकार दिला तेव्हा त्याने मला ‘भित्री’म्हटले.कदाचित मी भित्रीच होते.लग्न करण्याची हिंमत माझ्यात नव्हती.ही कदाचित माझीच चूक असेल किंवा नशीबाने केलेला दगा…!सुरैय्या यांनी एका मुलाखतीदरम्यान तिच्या आयुष्यातील हा दु:खरा अध्याय प्रथमच खुला केला होता.सुरैय्या यांचे देव आनंदवर जीवापाड प्रेम होते,पण कुटूंबाच्या विरोधात जाऊन लग्न करण्याचे धैर्य त्यावेळी तिच्यात नव्हते.
मूळात भारतीय समाज व्यवस्थेत प्रत्येक मुलीच्या जीवनात कुटूंब आणि नातेसंबंधांना खूप महत्वं असतं.फक्त प्रेमासाठी कुटूंबियांचे मन दु:खवून स्वत:च्या सुखाचा,आनंदाचा आणि स्वार्थाचा विचार सहसा मुली करण्यास धजत नाही वरुन तो काळ…चाळीसच्या दशकाचा होता…!अभिनयाचे स्वातंत्र्य असले तरी आयुष्याचे नव्हते..!लहानपणापासून ज्या कुटूंबात वाढलो,वावरलो,घडलो ते कुटूंब स्वत:च्या प्रेमाच्या भावनेपेक्षा निश्‍चितच मुलींच्या जीवनात वरचढ ठरतं. सुरैया सारखी मनस्वी अभिनेत्री देखील या भावनेला अपवाद नव्हती.
ज्या वेळी सुरैयाने देव आनंदला, कुटूंबाच्याविरोधात जाऊन लग्न करणार नाही हा निर्णय ऐकवला त्यावेळी देव आनंदच्या मनाची स्थिती काय झाली असेल,याचा विचार प्रत्येक प्रेमभंग झालेला प्रेमवीर करु शकतो.सुरैया देव आनंदसाठी सर्वस्व होती,एका क्षणात ती खूप परकी झाली आणि…तिच्या शिवाय आयुष्य कंठणे देव आनंदला फार-फार जड जाणार होते.
सुरैया आणि देव आनंद शेवटच्या वेळी तिच्या घरातील बाल्कनीत भेटले आणि एकमेकांना घट्ट मिठी मारुन खूप रडले.पण शेवटी पुरुषी ‘मन’होतं जे सुरैयाच्या निर्णयानंतर खूप दूखावल्या गेलं होतं…!. या भेटीनंतर देव आनंदला स्वत:ला सावरायला खूप वेळ जाऊ द्यावा लागला.तिचे अगतिक अश्रूं आणि तिच्या अगणिक आठवणी त्याच्या मनाला घायाळ करत होते पण,ज्या नात्याला कोणतेही भविष्यच नाही,त्या नात्याच्या मागे धावण्यास देव आनंदच्या मनाने नकार दिला व या शेवटच्या भेटी नंतर देव…सुरैयाची कधीही भेट झाली नाही.देव आनंद यांनी त्यांच्या ‘रोमान्सिंग विथ लाइफ:देव आनंद’या आपल्या आत्मचरित्रात याचा उल्लेख केला आहे.
३१ जानेवरी २००४ रोजी सुरैय्या यांचे निधन झाले त्यावेळी सर्वांच्या नजरा देव आनंदला शोधत होत्या मात्र,देव आनंद आले नाहीत.हा एका ख-या प्रेमाचा पराभव होता की दू:खाचा?असा प्रश्‍न सर्वांना पडला कारण सुरैय्या या देवसाठी आयुष्यभर अविवाहित राहील्या होत्या…!सुरैय्याचं जगणं देव..याच नावावर थांबलं होतं..संपलं होतं..!
१९३६ ते १९६३ पर्यंत सुरैय्या यांनी हिंदी चित्रपटसृष्टित काम केले.आयुष्याच्या अखेरच्या सहा महिन्यांत सुरैय्या त्यांचे वकील धीमंत ठक्कर यांच्या कुटूंबासोबत राहत होती.त्यांनीच तिला आजारी पडल्यावर रुग्णालया दाखल केले होते.तिला ‘हायपोग्लायसेमिया’सारख्या अनेक गंभीर आजारांनी ग्रासले होते.वयाच्या ७४ व्या वर्षी तिने या जगाचा निरोप घेतला.सुरैय्या यांना १९९६ स्क्रीन लाइफटाइम अचीवमेंट अवार्डने सन्मानित करण्यात आले.याच वर्षी तिच्या नावाने पोस्टाचे तिकीट जारी झाले तर २००३ साली तिला प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सुरैय्या तिच्या काळातील सर्वात सुंदर आणि सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री होती.दिलीप कुमार सारख्या बड्या अभिनेत्यालाही सुरैय्यासोबत काम करायचं होतं.त्यांनी दिग्दर्शक के.आसिफ यांच्याकडे त्यांना व सुरैय्या यांना घेऊन चित्रपट बनवण्याची विनंती केली होती.के.आसिफ यांनीही याला होकार दिला.या दोघांसोबत त्यांनी ‘जानवर’या चित्रपटाची घोषणा केली.या चित्रपटाची शुटिंग सुरु झाली मात्र,एका सीनच्या शुटिंगच्या वेळी सुरैय्याला दिलीप कुमारचा इतका राग आला की त्यांनी पुन्हा कधीही दिलीप कुमारसोबत काम केलं नाही.या शुटिंगदरम्यान खूप गदारोळ झाला होता.या सीनमध्ये,सुरैय्या यांच्या पायाला सांप चावतो आणि तिचा जीव वाचवण्यासाठी दिलीप कुमार यांना तिच्या पायातून विष काढायचे होते.हा सीन एका शॉटमध्ये परफेक्ट पद्धतीने शूट करण्यात आला होता.पण,तोच सीन अनेक वेळा रिशूट करण्यात आल्याने सुरैय्या अस्वस्थ झाली.हा प्रकार त्यांच्या मामालाही कळला.
दूस-या दिवशी जेव्हा त्या सेटवर पोहोचल्या तेव्हा त्यांना पुन्हा तोच सीन शूट करण्यास सांगण्यात आले.यावेळी दिलीप कुमार यांनी सुरैय्या यांच्या पायतील विष बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरु करताच,सुरैय्यांनी आपला पाय ओढला आणि उभ्या राहिल्या.त्यांना दिलीप कुमारचा खूप राग आला होता.दरम्यान,सुरैय्याचे मामाही तिथे आले आणि त्यांनीही दिलीपकुमारला मारण्याचा प्रयत्न केला.मात्र,के.आसिफ मध्ये पडले.या घटनेनंतर सुरैय्याने पुन्हा दिलीप कुमारसोबत एकाही चित्रपटात काम न करण्याचा निर्णय घेतला.या निर्णयानंतर के.आसिफ सुरैय्यावर खूप चिडले होते.चित्रपटासाठी इतका पैसा खर्च केला,त्याची भरपाई कोण करणार,असे ते म्हणाले.त्यानंतर सुरैय्याने के.आसिफ यांना चेक भरुन दिला आणि रागात सेट सोडला.त्या दिवसानंतर तो चित्रपट कधीच पूर्ण झाला नाही.
दिलीप कुमार हे त्याकाळी सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेते होते.त्यांना एका चित्रपटासाठी १ लाख रुपये मिळत होते तर सुरैय्या या अभिनेत्रींमध्ये सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री असून जवळपास सर्वच चित्रपटांसाठी तिने ४० ते ५० हजार रुपये मानधन घेतले.तिच्या चाहत्यांमध्ये तिची लोकप्रियता इतकी होती की,तिला एक नजर बघण्यासाठी तिच्या घरासमोर चाहत्यांची मोठी रांग असायची,गर्दी एवढी असायची की,ट्रॅफिक जाम असायचा.सुरैय्या यांना ‘मल्लिका-ए-हुस्न’,‘मल्लिका-ए-तरन्नुम’ आणि ‘मल्लिका-ए-अदाकारी’या नावाने देखील ओळखले गेले.
एकदा सुरैय्या यांना त्यांच्या एका चित्रपटाच्या प्रीमियरला जायचे होते.घराबाहेर उभी गर्दी टाळत कशातरी त्या थिएटरमध्ये पोहोचल्या.सुरैय्या यांना कोणी ओळखू नये म्हणून थिएटरमध्ये खूप खबरदारी घेण्यात आली होती.परंतू तिथे उपस्थित असलेल्या एका दर्शकाने तिला ओळखले व खूप जोरात ओरडला,’अरे,ही सुरैय्या आहे’हे ऐकताच जमाव सुरैय्यावर तुटून पडला.सुरैय्याला गर्दीने घेराव घातला.यात तिची ओढणी हातातून निसटून गेली.
सुरवातीला सुरैय्यासोबत असलेले सुरक्षा रक्षक बराच वेळ गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत राहीले.मात्र,शेवटी पोलिसांना बोलवावे लागले.या घटनेचा सुरैय्या यांच्यावर इतका वाईट परिणाम झाली की,त्यांनी सार्वजनिक ठिकाणी जाणे बंद केले.या घटनेनंतर त्यांनी कधीही त्यांच्या चित्रपटांच्या प्रीमीअरलाही हजेरी लावली नाही.
सुरैया यांचे चाहते फक्त भारतातच नाही तर हॉलिवूडमध्ये देखील होते.पण,सुरैय्या स्वत:हॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते ग्रेगरी पेक यांची चाहती होती.त्यांनाही तिला भेटायचं होतं.१९५२ मध्ये भारतात पहिला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव झाला.यावेळी सुरैय्या यांनी हॉलिवूडचे दिग्दर्शक फ्रँक कॅप्राची भेट घेतली होती.सुरैय्याने आपल्या एका फोटोवर स्वाक्षरी करुन कॅप्रा यांना दिले आणि हा फोटो परत गेल्यावर ग्रेगरी पेकला देण्यास सांगितले.
यानंतर एकदा ग्रेगरी भारतात आल्यावर त्यांनी सुरैय्या यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. मीडिया रिपोर्टनुसार,ग्रेगरी रात्री ११ वाजता सुरैय्याला भेटण्यासाठी तिच्या घरी पोहोचले होते.त्यांनी घराच दार वाजवले.सुरैय्याच्या आईने दरवाजा उघडला.ग्रेगरीने सुरैय्या मॅडम कुठे आहे?अशी विचारणा केली.ग्रेगरी यांच्या आगमनाची बातमी सुरैय्याला समजल्यानंतर तिला अत्यंत आनंद झाला.दोघांनी सुमारे तासभर चर्चा केली.

केवळ ग्रेगरीच नव्हे तर देशाचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरु हे देखील सुरैय्याचे चाहते होते.१९५४ मध्ये सुरैय्या यांचा ‘मिर्झा गालिब’हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळी नेहरु यांनाही आमंत्रित करण्यात आले होते.याच कार्यक्रमा दरम्यान नेहरु व सुरैय्याची भेट झाली.ते सुरैय्याला म्हणाले,‘तुम्ही गालिबचा आत्मा जिवंत केला आहे’,पंतप्रधानांची ही स्तुती ऐकून सुरैय्या खूप आनंदीत झाली.नोव्हेंबर १९५६ मध्ये भारत सरकारने सुरैय्या यांना सोव्हिएत संघात पाठवले होते.येथे त्यांच्या चित्रपटांचे स्क्रीनिंगही झाले होते.
१९४८ मध्ये रिलीज झालेल्या ‘विद्या’या चित्रपटाचे चित्रिकरण सुरु झाले होते पण,हिरो कोण असणार हे ठरत नव्हते.एके दिवशी सुरैया सेटवर खुर्चीवर बसली होती.तेवढ्यात त्यांची नजर कोप-यात बसलेल्या एक तरुणावर पडली जो सुरैय्याकडे टक लावून पाहत होता.सुरैय्याने निर्मात्याला फोन करुन हे सांगितले.
जो तरुण खुर्चीवर बसला आहे,त्याला तिथून हटवा,तरच मी काम करु शकेन,असे त्या म्हणाल्या.निर्माता देव आनंदकडे गेला,पण त्याला बाहेर पाठवण्याऐवजी सुरैय्याकडे घेऊन गेले आणि हसतमुखाने त्याची ओळख करुन दिली,’भेटा,हा आमच्या चित्रपटाचा नायक देव आनंद आहे’.
सुरैय्या काही बोलणार तेवढ्यात देव आनंद म्हणाला,’एकत्र काम करण्यापूर्वी एवढ्या मोठ्या अभिनेत्रीला नीट बघायला हवे,माफ करा’.या भेटीनंतर दोघेही चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त झाले.रोजच्या भेटीनंतर दोघांमध्ये घट्ट मैत्री झाली आणि नंतर दोघेही एकमेकांना आवडू लागले.दोघांची नजर एकमेकांना सेटवर शाेधू लागली.‘दिल को हाय तेरी तस्वीर से बहलाये हूये है,दिल को….!’
सेट व्यतिरिक्त देव आनंद सुरैय्याच्या घरीही जायचे.ते दोघे एकत्र बाहेर जायचे,पण काही दिवसांनी सुरैय्याच्या आजीला त्यांच्या नात्याची चाहूल लागली..सुरैय्याचे लग्न गैरधर्माच्या मुलाशी व्हावे हे आजीला अजिबात मान्य नव्हते.चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान सुरैय्याची आजी त्यांच्यासोबत सेटवर हजर राहू लागली.त्यामुळे देव व सुरैय्यावर अनेक बंधने आली.एकमेकांसोबत बोलण्यासाठी ते तरसू लागले.फोनवर बोलणे शक्य नसल्याने दोघेही पत्राच्या माध्यमातून मनाच्या भावना एकमेकांपर्यंत पोहोचवू लागले.
१९४९ साली ‘जीत’च्या शुटिंग दरम्यान देव आनंद सुरैय्याला पळून जाऊन लग्न करण्यास सांगणार होते.पण,शुभ कार्यात सतराशे विघ्न म्हणतात तेच घडले.सुरैय्याच्या आजीला याची भनक लागली.सुरैय्याला पण कुटूंबाच्या विरोधात जायचं नव्हतं त्यामुळे तिने लग्नास नकार दिला आणि देव आनंदपासून अंतर ठेऊ लागली.ही नियतीची क्रूर थट्टाच होती ज्या देव आनंदवर तिने आयुष्यभर प्रेम केले,ज्याच्यासाठी मृत्यूपर्यंत अविवाहीत राहीली,त्याची धर्म आणि कुटूंबापलीकडे जाऊन‘ साथ‘ देण्यास मात्र,तिने नकार दिला होता… !
‘जिद्दी‘चित्रपटात एका सीनमध्ये देव आनंद यांना सुरैय्याच्या भूवयांचे चुंबन घ्यायचे होते.पण आजीने इतका विरोध केला की अखेर दिग्दर्शकाने तो सीनच रद्द केला.पुढे आजीचा हा विरोध इतका वाढला की,तिने देव व सुरैय्याच्या भेटी गाठी बंदच केल्या.फोनवर बोलणेही कठीण झाले.या स्थितीतही देव याने सुरैय्याला धीर दिला.पण,एका क्षणाला आजीच्या विरोधा पुढे सुरैय्या ही… तिच्यावर झालेल्या पारंपारिक संस्कारातून ‘दूर्बल’झाली.यानंतर एक दिवस ती देव आनंदला भेटली व मला विसरुन जा,आपलं लग्न होऊ शकत नाही,असं सांगितलं व त्याच्या आयुष्यातून कायमची निघून गेली.या भेटीनंतर देव आनंद भावाच्या खांद्यावर डोकं ठेवून खूप रडला…!
प्रेमासारखे पवित्र व महान नाते अश्‍या निष्ठूरतेने संपविण्यापेक्षा सुरैय्याने आजीला विरोध का केला नाही?याचे शल्य देव आनंदच्या मनाला बोचत राहीले.देव आनंद सुरैय्याच्या इतक्या गही-या प्रेमात पडला होता की त्याने प्रेमाची निशाणी म्हणून तिला खूप सुंदर अंगठी दिली होती.सुरैय्याने ती अंगठी मुंबईच्या समुद्रात फेकली पण,देव आनंदसोबतच्या प्रेमाच्या आठवणी तिने मृत्यूपर्यंत मनात जपून ठेवल्या व अखेरपर्यंत अविवाहीत राहीली.
मात्र,आयुष्य हे देव आनंदसाठी संपले नव्हते.जगप्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ अल्बर्ट एलिसच्या आत्मचरित्रात एक सुंदर संदेश आहे.जिवनात प्रत्येकाला दु:खं हे असणारच.हे दु:खं दोन प्रकारे माणसाला संपविता येतं.एक स्वत:चा आत्मनाश करुन किंवा दूसरे दु:खं सहन करुन…!देव आनंदने एलिस यांचा दूसरा मार्ग स्वीकारला होता.प्रेमभंगाच्या दु:खाच्या तीव्रतेवर ‘काळ’ हेच एकमेव औषध होते.देव आनंद आपल्या भावांसोबत ‘नवकेतन’ बॅनरच्या खाली निर्मित चित्रपटांमध्ये स्वत:ला व्यस्त ठेवीत राहीला.
१९५४ साली नवकेतनचा ‘टॅक्सी ड्रायव्हर’या चित्रपटाच्या सेटवरच शूटिंगच्या वेळी दीड तास गायब होऊन देव आनंद व कल्पना कार्तिक यांनी नोंदणी विवाह केला.फारशी प्रसिद्ध नसलेली कल्पना कार्तिक हिचे खरे नाव मोना सिंग होते.तिने नवकेतनच्याच ‘बाजी’चित्रपटात १९५१ मध्ये पदार्पण केले होते.यानंतर देव-कल्पनाचा ‘हमसफर’ंआणि ‘आंधिया‘आला मात्र,तो फारसा चालला नाही.या दोन्ही चित्रपटामुळे आर्थिक बोजा नवकेतनवर पडला होता,त्यातूनच ‘टॅक्सी ड्रायव्हर’च्या निर्मितीची सुरवात झाली.यानंतर या दोघांचाही ‘हाऊस नंबर ४४’,व ‘नौ दो ग्यारह’हे चित्रपट आले जे यशस्वी ठरले.लग्नानंतर कल्पनाने चित्रपटसृष्टि सोडली व सुनील आनंद व देविना आनंद या दोन मुलांची आई झाली.

कल्पना कार्तिक यांचा जन्म लाहोरमध्ये एका पंजाबी-ईसाई कुटूंबात झाला होता व ती देव आनंद यांची मोठी वहीणी हिच्या नात्याशी संबंधित होती.ती ‘मिस शिमला’झाल्यावर वहीनीने चेतन आनंदसोबत तिची भेट करुन दिली.तिचे वडील पंजाबमधील बळाला येथे तहसीलदार होते आणि ती ७ भावंडांमध्ये सर्वात लहान होती.फाळणी झाल्यावर तिचे कुटूंब शिमला येथे स्थलांतरित झाले.मोनाची चुलत बहीण ही आनंद कुटूंबातील सून असल्याने चित्रपटसृष्टित तिला पदार्पणासाठी संघर्ष करावा लागला नाही.
 कल्पना कार्तिक..असे तिचे नाव बदल्यानंतर १९५१ साली गुरु दत्त दिग्दर्शित आणि नवकेतन फिल्मस निर्मित ‘बाजी’या चित्रपटापासून तिला संधी मिळाली.या क्राईम थ्रिलर चिटपटाने खूप चांगला व्यवसाय केला.देव व कल्पना यांची या चित्रपटात जबरदस्त केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप भावली.
‘टॅक्सी ड्रायव्हर’च्या शुटिंगच्यावेळी देव व कल्पनामध्ये प्रेम फूलू लागले.या चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान जेवणाच्या सुटीमध्ये दिड तास हे जोडपे गायब झाले व लग्नाची नोंदणी करुन गुपचूप परतले.
मात्र,कॅपरामन याने तिच्या बोटातील अंगठी अचूक टिपली.त्याने या बाबत विचारणा करताच देव आनंद यांनी त्याला एकांतात घेऊन जाऊन गप्प बसवले.१९५७ मध्ये ‘नौ दो ग्यारह’चित्रपटानंतर,कल्पनाने तिच्या डायरीत लिहले,’माझा शेवटचा चित्रपट संपला’.
तिने अभिनय थांबवले व देव आनंदसोबत सुखी संसारात रममाण झाली.कल्पना कार्तिकची कारकीर्द ही जरी अल्प असली तरी १९५० च्या दशकात भारतीय सिनेसृष्टित तिचं योगदान खूप प्रासंगिक ठरतं.तिने तिच्या काळातील काही सर्वोत्तम दिग्दर्शकांसोबत काम केले.लग्नानंतर तिने कुटूंबाप्रति स्वत:ला समर्पित केले.१९५६ साली सुनील आनंदचा जन्म झाला तर यानंतर देविना जगात आली.हिंदू देव आनंदसोबत लग्नानंतरही ती ईसाई धर्माचे पालन करीत राहीली.
तिच्या समकालीन अभिनेत्रींसारखी ती महत्वाकांक्षी नव्हती तर प्रतिभावंत व दृढनिश्‍चयी होती.तिने चमचमणारी चित्रपटसृष्टि सहज मागे सोडली व देव आनंदसोबत संसारात सुखं मानले.यामुळेच बॉलिवुड जगतात त्यांचे हे प्रेम व लग्न चिरस्थायी प्रेमकथा मानली जाते.त्यांचे लग्न हा संपूर्ण भारतीयांसाठीच एक सुखद धक्का ठरला होता.

काही सिनेमातज्ज्ञ सांगतात,देव आनंदला सुरैय्याच्या दु:खातून बाहेर काढण्यासाठीच कल्पनाला त्याच्यासोबत काम करण्याची संधी देण्यात आली होती.देव आनंद त्यावेळी लोकप्रियतेच्या शिखरावर होते.त्यांची केशभूषा,चाल,लकब,सुहास्य,संवाद फेक,कपड्यांची स्टाईल, यावर प्रेक्षक अक्षर:शहा उड्या मारत होते.देव आनंद त्याकाळी अनेक तरुणींच्या ह्दयाचे ठोके चूकविणारे हिरो होते अशात,एका फारसी प्रसिद्ध नसलेल्या अभिनेत्रीसोबत त्यांनी अचानक लपून केलेले लग्न, ही लाखो चाहत्यांसाठी मानसिक व भावनिक धक्का देणारी बाब होती.
सुरैय्यासोबतच्या नात्यात पोळलेल्या देव आनंदने कल्पनासोबतच्या नात्यात पुन्हा ती जोखिम स्वीकारलीच नाही व नोंदणी विवाह करुन मोक़ळा झाला.
प्रेम…ही भावना स्त्री-पुरुषासाठी सारखीच असली तरी..सुरैय्या आयुष्याच्या अखेरपर्यंत देव आनंदसारठी अविवाहित राहीली,पण देव आनंदने सुरैय्यासोबत नांत संपुष्टात आल्यानंतर अवघ्या चारच वर्षांनंतर विवाह केला व दोन मुलांचा पिता देखील झाला…!
सुरैय्याच्या अखेरच्या प्रवासात देखील तो सहभागी झाला नाही यावरुन सुरैय्याने दिलेले दु:खं हे किती गहीरे होते याची कल्पना येते.तिच्या मृत्यूनंतर देखील तो धोका,देवच्या मनात कदाचित जिवंत होता अन् त्याने तिचे अखेरचे दर्शनही टाळले…!‘हर फिक्र को धूए में उडाता चला गया..मै जिंदगी का साथ निभाता चला गया!‘
सहा दशकांची चित्रपट कारकीर्द गाजवून हा महान अभिनेता ३ डिसेंबर २०११ रोजी लंदनमधील एक रुग्णालयातूनच अंतिम प्रवासासाठी निघून गेला.आपल्या ६५ वर्षाच्या कारकीर्दीत देव आनंदने ११४ चित्रपटांमध्ये अभिनय केला.अनेक चित्रपटांचे ते निर्माते व दिग्दर्शकही होते.भारत सरकारने त्यांच्या या योगदानासाठी २००१ साली पद्मभूषण पुरस्कार तर २००२ साली दादासाहेब फाळके पुरस्काराने त्याला सन्मानित केले.
आपल्या मृत्यूपत्रात लिहून ठेवल्याप्रमाणे त्याच्या कोट्यावधी भारतीय चाहत्यांना त्याच्या वृद्धत्वाचे एक ही छायाचित्र दिसू नये म्हणून त्याचे अंत्यसंस्कार त्याच्या इच्छेप्रमाणे लंदनमध्येच करण्यात आले.परिणामी,या एव्हरग्रीन,सदाबहार अभिनेत्याचे तेच एव्हरग्रीन रुप शेवटपर्यंत भारतीय चाहत्यांच्या स्मृतिपटलावर आज देखील कायम आहे….!
…………………………
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या